मुंबई: राज्य शासनाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ असलेल्या शक्तिपीठ महामार्गाच्या सुधारित आखणीला अधिकृत मंजुरी दिली आहे. या निर्णयानुसार आता महामार्गाची एकूण लांबी ८५६ किलोमीटर झाली असून, यामध्ये सातारा जिल्ह्याचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. फेब्रुवारी २०२४ च्या प्रस्तावानुसार हा महामार्ग ८०२ किलोमीटरचा होता, मात्र सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील बागायती जमिनींच्या संपादनाला शेतकऱ्यांनी केलेल्या तीव्र विरोधामुळे या प्रकल्पाच्या आखणीत मोठे बदल करण्यात आले आहेत.
बदललेली जिल्हावार आखणी:
सुधारित आराखड्यानुसार, वर्धा, यवतमाळ, बीड आणि लातूर या जिल्ह्यांतील मार्गामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मात्र, नांदेड, हिंगोली, परभणी, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमधील मार्गामध्ये महत्त्वाच्या सुधारणा करण्यात आल्या आहेत. सातारा जिल्ह्याचा समावेश झाल्याने आता हा मार्ग सातारा आणि सांगलीतून कोल्हापूरमार्गे चंदगड आणि तेथून दोडामार्ग तालुक्यातील बांद्याजवळून थेट गोव्यात प्रवेश करेल.
सोलापूर आणि सातारा जिल्ह्यातील मार्ग:
सोलापूर जिल्ह्यातील पूर्वीच्या आखणीत मोठे बदल झाले असून उत्तर सोलापूर आणि सांगोला हे तालुके आता या मार्गातून वगळण्यात आले आहेत. त्याऐवजी माढा आणि माळशिरस या नवीन तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. बार्शी, मोहोळ आणि पंढरपूर तालुक्यातील बाधित गावांच्या यादीतही काही बदल झाले आहेत. सोलापूरच्या गारवडमधून हा महामार्ग साताऱ्यातील कारखेल येथे प्रवेश करेल. तेथून दिवड, कुकुडवाडवरून खटावमधील पडळनंतर मायणीजवळून तो सांगली जिल्ह्यात मार्गस्थ होईल.
धार्मिक पर्यटनाला चालना:
या नवीन आखणीमुळे सातारा जिल्ह्यातील शिखर शिंगणापूर आणि गोंदवले बुद्रुक ही दोन महत्त्वाची तीर्थक्षेत्रे महामार्गाशी जोडली जाणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या रोषाचा फटका बसू नये म्हणून हा प्रकल्प मागे पडला होता, मात्र आता सुधारित आखणीच्या शासन निर्णयामुळे या महामार्गाच्या कामाला पुन्हा गती मिळण्याचे संकेत मिळत आहेत.


