Author Archives: Kokanai Digital

शक्तीपीठ महामार्ग संबंधित शंका निरसन करण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे ‘सह्याद्री’ वाहिनीवर प्रसारण

   Follow us on        

वर्धा / सिंधुदुर्ग:

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने काही दिवसांपूर्वी वर्धा येथे अत्यंत महत्त्वाच्या अशा ‘शक्तीपीठ महामार्ग शेतकरी संवाद’ कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. या संवाद कार्यक्रमात महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक श्री. मिश्रा सर, वर्धा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि महामंडळाचे मुख्य अभियंता यांनी उपस्थित राहून शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला व त्यांच्या शंकांचे निरसन केले. या विशेष कार्यक्रमाचे प्रसारण बुधवार, १५ जुलै २०२६ आणि गुरुवार, १६ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ०६:३० वाजता ‘दूरदर्शन सह्याद्री’ वाहिनीवर करण्यात येत आहे. महामार्गाबाबतची अधिकृत माहिती आणि शासकीय भूमिका समजून घेण्यासाठी सर्व नागरिकांनी व विशेषतः शेतकऱ्यांनी हा कार्यक्रम आवर्जून पाहावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

​हा महामार्ग ज्या गावांतून जात आहे, त्या सर्व गावांमधील संबंधित शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवणे अत्यंत आवश्यक आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील कुंभवडे, फुकेरी, झोळंबे तसेच सावंतवाडी तालुक्यातील केगद, उडेली, नेने, फणसवडे, डेगवे, बांदा, घारपी, दाभिळ, असनिये, पडवे माजगाव आणि पडवे या गावांचा यामध्ये समावेश आहे. संबंधित गावांमधील स्थानिक सुजाण नागरिकांनी व लोकप्रतिनिधींनी आपापल्या भागातील शेतकऱ्यांना हा संवाद कार्यक्रम पाहण्याची विनंती करावी, जेणेकरून थेट प्रशासनाकडून मिळणारी महत्त्वाची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकेल.

परेल-सीएसएमटी जलद लोकल मार्गिका जमिनी खालून नेणार?

   Follow us on        

मुंबई: मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते कुर्ला दरम्यानच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिका प्रकल्पात रेल्वे प्रशासनाकडून मोठा बदल करण्याची तयारी सुरू आहे. दक्षिण मुंबईतील जागेची टंचाई, दाट लोकवस्ती आणि जवळपास ५५० प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनाचे मोठे आव्हान लक्षात घेता, आता परळ ते सीएसएमटी दरम्यानची जलद उपनगरी (लोकल) मार्गिका थेट भूमिगत करण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. या नवीन प्रस्तावानुसार, भायखळा हे एकमेव स्थानक भूमिगत केले जाण्याची शक्यता असून मुंबई रेल्वे विकास महामंडळ (MRVC) सध्या या पर्यायाची व्यवहार्यता तपासण्यासाठी सर्वेक्षण करत आहे. या तांत्रिक अभ्यासासाठी जपानच्या ‘पाडेको’ (PADECO) या नामांकित अभियांत्रिकी व पायाभूत सुविधा सल्लागार कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे.

​या १७.५ किलोमीटर लांबीच्या प्रकल्पातील कुर्ला ते परळ (१०.१ किमी) या पहिल्या टप्प्याचे काम सध्या वेगात सुरू आहे, मात्र परळ ते सीएसएमटी (७.४ किमी) या दुसऱ्या टप्प्यातील काम जागेच्या अनुपलब्धतेमुळे रखडले आहे. रेल्वे अधिकाऱ्यांच्या मते, सध्या उपलब्ध असलेल्या मर्यादित जागेत केवळ एकच अतिरिक्त मार्गिका उभारणे शक्य आहे. त्यामुळे नव्या नियोजनानुसार, विद्यमान तिसरी आणि चौथी जलद मार्गिका दादरपर्यंत मेल-एक्स्प्रेस गाड्यांसाठी राखीव ठेवली जाईल आणि जलद लोकल मार्गिका भूमिगत केली जाईल. यामुळे लांब पल्ल्याच्या गाड्या आणि उपनगरी लोकल वाहतुकीचे अधिक प्रभावी विभाजन करणे शक्य होणार आहे.

