Author Archives: Kokanai Digital

राज्यात २०-२२ एप्रिलदरम्यान वादळी पावसाची शक्यता

   Follow us on        

मुंबई: राज्यातील विविध भागांमध्ये पुढील काही दिवसांत हवामानात बदल होण्याचे संकेत मिळत असून 20 ते 22 एप्रिलदरम्यान वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसर, खानदेश, मराठवाडा तसेच विदर्भातील काही भागांमध्ये दुपारनंतर आभाळ दाटून येत मेघगर्जनेसह पाऊस होऊ शकतो. या काळात विजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा आणि काही ठिकाणी गारपीट होण्याचीही शक्यता आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार 19 एप्रिल रोजी पश्चिम महाराष्ट्रातील घाट क्षेत्र, उत्तर खानदेश आणि दक्षिण मराठवाड्यात दुपारनंतर वादळी पावसाची स्थिती निर्माण होऊ शकते. त्यानंतर 20 आणि 21 एप्रिल रोजी या पावसाचा प्रभाव अधिक भागांमध्ये जाणवण्याची शक्यता असून पुणे विभागासह मराठवाड्यातील दक्षिण भाग, छत्रपती संभाजीनगर विभाग आणि विदर्भातील अमरावती परिसरातही वादळी पावसाची शक्यता आहे. मात्र 22 एप्रिल रोजी या पावसाच्या क्षेत्रात आणि तीव्रतेत काहीशी घट होईल, असे संकेत आहेत.

कृषी विभागाने शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, काढणी केलेली पिके सुरक्षित ठेवावीत, शेतीची कामे हवामानानुसार नियोजित करावीत आणि वादळी वारे व गारपीटीपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी.

Konkan Railway: कन्फर्म तिकीट असूनही डब्यात प्रवेश नाही; रत्नागिरीत संतापजनक प्रकार

   Follow us on        

रत्नागिरी: भारतीय रेल्वेच्या ढसाळ नियोजनाचा एक संतापजनक प्रकार रत्नागिरी रेल्वे स्थानकावर समोर आला आहे. पाटणा एक्सप्रेसमध्ये आरक्षित डब्यांत विना तिकीट प्रवाशांच्या प्रचंड गर्दीमुळे अधिकृत प्रवाशांना साधे डब्यात पाय ठेवणेही कठीण झाले आहे. कन्फर्म तिकीट खिशात असूनही अनेक प्रवाशांना रेल्वे गाडी सोडून द्यावी लागल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी स्थानकावर आलेल्या या गाडीतील आरक्षित डब्यांमध्ये पाय ठेवायलाही जागा नव्हती. डब्याचे दरवाजे आणि अगदी स्वच्छतागृहांच्या बाहेरही प्रवाशांनी प्रचंड गर्दी केली होती. ज्या प्रवाशांकडे कन्फर्म तिकिटे होती, त्यांना आपल्या सामानासह आत शिरणे अशक्य झाले होते. एका संतप्त प्रवाशाने आपला अनुभव सांगताना म्हटले की, “सर्व परप्रांतीय प्रवासी बेकायदेशीरपणे आरक्षित डब्यातून प्रवास करत आहेत. आमच्याकडे रिझर्व्हेशन आहे, पण आत जायला जागाच नाही. मग आम्ही प्रवास करायचा कसा? ”

​यावेळी रेल्वे सुरक्षा दलाचे (RPF) जवान आणि पोलीस घटनास्थळी उपस्थित होते. पोलिसांनी डब्यात शिरण्याचा प्रयत्न करणाऱ्या काही प्रवाशांना मदत करण्याचा प्रयत्न केला, मात्र गर्दी इतकी अफाट होती की खुद्द पोलीसही तिथे हतबल झाल्याचे पाहायला मिळाले. आरक्षित डब्यात विना तिकीट प्रवासी कसे घुसले आणि टीसी (TC) यावर काय कारवाई करत आहेत, असा संतप्त सवाल प्रवाशांनी उपस्थित केला आहे. कोकणात येणाऱ्या-जाणाऱ्या गाड्यांमध्ये होणारी ही प्रचंड गर्दी आणि रेल्वे प्रशासनाचे त्याकडे होणारे दुर्लक्ष प्रवाशांच्या जीवावर बेतण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

