सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठही तालुक्यातील ३७ गावांमध्ये १ कोटी ६० लाख रुपये खर्च करून सौर हायमास्ट मंजूर केले गेले आहेत. जिल्हा वार्षिक अपारंपरिक ऊर्जा विकास कार्यक्रमांतर्गत हे सौर हायमास्ट मंजूर करण्यात आले आहेत.
जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण २०२४-२५ या आर्थिक वर्षात अपारंपरिक ऊर्जा विकास कार्यक्रमांतर्गत सौर पथदीप मंजूर करण्याबाबत प्रस्ताव ग्रामपंचायत विभागाकडून दिला होता. जिल्ह्यातील आठही तालुक्यातील ३७ गावांमध्ये हे हायमास्ट मंजूर झाले आहेत. त्यामध्ये सावंतवाडी तालुक्यातील शेर्ले-कापाईवाडी सार्वजनिक गणेशोत्सव ठिकाणी, पाणलोस रवळनाथ माऊली मंदिर, चौकूळ शंकर मंदिर, इन्सुली क्षेत्रफळ कोठावळे बांध हायवे सर्कलजवळ, वेंगुर्लेतील शेळपी मुंडयेवाडी, भोगवे शेवटचा स्टॉप जवळ, ग्रामपंचायत परबवाडा इमारत, ग्रामपंचायत खडपीवाडी कोचरा वेतोबा मंदिरजवळ, निवती किनारा, आडेली कांबळेवीर नेमळे रस्त्याजवळ (प्रभू खानोलकर घरानजीक), मालवणातील शिरवडे देव सिद्ध गणेश मंदिर, देव गांगेश्वर मंदिर, तळगाव सातेरी मंदिर खांदवाडी, चौके देवी भराडी मंदिर, आंबेरी वाक येथे, दोडामार्गातील झोळंबे रबेलवाडी प्राथमिक शाळेजवळ, गावठणवाडी सातेरी मंदिर देवस्थानसमोर, श्रीरामवाडी मासे लिलाव केंद्राजवळ, झोळंबे वरचीवाडी, कोलझर टेंबवाडी येथे, देवगड तालुक्यातील सौंदळे ग्रामपंचायत, कुडाळातील सोनवडे तर्फ कळसुली दुर्गानगर ब्राह्मण देव मंदिर तळी, वेताळ बांबर्डे वाघ भाटले वाडी वाघोबा मंदिर, खुर्द मायदेश्वर मंदिरनजीक, पिंगळी भद्रकाली मंदिर, कुलस्वामिनी तुळजाभवानी मंदिर अंदुर्ले खिंड येथे,
कणकवलीतील हळवल श्रीराम मंदिर, नडगिवे ग्रामपंचायत आदी ३७ कामांना मंजुरी दिली आहे. याबाबतचे आदेश बांधकाम आणि संबंधित ग्रामपंचायतींना पाठविले आहेत. लवकरच या कामांना सुरुवात होईल, यादृष्टीने योग्य कार्यवाही करावी, अशाही सूचना दिल्या आहेत.
Railway News: प्रवाशांची अतिरिक्त गर्दी टाळण्यासाठी मध्य रेल्वेने उन्हाळी हंगामासाठी काही विशेष गाड्यांच्या फेऱ्यांची कालावधी डिसेंबरपर्यंत विस्तारित करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये एकूण २२ विशेष गाड्यांचा अतिरिक्त फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत.
या यादीत कोकण रेल्वे मार्गावरील आठवड्यातून दोन दिवस चालविण्यात येणार्या ०११३९/०११४० नागपूर-मडगाव- नागपूर या गाडीचा समावेश आहे. या गाडीची सेवा या वर्षाच्या सप्टेंबर अखेरीस संपणार होती. मात्र तिची सेवा डिसेंबर अखेरपर्यंत वाढविण्यात आली आहे. दोन्ही बाजूने प्रत्येकी २६ प्रमाणे या गाडीच्या एकूण ५२ फेऱ्या होणार आहेत.
