Author Archives: Kokanai Digital

Railway Megablock : मध्यरेल्वेचा दोन दिवसांचा ‘ब्लॉक’, कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांवर परिणाम

   Follow us on        

मुंबई: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात परळ आणि करी रोड दरम्यान असलेला जुना रेल्वे ओव्हर ब्रिज (ROB) पाडण्यासाठी विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक ४ एप्रिलच्या रात्री २३:१५ पासून ५ एप्रिलच्या पहाटे ०५:४५ पर्यंत असेल. या कामामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी तारखेनुसार वेळापत्रकात खालील बदल करण्यात आले आहेत:

​३ एप्रिल २०२६ (शुक्रवार)

​या दिवशी सुटणाऱ्या खालील गाड्या मुंबई सीएसएमटीला न जाता ठाणे स्थानकावर शॉर्ट टर्मिनेट होतील (प्रवास ठाण्यातच संपेल):

​१२८७० हावडा – मुंबई सीएसएमटी सुपरफास्ट एक्स्प्रेस

​११०५८ अमृतसर – मुंबई सीएसएमटी एक्स्प्रेस

​११०२० भुवनेश्वर – मुंबई सीएसएमटी कोणार्क एक्स्प्रेस

​१२८१० हावडा – मुंबई सीएसएमटी मेल

​०१०८० गोरखपूर – मुंबई सीएसएमटी विशेष

​४ एप्रिल २०२६ (शनिवार)

​अ) ठाणे आणि पनवेल येथे प्रवास संपणाऱ्या गाड्या:

​१२१३४ मंगळुरू जंक्शन – मुंबई सीएसएमटी सुपरफास्ट एक्स्प्रेस (ठाणे येथे संपेल)

​१२७०२ हैदराबाद – मुंबई सीएसएमटी हुसेन सागर एक्स्प्रेस (ठाणे येथे संपेल)

​१११४० होसपेटे जंक्शन – मुंबई सीएसएमटी एक्स्प्रेस (ठाणे येथे संपेल)

​१२०NT/१२०५२ मडगाव – मुंबई सीएसएमटी जनशताब्दी एक्स्प्रेस (पनवेल येथे संपेल)

​१०१०४ मडगाव – मुंबई सीएसएमटी मांडवी एक्स्प्रेस (पनवेल येथे संपेल)

​२२१२० मडगाव – मुंबई सीएसएमटी तेजस एक्स्प्रेस (पनवेल येथे संपेल)

​ब) बदललेल्या स्थानकावरून सुटणाऱ्या गाड्या (Short Originate):

​२०१११ कोकण कन्या एक्स्प्रेस: ही गाडी सीएसएमटीऐवजी पनवेल स्थानकावरून रात्री ००:३२ वाजता सुटेल.

​११०५७ मुंबई – अमृतसर एक्स्प्रेस: ही गाडी सीएसएमटीऐवजी दादर स्थानकावरून रात्री २३:४६ वाजता सुटेल.

​५ एप्रिल २०२६ (रविवार)

​अ) नवीन वेळेनुसार सुटणाऱ्या गाड्या (Rescheduled):

ब्लॉकमुळे सकाळी सुटणाऱ्या या गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे:

​११००३ दादर – सावंतवाडी रोड राज्यराणी एक्स्प्रेस: सकाळी ०६:३० वा.

​२२२२९ मुंबई सीएसएमटी – मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस: सकाळी ०५:४० वा.

​२२१७७ मुंबई सीएसएमटी – वाराणसी महानगरी एक्स्प्रेस: सकाळी ०५:५० वा.

​१७६१७ मुंबई सीएसएमटी – नांदेड तपोवन एक्स्प्रेस: सकाळी ०६:३० वा.

​२२१०५ मुंबई सीएसएमटी – पुणे जंक्शन इंद्रायणी एक्स्प्रेस: सकाळी ०६:५० वा.

​०११२९ मुंबई सीएसएमटी – मडगाव विशेष: सकाळी ०७:१० वा.

​१०१०३ मुंबई सीएसएमटी – मडगाव मांडवी एक्स्प्रेस: सकाळी ०७:५० वा.

​२२१५९ मुंबई सीएसएमटी – चेन्नई सेंट्रल सुपरफास्ट एक्स्प्रेस: दुपारी ०२:३० वा.

​ब) पनवेलवरून सुटणाऱ्या गाड्या:

​१२०५१ मुंबई – मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस: सकाळी ०६:४५ वाजता पनवेलवरून सुटेल.