​मेल-एक्स्प्रेस गाड्या जड असल्याने त्यांना तीव्र चढ-उतारांवरून धावणे तांत्रिकदृष्ट्या कठीण असते, तर लोकल गाड्यांमध्ये मल्टिपल मोटर डबे असल्याने त्या तीव्र चढ सहज पार करू शकतात; म्हणूनच लांब पल्ल्याच्या गाड्यांऐवजी केवळ लोकल मार्गिकाच भूमिगत करणे तांत्रिकदृष्ट्या अधिक व्यवहार्य मानले जात आहे. भूसंपादनाचा तिढा सुटण्यास यामुळे मदत होणार असली, तरी जलद मार्गिका भूमिगत केल्यास या संपूर्ण प्रकल्पाचा खर्च मूळ अंदाजाच्या तुलनेत थेट अडीच ते तीन पटीने वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सल्लागार कंपनीचा अंतिम आराखडा आल्यानंतरच यावर अंतिम निर्णय घेतला जाईल.

Mumbai Local: एसी लोकलची एसी बंद पडल्याने गुदमरून प्रवासी बेशुद्ध

   Follow us on        

मुंबई:

मुंबई उपनगरीय रेल्वेच्या मध्य रेल्वे मार्गावर प्रवाशांच्या सुरक्षेचा आणि रेल्वेच्या देखभालीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सोमवार, १३ जुलै २०२६ रोजी सकाळी ऐन गर्दीच्या (रश अवर) वेळी टिटवाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) दरम्यान धावणाऱ्या वातानुकूलित (AC) लोकल ट्रेनमध्ये एक मोठी तांत्रिक बिघाड झाल्याची घटना घडली. ट्रेन प्रवाशांनी तुडुंब भरलेली असताना अचानक या गाडीतील एअर कंडिशनिंग (AC) यंत्रणा पूर्णपणे निकामी झाली. यामुळे बंद डब्यांमध्ये हवेची कोंडी होऊन गुदमरल्यासारखे गंभीर वातावरण निर्माण झाले, ज्यामुळे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला.

​सकाळच्या वेळी नोकरी-धंद्यासाठी बाहेर पडलेल्या हजारो प्रवाशांमुळे ट्रेनमध्ये प्रचंड गर्दी होती. अशातच अचानक थंडावा बंद झाल्याने डब्यांमधील तापमान वेगाने वाढले. हवेअभावी डब्यात असलेले शेकडो प्रवासी घामाघूम झाले. ऑक्सिजनची पातळी कमी झाल्यासारखी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे काही प्रवाशांना चक्कर आली, तर काही जण क्षणभर बेशुद्ध पडले. यामध्ये एका प्रवाशाची तब्येत जास्त बिघडल्यामुळे त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. या घटनेमुळे संपूर्ण ट्रेनमध्ये काही काळ भीतीचे आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

​ट्रेन मुलुंड ते कुर्ला स्थानकादरम्यान असताना प्रवाशांचा जीव गुदमरू नये आणि कोणतीही मोठी दुर्घटना घडू नये, म्हणून रेल्वे प्रशासनाने तात्काळ सुरक्षेचा उपाय म्हणून एसी डब्यांची स्वयंचलित दारे उघडी ठेवून ट्रेन पुढे नेण्याचा निर्णय घेतला. अखेर ही ट्रेन कुर्ला स्थानकावर पोहोचल्यानंतर रेल्वे प्रशासनाने पुढील प्रवास रद्द केला. सर्व प्रवाशांना तेथेच उतरवून ट्रेन रिकामी करण्यात आली आणि ती तांत्रिक दुरुस्तीसाठी कारशेडमध्ये रवाना करण्यात आली. यामुळे प्रवाशांना उतरून दुसऱ्या लोकलचा आसरा घ्यावा लागला, ज्यामुळे मध्य रेल्वेच्या इतर लोकल फेऱ्यांवरही काही काळ परिणाम झाला.

​या गंभीर प्रकारानंतर नियमित प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. महागडे तिकीट किंवा पास काढल्यानंतरही प्रवाशांच्या जिवाशी खेळ केला जात असल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे. “आणीबाणीच्या प्रसंगी किंवा एसी बंद पडल्यास डब्यांमध्ये पर्यायी हवा खेळती राहण्यासाठी (Ventilation) कोणतीही सक्षम व्यवस्था का नाही?” असा संतप्त सवाल प्रवाशांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, रेल्वे प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेतली असून, एसी यंत्रणा निकामी होण्यामागच्या नेमक्या कारणांचा शोध घेण्यासाठी उच्चस्तरीय चौकशी सुरू केली असल्याचे स्पष्ट केले आहे.

