नाशिक: नाशिक ते कल्याण दरम्यान लोकल रेल्वे सेवा सुरू करण्याच्या दीर्घकालीन मागणीवर केंद्र सरकारने पुन्हा एकदा तांत्रिक कारणांचे बोट दाखवत ही सेवा सध्यातरी शक्य नसल्याचे स्पष्ट केले आहे.
खासदार राजाभाऊ वाजे यांनी लोकसभेत यासंदर्भात रेल्वे मंत्रालयाला जाब विचारला असता, मंत्रालयाने दिलेल्या उत्तरामुळे नाशिककरांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. कसारा ते इगतपुरी या घाट विभागातील बोगद्यांची रुंदी कमी असून, मुंबई उपनगरीय लोकल गाड्यांची रुंदी जास्त असल्यामुळे या मार्गावर लोकल चालवणे सध्या कठीण असल्याचे रेल्वेने म्हटले आहे. या तांत्रिक अडचणींमुळे नाशिक-कल्याण लोकलचे स्वप्न पुन्हा एकदा अधांतरी राहिले असून, खासदार वाजे यांनी केंद्र सरकार नाशिककरांना ‘एप्रिल फूल’ बनवत असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
या मार्गावर सध्या ३६ उपनगरीय गाड्या धावत असल्या तरी, नवीन सेवा सुरू करणे हे मार्गाची क्षमता, उपलब्ध पाथ, रोलिंग स्टॉक आणि पायाभूत सुविधांवर अवलंबून असल्याचे रेल्वे मंत्रालयाचे म्हणणे आहे. मात्र, नाशिक ते कल्याण या प्रवासासाठी हजारो विद्यार्थी, शेतकरी, लघु व्यापारी आणि रोजंदारी करणारे कामगार दररोज प्रवास करतात, त्यांच्यासाठी ही केवळ सुविधा नसून एक अत्यंत आवश्यक गरज आहे. एक्स्प्रेस गाड्या सर्व स्थानकांवर थांबत नसल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत.
या तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी सरकार कोणते ठोस पाऊल उचलणार किंवा नवीन तंत्रज्ञानाचा वापर करणार का, याबाबत मंत्रालयाने कोणतीही स्पष्ट भूमिका मांडलेली नाही. त्यामुळे ही रेल्वे सेवा नेमकी कधी सुरू होणार, हा प्रश्न अद्यापही अनुत्तरितच राहिला आहे.