​२२११९ मुंबई – मडगाव तेजस एक्स्प्रेस: सकाळी ०७:०७ वाजता पनवेलवरून सुटेल.

या बदलांमुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून रेल्वे प्रशासनाने प्रवासापूर्वी सुधारित वेळापत्रक तपासण्याचे आणि लोकल गाड्यांच्या माहितीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेला QR कोड वापरण्याचे आवाहन केले आहे. पायाभूत सुविधांच्या या महत्त्वाच्या कामासाठी प्रवाशांनी सहकार्य करावे, अशी विनंती रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आली आहे.

लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे सिंधुदुर्ग कोकण रेल्वेच्या मूलभूत सुविधांपासून वंचित – सागर तळवडेकर

   Follow us on        

सावंतवाडी: लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे सिंधुदुर्ग जिल्हा आजही कोकण रेल्वेच्या मूलभूत सुविधांपासून वंचित असल्याचा आरोप कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे उपाध्यक्ष सागर तळवडेकर यांनी केला आहे. कोकण रेल्वेमुळे गोवा, कर्नाटक आणि केरळ या राज्यांना विकासाचा मोठा फायदा झाला असताना महाराष्ट्रातील सिंधुदुर्गकडे मात्र दुर्लक्ष झाले असल्याचे त्यांनी नमूद केले.

कोकण रेल्वेच्या रत्नागिरी विभागातील सिंधुदुर्ग जिल्ह्याला सुविधांच्या बाबतीत मागे ठेवण्यात आल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. गोवा आणि कर्नाटक राज्यांना आधुनिक डेमू आणि मेमू गाड्यांचे जाळे उपलब्ध झाले आहे, तर सिंधुदुर्गमधील प्रवाशांना अद्यापही मर्यादित सेवा आणि अडचणींचा सामना करावा लागत आहे.

जिल्ह्यातील प्रवाशांना कमी तिकिट दरात सेवा मिळत असली तरी महत्त्वाच्या गाड्यांना थांबे मिळत नसल्याने स्थानिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. अनेक गाड्या जिल्ह्यातून धावत असल्या तरी त्यांचा लाभ स्थानिकांना पुरेसा मिळत नाही, ही वस्तुस्थिती असल्याचे तळवडेकर यांनी स्पष्ट केले.

सावंतवाडी टर्मिनस हा केवळ एक प्रकल्प नसून कोकणाच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. या प्रकल्पामुळे पर्यटन आणि हॉटेल उद्योगाला चालना मिळून मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होऊ शकते. मोपा विमानतळ आणि प्रस्तावित पंचतारांकित हॉटेल प्रकल्पांमुळे सावंतवाडी परिसर पर्यटनदृष्ट्या अधिक सक्षम होणार आहे.

मात्र सध्या कोकणातून धावणाऱ्या बहुतांश गाड्या गोवा किंवा दक्षिण भारताकडे वळवल्या जात असल्याने स्थानिक प्रवाशांना आरक्षणाची समस्या भेडसावत आहे. गणेशोत्सव, होळी यांसारख्या सणांच्या काळात ही अडचण अधिक तीव्र होते. त्यामुळे स्थानिक नागरिक आणि मुंबईतील चाकरमान्यांनी एकत्र येऊन या प्रश्नावर आवाज उठवावा, असे आवाहन सागर तळवडेकर यांनी केले आहे.

मुंबई-सिंधुदुर्ग विमानसेवेला सरकारचा मोठा ‘बूस्टर’; मुंबई ते तळकोकण प्रवास आता एका तासात

   Follow us on        

मुंबई: महाराष्ट्र  सरकारने कोकणातील पर्यटन आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळावरून मुंबईकडे जाणाऱ्या विमानसेवेसाठी १०० टक्के व्हायाबिलिटी गॅप फंडिंग (VGF) मंजूर करण्यात आले आहे. या निर्णयामुळे विमानसेवा आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य ठरणार असून, नियमित उड्डाणांना चालना मिळणार आहे.

या निर्णयानंतर मुंबई ते चिपी (सिंधुदुर्ग) हा प्रवास आता केवळ एका तासात पूर्ण होणार आहे. ही सेवा आठवड्यातील सातही दिवस सुरू राहणार असल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. यामुळे वेळेची मोठी बचत होणार असून, प्रवास अधिक सुलभ आणि सोयीस्कर होईल.

