मुंबई : पुन्हा एकदा मध्य रेल्वे प्रशासनाने ‘स्पष्टीकरण’ देत रत्नागिरी पॅसेंजर गाडीला लोकल विलंबाचे कारण ठरवले आहे. दिवा क्रॉसिंगवर मोठी अडचण निर्माण होत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र हे स्पष्टीकरण पूर्णपणे अस्वीकार्य असल्याचे मत प्रवाशांनी व्यक्त केले आहे.
मध्य रेल्वेचे ‘स्पष्टीकरण’
दादर – रत्नागिरी गाडी बंद करण्यामागे रेल्वेने आपले स्पष्टीकरण दिले आहे. दादर रत्नागिरी ही गाडी कोरोनानंतर सुरू करताना दादर स्थानकावरून दिवा स्थानकामध्ये शिफ्ट केली गेली होती. याचे मुख्य कारण दिवास्थानकामध्ये क्रॉसिंग करत असताना इतर लोकल ट्रेनला होणारा उशीर हे होते. ही गाडी ज्यावेळेस दिवास्थानकामध्ये क्रॉसिंग करते त्यावेळेस सुमारे सात ते आठ लोकल गाड्यांना थांबावे लागत होते. त्यातून लोकल सेवेवर दुष्परिणाम होत होता, असे रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितले.
मात्र हे स्पष्टीकरण अस्वीकार्य असून उत्तर भारतात जाणार्या गाड्यांना प्राधान्य दिल्यानंतर केलेली सारवासारव असल्याचे मत प्रवासी संघटनांनी व्यक्त केले आहे.
कोरोना पूर्व काळात मागील २० वर्षांपासून ही रत्नागिरी पॅसेंजर गाडी नियमित धावत होती. त्या काळात कधीही लोकल सेवेवर एवढा ‘मोठा’ परिणाम झाला नव्हता. आता अचानक काय बदलला? रेल्वे प्रशासनाला रात्रीच्या अंधारात काय ‘नवीन’ समस्या दिसली?
सर्वात मोठा प्रश्न – दिवा स्टेशनचा!
दिवा स्टेशनवरून मुंबईकडे येणाऱ्या गाड्यांसाठी ट्रॅक क्रमांक ५ आणि ६ पूर्णपणे मेल आणि एक्सप्रेस गाड्यांसाठी राखीव आहेत. मग लोकल गाड्यांना या रत्नागिरी पॅसेंजरमुळे कशी अडचण येते? एखादी पॅसेंजर गाडी क्रॉसिंगवर थांबली तरी ती ५-६ ट्रॅकवरच राहते ना? लोकलना तर वेगळ्या ट्रॅकवरून मार्ग मिळतो. मग ही ‘मोठी अडचण’ कुठून निर्माण झाली?
कल्याण स्टेशनची सत्यकथा…
कल्याण स्टेशनवर तर रोज दोन्ही बाजूने (मुंबई-कल्याण आणि कल्याण-पुढे) गाड्या एकाच वेळी मर्ज होतात. तेव्हा लोकल गाड्या खोळंबून बाजूला ठेवल्या जातात. तरीही त्या गाड्या चालू राहतात, वेळेवर सुटतात. प्रवासी तक्रार करतात पण रेल्वे प्रशासनाला ते ‘नॉर्मल’ वाटते. मग दिवा स्टेशनवर एका पॅसेंजर गाडीमुळे एवढा गोंधळ का?
पुन्हा एकदा रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना ‘समजूत’ घालण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र प्रवासी आता म्हणतात – “२० वर्षे चाललेल्या गाडीला अचानक ‘समस्या’ का? ट्रॅक ५-६ मेल-एक्सप्रेससाठी राखीव असताना लोकलना अडथळा कसा? कल्याणात मर्जिंग होऊनही लोकल चालतात, मग दिव्यात काय वेगळे आहे?”
मनसेचा अप्रत्यक्ष पण स्पष्ट संदेश
राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मनसेने रेल्वे प्रशासनाकडे प्रतिनिधी पाठवून तातडीने गाडी पूर्ववत दादरपर्यंत सुरू करण्याची मागणी केली. रेल्वेने लोकल विलंबाचे कारण सांगत गाडी बंद/मर्यादित ठेवण्याचा निर्णय घेतला असला तरी मनसे म्हणते – कोकणवासीयांच्या सोयीसाठी ही गाडी आवश्यक आहे, आणि तिच्या जागी उत्तर भारतात जाणाऱ्या गाड्या प्राधान्य देणे हे मराठी माणसावर अन्याय आहे.
मागील २० वर्षे ही गाडी चालू होती, तेव्हा लोकलना एवढी अडचण नव्हती. आता अचानक “लोकल विलंब” म्हणून तिला लक्ष्य करणे हे रेल्वेचे तर्कशास्त्र मनसेला मान्य नाही. दिवा स्टेशनवर ५-६ ट्रॅक मेल-एक्सप्रेससाठी राखीव असताना लोकलना कशी समस्या येते, हाही प्रश्न मनसेने केला आहे.
मनसेने सांगितले की, मागणी पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन आणि ट्रेन रोखण्याची कारवाई केली जाईल. हा इशारा रेल्वे आणि केंद्र सरकारला थेट आहे.