 

 

View this post on Instagram

 

समृद्धी महामार्गावर वर्षभरात धावली दीड कोटींच्यावर वाहने; रेकॉर्डब्रेक टोल वसूली

   Follow us on        

मुंबई: नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाने वाहन संख्या आणि टोल वसुलीमध्ये नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (MSRDC) आकडेवारीनुसार, आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये या ७०१ किमी लांबीच्या महामार्गावरून तब्बल १.५५ कोटी वाहनांनी प्रवास केला. या माध्यमातून वर्षभरात १,२४०.०४ कोटी रुपयांचा टोल महसूल गोळा झाला असून, हा आकडा गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत ४९९.४१ कोटी रुपयांनी अधिक आहे. समृद्धी महामार्गाच्या इतिहासात टोल वसुलीने एकाच वर्षात १,००० कोटींचा टप्पा ओलांडण्याची ही पहिलीच वेळ आहे.

​या महामार्गाच्या प्रवासाकडे नजर टाकल्यास, २०२२-२३ मध्ये जेव्हा हा मार्ग अंशतः खुला झाला होता, तेव्हा पहिल्या चार महिन्यांत १३.५९ लाख वाहनांमधून १०६.४१ कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता. त्यानंतर २०२३-२४ मध्ये वाहनांची संख्या ६८.९९ लाखांवर पोहोचली आणि ५२८.१० कोटींचा टोल जमा झाला. २०२४-२५ मध्ये वाहनांच्या संख्येने १ कोटीचा टप्पा पार केला होता, ज्यातून ७४० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. १० जिल्ह्यांमधून जाणाऱ्या या महत्त्वपूर्ण मार्गिकेचा वापर सातत्याने वाढत असून, आतापर्यंत एकूण ३.४४ कोटी वाहनांनी यावरून प्रवास केला आहे आणि त्यातून एकूण २,६६० कोटी रुपयांचा टोल जमा झाला आहे.

मध्य रेल्वेच्या ‘उत्तर भारत केंद्रित’ धोरणाविरोधात खासदार अरविंद सावंत आक्रमक

   Follow us on        

​नवी दिल्ली:उन्हाळी सुट्ट्यांच्या काळात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या वाट्याला मध्य रेल्वेकडून येत असलेल्या सापत्न वागणुकीविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि खासदार अरविंद सावंत यांनी दिल्लीत आवाज उठवला आहे. मध्य रेल्वेचे धोरण ‘उत्तर भारत केंद्रित’ असल्याचा आरोप करत सावंत यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची प्रत्यक्ष भेट घेतली. यावेळी त्यांनी रेल्वेमंत्र्यांना एक सविस्तर पत्र सादर करून कोकणवासीयांच्या भावना आणि आकडेवारीनिशी रेल्वेचा दुजाभाव त्यांच्या निदर्शनास आणून दिला.

​खासदार सावंत यांनी पत्रात नमूद केले आहे की, मध्य रेल्वेने १९ मार्गांवर एकूण १,५०० ‘समर स्पेशल’ गाड्यांचे नियोजन केले असताना, त्यातील तब्बल ४५० गाड्या बिहारसाठी आणि ३३२ गाड्या उत्तर प्रदेशसाठी सोडल्या आहेत. याउलट, मुंबईतून लाखो प्रवासी ज्या कोकण मार्गावर अवलंबून असतात, तिथे केवळ ३६ गाड्या देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, उत्तर भारतासाठी धावणाऱ्या गाड्या दररोज उपलब्ध आहेत, तर मुंबई-मडगाव विशेष गाडी १६ एप्रिल ते ११ जून दरम्यान आठवड्यातून केवळ एकदाच सोडली जाणार आहे. हा विरोधाभास संतापजनक असून कोकणी प्रवाशांची क्रूर थट्टा असल्याची टीका सावंत यांनी केली आहे.