कोकणातील पर्यटनासाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. जलद आणि सुलभ हवाई सेवा उपलब्ध झाल्याने देशभरातील पर्यटकांना सिंधुदुर्ग आणि आसपासच्या पर्यटनस्थळांना भेट देणे अधिक सोपे होईल. त्यामुळे कोकण पर्यटनाचा ‘टेक ऑफ’ होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

याशिवाय, या निर्णयाचा स्थानिक अर्थव्यवस्थेवरही सकारात्मक परिणाम होणार आहे. हॉटेल उद्योग, पर्यटनाशी संबंधित व्यवसाय आणि स्थानिक रोजगाराच्या संधींना मोठी चालना मिळणार आहे. यामुळे कोकणातील विकास प्रक्रियेला वेग येण्याची शक्यता आहे.

विधानभवनातील कॅबिनेट बैठकीत घेतलेल्या या निर्णयाचे सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी स्वागत केले आहे. त्यांनी सांगितले की, ही सेवा सुरू होणे ही प्रवाशांची दीर्घकाळाची मागणी होती. त्यामुळे हा निर्णय कोकणवासीयांसाठी दिलासादायक ठरला असून, प्रदेशाच्या विकासासाठी एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

कल्याण – नाशिक लोकल सेवा अशक्य! रेल्वे प्रशासनाने दिले ‘हे’ कारण

   Follow us on        

नाशिक: नाशिक ते कल्याण दरम्यान लोकल रेल्वे सेवा सुरू करण्याच्या दीर्घकालीन मागणीवर केंद्र सरकारने पुन्हा एकदा तांत्रिक कारणांचे बोट दाखवत ही सेवा सध्यातरी शक्य नसल्याचे स्पष्ट केले आहे.

खासदार राजाभाऊ वाजे यांनी लोकसभेत यासंदर्भात रेल्वे मंत्रालयाला जाब विचारला असता, मंत्रालयाने दिलेल्या उत्तरामुळे नाशिककरांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. कसारा ते इगतपुरी या घाट विभागातील बोगद्यांची रुंदी कमी असून, मुंबई उपनगरीय लोकल गाड्यांची रुंदी जास्त असल्यामुळे या मार्गावर लोकल चालवणे सध्या कठीण असल्याचे रेल्वेने म्हटले आहे. या तांत्रिक अडचणींमुळे नाशिक-कल्याण लोकलचे स्वप्न पुन्हा एकदा अधांतरी राहिले असून, खासदार वाजे यांनी केंद्र सरकार नाशिककरांना ‘एप्रिल फूल’ बनवत असल्याचा गंभीर आरोप केला आहे.

​या मार्गावर सध्या ३६ उपनगरीय गाड्या धावत असल्या तरी, नवीन सेवा सुरू करणे हे मार्गाची क्षमता, उपलब्ध पाथ, रोलिंग स्टॉक आणि पायाभूत सुविधांवर अवलंबून असल्याचे रेल्वे मंत्रालयाचे म्हणणे आहे. मात्र, नाशिक ते कल्याण या प्रवासासाठी हजारो विद्यार्थी, शेतकरी, लघु व्यापारी आणि रोजंदारी करणारे कामगार दररोज प्रवास करतात, त्यांच्यासाठी ही केवळ सुविधा नसून एक अत्यंत आवश्यक गरज आहे. एक्स्प्रेस गाड्या सर्व स्थानकांवर थांबत नसल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत.

या तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी सरकार कोणते ठोस पाऊल उचलणार किंवा नवीन तंत्रज्ञानाचा वापर करणार का, याबाबत मंत्रालयाने कोणतीही स्पष्ट भूमिका मांडलेली नाही. त्यामुळे ही रेल्वे सेवा नेमकी कधी सुरू होणार, हा प्रश्न अद्यापही अनुत्तरितच राहिला आहे.

मध्य रेल्वे ही खरोखर ‘मध्य रेल्वे’ आहे की ‘उत्तर भारतीय रेल्वे’?

