नवी दिल्ली: भारतीय रेल्वेने रेल्वे ट्रॅक ओलांडताना होणाऱ्या अपघातांना आळा घालण्यासाठी देशभरात “मिशन मोड”मध्ये अंडरपास (भुयारी मार्ग) बांधण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला आहे. ज्या ठिकाणी रेल्वे रुळाच्या एका बाजूला वस्ती आणि दुसऱ्या बाजूला शेती, शाळा, स्मशानभूमी किंवा इतर आवश्यक ठिकाणे आहेत, अशा ठिकाणी हे अंडरपास उभारले जाणार आहेत. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी अधिकाऱ्यांना अशा ठिकाणी प्राधान्याने काम करण्याचे निर्देश दिले आहेत.
या अंडरपासची रचना अशी केली जाणार आहे की नागरिकांना सायकल, दुचाकी किंवा अन्य आवश्यक वस्तूंसह सहजपणे मार्ग वापरता येईल. यामुळे लोकांना रेल्वे रुळ ओलांडण्याची गरज कमी होईल आणि अपघातांचे प्रमाण लक्षणीयरीत्या घटण्यास मदत होईल. पुढील ५ ते ६ वर्षांत देशभरातील ही समस्या सोडवण्याचे उद्दिष्ट रेल्वे प्रशासनाने ठेवले आहे.
विशेष म्हणजे, हे अंडरपास अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून केवळ १२ तासांत तयार केले जाणार आहेत. यासाठी आधीच प्री-फॅब्रिकेटेड (पूर्वनिर्मित) संरचना तयार करून त्या ठिकाणी नेल्या जातील. त्यानंतर रेल्वे ट्रॅक काही काळासाठी बंद करून (ब्लॉक घेऊन) ट्रॅक कापून ही संरचना बसवली जाईल आणि अवघ्या १२ तासांत काम पूर्ण केले जाईल. यामुळे प्रवाशांना कमीत कमी अडथळा येईल आणि काम जलदगतीने पूर्ण होईल.


