Winter Special Trains: महाराष्ट्रातील स्थानकांवर थांबे देताना रेल्वेचा आखडता हात – अक्षय महापदी

   Follow us on        

Konkan Railway: मध्य रेल्वेतर्फे कोकण रेल्वे मार्गावर सोडण्यात आलेल्या हिवाळी विशेष गाड्यांचे थांबे पाहून महाराष्ट्रात थांबे देताना हात आखडता घेण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. नाताळ आणि नववर्ष गोव्याची मक्तेदारी असली तरीही त्या काळात महाराष्ट्रातही पर्यटकांचे प्रमाण वाढते. तसेच शालेय सुट्ट्यांमुळे स्थानिक नागरिकही आपापल्या मूळ गावी जाण्याच्या प्रयत्नात असतात. तळकोकणात जत्रांचा हंगामही सुरू होत असल्याने चाकरमानी गावी जात असतात. सर्व नियमित गाड्यांचे आरक्षण याआधीच भरल्यामुळे प्रवाशांची मदार विशेष गाड्यांवर होती. परंतु महाराष्ट्रातील बऱ्याच तालुक्यांत थांबे न दिल्यामुळे प्रवाशांचा हिरमोड झाला आहे. याबाबत अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती, महाराष्ट्रचे सचिव अक्षय मधुकर महापदी यांनी समितीतर्फे नाराजी व्यक्त केली असून या गाड्यांना महाड, लांजा, राजापूर, वैभववाडी आणि सावंतवाडी या तालुक्यांतील रेल्वे स्थानकांवर थांबे देण्याची मागणी निवेदना द्वारे मध्य रेल्वे प्रशासनाला केली आहे.

हिवाळी पर्यटन आणि सणांच्या काळात धावणाऱ्या ०११५१/०११५२ मुंबई-करमळी, ०१४६३/०१४६४ लोकमान्य टिळक टर्मिनस-कोचुवेली, आणि ०१४०७/०१४०८ पुणे-करमळी या हिवाळी विशेष गाड्यांना महाड, लांजा, राजापूर आणि वैभववाडी या तालुक्यांत थांबा न दिल्याबद्दल आम्ही खेद व्यक्त करतो. या गाड्या या भागातील प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरू शकतात.

रत्नागिरी ते कणकवली या १११ किलोमीटरच्या भागात कोणत्याही गाडीला एकही थांबा न दिल्यामुळे या गाड्या नक्की कोणासाठी सोडल्या जातात हा प्रश्न उभा राहिला आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस कोचुवेली विशेष गाडी सावंतवाडीच्या पुढे दर १५ ते २० किलोमीटरवर थांबणार आहे. परंतु, महाराष्ट्रात थांबे देण्यास आपले प्रशासन तयार नाही. कोकण रेल्वेत २२% आर्थिक सहभाग उचलून महाराष्ट्राला काहीही मिळाले नाही या आमच्या मतावर या प्रकारांमुळे मोहोर उमटते.

कोकण रेल्वे मार्गावरील वरील सर्व तालुके हे कोकणातील आर्थिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत. सणासुदीचा कालावधी तसेच पर्यटन हंगामामुळे येथे प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. अशा परिस्थितीत या स्थानकांना थांबे न दिल्याने स्थानिक रहिवाशांची अनावश्यक गैरसोय होणार आहे.

वरील गाड्यांना वरील स्थानकांवर थांबा दिल्यास स्थानिक नागरिकांची दळणवळणाची समस्या सुटेल,पर्यटन क्षेत्राला चालना मिळेल व प्रवाशांचा वेळ आणि खर्च वाचेल.

आपण या भागातील प्रवाशांच्या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे आणि वरील गाड्यांना आरक्षण सुरु होण्यापूर्वी महाड तालुक्यातील वीर, लांजा तालुक्यातील विलवडे, राजापूर तालुक्यातील राजापूर रोड आणि वैभववाडी तालुक्यातील वैभववाडी रोड तसेच ०११५१/०११५२ मुंबई-करमळी गाडीला सावंतवाडी रोड स्थानकांवर तातडीने थांबे देण्याची व्यवस्था करावी, अशी आम्ही नम्र विनंती करतो.

आपण लवकरात लवकर याबाबत सकारात्मक निर्णय घ्याल, अशी अपेक्षा आहे असे या निवेदनात त्यांनी म्हटले आहे.

Loading

Facebook Comments Box






मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search