​नियमित गाड्यांची स्थितीही बिकट असून मांडवी, कोकण कन्या, जनशताब्दी आणि तेजस एक्स्प्रेस सारख्या गाड्यांच्या स्लीपर क्लासची वेटिंग लिस्ट १०० च्या पुढे गेली आहे. सध्या कोकणातील रस्त्यांची दुरवस्था आणि घाटातील वाहतूक कोंडी पाहता रेल्वे प्रवास हाच एकमेव सुरक्षित पर्याय आहे, मात्र रेल्वे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. या पार्श्वभूमीवर, दादर-रत्नागिरी ट्रेन पुन्हा सुरू करावी, विशेष गाड्यांच्या फेऱ्या ‘दररोज’ कराव्यात आणि अतिरिक्त रेक्स (डबे) उपलब्ध करून द्यावेत, अशा प्रमुख मागण्या त्यांनी रेल्वेमंत्र्यांकडे केल्या आहेत. हा अन्याय त्वरित दूर न झाल्यास कोकणच्या जनतेचा उद्रेक होईल आणि तीव्र जनआंदोलन छेडले जाईल, असा इशाराही अरविंद सावंत यांनी यावेळी दिला.

शालेय अभ्यासक्रमातून मराठी विषय डावलणाऱ्या शाळांविरुद्ध राज्य सरकार आक्रमक

   Follow us on        

मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा सक्तीची असतानाही नियमांचे पालन न करणाऱ्या शाळांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. शालेय शिक्षण विभागाने याबाबत सविस्तर कार्यपद्धती निश्चित करून शासन निर्णय जारी केला आहे.या निर्णयानुसार, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शाळांना प्रथम नोटीस दिली जाईल आणि १५ दिवसांच्या आत समाधानकारक खुलासा सादर करणे बंधनकारक असेल. खुलासा समाधानकारक न झाल्यास शाळा व्यवस्थापनावर एक लाख रुपयांपर्यंत दंड आकारला जाईल. तसेच, पुढील शैक्षणिक वर्षापासून मराठी विषय अनिवार्यपणे सुरू करण्याचे आदेश देण्यात येतील.

शाळेला निर्णयाविरुद्ध ३० दिवसांच्या आत अपील करण्याची संधी दिली जाईल. अपिलानंतरही आदेशाचे पालन न झाल्यास शाळेची मान्यता रद्द करण्याची कार्यवाही केली जाईल. याबाबतचा अंतिम निर्णय शालेय शिक्षण आयुक्त स्तरावर सुनावणी घेऊन तीन महिन्यांच्या आत करण्यात येणार आहे.

या उपाययोजनांमुळे राज्यातील सर्व माध्यमांच्या, सर्व बोर्डांच्या (सीबीएसई, आयसीएसई, आयबीसह) आणि खासगी-सरकारी शाळांमध्ये मराठी भाषेचे प्रभावी अध्यापन सुनिश्चित होणार असल्याचे शालेय शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा असून तिचे संवर्धन आणि नव्या पिढीला मातृभाषेचे ज्ञान देणे आवश्यक आहे, असे सरकारचे मत आहे.

Photo Credit – AI

 

 

एसटी प्रवाशांवर दोन रुपयांचा ‘स्वच्छता अधिभार’; सुट्या पैशांवरून वाहक आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये वाद

   Follow us on        

मुंबई:महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) आपल्या बस आणि बसस्थानकांच्या स्वच्छतेसाठी प्रत्येक तिकिटामागे दोन रुपये ‘स्वच्छता अधिभार’ (Cleanliness Surcharge) लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. १५ एप्रिल २०२६ पासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली असून, यामुळे एसटी प्रवासासाठी आता प्रवाशांना अतिरिक्त दोन रुपये मोजावे लागणार आहेत. विशेषतः ‘अमृत ज्येष्ठ नागरिक’ योजनेअंतर्गत १०० टक्के सवलत मिळणाऱ्या प्रवाशांनाही आता हे दोन रुपये द्यावे लागत असल्याने अनेक ठिकाणी वादाचे प्रसंग उद्भवत आहेत.

