रेल्वे प्रवासासाठी ज्येष्ठ नागरिकांना पूर्वी असलेल्या सवलती सुरू करा- खासदार संजय दीना पाटील

   Follow us on        

​नवी दिल्ली: ​रेल्वे प्रवासादरम्यान ज्येष्ठ नागरिकांना मिळणारी सवलत पुन्हा चालू करावी अशी मागणी खासदार संजय दीना पाटील यांनी काल लोकसभेत केली.

मुंबईची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनमधील वाढती गर्दी आता प्रवाशांच्या जीवावर बेतत आहे. या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधताना खासदार संजय दीना पाटील यांनी लोकसभेत मुंबई आणि उपनगरातील लोकल गाड्यांच्या फेऱ्या तातडीने वाढवण्याची मागणी केली. प्रवाशांची वाढती संख्या आणि उपलब्ध गाड्यांचे प्रमाण यात मोठी तफावत असल्याने सामान्य मुंबईकरांचे हाल होत असून, रेल्वे प्रशासनाने यावर तातडीने उपाययोजना कराव्यात, असे त्यांनी ठणकावून सांगितले.

​रेल्वे प्रवासादरम्यान ज्येष्ठ नागरिकांना मिळणारी सवलत बंद केल्याबद्दल खासदार पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. कोरोना काळापासून ही सवलत बंद असल्याने ज्येष्ठ नागरिकांच्या खिशाला मोठी कात्री लागत आहे. ही सवलत केवळ आर्थिक मदत नसून तो त्यांचा सन्मान आहे, त्यामुळे केंद्र सरकारने कोणताही विलंब न लावता ज्येष्ठ नागरिकांची रेल्वे सवलत तात्काळ बहाल करावी, जेणेकरून त्यांना या उतारवयात आर्थिक दिलासा मिळेल, अशी मागणी त्यांनी लावून धरली.

​सर्वसामान्य जनतेच्या धार्मिक भावनांचा विचार करून रेल्वेने तीर्थक्षेत्रांसाठी विशेष योजना आखावी, अशी सूचनाही त्यांनी यावेळी मांडली. अयोध्या, वाराणसी आणि वैष्णोदेवी यांसारख्या पवित्र तीर्थक्षेत्रांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. अशा प्रवाशांसाठी रेल्वेने ‘स्वस्त दरातील विशेष टुरिस्ट पॅकेज’ सुरू केल्यास सामान्य नागरिकांना कमी खर्चात आणि सुरक्षितपणे देवदर्शन करणे शक्य होईल, असे पाटील यांनी नमूद केले.

​शेवटी, मुंबईतील उपनगरीय रेल्वे सेवा अधिक कार्यक्षम करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. केवळ घोषणा न करता जमिनीवर प्रत्यक्ष बदल दिसायला हवेत, तरच मुंबईकरांचा प्रवास सुरक्षित आणि सुखाचा होईल. रेल्वे अर्थसंकल्पात आणि नियोजनात मुंबईच्या लोकल प्रवाशांच्या मागण्यांना प्राधान्य मिळावे, अशी आग्रही भूमिका त्यांनी मांडली.

Facebook Comments Box
   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search