Author Archives: Kokanai Digital

कल्याण-बदलापूर रेल्वे मार्गावर वीकेंडलाच ब्लॉक; लोकल फेऱ्या रद्द, एक्सप्रेस गाड्यांच्या मार्गात बदल

   Follow us on        

कल्याण: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागांतर्गत येणाऱ्या कल्याण ते बदलापूर स्थानकांदरम्यान ३ऱ्या आणि ४थ्या रेल्वे लाईनवरील ओव्हरहेड इक्विपमेंट (OHE) दुरुस्ती आणि पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणासाठी विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. १ मे आणि २ मे च्या मध्यरात्री हा ब्लॉक घेण्यात येणार असून, याचा मोठा फटका उपनगरीय लोकल सेवेसह लांब पल्ल्याच्या गाड्यांना बसणार आहे.

​ब्लॉकचे सविस्तर वेळापत्रक:

​मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, हा ब्लॉक दोन टप्प्यांत घेण्यात येईल:

​ब्लॉक ‘A’ (शुक्रवार/शनिवार मध्यरात्र): दि. २ मे २०२६ रोजी पहाटे ०१:४० ते ०३:४० वाजेपर्यंत कल्याण ते अंबरनाथ दरम्यान अप आणि डाऊन दक्षिण-पूर्व मार्गावर काम चालेल.

​ब्लॉक ‘B’ (शनिवार/रविवार मध्यरात्र): दि. ३ मे २०२६ रोजी पहाटे ०१:३० ते ०३:३० वाजेपर्यंत अंबरनाथ ते बदलापूर दरम्यान डाऊन दक्षिण-पूर्व मार्गावर दुरुस्ती केली जाईल.

​लोकल प्रवाशांची गैरसोय; या असतील शेवटच्या गाड्या:

​ब्लॉकच्या कालावधीत कल्याण ते बदलापूर दरम्यान लोकल सेवा पूर्णपणे बंद राहणार आहे. प्रवाशांनी गोंधळ टाळण्यासाठी शेवटच्या आणि पहिल्या लोकलच्या वेळा लक्षात घेणे आवश्यक आहे:

​१ मे (शुक्रवार): CSMT वरून सुटणारी शेवटची बदलापूर लोकल (BL61) रात्री २३:५१ वाजता सुटेल.

​२ मे (शनिवार): CSMT वरून सुटणारी शेवटची कर्जत लोकल (S41) रात्री २३:३० वाजता सुटेल.

​ब्लॉकनंतरची पहिली गाडी: दोन्ही दिवशी कर्जतवरून पहाटे ०३:३५ वाजता सुटणारी (S4) कर्जत-CSMT लोकल ही पहिली गाडी असेल.

​एक्सप्रेस गाड्यांच्या मार्गात बदल:

​ब्लॉकमुळे खालील तीन महत्त्वाच्या एक्सप्रेस गाड्या कर्जत-पनवेल मार्गे वळवण्यात आल्या आहेत:

१. ११०२० भुवनेश्वर – CSMT कोणार्क एक्सप्रेस

२. १८५१९ विशाखापट्टणम – LTT एक्सप्रेस

३. १२७०२ हैदराबाद – CSMT हुसेनसागर एक्सप्रेस

​विशेष सोय: ज्या गाड्यांचा कल्याण स्थानकावर थांबा होता, त्या आता प्रवाशांच्या सोयीसाठी ठाणे आणि पनवेल स्थानकांवर थांबतील.

​रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना होणाऱ्या या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त केली असून, प्रवाशांनी बदललेले वेळापत्रक तपासूनच बाहेर पडण्याचे आवाहन केले आहे.

मदार–तिरुवनंतपुरम स्पेशल ट्रेनला संगमेश्वर रोड स्थानकावर थांबा मंजूर

   Follow us on        

संगमेश्वर | २९ एप्रिल २०२६ कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या मदार (अजमेर) ते तिरुवनंतपुरम सेंट्रल दरम्यानच्या विशेष गाडीला संगमेश्वर रोड स्थानकावर अधिकृत थांबा मंजूर करण्यात आला आहे. यामुळे संगमेश्वर आणि परिसरातील प्रवाशांची मोठी गैरसोय दूर झाली असून परिसरात आनंदाचे वातावरण आहे.

​सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

​यापूर्वी या गाडीला संगमेश्वर स्थानकावर थांबा नसल्याने स्थानिक प्रवाशांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. या संदर्भात ‘निसर्गरम्य चिपळूण आणि संगमेश्वर रेल्वे ग्रुप’ च्या वतीने कोकण रेल्वेकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता. तसेच, पद्मश्री गजानन माने यांच्या मार्गदर्शनाखाली कोकण रेल्वेचे सी.एम.डी. (CMD) संतोष कुमार झा यांच्यासोबत झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत हा विषय प्रकर्षाने मांडण्यात आला होता. प्रशासनाने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करत अखेर या थांब्याचे अधिकृत पत्र प्रसिद्ध केले आहे.

​गाडीचे वेळापत्रक आणि वेळ

​रेल्वे प्रशासनाने जाहीर केल्यानुसार, ०२ मे २०२६ ते ०६ जून २०२६ या कालावधीत ही सेवा उपलब्ध असेल:

​ट्रेन क्र. ०६०१३ (तिरुवनंतपुरम – मदार जं. स्पेशल): ही गाडी दर गुरुवारी सकाळी ०८:१६ वाजता संगमेश्वर स्थानकावर येईल आणि दोन मिनिटांच्या थांब्यानंतर ०८:१८ वाजता मार्गस्थ होईल.

​ट्रेन क्र. ०६०१४ (मदार जं. – तिरुवनंतपुरम स्पेशल): ही गाडी दर रविवारी रात्री २३:१० वाजता संगमेश्वर स्थानकावर पोहोचेल आणि २३:१२ वाजता पुढील प्रवासासाठी रवाना होईल.

​कोकण रेल्वेने घेतलेल्या या निर्णयामुळे संगमेश्वर परिसरातील नागरिक आणि पर्यटकांना मोठा फायदा होणार आहे. रेल्वे ग्रुपच्या या यशस्वी पाठपुराव्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

कशेडी घाटात एसटी बसचा भीषण अपघात; १२ ते १३ प्रवासी जखमी

   Follow us on        

खेड: मुंबई-गोवा जुन्या महामार्गावरील कशेडी घाटात गुरुवारी उशिरा रात्री एक भीषण अपघात घडला. खेड डेपोची खेड-बोरीवली एसटी बस रात्री १० वाजता मार्गस्थ झाली होती. रात्री ११:३० ते १२ च्या सुमारास रायगड जिल्ह्यातील भोगाव परिसरात पोहोचली असता, बसचे ब्रेक निकामी झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटले. परिणामी, या बसने समोर असलेल्या एका बल्कर ट्रकला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात ट्रक चालकासह बसमधील सुमारे १२ ते १३ प्रवासी जखमी झाले असून, त्यातील काहींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

​अपघाताचे ठिकाण हे अत्यंत धोकादायक असून एका बाजूला खोल दरी आहे. सुदैवाने, धडक बसल्यानंतर बस दरीच्या टोकावर थांबली, ज्यामुळे मोठा अनर्थ टळला आणि अनेक प्रवाशांचे प्राण वाचले. घटनेची माहिती मिळताच शिवसेना खेड तालुकाप्रमुख सचिन धाडवे, तसेच मदत ग्रुपचे प्रसाद गांधी, अक्षय भोसले, निखिल चौधरी, समीर मोरे आणि दर्पण दरेकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली. पोलादपूर पोलिसांनीही तातडीने धाव घेत बचावकार्य सुरू केले. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

​कशेडी घाटात सध्या बोगद्याचे काम पूर्ण झाले असले, तरी स्थानिक गावांसाठी काही एसटी बसेस अजूनही जुन्या घाटातूनच धावतात. भोगाव परिसरात सध्या रस्त्याचे काम सुरू असून, त्या ठिकाणी आवश्यक सुरक्षा उपाययोजना केल्या जात नसल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे. वारंवार होणाऱ्या अशा घटनांमुळे घाटातील रस्ते सुरक्षा आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Konkan Railway: मदार-मडगाव दरम्यान ‘वन-वे’ विशेष गाडी

   Follow us on        

मडगाव: उत्तर पश्चिम रेल्वेने प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मदार ते मडगाव दरम्यान विशेष ‘वन-वे’ रेल्वे सेवा जाहीर केली आहे. गाडी संख्या ०९६०७, मदार-मडगाव स्पेशल रविवार, दिनांक ३ मे २०२६ रोजी मदार स्थानकावरून सायंकाळी १९.५५ वाजता सुटेल आणि मंगळवारी पहाटे ०४.४० वाजता मडगाव येथे पोहोचेल.