धक्कादायक! १५ फुटी अजगराने गिळला कुत्रा आणि चार पिल्ले

   Follow us on        

दोडामार्ग:

तालुक्यातील मोर्ले गावात रविवारी सकाळी एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. येथील रहिवासी पंकज गवस यांच्या मांगरात (गोठ्यात) अन्नाच्या शोधात शिरलेल्या सुमारे १५ फूट लांबीच्या एका अवाढव्य अजगराने एका कुत्र्याला आणि त्याच्या चार निष्पाप पिल्लांना जिवंत गिळल्याची घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण मोर्ले परिसरात भीतीचे आणि आश्चर्याचे वातावरण निर्माण झाले होते.

​मिळालेल्या माहितीनुसार, पंकज गवस यांच्या मांगरामध्ये नेहमीप्रमाणे एक कुत्रा आणि त्याची चार पिल्ले राहत होती. रविवारी सकाळी ही पिल्ले अचानक दिसेनाशी झाल्याने गवस यांनी परिसरात शोधमोहीम सुरू केली. मांगरामध्ये शोध घेत असताना त्यांना एक भलामोठा अजगर निपचित पडलेला दिसला. त्या अजगराचे पोट कमालीचे फुगलेले होते, ज्यावरून त्याने मोठी शिकार केल्याचे स्पष्ट होत होते. अन्नाच्या शोधात आलेल्या या अजगराने कुत्रा आणि त्याच्या चारही पिल्लांना एकामागून एक गिळंकृत केले होते.

​ही बातमी वाऱ्यासारखी सबंध गावभर पसरताच, अजगराला पाहण्यासाठी गावकऱ्यांनी मांगराबाहेर मोठी गर्दी केली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तातडीने वनविभागाला या घटनेची माहिती देण्यात आली. माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने अत्यंत सावधगिरी बाळगत अजगराचे सुरक्षितरीत्या रेस्क्यू केले. यानंतर त्या अजगराला त्याच्या नैसर्गिक अधिवासात (जंगलात) सुखरूप सोडण्यात आले आहे. या घटनेमुळे काही काळ परिसरात भीतीचे वातावरण असले, तरी वनविभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, वन्यप्राणी आढळल्यास घाबरून न जाता तातडीने वनविभागाशी संपर्क साधावा.

‘मुंबई वॉटर मेट्रो’ साठी लागणार्‍या बोटी सिंधुदुर्ग जिल्हय़ात बनणार

   Follow us on        

सिंधुदुर्ग: जिल्ह्यासाठी एक अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी सिंधुदुर्गवासियांना १५० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची ‘गुड न्यूज’ दिली आहे. मंत्रालयामध्ये ‘जोया मरीन कंपनी’ आणि ‘महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड बंदर मंत्रालय’ यांच्यात एक महत्त्वपूर्ण सामंजस्य करार (MoU) स्वाक्षरित करण्यात आला आहे. या करारानुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या ‘मुंबई वॉटर मेट्रो’साठी लागणाऱ्या ५० आणि १०० पॅसेंजरच्या बोटी या प्रकल्पांतर्गत बनवल्या जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात अशा जवळपास १०० बोटी बनवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

​हा भव्य बोट निर्मितीचा कारखाना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथील तळवणे गावात उभा राहणार आहे. बोट क्राफ्ट, येल्लो फ्लीट यांसारख्या कंपन्यांनी एकत्र येऊन हा प्रकल्प जिल्ह्यात आणला आहे. या प्रकल्पामुळे कोकणातील तरुणांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार आहे. नोकरी-धंद्यासाठी मुंबई किंवा इतर ठिकाणी गेलेल्या कोकणातील तरुणांना पुन्हा आपल्या मातृभूमीत परत आणणे (रिव्हर्स मायग्रेशन), हाच यामागचा मुख्य उद्देश असल्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी सांगितले.