गाडी क्रमांक ०११३९ नागपूर-मडगाव ही विशेष गाडी दिनांक २८ डिसेंबर २०२४ पर्यंत चालविण्यात येणार असून गाडी क्रमांक ०११४० मडगाव – नागपूर ही गाडी दिनांक २९ डिसेंबर २०२४ पर्यंत या आधीच्या वेळापत्रकाप्रमाणे, डब्यांच्या संरचनेनुसार चालविण्यात येणार आहे.
वाचकांचे व्यासपीठ: कोकण रेल्वे २५ वर्षापूर्वी कोकणात आली. कोकण रेल्वे मार्ग साकारणे हे अत्यंत खडतर आणि आव्हानात्मक कार्य KRCL कोकण रेल्वे कार्पोरेशन लिमिटेड या कंपनीने आणि त्यावेळेच्या लोकप्रतिनिधींनी अगदी लीलया पेलले. मात्र त्यानंतर आतापर्यंत पाहिजे तसा विकास कोकण रेल्वेचा झाला नाही. असे नाही की प्रयत्न झालेच नाही. कोकण रेल्वे प्रवाशांचा प्रवास सुखकर होण्यासाठी अनेक योजना, प्रस्ताव पुढे आलेत, मात्र त्यांना मूर्त स्वरूप देण्यात अपयश आले. कोणत्या आहेत या योजना आणि प्रस्ताव हे थोडक्यात पाहू.
राज्यात पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना चिपळूण कराड रेल्वे मार्ग होणार असे जाहीर केले गेले होते. या प्रस्तावाला ७ मार्च २०१२ रोजी मंत्रिमंडळात मान्यताही दिली गेली होती. मात्र त्यानंतर यासाठी प्रयत्न झाले नाहीत. मात्र कोकण आणि पाश्चिम महाराष्ट्र यांना जोडणारा रेल्वे मार्ग मृगजळच ठरला आहे.
माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू रेल्वे यांच्या प्रयत्नाने कोल्हापूर वैभववाडी मार्ग याबाबत सर्वेक्षण झाले होते. मात्र पुढे यासाठी म्हणावे तसे प्रयत्न न झाल्याने हाही मार्ग रखडला. आपत्कालीन परिस्थितीमध्ये हा मार्ग होणे काळाची गरज आहे त्यामुळे गणपती मे महिन्याच्या सुट्टीमध्ये ज्यादा गाड्याअप किंवा डाउन कोल्हापूर मार्गे वळवता येतील व गाड्यांचा होणारा खोळंबा रोखता येईल.
विद्यमान खासदार नारायण राणे काँग्रेसच्या सत्तेत मंत्री असताना सावंतवाडी ते रेडी रेल्वे मार्ग टाकण्याचे सुतवाच झाले होते त्याचे पुढे काय झाले? कणकवली ते रेडी पर्यंत स्वतंत्र टॉय ट्रेन सिंधुदुर्ग जिल्ह्यात फिरणार अशी रेवडी त्याच वेळेला उडवली होती त्या रेवडीचे पुढे काय झाले? हे देखील प्रश्नच आहेत.
सावंतवाडी आंबोलीमार्गे बेळगाव जोडण्याची एक रेवडी मध्यंतरी उडवली केली होती त्यामध्ये सीमा वरती भागातील काही आमदार खासदार सक्रिय झाले होते त्याचे पुढे काय झाले ?
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सावंतवाडी रेल्वे टर्मिनस याचा कोनशिला समारंभ रेल्वेमंत्री सुरेश प्रभू तात्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला होता. खरं म्हणजे सावंतवाडी टर्मिनस काळाची गरज आहे. मे महिन्यामध्ये आणि गणपती मध्ये सावंतवाडी टर्मिनस जर पूर्ण झाले तर जादा गाड्या सोडता येतील तसेच वसई सावंतवाडी कल्याण सावंतवाडी पुणे सावंतवाडी अशा गाड्या सोडता येतील
सावंतवाडी टर्मिनसचा प्रश्न येत्या दिवाळीपूर्वी सोडवून निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी त्या टर्मिनसचे उद्घाटन करा आणि त्याला मधु दंडवते यांचे नाव द्या कारण कोकण रेल्वे मार्गावर रेल्वे आणण्याचे श्रेय फक्त आणि फक्त मधू दंडवते जॉर्ज फर्नांडिस यांना जाते. 2024 साल हे मधु दंडवते यांच्या जन्मशताब्दीचे वर्ष आहे तरी या वर्षात टर्मिनसला त्यांचे नाव देऊन सावंतवाडी टर्मिनस वरून स्पेशल गाडी वसई किंवा कल्याण पर्यंत सोडण्यात यावी हीच मधु दंडवते यांना आदरांजली ठरेल. पाणी भरण्याची आणि पाण्याची सोय आता दीपक केसरकर यांनी पूर्णत्वास नेलेली आहे तिलारी प्रकल्पातून पाणी देण्याची योजना त्यांनी मंजूर केलेली आहे तरी लवकरात लवकर सावंतवाडी टर्मिनस पूर्ण करून मधु दंडवते यांचे नाव देण्यात यावे.