खासदार अरविंद सावंत यांचा लोकसभेत प्रश्न 

   Follow us on        

नवी दिल्ली: मध्य रेल्वेच्या धोरणांवर पक्षपातीपणाचे आरोप करत महाराष्ट्रातील, विशेषतः कोकण आणि मराठी जनतेत तीव्र नाराजी पसरली आहे. विशेष गाड्यांच्या घोषणेमध्ये बिहारसाठी ४५०, उत्तर प्रदेशसाठी ३३२ गाड्या देण्यात आल्या असताना कोकणाच्या वाट्याला केवळ ३६ गाड्या आल्याने संताप व्यक्त केला जात आहे. यासोबतच दादर-रत्नागिरी ही महत्त्वाची गाडी बंद केल्याने कोकणवासीयांमध्ये असंतोष अधिक वाढला आहे. आधीच हिंदी भाषेच्या सक्तीच्या मुद्द्यावरून नाराजी असताना, आता गाड्यांच्या वाटपातही भेदभाव होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

या पार्श्वभूमीवर खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभेतील शून्य प्रहरामध्ये हा मुद्दा उपस्थित केला. सीएसएमटी-गोरखपूर ही गाडी दररोज धावत असताना सीएसएमटी-मडगाव गाडी आठवड्यातून केवळ एकदाच का चालवली जाते, असा सवाल त्यांनी केला. तसेच कोकणातील दादर-रत्नागिरी गाडी बंद करण्यामागील कारण काय, पुणे-नांदेड आणि नांदेड-हडपसर यांसारख्या गाड्यांची क्षमता का कमी करण्यात आली, असे प्रश्नही त्यांनी उपस्थित केले. कोकण रेल्वेसाठी लढा देणाऱ्या कोकणवासीयांवरच अन्याय का केला जात आहे, असा सवालही त्यांनी सरकारला विचारला. “मध्य रेल्वे ही खरोखर ‘मध्य रेल्वे’ आहे की ‘उत्तर भारतीय रेल्वे’?” असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला.

यावेळी त्यांनी रेल्वे मंत्र्यांकडे काही महत्त्वाच्या मागण्या मांडल्या. दादर-रत्नागिरी गाडी तात्काळ पुन्हा सुरू करावी, कोकणासाठी गाड्यांची संख्या वाढवावी आणि हडपसर येथे मर्यादित केलेल्या गाड्या पुन्हा पूर्ण क्षमतेने चालवाव्यात, अशी मागणी त्यांनी केली. या मुद्द्यावर लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Shaktipeeth Expressway: शक्तिपीठ महामार्गाच्या ८५६ किमीच्या सुधारित आखणीला राज्यशासनाची मंजुरी

   Follow us on        

मुंबई: राज्य शासनाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ असलेल्या शक्तिपीठ महामार्गाच्या सुधारित आखणीला अधिकृत मंजुरी दिली आहे. या निर्णयानुसार आता महामार्गाची एकूण लांबी ८५६ किलोमीटर झाली असून, यामध्ये सातारा जिल्ह्याचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. फेब्रुवारी २०२४ च्या प्रस्तावानुसार हा महामार्ग ८०२ किलोमीटरचा होता, मात्र सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील बागायती जमिनींच्या संपादनाला शेतकऱ्यांनी केलेल्या तीव्र विरोधामुळे या प्रकल्पाच्या आखणीत मोठे बदल करण्यात आले आहेत.

​बदललेली जिल्हावार आखणी:

सुधारित आराखड्यानुसार, वर्धा, यवतमाळ, बीड आणि लातूर या जिल्ह्यांतील मार्गामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मात्र, नांदेड, हिंगोली, परभणी, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमधील मार्गामध्ये महत्त्वाच्या सुधारणा करण्यात आल्या आहेत. सातारा जिल्ह्याचा समावेश झाल्याने आता हा मार्ग सातारा आणि सांगलीतून कोल्हापूरमार्गे चंदगड आणि तेथून दोडामार्ग तालुक्यातील बांद्याजवळून थेट गोव्यात प्रवेश करेल.

​सोलापूर आणि सातारा जिल्ह्यातील मार्ग:

सोलापूर जिल्ह्यातील पूर्वीच्या आखणीत मोठे बदल झाले असून उत्तर सोलापूर आणि सांगोला हे तालुके आता या मार्गातून वगळण्यात आले आहेत. त्याऐवजी माढा आणि माळशिरस या नवीन तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. बार्शी, मोहोळ आणि पंढरपूर तालुक्यातील बाधित गावांच्या यादीतही काही बदल झाले आहेत. सोलापूरच्या गारवडमधून हा महामार्ग साताऱ्यातील कारखेल येथे प्रवेश करेल. तेथून दिवड, कुकुडवाडवरून खटावमधील पडळनंतर मायणीजवळून तो सांगली जिल्ह्यात मार्गस्थ होईल.