​या पर्यावरणपूरक प्रकल्पामुळे स्थानिक अर्थकारणाला मोठी गती मिळणार आहे. या कारखान्यात विविध प्रकारच्या नोकऱ्या आणि कौशल्य विकासाच्या संधी उपलब्ध होणार असल्याने, पालकमंत्र्यांनी स्थानिक तरुण-तरुणींना या क्षेत्रातील आवश्यक कौशल्ये (Skills) आत्मसात करण्याचे आवाहन केले आहे. तसेच, येत्या ५ वर्षांत जहाज बांधणी, मत्स व्यवसाय आणि पर्यटन क्षेत्रात असे अनेक मोठे प्रकल्प सिंधुदुर्गात आणून रोजगार निर्मितीला प्राधान्य दिले जाईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

Konkan Railway: आरपीएफची मोठी कारवाई; सीसीटीव्हीच्या मदतीने ३.५ लाखांच्या मुद्देमालासह तीन चोरट्यांना अटक

   Follow us on        

गोवा:

कोकण रेल्वेच्या थिविम रेल्वे स्टेशनवर रेल्वे संरक्षण दलाने (आरपीएफ) सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने एक मोठी आणि यशस्वी कारवाई केली आहे. स्टेशन परिसरात संशयास्पद रित्या फिरणाऱ्या तीन आरोपींना आरपीएफ जवानांनी तत्परता दाखवत रंगेहात ताब्यात घेतले. या आरोपींकडून तब्बल १५ महागडे मोबाईल फोन आणि ५ लॅपटॉप असा एकूण ३.५ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. थिविम हे गोव्यातील एक अत्यंत महत्त्वाचे स्टेशन असून, प्रवाशांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या आरपीएफच्या चोख नजरतेमुळे या चोरांचा डाव उधळून लावण्यात यश आले.

​मंगळवारी स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत असताना आरपीएफ कर्मचाऱ्यांना काही जणांच्या हालचाली संशयास्पद आढळल्या. या आरोपींकडे चोरीच्या महागड्या इलेक्ट्रॉनिक वस्तू असल्याचे कॅमेऱ्यात स्पष्ट झाल्यानंतर, आरपीएफ आउटपोस्टच्या जवानांनी क्षणाचाही विलंब न लावता त्यांना वेढा घातला आणि पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या तिघांनाही अटक केली. या धडक कारवाईनंतर आरपीएफने पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी तीनही आरोपींना जप्त केलेल्या मालासह अंजुना पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. सध्या अंजुना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून या टोळीची कसून चौकशी सुरू आहे.

​कोकण रेल्वे प्रशासनाने आरपीएफ जवानांच्या या कामगिरीचे भरभरून कौतुक केले आहे. आरपीएफच्या ‘#सदारसेवा’ या उपक्रमांतर्गत रेल्वे क्षेत्रातील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी अशा कारवाया सातत्याने केल्या जात आहेत. सीसीटीव्ही तंत्रज्ञान आणि जवानांची सतर्कता यामुळे रेल्वे प्रवास अधिक सुरक्षित होत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले असून, प्रवाशांनीही प्रवास करताना आपल्या साहित्याबाबत सतर्क राहावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

गणेशोत्सव २०२६: यावर्षी कोकण रेल्वेने गावी जाणार असाल तर ही बातमी वाचाच

   Follow us on        

गणेशोत्सव हा संपूर्ण कोकणवासीयांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा आणि वर्षातील सर्वात मोठा सण मानला जातो. दरवर्षी लाखो चाकरमानी बाप्पाच्या आणि गौरीच्या उत्सवासाठी मुंबई-पुण्यासारख्या शहरांतून न चुकता आपल्या कुटुंबासह गावी जात असतात. यंदा २०२६ मध्ये सोमवार, १४ सप्टेंबर रोजी श्रीगणेश चतुर्थी आहे. या निमित्ताने कोकणात जाणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेता, कोकण रेल्वे मार्गावरील ‘कोकणकन्या एक्सप्रेस’, ‘मांडवी एक्सप्रेस’, ‘तुतारी’ आणि ‘मत्स्यगंधा’ यांसारख्या नियमित गाड्यांचे आगाऊ तिकीट आरक्षण चालू झाले आहे. नियमित गाड्यांचे तिकीट मिळवण्यासाठी दरवर्षी मोठी चुरस पाहायला मिळत असल्याने चाकरमान्यांना आतापासूनच तयारी करावी लागणार आहे.