नागपूर: नागपुरातील सुरू होणारी कंपनी गुजरातला नेण्यात आली असल्याची बातमी काल व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली होती. विरोधकांनी या गोष्टीवरून मोठ्या प्रमाणात सरकारवर ताशेरे ओढले होते. मात्र ही बातमी पूर्णपणे खोटी असल्याचे रिन्यू कंपनीने म्हंटले आहे. याबाबत कंपनीने एक लिखित खुलासा जारी केला आहे.
कंपनीने काय म्हटले आहे खुलाश्यात..
महाराष्ट्र सरकारशी चर्चा अपूर्ण राहिल्याने किंवा वीज दर प्रचंड असल्याने महाराष्ट्रात गुंतवणूक करणार नाही, असे आम्ही म्हटल्याचे वृत्त धादांत खोटे. हे वृत्त नुसते दिशाभूल करणारे नाही, तर अतिशय बेजबाबदारपणाचे आहे. महाराष्ट्रात आम्ही सौर उत्पादनात अपस्ट्रीम व्हॅल्यूचेनमध्ये गुंतवणूक करणार आहोत, ती गुजरातमध्ये करणार नाही. रिन्यू ही महाराष्ट्रातील सर्वांत मोठी कंपनी आहे आणि महाराष्ट्राबाबत आमची वचनबद्धता आहे. महाराष्ट्रात आम्ही 550 मेवॉ क्षमता स्थापित केली आहे आणि आणखी 2000 मेवॉ चे काम सुरु आहे. 2026 पर्यंतचा हा आराखडा असून, त्यासाठी 15,000 कोटी रुपये गुंतवणूक करण्यात येणार आहे. याशिवाय पंप स्टोरेज, ग्रीन डायड्रोजन क्षेत्रात सुद्धा आम्ही राज्यात काम करणार असून, यातून 30 हजार रोजगारनिर्मिती होणार आहे. कंपनी महावितरणला 550 मेवॉ वीज स्पर्धात्मक दरात देत असून, सध्याचे प्रकल्प आणि येणारे प्रकल्प असे मिळून 1 लाख कोटींची गुंतवणूक राज्यात आम्ही करणार आहोत
मुंबई : पाश्चिम उपनगरीय रेल्वे प्रवाशांसाठी एक खुशखबर आहे. गोरेगाव ते कांदिवलीदरम्यान नवीन सहाव्या मार्गिकेच्या पूर्तीनंतर पाश्चिम उपनगरीय रेल्वे मार्गावर नव्या १२ लोकल चालवण्यात येणार आहे. लोकलमधील प्रवासी क्षमता वाढवण्यासाठी १२ डब्यांच्या १० लोकल फेऱ्यांचे रूपांतर १५ डब्यांत करण्यात येणार आहे. नवे वेळापत्रक लागू झाल्यावर प्रवाशांना या सुविधा वापरायला मिळतील.
