नवी दिल्ली: नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग (NCERT) ने आपल्या शालेय अभ्यासक्रमातून १८ व्या शतकातील मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शवणारा नकाशा हटवल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, हा नकाशा हटवण्यासाठी कोणताही ऐतिहासिक आधार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेण्यात आला नसल्याचे खुद्द NCERT ने एका RTI (माहितीचा अधिकार) उत्तरात मान्य केल्याचा दावा समाज माध्यमांवर केला जात आहे.
NCERT च्या पाठ्यपुस्तकात १७५९ सालातील मराठा साम्राज्याचा नकाशा समाविष्ट होता. या नकाशामध्ये उत्तरेत पेशावर (आजचे पाकिस्तान) पासून ते दक्षिणेत तंजावरपर्यंत मराठ्यांचे वर्चस्व स्पष्टपणे दिसत होते. ‘अटक ते कटक’ असा हा गौरवशाली इतिहास विद्यार्थ्यांच्या मनातून पुसून टाकण्याचा हा राजकीय कट असल्याचा आरोप मराठा इतिहासप्रेमींकडून केला जात आहे.
RTI मधून झालेला धक्कादायक खुलासा
या प्रकरणावर माहितीच्या अधिकाराखाली (RTI) प्रश्न विचारण्यात आले होते की, हा नकाशा हटवण्यासाठी कोणते ऐतिहासिक पुरावे वापरले किंवा कोणत्या तज्ज्ञांनी हा सल्ला दिला? यावर उत्तर देताना NCERT ने म्हटले आहे की, “यासंबंधीची कोणतीही माहिती किंवा कागदपत्रे त्यांच्या फाईल्समध्ये उपलब्ध नाहीत.” कोणत्याही पुराव्याशिवाय हा नकाशा का हटवला गेला, असा सवाल आता उपस्थित होत आहे.
या प्रकरणातील आरोपांचे स्वरूप अत्यंत गंभीर असून प्रामुख्याने दबावाचे राजकारण आणि हेतुपुरस्सर दुर्लक्ष यांवर बोट ठेवण्यात आले आहे. आंदोलकांचा असा दावा आहे की, काही तक्रारदार गट आणि तथाकथित राजघराण्यांच्या राजकीय दबावाला बळी पडून NCERT ने मराठा साम्राज्याचा नकाशा हटवण्याचा हा चुकीचा निर्णय घेतला आहे. त्यातच, ज्येष्ठ इतिहासकार गजानन भास्कर मेहेंदळे यांच्या निधनानंतर NCERT च्या समितीवर एकाही तज्ज्ञ मराठा इतिहासकाराची नियुक्ती करण्यात आली नाही, ज्यामुळे समितीमध्ये इतर प्रादेशिक लॉबींचा प्रभाव वाढला आणि मराठा इतिहासाला दुय्यम स्थान देण्याचे प्रयत्न सुरू झाले, असा आरोप केला जात आहे. हा केवळ तांत्रिक किंवा शैक्षणिक बदल नसून, मराठ्यांनी संपूर्ण भारतावर मिळवलेले प्रभुत्व विद्यार्थ्यांच्या स्मृतीतून पुसून टाकण्याचा आणि पर्यायाने मराठा अस्मितेवर घाला घालण्याचा हा एक मोठा राजकीय कट असल्याचे अभ्यासकांचे आणि इतिहासप्रेमींचे म्हणणे आहे.
या निर्णयाच्या विरोधात समाज माध्यमांवर #SaveMarathaHistory ही मोहीम जोरात सुरू झाली आहे. खासकरून मराठी एकीकरण समितीने यावर मोठा आक्षेप घेतला आहे. मराठा साम्राज्याने देशाला परकीय आक्रमकांपासून वाचवले, तोच इतिहास पाठ्यपुस्तकातून गायब करणे हे ऐतिहासिक सत्याचा अपलाप करणारे आहे, असे मत व्यक्त केले जात आहे.
NCERT ने हा नकाशा पुन्हा समाविष्ट करावा आणि इतिहासाची छेडछाड थांबवावी, अशी मागणी इतिहासप्रेमी आणि विविध संघटनांकडून केली जात आहे.


