कराड: कराड ते चिपळूण दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पाटण येथील धांडे पुलाचे बांधकाम आणि बाजारपेठेतील रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यासाठी हा राष्ट्रीय महामार्ग पुढील दोन महिने म्हणजेच तब्बल ६० दिवस वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांनी यासंदर्भात अधिकृत अधिसूचना जारी केली असून, हा मार्ग २७ मार्च रोजी रात्री १२ वाजल्यापासून ते २७ मे रात्री १२ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, जेणेकरून पावसाळ्यात वाहतुकीचा खोळंबा होणार नाही.
महामार्ग बंद असल्याने प्रवाशांच्या सोयीसाठी वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. कराड आणि उंब्रजकडून चिपळूणकडे जाणारी सर्व वाहने आता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ मार्गे पाचवड, कोकरूड, मलकापूर आणि संगमेश्वरमार्गे चिपळूणला पोहोचतील. प्रवासाचे नियोजन करताना वाहनधारकांनी या बदलाची नोंद घेऊन सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


