मुंबई: उन्हाळी सुट्ट्यांमधील प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता, कोकण रेल्वेने मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते मडगाव (गोवा) दरम्यान चालवल्या जाणाऱ्या साप्ताहिक ‘उन्हाळी विशेष’ ट्रेनच्या (०१०१९/०१०२०) वेळापत्रकात महत्त्वपूर्ण बदल केला आहे. पूर्व नियोजित वेळापत्रकानुसार ही गाडी ५ एप्रिल २०२६ पासून सुरू होणार होती, मात्र आता ही सेवा १२ एप्रिल २०२६ पासून प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल. ही विशेष रेल्वे १२ एप्रिल ते ७ जून २०२६ या कालावधीत दर रविवारी चालवली जाणार आहे.
फेर्यांमध्ये केलेल्या कपातीमुळे प्रवाशांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. याआधीच कोकण रेल्वे मार्गावर उन्हाळी सुट्ट्यांसाठी पुरेशा गाड्यांची घोषणा केली नसल्याचा सूर होता. आता ही गाडी ऐन हंगामात जेव्हा चाकरमानी गावी जाण्याची योजना आखतात तेव्हाच रद्द केली गेली असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे.
सुधारित वेळापत्रकानुसार, गाडी क्रमांक ०१०१९ मुंबई सीएसएमटीहून दर रविवारी मध्यरात्री ००:५५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी १५:१५ वाजता मडगावला पोहोचेल. परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक ०१०२० मडगावहून रविवारी सायंकाळी १६:०० वाजता रवाना होईल आणि दुसऱ्या दिवशी (सोमवारी) पहाटे ०३:५० वाजता मुंबईत पोहोचेल. या विशेष गाडीचे बुकिंग १ एप्रिल २०२६ पासून आयआरसीटीसीच्या (IRCTC) संकेतस्थळावर सुरू होणार आहे. तरी प्रवाशांनी या बदललेल्या तारखांची नोंद घेऊन आपल्या प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन कोकण रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.