​या प्रवासात ही गाडी राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या स्थानकांवर थांबणार आहे. या विशेष रेल्वेचे सर्व थांबे खालीलप्रमाणे आहेत:

​प्रवासातील सर्व स्थानके:

मदारहून सुटल्यानंतर ही गाडी अजमेर, विजयनगर, भीलवाडा, चित्तौडगड, नीमच, मंदसौर, रतलाम, वडोदरा, भरूच, सुरत, वापी, वसई रोड, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम आणि करमली या स्थानकांवर थांबेल. त्यानंतर ही गाडी आपल्या अंतिम स्थानकावर म्हणजेच मडगाव येथे पोहोचेल.

​डब्यांची रचना आणि सुविधा:

या गाडीला एकूण २२ डबे असतील, ज्यात २ सेकंड एसी, ६ थर्ड एसी, १ थर्ड एसी इकॉनॉमी, ७ शयनयान (स्लीपर), ४ सामान्य श्रेणी आणि २ पॉवरकार डब्यांचा समावेश आहे. रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, या विशेष रेल्वेमध्ये लिननची (चादर, उशी, ब्लँकेट) सुविधा उपलब्ध नसेल, त्यामुळे प्रवाशांनी स्वतःची व्यवस्था करून प्रवास करावा.

​कोकण रेल्वे मार्गावरून जाणारी ही गाडी विशेषतः दक्षिण भारतात आणि कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी सोय ठरणार आहे. प्रवाशांनी वेळापत्रकाची नोंद घेऊन आपले आरक्षण निश्चित करावे, असे आवाहन रेल्वे विभागातर्फे करण्यात आले आहे.

तिरुवनंतपुरम – मदार जंक्शन विशेष एक्सप्रेस शनिवारपासून संगमेश्वर स्थानकावर थांबणार

   Follow us on        

रत्नागिरी: कोकण रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुविधेसाठी रेल्वे प्रशासनाने संगमेश्वर रोड स्थानकावर तिरुवनंतपुरम मदार विशेष जादा थांबा देण्याचा निर्णय घेतला आहे. हा बदल २ मे २०२६ पासून ६ जून २०२६ पर्यंत लागू राहणार आहे.

​गाडी क्र. ०६०१३ तिरुवनंतपुरम सेंट्रल ते मदार जंक्शन ही साप्ताहिक विशेष ट्रेन (जी दर बुधवारी तिरुवनंतपुरमवरून सुटते) दर गुरुवारी सकाळी ०८:१६ वाजता संगमेश्वर रोड स्थानकावर पोहोचेल आणि ०८:१८ वाजता पुढील प्रवासासाठी रवाना होईल. या गाडीला ६ मे २०२६ ते ३ जून २०२६ या कालावधीत हा थांबा मिळेल.

​तसेच परतीच्या प्रवासात गाडी क्र. ०६०१४ मदार जंक्शन ते तिरुवनंतपुरम सेंट्रल ही साप्ताहिक विशेष ट्रेन (जी दर शनिवारी मदार जंक्शनवरून सुटते) दर रविवारी रात्री २३:१० वाजता संगमेश्वर रोड स्थानकावर येईल आणि २३:१२ वाजता मार्गस्थ होईल. या गाडीला २ मे २०२६ ते ६ जून २०२६ या कालावधीत हा जादा थांबा देण्यात आला आहे.

​कोकण रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील बी. नारकर यांनी ही माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली असून प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर ‘समर स्पेशल’ गाड्यांची घोषणा

   Follow us on        

Konkan Railway: उन्हाळी सुट्ट्यांमध्ये प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने मडगाव – लोकमान्य टिळक टर्मिनस दरम्यान दोन विशेष उन्हाळी गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष गाड्यांमुळे कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातील प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे.

पहिली विशेष गाडी क्रमांक ०११०४ मडगाव – लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष गाडी गुरुवार, ३० एप्रिल २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजता मडगाव येथून सुटणार असून त्याच दिवशी रात्री १०:०५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचणार आहे. परतीची गाडी क्रमांक ०११०३ लोकमान्य टिळक टर्मिनस – मडगाव विशेष गाडी गुरुवार, ३० एप्रिल २०२६ रोजी रात्री १०:५५ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी १२:५० वाजता मडगाव येथे पोहोचेल. या गाडीला करमळी, थिवीम, सावंतवाडी रोड, कुडाळ, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पेन, पनवेल आणि ठाणे स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.