​धार्मिक पर्यटनाला चालना:

या नवीन आखणीमुळे सातारा जिल्ह्यातील शिखर शिंगणापूर आणि गोंदवले बुद्रुक ही दोन महत्त्वाची तीर्थक्षेत्रे महामार्गाशी जोडली जाणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या रोषाचा फटका बसू नये म्हणून हा प्रकल्प मागे पडला होता, मात्र आता सुधारित आखणीच्या शासन निर्णयामुळे या महामार्गाच्या कामाला पुन्हा गती मिळण्याचे संकेत मिळत आहेत.

उपनगरीय लोकल सेवेचा वक्तशीरपणा सुधारण्याच्या नावाखाली कोकणरेल्वे मार्गावरील सर्वच गाड्यांना ‘बाहेरचा मार्ग’?

   Follow us on        

मुंबई: कोकणात जाणाऱ्या सामान्य चाकरमान्यांच्या हक्काची आणि जिव्हाळ्याची असलेली ‘रत्नागिरी-दादर पॅसेंजर’ रेल्वे आता कायमची इतिहासजमा होणार असल्याचे चिन्ह दिसत आहे. कोरोना काळात बंद करण्यात आलेली ही गाडी पुन्हा दादरपर्यंत सुरू करावी, ही कोकणवासीयांची अत्यंत रास्त मागणी रेल्वे प्रशासनाने अत्यंत उद्धटपणे फेटाळून लावली आहे.

​शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर यांनी नुकतीच दिल्लीत रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली. मात्र, रेल्वे अधिकाऱ्यांनी दादर किंवा सीएसटीएम येथून रत्नागिरीसाठी गाडी सुरू करणे ‘शक्यच नाही’ असे स्पष्टपणे सांगून कोकणच्या जनतेच्या तोंडाला पाने पुसली आहेत.

विशेष म्हणजे, आता ही गाडी दिवा स्थानकावरून वसईमार्गे वळवण्यात येणार आहे. म्हणजेच, मुंबईत राहणाऱ्या चाकरमान्याला ही गाडी पकडण्यासाठी थेट दिवा किंवा वसई गाठावी लागणार आहे.

उपनगरीय लोकल सेवेचा वक्तशीरपणासाठी कोकणकरांच्या सोयीचा बळी. 

रेल्वे अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार उपनगरीय लोकल सेवेचा वक्तशीरपणा वाढविण्यासाठी काही ठोस पावले उचलत आहे. त्यात कोकण रेल्वे मार्गे जाणार्‍या गाड्या कायमस्वरूपी पनवेल, बोरिवली येथील प्रस्तावित टर्मिनसवर शिफ्ट करण्याचा विचार असल्याची माहिती समोर येत आहे.

एका आघाडीच्या मराठी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार भविष्यात कोकणात जाणाऱ्या सर्व एक्स्प्रेस गाड्या आता पश्चिम रेल्वेच्या बोरीवली स्थानकातून सुटतील. या गाड्या पुढील दीड ते दोन वर्षात पूर्ण होणार्‍या नव्या रेल्वे मार्गाने म्हणजेच जुचंद्र, कमान रोड, खारबाव, भिवंडी रोड, नवी डोंबिवली, कोपर, नांदवली, तळोजे आणि कळंबोलीमार्गे पनवेलला जातील.

एकदंरीत मध्यरेल्वे कोकणरेल्वेशी असलेली लिंक संपूर्णपणे तोडणार असून या गाड्या पाश्चिम रेल्वेच्या समन्वयाने चालविण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.

प्रवासी वर्गात नाराजी. 

आधीच दादर रत्नागिरी एक्सप्रेस गाडी बंद केल्याने नाराज झालेला कोकणातील प्रवासी वर्ग या बातमीने सुन्न झाला आहे. कोकणातील जनतेचा कोणी नसल्याची भावना त्यांच्याकडून व्यक्त होत आहे.

श्री क्षेत्र टेरव येथे २ एप्रिल रोजी चैत्र पौर्णिमेला रंगणार वार्षिक जत्रोत्सव.