पश्चिम रेल्वेवरील मेल-एक्स्प्रेस आणि लोकल मार्गिकांच्या स्वतंत्र मार्गिका उभारण्यासाठी सहाव्या मार्गिकेचे काम सध्या युध्द पातळीवर सुरू आहे. ऑक्टोबर अखेर सहावी मार्गिका कार्यरत होणे अपेक्षित आहे. यामुळे रेल्वेगाड्या चालवण्यासाठी अतिरिक्त रूळ उपलब्ध होणार आहे. दादर ते विरार दरम्यान नव्या १० लोकल फेऱ्या सुरू करण्याचे नियोजन रेल्वेचे आहे. वाढीव फेऱ्यांनंतर पश्चिम रेल्वेवरील फेऱ्यांची संख्या १,४०६पर्यंत पोहोचणार आहे. त्याचबरोबर बारा डब्यांच्या १२ लोकल फेऱ्यांचे रूपांतर १५ डबा लोकलमध्ये करण्यात येणार आहे.पंधरा डब्यांच्या लोकल विस्तारामुळे पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
सहाव्या मार्गिकेचे काम पूर्ण झाल्यावर पश्चिम रेल्वेच्या मुंबई उपनगरी रेल्वेगाड्यांवर नवे वेळापत्रक लागू करण्यात येईल. वेळापत्रक अंमलबजावणीचीf तारीख जाहीर करण्यात आलेली नाही, असे पश्चिम रेल्वेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
मुंबई : उपनगरीय लोकलमध्ये वरिष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र डबा राखीव ठेवण्याच्या हालचाली चालू झाल्या आहेत. लोकलमधून प्रवास करताना ज्येष्ठ नागरिकांना होणाऱ्या त्रासाला पूर्णविराम देण्याच्या उद्देशाने लोकलमधील एका मालडब्याचे ज्येष्ठ नागरिकांच्या स्वतंत्र डब्यात रूपांतर करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. मात्र, त्याबाबतच्या कार्यादेशासाठी रेल्वे प्रशासनाकडून विलंब होत असल्याबाबत उच्च न्यायालयाने बुधवारी नाराजी व्यक्त केली. तसेच, हा कार्यादेश लवकरात लवकर काढण्याचे आदेश रेल्वे प्रशासनाला दिले.
ज्येष्ठ नागरिकांसाठी लोकलमध्ये स्वतंत्र डबा उपलब्ध करून दिला जाईपर्यंत त्यांना मालडब्यातून प्रवास करण्याची मुभा देण्याचे आदेशही मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठाने रेल्वे प्रशासनाला दिले. त्यानंतर, दोन वर्षात ज्येष्ठ नागरिकांसाठी लोकलमध्ये स्वतंत्र डबा उपलब्ध करून दिला जाईल, असे रेल्वे प्रशासनाने न्यायालयाला आश्वासित केले. त्यानंतर, न्यायालयाने या प्रकरणी दाखल याचिका निकाली काढली.
मध्य आणि पश्चिम उपनगरीय लोकलमधून प्रवास करताना ज्येष्ठ नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रत्येक गाड्यांमध्ये काही जागा आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. मात्र, उपनगरीय लोकल गाड्यांमधील गर्दीचा विचार करता ज्येष्ठ नागरिकांना त्या जागांपर्यंत पोहोचणे शक्य होत नाही. ज्येष्ठ नागरिकांना होणाऱ्या या त्रासावर उपाय म्हणून अपंग प्रवाशांप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र डबा उपलब्ध करण्याची मागणी वकील के. पी. पी. नायर यांनी जनहित याचिकेद्वारे केली आहे.
पश्चिम रेल्वेचे विभागीय व्यावसायिक व्यवस्थापक यांनी या याचिकेवर उत्तर दाखल करताना, पश्चिम आणि मध्य रेल्वेने गेल्या वर्षी रेल्वे मंडळाला मालडब्यात (चर्चगेटच्या दिशेपासून लोकलच्या सातव्या डब्यात बदल करण्याची शिफारस केली होती. त्याचप्रमाणे, हा डबा ज्येष्ठ नागरिकांसाठीचा विशेष डबा म्हणून नियुक्त करण्याचा प्रस्ताव पाठवला होता. रेल्वे मंडळाने व्यवहार्यता आणि त्यासाठी लागणाऱ्या खर्चाचा अभ्यास केल्यानंतर यावर्षी २७ फेब्रुवारी रोजी या प्रस्तावाला मंजुरी दिली होती.
