Konkan Railway Track Doubling | कोकण रेल्वे यंदा आपले रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे करत आहे. ०१ मे १९९८ रोजी तत्कालीन प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांनी कोकण रेल्वे राष्ट्राला समर्पित केली होती. या २५ वर्षात मुंबई ते आपले गाव या प्रवासासाठी कोकणवासीयांची नेहमीच कोकण रेल्वेला नेहमीच पहिली पसंती राहिली आहे. कोकणरेल्वेने सुद्धा आपल्या सेवेत खूप चांगल्या सुधारणा केल्या आहेत.
सुरवातीच्या काळात प्रत्येक दिवशी सरासरी १७ गाड्या या मार्गावर धावत होत्या. आता प्रवाशांची संख्या वाढली त्यामुळे गाड्यांची संख्याही वाढली त्यामुळे ही सरासरी वाढून प्रत्येक दिवशी ५० एवढी झाली आहे. त्याबरोबर १७ मालगाड्या रोज धावतात. स्थानकांची संख्याही वाढून ४९ ची ६८ एवढी झाली आहे.
एवढ्या गाड्या वाढवूनसुद्धा अजून गाड्यांची मागणी होत आहे. कारण या मार्गावर धावणाऱ्या गाड्यांना तुफान गर्दी होत आहे. हंगामाच तर सोडाच तर पावसाचे एक दोन महिने सोडले बाकीच्या दिवशी आरक्षित तिकीट मिळविण्यास मोठी कसरत करावी लागत आहे. पुरवठा कमी आणि मागणी जास्त या मुळे आरक्षणात संधीसाधू दलालांचा सुळसुळाट आहे. मजबुरी असल्याने या दलालांकडून दुप्पट भावात तिकीटे खरेदी करावी लागतात.
जनरल डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे दुःख तर विचारूच नका. या कोच मधून प्रवास करणे म्हणजे एक दिव्यच म्हणावे लागेल. सीट भेटली ते नशीबवान म्हंटले तरीही खचाखच भरलेल्या डब्यातून टॉयलेट ला जाणे पण अशक्य होते. त्यात जागेसाठी आणि इतर कारणांसाठी होणारी भांडणे पण सहन करावी लागतात. अशा परिस्थितीत ८/१० तास प्रवास करताना जीव नकोसा होतो. हंगामात तर आरक्षित डब्यांची स्थिती अशीच जनरल डब्यांसारखी होते.
या कारणांनी या मार्गावर नवीन गाड्या सोडण्यासाठी नेहमीच मागणी होत आहे. मात्र नेहमीच या मागणीला लाल कंदील दाखवला गेला आहे. कारण त्यांच्यामते कोकण रेल्वे पूर्ण क्षमतेने धावत असून या मार्गावर आता कोणतीही नवीन गाडी सुरू करता येणे शक्य नाही.
रेल्वे रूळ दुहेरीकरण – एक काळाची गरज
कोकण रेल्वे वर गेल्या २५ वर्षात गाड्या वाढल्यात, स्थानके वाढली आणि प्रवासी संख्या पण वाढली. मात्र रेल्वे रूळ दुहेरीकरणाचा प्रश्नावर रेल्वे प्रशासनाने प्राधान्य दिले नसल्याचे दिसत आहे. मुंबई ते रोहा या मार्गावर आधीच रेल्वे रूळ दुहेरीकरण झाले आहे. मात्र हा मार्ग मध्य रेल्वेच्या अखत्यारीत येतो. तर रोहा या स्थानकापासून पुढे कोकण रेल्वेमार्ग चालू होतो. गेल्या २५ वर्षात फक्त ४९ किलोमीटर कोकण रेल्वेमार्गावर दुहेरीकरण झाले आहे. रोहा ते वीर या स्थानकांदरम्यान हे दुहेरीकरण ऑगस्ट २०२१ रोजी पूर्ण करण्यात आले आहे. या प्रकल्पाला एकूण ५५० कोटी एवढा खर्च आला होता. मात्र त्यापुढील रेल्वे रुळाच्या दुहेरीकरणाबाबत अजूनही काही वाच्यता रेल्वे प्रशासनाकडून केली जात नाही आहे.
दिवा सावंतवाडी या गाडीप्रमाणे वसई – सावंतवाडी अशी गाडी चालू करावी अशी मागणी होत आहे. ही मागणी रास्त आहे. कारण सध्या या मार्गावर चालणाऱ्या गाड्यांच्या जनरल डब्यांत तुफान गर्दी होत आहे. ही गर्दी कमी करण्यासाठी जनरल गाडीची गरज आहे. अनेक स्थानके अशीही आहेत जेथे प्रवाशांचा प्रतिसाद मिळत असूनही तेथे महत्वाच्या गाडयांना थांबे दिले नाही आहेत. दुहेरीकरण झाल्यास नवीन गाड्या सोडून अशा स्थानकांना प्राधान्य देता येईल.
पर्यटनवृद्धी साठी
कोकणाला लाभलेल्या निसर्गसंपन्नतेमुळे कोकण भाग पर्यटनासाठी ओळखला जातो. सिंधुदुर्ग जिल्ह्याला पर्यटन जिल्हा म्हणून या अगोदरच मान्यता मिळाली आहे. विस्टाडोम कोच सारख्या सुविधा देऊन रेल्वे प्रशासन आपल्या परीने प्रयत्न करत आहे यावर वाद नाही. मात्र येथे पर्यटनासाठी येण्यासाठी रेल्वेची तिकिटे भेटणे मुश्किल होत असल्याने त्याचा पर्यटनावर परिणाम होत आहे.
पुण्यातील कोंकणासीयांसाठी
कोकण रेल्वेचा फायदा पुण्यातील कोंकणवासीयांना पाहिजे तसा झाला नाही आहे. सध्या काही मोजक्याच लांब पल्ल्याच्या गाड्या पुण्यावरून कोकण रेल्वे मार्गावरून धावतात. या गाड्या कोकणातील मोजकेच थांबे घेत असल्याने आणि या गाडयांना होणाऱ्या गर्दीमुळे या गाड्या पुणेकरांसाठी असूनही नसल्यासारख्या आहेत. पुण्यावरून सावंतवाडी पर्यंत एका गाडीची प्रतीक्षा पुणेकरांना आहे. मागेच हुजूर साहिब नांदेड पनवेल एक्सप्रेसचा विस्तार रत्नागिरी पर्यंत करण्याची मागणी प्रवाशांकडून झाली होती. रेल्वे रूळ दुहेरीकरणामुळेच अशा मागण्या पूर्ण करणे शक्य होणार आहे.
वरील सर्व मुद्द्यांचा विचार करता कोकणरेल्वे पूर्ण क्षमतेने कार्यरत करायची असेल तर रेल्वे रुळांचे दुहेरीकरण करणे ही काळाची गरज असल्याचे सिद्ध होत आहे. हे काम सोपे नसून मोठ्या प्रमाणात निधी मिळवणे आवश्यक आहे, प्रबळ राजकीय इच्छाशक्तीची गरजही आहे. रेल्वे प्रशासन आणि राज्य सरकारने त्यात रस दाखविला गेला पाहिजे. कोकणातील जनतेने सुद्धा सरकारवर यासाठी दबाव टाकणे आवश्यक आहे.