​या नवीन नियमामुळे बसमध्ये सुट्या पैशांवरून वाहक आणि प्रवासी, विशेषतः ज्येष्ठ नागरिक यांच्यात शाब्दिक चकमकी होत असल्याचे समोर आले आहे. ज्या ज्येष्ठ नागरिकांना यापूर्वी पूर्णपणे मोफत प्रवासाची सवलत होती, ते आता अतिरिक्त दोन रुपये देण्यास टाळाटाळ करत आहेत. या समस्येवर उपाय म्हणून यूपीआय (UPI) पेमेंटचा पर्याय उपलब्ध असला तरी, गेल्या आठवड्यात सर्व्हर डाऊन असल्याने प्रवाशांच्या खात्यातून पैसे कापले जाऊनही महामंडळाच्या खात्यात ते जमा होण्यास अडचणी येत आहेत. यामुळे मशीनमधून तिकीट निघत नसल्याने वाहकांची मोठी पंचाईत होत आहे.

​महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे. महामंडळाची ही स्वच्छता योजना हेतूने चांगली असली तरी, दोन रुपयांच्या वसुलीमुळे रोज सुमारे अडीच लाख अमृत ज्येष्ठ नागरिक आणि वाहकांमध्ये वाद होत आहेत. या वादांमुळे एसटीची बदनामी होत असून, प्रशासनाने यावर काहीतरी सुवर्णमध्य किंवा तोडगा काढावा, अशी मागणी बरगे यांनी केली आहे. दरम्यान, ‘महिला सन्मान योजना’ आणि इतर सवलतधारक प्रवाशांच्या बाबतीत हा अधिभार नक्की कसा लागू राहील, याबाबत अद्याप काही संभ्रम कायम आहेत.

वेंगुर्ले तालुक्यात वनविभागाची मोठी कारवाई; ७ कोटींचे अंबरग्रीस जप्त, चौघांना अटक


   Follow us on        

वेंगुर्ले: वेंगुर्ले तालुक्यातील शिरोडा परिसरात वनविभागाने गुरुवारी एक मोठी कारवाई करत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कोट्यवधी रुपये किंमत असलेल्या ‘अंबरग्रीस’ची (ब्लू व्हेल माशाची उलटी) तस्करी उघडकीस आणली आहे. या धाडसी कारवाईत सुमारे ९.१२० किलो वजनाचे अंबरग्रीस जप्त करण्यात आले असून, याची बाजारपेठेत किंमत अंदाजे ७ कोटी रुपये इतकी मोठी आहे. याप्रकरणी वनविभागाने चार संशयित आरोपींना मुद्देमालासह ताब्यात घेतले असून परिसरात एकच खळबळ माजली आहे.

​बनावट ग्राहक बनून रचला सापळा

शिरोडा परिसरात काही व्यक्ती अंबरग्रीसची विक्री करण्यासाठी येणार असल्याची गोपनीय माहिती वनविभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे श्री. सचिन शिदतूरे (वनक्षेत्रपाल फिरते पथक, सावंतवाडी) यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पथके तयार केली. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी स्वतः ‘बनावट ग्राहक’ बनून तस्करी करणाऱ्यांशी संपर्क साधला आणि सापळा रचला. गुरुवारी, १६ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ७ च्या सुमारास व्यवहार निश्चित झाल्यावर वनविभागाने या आरोपींना रंगेहात पकडले.