नायर यांच्या याचिकेवर बुधवारी सुनावणी झाली. त्यावेळी, याबाबतची माहिती न्यायालयाला देण्यात आली. तसेच, रेल्वे प्रशासनाकडून याबाबत सकारात्मक उपाययोजना केल्या जात असून येत्या दोन वर्षात मध्य रेल्वेच्या १५५, तर पश्चिम रेल्वेवरील १०५ डब्यांचे ज्येष्ठ नागरिकांसाठींच्या स्वतंत्र डब्यात रुपांतर करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वेकडून खंडपीठाला देण्यात आली. मात्र, त्याबाबतचा कार्यादेश अद्याप काढण्यात आलेला नसल्याबाबत न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. तसेच, हा कार्यादेश लवकरात लवकर काढण्याचे आदेश रेल्वे प्रशासनाला दिले.
Follow us on मुंबई: वसई सावंतवाडी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीने पश्चिम रेल्वेवरून नेहमीसाठी व रात्रीची वसई सावंतवाडी पॅसेंजर किंवा स्लो मधू दंडवते एक्सप्रेस सुरू करण्यासाठी पाठपुरावा केला.यासाठी कोकण रेल्वे,मध्य रेल्वे,पश्चिम रेल्वे प्रशासन,रेल्वे बोर्ड व लोकप्रतिनिधी यांच्याकडे सततचा पाठपुरावा केला होता . मात्र आत्ताच नव्याने सुरू करण्यात आलेल्या वांद्रे मडगाव एक्सप्रेसच्या थांब्या बाबत, वेळापत्रकाबाबत संघटनेने नाराजी व्यक्त केली आहे.
आम्ही कोकणासाठी पॅसेजर मागतोय तुम्ही सुपरफास्ट देताय,आम्ही रात्रीसाठी रेल्वे मागतोय तुम्ही दिवसाला देताय,आम्ही कोकणासाठी रेल्वे मागतोय तर तुम्ही गोव्यासाठी देताय? कोकणातील फक्त सात रेल्वे स्थानकावर थांबणारी सुपरफास्ट एक्सप्रेस देऊन कोकण रेल्वे प्रशासनाने कोकणी माणसाच्या जखमेवर मिठ चोळलेय अशा शब्दात संघटनेने आपली नाराजी व्यक्त केली आहे.
कोकण रेल्वेच्या प्रकल्पात ज्या महाराष्ट्र राज्याने सर्वाधिक २२% गुंतवणूक केली त्याच्या वाटयाला मध्यरेल्वेच्या फक्त तीनच रेल्वे आल्या,त्यामुळे पश्चिम रेल्वेवरून चालू झालेली नवीन रेल्वेही वांद्रे ते वसईमार्गे सावंतवाडीपर्यत पॅसेंजर किंवा स्लो एक्सप्रेस चालवावी म्हणजे किमान कोकणातील प्रत्येक तालुक्याला एकतरी हॉल्ट मिळेल अशी मागणी करणाऱ्या प्रवासी संघटनेची धारणा होती.मात्र कोकण रेल्वेने बोरीवली मार्गे सुटणारी स्लो रेल्वे न देता बोरीवली ते मडगाव दरम्याने धावपारी सुपरफास्ट एक्सप्रेस १०११५/१६ देऊन काय साध्य केले?
कोकणातील रायगड,रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हातील तब्बल ३४ रेल्वे स्थानकांवर हया पश्चिम रेल्वेवरून सुरू झालेल्या नवीन रेल्वेला हॉल्टच दिला नाही.यामध्ये १)आपटे २) जिते ३) पेण ४) कासू ५) नागोठणे ६) कोलाड ७) इंदापूर ८) माणगाव ९) गोरेगाव रोड ८) सापे वामने ९) करंजडी १०) विन्हेरे ११) दिवाणखवटी १२) कलंबनी बु. १३) खेड १४) अंजनी १५) कामथे १६) सावर्डा १७) आरवली रोड १८) कडवई १९) संगमेश्वर रोड २०) उक्षी २१) भोके २२) निवसर २३) आडवली २४ ) वेरवली २५) विलवडे २६) सौंदळ २७) राजापूर रोड २८) खारेपाटण रोड २९) वैभववाडी रोड ३०) आचरणे ३१) नांदगाव रोड ३२) सिंधुदुर्ग ३३) कुडाळ ३४) झाराप ह्या स्टेशनवरील चाकरमनी मुंबईच्या पश्चिम उपनगरामध्ये राहत नाहीत का?असा संतप्त सवाल कोकणातील चाकरमनी विचारत आहेत.
