मुंबई: मुंबई मेट्रो लाईन १४ (कांजूरमार्ग–बदलापूर) प्रकल्पाला आंतरराष्ट्रीय स्तरावरून मोठा पाठिंबा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, OPEC Fund for International Development (OFID) या आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थेच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाने गुरुवारी MMRDA चे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी, IAS यांची भेट घेतली. या बैठकीत OFID ने मेट्रो लाईन १४ (कांजूरमार्ग–बदलापूर) तसेच इतर मेट्रो प्रकल्पांच्या अर्थसहाय्यासाठी ठाम रस व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे, OFID सध्या MMRDA च्या मेट्रो लाईन ५ (ठाणे–भिवंडी–कल्याण) या प्रकल्पात प्रणाली घटकांसाठी वित्तपुरवठा करणारा भागीदार आहे.
शिष्टमंडळात अल शायमा अल शैबी (उपाध्यक्षा – सार्वजनिक क्षेत्र संचालन), सोमनाथ बसु (संचालक – सेक्टर्स अँड थीम्स) आणि तोशिफुमी काझाओका (वरिष्ठ देश व्यवस्थापक) यांचा समावेश होता. यावेळी OFID ने ‘मुंबई 3.0’ तसेच महत्त्वाच्या पाणीपुरवठा प्रकल्पांमध्येही वित्तपुरवठ्याबाबत उत्सुकता दर्शवली असून, यामुळे मुंबई महानगर प्रदेशातील पायाभूत सुविधा विकासाला नवी गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