   Follow us on        

चिपळूण:- चिपळूण तालुक्यातील दसपटी विभागातील निसर्गरम्य श्री क्षेत्र टेरव या पुरातन व सुप्रसिद्ध देवस्थानचे ग्रामदैवत श्री वाघजाई देवी आणि कुलदैवत श्री कुलस्वामिनी भवानी देवी आहे. श्री काळकाई देवी ही माहेरवाशिणींची रक्षणकर्ती देवी म्हणून प्रसिद्ध आहे. तसेच जागृत आणि नवसाला पावणाऱ्या देवता असा या देवतांचा लौकीक आहे. शक्ती, युक्ती, बुद्धी व भक्ती यांचा अजोड मिलाप असलेल्या महाबली श्री हनुमान जन्मोत्सव चैत्र पौर्णिमेला साजरा करण्यात येतो, यंदा हा उत्सव गुरूवार दिनांक २ एप्रिल रोजी मोठ्या जल्लोषात साजरा होणार आहे. श्री भवानी वाघजाई व हनुमान मंदिराची अप्रतिम रंगरंगोटी करून मंदिर यात्रोत्सवासाठी सजविण्यात आले आहे. सदर रंगकाम ज्येष्ठ आर्किटेक्ट श्री सतीश राव, सीपीएमसी, मुंबई यांच्या सल्ल्याने व देखरेखीखाली ठेकेदार श्री अमित पारकर, आकार आविष्कार इन्फ्रा, मुंबई यांनी केले आहे.

चैत्र पौर्णिमेला रुढी परंपरेनुसार सूर्योदय झाल्यावर ब्राम्हण, मानकरी, ग्रामस्थ आणि पुजारी यांच्या उपस्थितीत मंदिरात हनुमान जन्मोत्सव साजरा करतील. दुपारी १२ वाजता ग्रामस्थांच्या उपस्थितीत दोन्ही मानकरी श्रीफळाच्या तीन जोड्या श्री कुलस्वामिनी भवानी मातेसमोर ठेवून व गाऱ्हाणे घालून पुजारी ते श्रीफळ वाढवतील व प्रसाद म्हणून मानाप्रमाणे त्याचे वाटप करतील. तसेच मंदिराच्या पोवळीबाहेर पूर्व दिशेस देवीचे देणे मागणे दिले जाईल. मंदिराच्या बाहेर पावट्याच्या घुगऱ्या व देवीच्या देण्या मागण्याचा प्रसाद दिला जाईल. रुढी परंपरेनुसार पूजाविधी संपन्न झाल्यावर, पुजारी पालखीत *कुलदैवत श्री भवानी, ग्रामदैवत श्री वाघजाई, भैरी, केदार, महालक्ष्मी व कुलस्वामिनी* या देवतांची रुपी लावतील. शतकाच्या दिशेने वाटचाल करणारा टेरव गावचा चैत्रपौर्णिमा जत्रोत्सव म्हणजेच ग्रामस्थ, माहेरवाशिणी, चाकरमानी आणि भक्तांच्या आनंदाला उधाण आणणारा दिवस असतो. चैत्र पौर्णिमे निमित्त पंचक्रोशीतील मौजे कामथे व चिंचघरी येथील पालख्यांचे मिरवणुकीने वाजतगाजत रात्रौ टेरव येथे आगमन होईल. पालख्या विद्युत रोषणाईंनी तसेच विविध प्रकारच्या फुलांनी सजविलेल्या जातील. ढोल ताशांच्या गजरात गुलाल उधळीत तिन्ही पालख्यांची मिरवणूक मंदिराकडे मार्गस्थ होईल. तिन्ही पालख्या नाचत उंचावून एकमेकींना भेटतात ते दृश्य विलोभनीय असते. मंदिरात तिन्ही पालख्या स्थानापन्न झाल्यावर दर्शनासाठी आणि ओटी भरण्यासाठी प्रचंड गर्दी होते. त्या नंतर सालाबादप्रमाणे रात्रौ मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल.

दुसऱ्या दिवशी सकाळी दोन्ही पालख्यांची पूजा व सन्मान केल्यावर आपआपल्या गावी मार्गस्थ होतील. सदर वेळी श्री क्षेत्र टेरवची पालखी मंदिराच्या उत्तरेच्या प्रवेशद्वारापर्यंत निरोप देण्यासाठी नेली जाईल आणि अशाप्रकारे जत्रोत्सवाची सांगता होईल.

तरी सर्व भाविक, चाकरमानी, माहेरवाशिणी व हितचिंतक यांनी वार्षिक जत्रोत्सवानिमित्त दर्शनाचा लाभ घ्यावा अशी विनंती ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.