​यंदा शुक्रवार, ११ सप्टेंबर रोजी श्रावणी अमावस्या सकाळी ८:५६ वाजता संपत आहे, त्यामुळे चाकरमानी मोठ्या संख्येने याच रात्री गावाकडे निघण्याची शक्यता आहे. या ११ सप्टेंबरच्या प्रवासासाठीचे रेल्वे आरक्षण १३ जुलै रोजी सकाळी सुरू होणार आहे. त्यानंतर १२ आणि १३ सप्टेंबर (शनिवार व रविवार) रोजीच्या प्रवासासाठी नियमित गाड्यांचे तिकीट आरक्षण अनुक्रमे १४ जुलै आणि १५ जुलै रोजी खुले केले जाईल. रेल्वेचे हे आरक्षण प्रवासाच्या ६० दिवस आधी उपलब्ध होत असल्याने प्रवाशांना वेळेत तिकीट बुक करावे लागेल.

​यासोबतच, कोकणात गौरीच्या सणासाठी जाणाऱ्या भाविकांची संख्याही खूप मोठी असते. यंदा गुरुवारी, १७ सप्टेंबर रोजी गौरी आगमन असून शुक्रवारी, १८ सप्टेंबर रोजी गौरीपूजन आहे. त्यामुळे १८ सप्टेंबरच्या महत्त्वाच्या दिवशी गावात पोहोचण्यासाठी १७ सप्टेंबर रोजी सुटणाऱ्या नियमित गाड्यांच्या आरक्षणासाठी प्रवाशांची मोठी झुंबड उडण्याची चिन्हे आहेत. या १७ सप्टेंबरच्या प्रवासाचे आरक्षण १९ जुलै रोजी सुरू होणार आहे. जर प्रवाशांना या नियमित गाड्यांचे तिकीट मिळाले नाही, तर त्यांना नंतर मध्य व कोकण रेल्वेकडून सोडल्या जाणाऱ्या विशेष (स्पेशल) गाड्यांवर अवलंबून राहावे लागेल. म्हणूनच कोकणवासीयांनी आरक्षणाच्या या महत्त्वाच्या तारखा लक्षात ठेवून वेळेत आपले नियोजन करणे फायदेशीर ठरेल.

खुशखबर! मुंबई – मंगुळुरु एक्सप्रेससह सावंतवाडी स्थानकावर तीन महत्त्वाच्या एक्स्प्रेस गाड्यांना थांबा मंजूर

कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या प्रयत्नांना अखेर यश!

   Follow us on        

सिंधुदुर्ग:

कोकणातील रेल्वे कनेक्टिव्हिटी अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकावर आता ३ प्रमुख एक्स्प्रेस गाड्यांना नवीन थांबा (Stoppage) मंजूर करण्यात आला आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या संदर्भातील मंजुरी दिली असून, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियाद्वारे ही माहिती देत केंद्र सरकारचे आभार मानले आहेत.

‘या’ ३ गाड्यांना मिळाला थांबा:

सावंतवाडी रोड स्थानकावर आता खालील गाड्या थांबतील:

१. गाडी संख्या १२१३३/१२१३४: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) – मंगळुरू एक्स्प्रेस

२. गाडी संख्या १२४३१/१२४३२: तिरुवनंतपुरम सेंट्रल – हजरत निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेस

३. गाडी संख्या १२२०१/१२२०२: लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) – तिरुवनंतपुरम उत्तर (कोचुवेली) गरीब रथ एक्स्प्रेस

देवेंद्र फडणवीस यांच्या पाठपुराव्याला यश

जनसामान्यांच्या सुविधेसाठी सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकावर विविध गाड्यांना थांबा मिळवा, यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी २५ मार्च २०२६ रोजी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडे पत्राद्वारे विनंती केली होती. त्यांच्या या मागणीची दखल घेत रेल्वे मंत्रालयाने ७ जुलै २०२६ रोजी अधिकृत पत्र जारी करून या तिन्ही गाड्यांच्या थांब्याला मंजुरी दिली आहे.

संघटनेच्या विविध माध्यमांतील प्रयत्नांना अखेर यश!

सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सुविधेसाठी प्रमुख गाड्या थांबवण्यात याव्यात, यासाठी कोकण रेल्वे प्रवासी संघटना (सावंतवाडी) ने विविध माध्यमातून मोठा पाठपुरावा केला होता. संघटनेच्या वतीने वेळोवेळी आंदोलने करण्यात आली, विविध स्तरांवर प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले, तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींना मागण्यांची निवेदनेही देण्यात आली होती. यासोबतच, या मागणीला जनआंदोलनाचे रूप देण्यासाठी समितीने सोशल मीडियाचाही पुरेपूर वापर करून प्रवाशांचा आवाज शासनापर्यंत पोहोचवला. संघटनेच्या याच चौफेर प्रयत्नांची आणि जनभावनेची दखल अखेर प्रशासनाला घ्यावी लागली आहे.

कोकण रेल्वेच्या प्रवाशांच्या हितासाठी मिळालेल्या अभूतपूर्व यशाबद्दल कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडीच्या वतीने परिसरातील सर्व सन्माननीय खासदार, आमदार आणि पालकमंत्री यांचे जाहीर आभार मानण्यात आले आहेत. लोकप्रतिनिधींच्या खंबीर पाठपुराव्यामुळेच प्रवाशांच्या मागण्यांना यश आले असल्याचे संघटनेने म्हटले आहे.

​या यशाबद्दल खासदार श्री. नारायण राणे साहेब, श्री. श्रीकांत शिंदे, श्री. नरेश म्हस्के, आणि श्रीमती मेधाताई कुलकर्णी, पालकमंत्री श्री. नितेश राणे, आमदार श्री. दीपक केसरकर, आमदार श्री. रवींद्र चव्हाण, आमदार श्रीमती सुलभा गायकवाड ताई, आमदार श्री. कुमार आयलानी, आणि आमदार श्री. बाळा नर आदींचे संघटनेच्या वतीने लोकप्रतिनिधींचे विशेष आभार मानण्यात आले आहेत.

​”आमच्या सर्व लोकप्रतिनिधींनी रेल्वे प्रवाशांच्या प्रश्नांवर नेहमीच सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हे यश मिळाले आहे. भविष्यातही प्रवासी बांधवांच्या हितासाठी आणि हक्कासाठी आपले असेच मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभत राहील, हा विश्वास आहे.”

— कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडी

​या यशस्वी प्रयत्नांमुळे कोकण रेल्वेच्या प्रवाशांमध्ये समाधानाचे वातावरण असून, सर्व स्तरांतून या लोकप्रतिनिधींचे कौतुक होत आहे.

 

मुसळधार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांतील पाणीसाठ्यात विक्रमी वाढ

   Follow us on        

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि आसपासच्या परिसरात कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात प्रमुख जलाशयांच्या पाणीसाठ्यात प्रचंड मोठी वाढ झाली आहे. मंगळवारी सकाळी ६ वाजल्यापासून ते बुधवार सकाळी ६ वाजेपर्यंत झालेल्या चोवीस तासांतील धुवांधार पावसामुळे सातही धरणांमधील एकूण उपयुक्त पाणीसाठा थेट ४१.३६ टक्क्यांवर पोहोचला आहे. महापालिकेच्या हायड्रॉलिक इंजिनिअर डिपार्टमेंटच्या भांडुप येथील मास्टर कंट्रोल सेंटरने (BMC) जारी केलेल्या अधिकृत अहवालानुसार, गेल्या २४ तासांत एकूण पाणीसाठ्यात १२.४४ टक्क्यांची तर गेल्या ४८ तासांत तब्बल २४.४४ टक्के इतकी लक्षणीय वाढ नोंदवली गेली आहे.

​या दमदार पावसामुळे मुंबईची तहान भागवणारे दोन महत्त्वाचे तलाव म्हणजेच ‘विहार’ आणि ‘तुळशी’ पूर्ण क्षमतेने भरून वाहू (ओव्हरफ्लो) लागले आहेत. प्राप्त माहितीनुसार, विहार तलाव ७ जुलै रोजी रात्री ९:०० वाजता, तर तुळशी तलाव त्याच रात्री ११:४३ वाजता ओव्हरफ्लो झाला. याशिवाय अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा आणि भातसा या इतर प्रमुख जलाशयांमध्येही पाण्याची आवक अत्यंत वेगाने सुरू असून त्यांच्या पाणीपातळीत मोठी सुधारणा झाली आहे. आज सकाळी ६ वाजेपर्यंत तानसा तलावात ३१९ मिमी, अप्पर वैतरणामध्ये ३०९ मिमी आणि मोडक सागरमध्ये २५१ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