लोकसभा प्रचाराच्या वेळी मंत्री पियुष गोयल यांनी मला मतदान करा मी कोकणाला नेहमीसाठी रेल्वे सुरू करून देतो असे आश्वासन दिले होते स्वाभिमानी कोकणी माणसाने गोयल यांना भरभरून मतदानही केले पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये पियुष गोयल हे सर्वाधिक मताधिक्याने निवडूनही आले, कोकणी माणसामुळे साहेब पुढे कॅबिनेट मंत्रीही झाले व पुढे जाऊन द्विसाप्ताहिक सुपरफास्ट एक्सप्रेस कोकणा ऐवजी गोव्यासाठी सोडण्याचे प्रयोजन मंत्री महोदयांनी केले त्यामुळे ही सुपरफास्ट एक्सप्रेस नेमकी कोकणासाठी की गोव्यासाठी असा सवाल श्री.यशवंत जडयार यांनी विचारला आहे.
पश्चिम रेल्वेवरून नवीन सुरू होणाऱ्या बांद्रे ते मडगाव सुपरफास्ट एक्सप्रेसला फक्त बोरीवली,वसई,पनवेल,रोहा,विर,चिपळूण,रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग,सावंतवाडी,थिवीम,करमळी हे थांबे देण्यात आल्याचे निदर्शनास येत आहे. प्रवासी संघटना ह्या रेल्वेची रात्रीसाठी मागणी करीत आहे तरीही ती दिवसाची दिल्याने ती तळकोकणात रात्री १०.३५ च्या दरम्याने पोहोचतेय.म्हणजे कोकणातील लोकांनी मुंबईतून ३०० रू.मध्ये रेल्वेने जायचे आणि तेथे उतरल्यावर १५०० रू.ची रिक्षा करून घरी जायचे.
प्रवासी संघटनेच्या वतीने पश्चिम रेल्वेवरून वसईमार्गे कोकण रेल्वे मार्गावर रेल्वे सुरू करण्यासाठी मागील १o वर्षापासून पाठपुरावा सुरू आहे यासाठी वसई विरारमध्ये फक्त एका महिन्यामध्ये १८ हजार सहयांचे क्याम्पीयनही राबवले,कोकण रेल्वेच्या बेलापूर येथील कार्यालयासमोर उपोषण,वसई रोड येथे रेल्वे आंदोलन,सावंतवाडी रोड येथे लाक्षणिक उपोषण केले तर माजी खासदार श्री.विनायक राऊत,श्री.राजेद्र गावीत,श्री.गोपाळ शेट्टी तर विद्यमान खासदार श्री.नारायण राणे,श्री.पियुष गोयल,श्री.अरविंद सावंत,श्रीम.सुप्रिया सुळे व रेल्वे प्रशासन यांच्याकडे सततचा पाठपुरावा केला आहे.त्यामुळे फक्त कोकणासाठी स्वतंत्र्य रेल्वे मिळणे अपेक्षित होते,मात्र प्रवासी संघटनेने पाठपुरावा करूनही प्रत्यक्ष ही नवीन रेल्वे सोडताना कोकण रेल्वे प्रशासनाने ह्या प्रवासी संघटनांशी संपर्क न साधता वेळापत्रक परस्परच जाहिर केले.
पश्चिम उपनगरातील कोकणातील प्रवाशांनी मागील १० वर्षे ही रेल्वे मिळवण्यासाठी संघर्ष केला आत्ता पुढील १० वर्ष त्याचे हॉल्ट मिळवण्यासाठी कोकणकरांनी आंदोलने / उपोषण करत राहायची का? असा सवाल कोकणातील चाकरमनी विचारत आहेत.
वांद्रे मडगाव एक्सप्रेस नेहमीसाठी सुरू करून त्यातील एक जनरल कोच वसई रोड स्टेशनला राखीव ठेवावा व किमान माणगाव,खेड,संगमेश्वर रोड,विलवडे,राजापूर रोड,वैभववाडी रोड व कुडाळ ह्या तालुक्याच्या ठिकाणी जादाचे हॉल्ट मिळावेत अन्यथा प्रवासी संघटना आपल्या मूळच्या वसई सावंतवाडी पॅसेंजरच्या मागणीवर ठाम असल्याचे प्रवासी संघटनेने सांगितले.