Konkan Railway: ऐन हंगामात विशेष गाडीच्या फेर्‍यांमध्ये कपात; प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर

   Follow us on        

मुंबई: उन्हाळी सुट्ट्यांमधील प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता, कोकण रेल्वेने मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते मडगाव (गोवा) दरम्यान चालवल्या जाणाऱ्या साप्ताहिक ‘उन्हाळी विशेष’ ट्रेनच्या (०१०१९/०१०२०) वेळापत्रकात महत्त्वपूर्ण बदल केला आहे. पूर्व नियोजित वेळापत्रकानुसार ही गाडी ५ एप्रिल २०२६ पासून सुरू होणार होती, मात्र आता ही सेवा १२ एप्रिल २०२६ पासून प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल. ही विशेष रेल्वे १२ एप्रिल ते ७ जून २०२६ या कालावधीत दर रविवारी चालवली जाणार आहे.

फेर्‍यांमध्ये केलेल्या कपातीमुळे प्रवाशांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. याआधीच कोकण रेल्वे मार्गावर उन्हाळी सुट्ट्यांसाठी पुरेशा गाड्यांची घोषणा केली नसल्याचा सूर होता. आता ही गाडी ऐन हंगामात जेव्हा चाकरमानी गावी जाण्याची योजना आखतात तेव्हाच रद्द केली गेली असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे.

​सुधारित वेळापत्रकानुसार, गाडी क्रमांक ०१०१९ मुंबई सीएसएमटीहून दर रविवारी मध्यरात्री ००:५५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी १५:१५ वाजता मडगावला पोहोचेल. परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक ०१०२० मडगावहून रविवारी सायंकाळी १६:०० वाजता रवाना होईल आणि दुसऱ्या दिवशी (सोमवारी) पहाटे ०३:५० वाजता मुंबईत पोहोचेल. या विशेष गाडीचे बुकिंग १ एप्रिल २०२६ पासून आयआरसीटीसीच्या (IRCTC) संकेतस्थळावर सुरू होणार आहे. तरी प्रवाशांनी या बदललेल्या तारखांची नोंद घेऊन आपल्या प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन कोकण रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

तुकाराम मुंडे, अश्विनी भिडेसह राज्यातील १० सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या…

   Follow us on        

मुंबई: महाराष्ट्र सरकारने आज, ३१ मार्च २०२६ रोजी राज्यातील दहा वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. या प्रशासकीय फेरबदलात सर्वात चर्चिले जाणारे नाव आहे अश्विनी भिडे यांचे. १९९५ च्या बॅचच्या आयएएस अधिकारी अश्विनी भिडे यांची बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भूषण गगराणी यांच्या सेवानिवृत्तीनंतर त्या मुंबई महापालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त म्हणून पदभार स्वीकारतील. मुंबई मेट्रोसारख्या मोठ्या प्रकल्पांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेल्या भिडे यांना ‘नो-नॉन्सेन्स’ प्रशासक म्हणून ओळखले जाते.

या बदल्यांमध्ये तुकाराम मुंढे यांची आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भ्रष्टाचाराविरोधात कडक भूमिका घेणारे मुंढे यांची ही २१ वर्षांच्या कारकिर्दीत २४वी बदली असल्याचे सांगितले जाते. प्रेरणा देशभ्रतार यांना मत्स्यव्यवसाय आयुक्तपद, पृथ्वीराज बी. पी. यांना वसई-विरार महानगरपालिका आयुक्तपद, तर विनिता वेद सिंघल यांना मृद व जलसंधारण विभागाचे प्रधान सचिवपद देण्यात आले आहे.

याशिवाय माणिक गुरसळ यांची दिव्यांग सक्षमीकरण विभागाचे सचिव, विकास चंद्र रस्तोगी यांची वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव, परिमल सिंह यांची कृषी विभागाचे सचिव, लहू माळी यांची शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाचे व्यवस्थापकीय संचालक आणि लोकेश चंद्र यांची मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव म्हणून नियुक्ती झाली आहे. या फेरबदलांमुळे वित्त, कृषी, आपत्ती व्यवस्थापन आणि शहरी प्रशासनासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांत नवीन गती येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने प्रशासनाला अधिक कार्यक्षम आणि सुधारित करण्याच्या दिशेने हे पाऊल उचलल्याचे मानले जाते.

 

 

 

 

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search