​जलाशयांमधील या समाधानकारक वाढीमुळे आगामी काळात मुंबईकरांवर ओढवणारे पाणीटंचाईचे संकट आणि चिंता मोठ्या प्रमाणावर दूर झाली आहे. मुंबई महानगरपालिकेने (BMC) नागरिकांना दिलासा दिला असला, तरी सध्या सुरू असलेल्या मुसळधार आणि सततच्या पावसामुळे सखल भागात पाणी साचण्याची शक्यता लक्षात घेऊन नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी आणि प्रशासनाने दिलेल्या सुरक्षा सूचनांचे पालन करून सावध राहावे, असे आवाहनही केले आहे.

​एकूण उपयुक्त पाणीसाठा: सातही जलाशयांमध्ये मिळून सध्या ५,९८,५८९ दशलक्ष लिटर म्हणजेच ४१.३६% पाणीसाठा उपलब्ध आहे.

​गेल्या २४ आणि ४८ तासांतील वाढ: गेल्या २४ तासांत पाणीसाठ्यात १२.४४% तर गेल्या ४८ तासांत २४.४४% इतकी मोठी वाढ झाली आहे.

​पूर्ण भरलेले तलाव (ओव्हरफ्लो): ‘विहार’ तलाव (७ जुलै रोजी रात्री ९.०० वाजता) आणि ‘तुळशी’ तलाव (७ जुलै रोजी रात्री ११.४३ वाजता) पूर्ण १००% भरून वाहू लागले आहेत.

​प्रमुख तलावांमधील उपयुक्त साठा (टक्केवारी):

​मोडक सागर: ७२.१४%

​तानसा: ६९.३५%

​भातसा: ३५.५९%

​मध्य वैतरणा: ३४.६८%

​अप्पर वैतरणा: २०.६६%

​गेल्या २४ तासांतील मुख्य पाऊस: तानसा तलाव क्षेत्रात सर्वाधिक ३१९ मिमी, अप्पर वैतरणा येथे ३०९ मिमी आणि मोडक सागर येथे २५१ मिमी पावसाची नोंद झाली आहे

Konkan Railway: पावसामुळे कोकण रेल्वेचे वेळापत्रक विस्कळीत; प्रवाशांचे मोठे हाल

   Follow us on        

Konkan Railway:गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वेच्या वाहतुकीवर मोठा परिणाम झाला असून, रेल्वेचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले आहे. मुंबईहून मडगावच्या दिशेने जाणाऱ्या बहुतांश एक्सप्रेस गाड्या तीन ते सहा तास उशिराने धावत असल्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. या विलंबाचा सर्वाधिक फटका ‘कोकणकन्या एक्सप्रेस’ला बसला आहे. ही गाडी सिंधुदुर्ग जिल्ह्यात तब्बल सात तास उशिराने पोहोचली असून, गेल्या आठ दिवसांपासून तिचे उशिरा धावणे सुरूच आहे. याव्यतिरिक्त तुतारी एक्सप्रेस (५ तास), मांडवी एक्सप्रेस (५ तास) आणि दिवा एक्सप्रेस (६ तास) या गाड्याही मोठ्या विलंबाने धावत आहेत. या गाड्या रात्री उशिरा कोकणातील स्थानकांवर पोहोचणार असल्याने, पुढील प्रवासासाठी प्रवाशांना नाईलाजाने खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागणार आहे.

या प्रमुख गाड्यांसोबतच वंदे भारत, जनशताब्दी, कोचुवेली, नेत्रावती, आणि मंगला एक्सप्रेस यांसारख्या लांब पल्ल्याच्या गाड्यांनाही अडीच ते साडेपाच तासांचा विलंब होत आहे. मात्र, या सर्व गोंधळात प्रवाशांसाठी एक दिलासादायक बाब म्हणजे, मुंबईच्या दिशेने परतीच्या प्रवासाला असणाऱ्या गाड्यांच्या वेळापत्रकावर कोणताही परिणाम झालेला नाही. मुंबईकडे जाणारी तुतारी, जनशताब्दी, कोकणकन्या, मडगाव-एलटीटी आणि दिल्लीला जाणारी मंगला एक्सप्रेस या सर्व गाड्या आपल्या निर्धारित वेळेनुसारच धावत आहेत.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search