मालवण: भाविकांची आणि प्रवाशांची दीर्घकाळापासूनची मागणी पूर्ण झाली असून, मालवण-आचरा-अक्कलकोट या नवीन बस फेरीचा बुधवारी सायंकाळी मालवण येथून मोठ्या उत्साहात शुभारंभ करण्यात आला. ही बस आचरा मार्गे जाणार असल्याने कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील धार्मिक स्थळांना जोडणारा एक महत्त्वाचा मार्ग प्रवाशांसाठी खुला झाला आहे.
मालवणहून सुटलेली बस आचरा येथे पोहोचताच स्थानिक ग्रामस्थांनी आणि लोकप्रतिनिधींनी बसचे जल्लोषात स्वागत केले. आचरा सरपंच जेरॉन फर्नांडिस यांच्या हस्ते नारळ वाढवून या बस फेरीचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला. यावेळी ‘गणपती बाप्पा मोरया’ आणि ‘स्वामी समर्थांच्या’ जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता.
वेळापत्रक आणि मार्ग
आचरा बस नियंत्रक दिनेश साळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, या बस फेरीचे नियोजन खालीलप्रमाणे असेल:
मालवणहून सुटण्याची वेळ: दुपारी ३:४५ वाजता.
आचरा येथून सुटण्याची वेळ: सायंकाळी ४:३० वाजता.
प्रवास मार्ग: कणकवली, गगनबावडा, कोल्हापूर, पंढरपूर, सोलापूर मार्गे अक्कलकोट.
परतीचा प्रवास: दुसऱ्या दिवशी सायंकाळी ६:३० वाजता अक्कलकोट येथून ही बस पुन्हा मालवणच्या दिशेने रवाना होईल.
या उद्घाटन प्रसंगी माजी सरपंच चंदन पांगे, संतोष मिराशी, अर्जुन बापर्डेकर, जयप्रकाश परुळेकर, पंकज आचरेकर, अशोक कांबळी, अशोक बागवे, दिलीप कावले, प्रवीण आचरेकर, निवृत्ती आचरेकर उपस्थित होते. तसेच बसचे चालक ए. एन. गव्हाणे, वाहक एस. डी. कांबळे आणि आचरा कंट्रोलर दिनेश साळकर यांचाही सत्कार करण्यात आला.
ही बस सेवा सुरू करण्यासाठी माजी सरपंच चंदन पांगे यांनी विशेष पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना निवृत्ती आचरेकर, प्रवीण आचरेकर, महेंद्र मांजरेकर, नरेश तारकर, विजय पांगे आणि परिसरातील सर्व ग्रामपंचायतींनी मोलाचे सहकार्य केले.
या नवीन बस सेवेमुळे आता मालवण आणि आचरा परिसरातील भाविकांना पंढरपूर आणि अक्कलकोट दर्शनासाठी थेट प्रवास करणे सोयीचे होणार आहे.