​आरोपींची नावे आणि कारवाईत सहभागी पथक

या प्रकरणात रणजित रामचंद्र नायर (वय ४०, रा. परबगाव शिरोडा), गुरुनाथ नाईक (वय ७०, रा. परबगाव शिरोडा), विभव आडारकर (वय ३५, रा. शिरोडा) आणि निलेश मनोहर पांडजी (वय ३३, रा. रेडी) या चौघांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई उपवनसंरक्षक श्री. मिलीश शर्मा, विभागीय वनअधिकारी श्री. संजय वाघमोडे आणि साहाय्यक वनसंरक्षक डॉ. सुनील लाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये वनक्षेत्रपाल सचिन शिदतूरे, अमित कटके, वनपाल सावळा कांबळे, महेश पाटील आणि अन्य वनरक्षकांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

​अंबरग्रीस हे अत्यंत दुर्मिळ आणि मौल्यवान मानले जाते, त्यामुळे केवळ पैशांच्या हव्यासापोटी अशा प्रकारचे गुन्हे घडत आहेत. नागरिकांनी अशा कोणत्याही तस्करीबद्दल माहिती मिळाल्यास त्वरित वनविभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

हत्तींचा मानवी वस्तीत शिरकाव रोखण्यासाठी वनविभागाकडून फणस काढण्याची मोहीम

   Follow us on        

उदगमंडलम: गुडलूर वनविभागाने गुडलूर आणि पंडालूर भागातील निवासी क्षेत्रांनजीक असलेल्या झाडांवरील पिकलेले फणस काढण्यास सुरुवात केली आहे. मानवी वस्तीत अन्नाच्या शोधात येणाऱ्या हत्तींना रोखणे आणि मानव-वन्यजीव संघर्ष कमी करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. मुदुमलाई व्याघ्र प्रकल्पाचे (MTR) क्षेत्र संचालक आणि गुडलूरच्या विभागीय वनअधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार चेरांबाडी वनपरिक्षेत्रात ही कार्यवाही केली जात आहे. केवळ घरांच्या जवळ असलेल्या झाडांवरील फणस संबंधित जमीनमालकांच्या संमतीने आणि वनविभागाच्या मदतीने काढले जात आहेत.

​वनविभागाच्या मते, ही एक वार्षिक प्रतिबंधात्मक उपाययोजना आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत हत्ती अन्नाच्या शोधात मानवी वस्तीकडे वळण्याची शक्यता जास्त असते आणि फणसाचा सुगंध त्यांना वस्तीकडे आकर्षित करतो, ज्यामुळे संघर्षाच्या घटना घडू शकतात. हे टाळण्यासाठी वनविभागाने जनतेला आवाहन केले आहे की, त्यांनी आपल्या घराभोवतीचे पिकलेले फणस स्वत: काढून टाकावेत किंवा मदतीसाठी वनविभागाच्या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. याशिवाय, हत्तींना पाण्यासाठी वस्तीत येण्यापासून रोखण्यासाठी राखीव जंगलातील पाण्याच्या टाक्या भरण्याचे कामही विभागाने सुरू केले आहे.

Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर समर स्पेशल गाड्यांची संख्या अपुरी

मुंबई: आगामी उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेता, रेल्वे प्रशासनाने तातडीने अतिरिक्त विशेष गाड्या सोडाव्यात, अशी आग्रही मागणी ‘अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती’ने केली आहे. एप्रिल ते जून या काळात मुंबई आणि पुणे येथून कोकणाकडे जाणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ होते. यामध्ये प्रामुख्याने सुट्ट्यांसाठी गावी जाणारे चाकरमानी, विद्यार्थी आणि पर्यटकांचा समावेश असतो. सध्या कोकण मार्गावर धावणाऱ्या नियमित गाड्यांची संख्या या गर्दीच्या तुलनेत अत्यंत अपुरी असून, जाहीर करण्यात आलेल्या साप्ताहिक विशेष गाड्यांमुळे प्रवाशांची गैरसोय दूर झालेली नाही. साप्ताहिक फेऱ्यांमुळे प्रवाशांना वेटिंग लिस्टचा सामना करावा लागत असून, नाइलाजास्तव असुरक्षित पर्यायांचा अवलंब करावा लागत असल्याचे समितीने निदर्शनास आणून दिले आहे.