आज पश्चिम रेल्वेच्या वसईमार्गे दक्षिणेतील राज्यामध्ये दिवसाला साधारण ५ सुपरफास्ट एक्सप्रेस जात आहेत,त्यामुळे कोकणाला सुपर फास्ट एक्सप्रेसची आवश्यकताच नाही आहे. दिव्यावरून सावंतवाडी पर्यत पॅसेंजर किंवा स्लो एक्सप्रेस जाऊ शकते तर वांद्रे ते सावंतवाडी पॅसेंजर का शक्य नाही? नवीन सुपर फास्ट एक्सप्रेस कोकणाच्या नावाखाली गोव्याला देण्यापेक्षा कोकण रेल्वे प्रशासनाने ती उरलेल्या ३४ स्टेशनवर थांबवावी असे श्री.यशवंत जडयार यांनी सांगितले.
देवरुख: रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कोकण प्रदेशाध्यक्ष रोहित तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त देवरूख येथे गुरुवारी भव्य राज्यस्तरीय नांगरणी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
रोहित तांबे यांचा आज वाढदिवस साजरा करण्यात आला, यानिमित्ताने गोरगरीब विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात येणार आहेत. तसेच गुरुवार दिनांक 19 सप्टेंबर रोजी देवरुख बागवाडी येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर आणि भव्य राजस्तरीय नांगरणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे .या स्पर्धेत लाखोंच्या बक्षिसांची लय लूट होणार आहे. यामध्ये घाटी व गावठी असे एकूण २० विजेत्यांना या स्पर्धेत सन्मानित करण्यात येणार आहे.
सदर स्पर्धेच्या आयोजनासाठी रोहित दादा विचार मंच , कोकण विकास संघर्ष समिती कार्यकर्ते प्रचंड मेहनत घेत आहेत .यामध्ये उद्योजक अक्षय जाधव सागर मोहिते ज्येष्ठ नेते संगम पवार मंगेश कदम भैया जाधव बाबू गोपाळ, प्रवीण सावंत शिवणे ऋतिक सावंत उजगांव, सोनू सावंत गमरे,आदी कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
मुंबई: नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भुज आणि अहमदाबादला जोडणाऱ्या देशातील पहिल्या ‘नमो भारत रॅपिड रेल्वे’ ला हिरवा कंदील दाखविला आहे. ही गाडी सर्वच बाबतीत मुंबईतील एसी लोकलच्या बाबतीत सरस आहे. मात्र प्रवास भाड्याचा विचार केला तर मुंबई एसी लोकलचे प्रवास भाडे ‘नमो भारत रॅपिड रेल्वे’ च्या जवळपास दुप्पट आहे.
नमो भारत रॅपिड रेल्वे अनेक सुविधांच्या बाबतीत मुंबई एसी लोकल च्या पुढे आहे. या गाडीचा वेळ प्रति तास १३० किमी आहे. तर गाडीत मोबाईल चार्जिंग, एलईडी प्रकाश व्यवस्था, सीसीटीव्हीची देखरेख, अद्ययावत अग्निशमन यंत्रणा आणि आरामदायक आसन व्यवस्थेत ही गाडी मुंबई एसी लोकलला मागे टाकत आहे. तर प्रवास भाड्याच्या बाबतीत मुंबई एसी लोकल पुढे आहे. उदाहरण द्यायचे झाले तर मुबईतील एसी लोकल चे चर्चगेट ते विरार सिंगल प्रवास भाडे ११५ रुपये आहे, आणि महिन्याच्या पासचे शुल्क २२०५ रुपये आहे. तेवढ्याच अंतरासाठी (५९ किलोमीटर) नमो भारत रॅपिड रेल्वेचे प्रवासभाडे अनुक्रमे ७० आणि १४१६ रुपये एवढे आहे.
याचा अर्थ मुंबईकरांना तुलनेने कमी सुविधा मिळणाऱ्या प्रवासासाठी जवळपास दुप्पट प्रवास भाडे भरावे लागत आहे. यामुळे मुंबईकर प्रवाशांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.
