



मुंबई : दादर – रत्नागिरी पॅसेंजर पूर्वीप्रमाणे दादर येथूनच सोडावी तसेच दादर – सावंतवाडी पॅसेंजर ट्रेन सुरू करण्याच्या या मागण्यांसाठी शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत (उबाठा) , रत्नागिरी सिंधुदुर्गचे माजी खासदार विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज गुरुवारी पुन्हा एकदा मध्य रेल्वेच्या महाप्रबंधक कार्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांना दादर – रत्नागिरी पॅसेंजर दादर वरून पुन्हा सुरू करण्यासाठी दादर दिवा मार्गाचे तीन दिवसात पाहणी करण्याचे आश्वासन देण्यात आले.
यापूर्वी दिलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने मध्य रेल्वेच्या प्रशासनाने संपूर्ण नकारघंटा वाजवलेली होती. परंतु आजच्या बैठकीमध्ये रेल्वे कामगार सेनेचे श्री. संजय जोशी, श्री बाबी देव यांनी दादर वरून गाडी कशी सोडता येईल आणि या गाडीमुळे इतर गाड्यांवर कोणताही परिणाम होणार नाही, हे अभ्यासाअंती मध्य रेल्वेचे महाप्रबंधक श्री.मीना व उपस्थित सर्व अधिकारी यांच्यासमोर मांडले. शेवटी श्री. मीना यांनी श्री. संजय जोशी आणि श्री. बाबी देव यांनी सुचविलेल्या पर्यायाबाबत त्यांच्याबरोबर दादर ते दिवा पर्यंतच्या मार्गाची पाहणी येत्या तीन दिवसात करावी आणि अहवाल सादर करावा, असे आदेश दिले.
शिष्टमंडळामध्ये खासदार – शिवसेना नेते श्री अरविंद सावंत, शिवसेना नेते माजी खासदार श्री. विनायक राऊत, श्री अरुणभाई दुधवडकर, आमदार श्री महेश सावंत, श्री.संतोष शिंदे, श्री. बाबी देव, श्री.संजय जोशी तसेच कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.