​प्रवाशांचा हा त्रास कमी करण्यासाठी समितीचे सचिव अक्षय सरोज मधुकर महापदी यांनी रेल्वे प्रशासनाला सविस्तर प्रस्ताव सादर केला आहे. यामध्ये प्रामुख्याने सीएसएमटी-चिपळूण, सीएसएमटी-सावंतवाडी रोड आणि पुणे-सावंतवाडी रोड या मार्गांवर विशेष गाड्या सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. या गाड्यांचे वेळापत्रकही सुचवण्यात आले असून, या फेऱ्या साप्ताहिक न ठेवता द्वि-साप्ताहिक किंवा दैनंदिन स्वरूपात चालवल्यास प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल, असे निवेदनात म्हटले आहे. विशेषतः पुणे-सावंतवाडी मार्गावरील मागणीचा विचार करून प्रवाशांच्या सोयीनुसार वेळ निश्चित करण्याची विनंती करण्यात आली आहे.

​कोकण रेल्वेवरील वाढता भार आणि प्रवाशांची सुरक्षितता विचारात घेऊन रेल्वे प्रशासनाने या प्रस्तावावर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी समितीने केली आहे. उन्हाळी हंगामातील हा गर्दीचा ओघ दरवर्षीचा असून, त्याचे नियोजन आधीच होणे आवश्यक आहे. जर रेल्वेने वेळेत अतिरिक्त गाड्यांची घोषणा केली, तर प्रवाशांना आपले आरक्षण सुलभतेने करता येईल आणि रेल्वेचा प्रवास अधिक सुखकर होईल. या संदर्भात रेल्वे प्रशासनाकडून लवकरच सकारात्मक पाऊल उचलले जाईल, अशी आशा कोकणवासीयांकडून व्यक्त केली जात आहे.

 

मराठी भाषेला दुय्यम स्थान; मध्य रेल्वेला शिवसेनेचा इशारा

   Follow us on        

मुंबई: मध्य रेल्वेच्या विविध स्थानकांवरील सूचनाफलकांवरून मराठी भाषा गायब झाल्याच्या निषेधार्थ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने रेल्वे प्रशासनाला धारेवर धरले आहे. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी असूनही रेल्वे स्थानकांवर केवळ हिंदी आणि इंग्रजी भाषेचा वापर करून स्थानिक मराठी भाषेला डावलले जात असल्याचे समोर आले आहे. या गंभीर प्रकाराची दखल घेत, दक्षिण मुंबईचे विभागप्रमुख संतोष शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज मध्य रेल्वे प्रशासनाची भेट घेऊन त्यांना लेखी निवेदन सादर केले व या प्रकाराचा जाब विचारला.

​सादर केलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, रेल्वे ही लाखो प्रवाशांच्या दैनंदिन जीवनाचा भाग आहे, तिथे स्थानिक भाषेला प्राधान्य देणे घटनात्मक आणि शासकीय धोरणानुसार आवश्यक आहे. असे असतानाही मराठीला डावलणे हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा अपमान आहे. जर रेल्वे प्रशासनाने तातडीने सर्व सूचनाफलकांवर मराठी भाषेचा समावेश केला नाही, तर शिवसेना आपल्या ‘परंपरागत’ पद्धतीने तीव्र आंदोलन छेडेल, असा इशाराही संतोष शिंदे यांनी यावेळी दिला.

​या प्रसंगी विभाग संघटक युगंधरा साळेकर, युवासेना विस्तारक अजिंक्य धात्रक यांच्यासह पक्षाचे विविध पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशासनाने या विषयावर सकारात्मक कार्यवाही न केल्यास उद्भवणाऱ्या परिस्थितीला रेल्वे प्रशासनच सर्वस्वी जबाबदार असेल, असेही पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search