नमो भारत रॅपिड रेल्वे ही छोट्या छोट्या शहरांना जोडणार असल्याने तिचे प्रवासभाडे तेथील प्रवाशांना परवडणारे असणे आवश्यक आहे. ही गोष्ट लक्षात घेऊन हे भाडे ठरविण्यात आले आहे. मुंबईतील लोकल गाड्यांच्या प्रवास भाड्यात MUTP शुल्क आणि इतर शुल्कांचा समावेश असल्याने तिकीटदर तुलनात्मक दृष्टीने जास्त असतात असे रेल्वे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
येत्या काही महिन्यांत मुंबई मध्ये वसई – दिवा, पनवेल – डहाणू/वसई, मुंबई – पुणे, मुंबई – नाशिक हे मार्ग नमो भारत रॅपिड रेल्वे साठी प्रस्तावित आहेत.
Vande Bharat Express:भारतीय रेल्वेकडे तयार असलेल्या 16 वंदे भारत ट्रेन धूळ खात यार्डात उभ्या असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. वंदे भारत सेवा सुरु करण्यासाठी तांत्रिक तसेच आर्थिक दृष्ट्या परवडेल अशा मार्गांची चाचपणी सुरु असून सध्या तरी असे मार्ग सापडले नसल्याने या वंदे भारत ट्रेन यार्डातच हिरव्या झेंड्याच्या प्रतिक्षेत धूळ खास उभ्या असल्याचं समजतं.
ट्रेन सुरु करण्यात अडचण काय?
रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय रेल्वे सध्या अशा मार्गांच्या शोधात आहे तिथे या वंदे भारत ट्रेन ताशी 130 ते 160 किलोमीटर वेगाने चालवता येतील. तसेच वंदे भारत ट्रेनसाठी आधुनिक सिग्नल यंत्रणेचीही गरज असल्याने या ट्रेन धूळ खात पडल्याची माहिती ‘मातृभूमी’ने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. परवडतील अशा मार्गांवर सर्वात प्रिमिअम ट्रेन्सपैकी असलेल्या वंदे भारत चालवण्याचा रेल्वेचा मानस असून आर्थिकदृष्ट्या परवडणाऱ्या मार्गांची चाचपणी सुरु आहे. इतर ट्रेनच्या वेळापत्रकामध्ये अडथळा निर्माण न करता चालवता येतील अशापद्धतीने या ट्रेनचा समावेश वेळापत्रकात करुन घेण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र असा टाइम स्लॉट अद्याप सापडलेला नाही. तसेच अनेक ट्रॅक हे हायस्पीड ट्रेनच्या वाहतुकीसाठी अद्यावत करण्यात आलेले नाही. त्यामुळेच कमी अंतरावरील अनेक मार्गांवर आवश्यकता असूनही या वंदे भारत ट्रेन सुरु करता येत नसल्याचे समजते.
सामान्यपणे 8 डब्ब्यांची एक वंदे भारत ट्रेन चालवण्यासाठी चार ते पाच ट्रेनच्या वेळापत्रकामध्ये बदल करावा लागतो. त्यामुळे एका ट्रेनचा परिमाण किमान 5 हजार प्रवाशांवर होतो. दुसरीकडे वंदे भारतमधून 500 प्रवासी प्रवास करतात. म्हणूनच वंदे भारतला स्लॉट देण्यासाठी केल्या जाणाऱ्या तडजोडीमुळे इतर प्रवाशांची नाराजी ओढावून घ्यावी लागते, असं रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. यामुळे जनतेत वंदे भारत सेवेबद्दल चुकीचा संदेश जाता कामा नये असा रेल्वेचा प्रयत्न आहे.
वंदे भारतसाठीच्या अटी
वंदे भारत चेअर कार ट्रेन एका वेळेस एका मार्गावर जास्तीत जास्त 8 तासांचा प्रवास करते. त्यामुळेच मागणी असलेल्या आणि 8 तासांमध्ये प्रवास पूर्ण होईल अशा मार्गांचा शोध सध्या सुरु आहे. तसेच वंदे भारत ट्रेन मध्य रात्री 12 पासून पहाटे 5 पर्यंत चालवल्या जात नाहीत.