दुसरी विशेष गाडी क्रमांक ०१००४ मडगाव – लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष गाडी रविवार, ३ मे २०२६ रोजी सायंकाळी ४:३० वाजता मडगाव येथून सुटणार असून पुढील दिवशी सकाळी ६:२० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल. परतीची गाडी क्रमांक ०१००३ लोकमान्य टिळक टर्मिनस – मडगाव विशेष गाडी सोमवार, ४ मे २०२६ रोजी सकाळी ८:२० वाजता सुटून त्याच दिवशी रात्री १०:४० वाजता मडगाव येथे पोहोचेल. या गाडीला करमळी, थिवीम, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, विलवडे, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पेन, पनवेल आणि ठाणे स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.

दोन्ही विशेष गाड्यांमध्ये एकूण २१ डबे असणार असून त्यामध्ये एसी थ्री टियरचा १ डबा, स्लीपरचे ११ डबे, सामान्य श्रेणीचे ७ डबे आणि एसएलआरचे २ डबे असतील. या गाड्यांच्या सविस्तर वेळापत्रक व थांब्यांची माहिती भारतीय रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे.

सावंतवाडीत २०० रुपयांच्या बनावट नोटा जप्त; सांगलीतील रॅकेटचा पर्दाफाश

   Follow us on        

सावंतवाडी: सावंतवाडी शहरातील एका राष्ट्रीयीकृत बँकेत भरणा केलेल्या रकमेमध्ये २०० रुपयांच्या आठ बनावट नोटा आढळल्याने खळबळ माजली आहे. या प्रकरणी बँक व्यवस्थापकांनी दिलेल्या तक्रारीवरून सावंतवाडी पोलिसांनी तातडीने कारवाई करत सांगली कारागृहातून सहा संशयितांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे बनावट नोटांचे एक मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून, याचे धागेदोरे कोकण आणि गोव्यापर्यंत पसरल्याचा संशय पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.

​बँकेत एका ग्राहकाने आपल्या खात्यात पैसे जमा करण्यासाठी आणलेल्या २०० रुपयांच्या बंडलमध्ये या बनावट नोटा कॅशियरला आढळल्या. अधिक तपासाअंती, या नोटा सांगली येथे छापण्यात आलेल्या बनावट नोटांच्या कारखान्यातील असल्याचे निष्पन्न झाले. ऑक्टोबर २०२५ मध्ये सांगली पोलिसांनी हा कारखाना उद्ध्वस्त केला होता आणि त्यावेळपासून हे संशयित सांगली कारागृहात होते. पोलिसांनी न्यायालयाच्या परवानगीने सुप्रीत कडप्पा देसाई, राहुल राजाराम जाधव, इब्रार आदम इनामदार, नरेंद्र जगन्नाथ शिंदे, संदीप बाळू कांबळे आणि सिद्धेश जगदीश म्हात्रे या सहा आरोपींना ताब्यात घेतले आहे.

​या अटकेमुळे बनावट नोटांच्या व्यापाराचे मोठे जाळे उघड होण्याची शक्यता आहे. हे सर्व आरोपी कोल्हापूर आणि मुंबई परिसरातील असून, त्यांनी चलनात आणलेल्या बनावट नोटांची व्याप्ती मोठी असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पथक करत असून, या रॅकेटमध्ये अजून कोणाचे हात गुंतले आहेत का, याचा शोध घेतला जात आहे.

Photo Credit – RBI

निवडणूक परराज्यात, फटका मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाला; डेडलाईन पुन्हा हुकणार?

   Follow us on        

रत्नागिरी:मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम आता अंतिम टप्प्यात आले असून, उर्वरित काम मे महिन्याअखेर पूर्ण होईल, अशी ग्वाही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली होती. मात्र, प्रत्यक्षात या कामाची गती पाहता हे काम पावसाळा संपेपर्यंत सुरू राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या विलंबाचे मुख्य कारण म्हणजे महामार्गाच्या कामावर असलेले पश्चिम बंगालमधील कामगार मतदानासाठी आपल्या गावी परतले आहेत.

​रत्नागिरी जिल्ह्यात महामार्गावरील काही उड्डाणपूल आणि रस्त्याचे काम अद्याप शिल्लक आहे. या कामाचा ठेका घेतलेली एजन्सी आणि त्यावरील बहुतांशी कामगार हे परराज्यातील, विशेषतः पश्चिम बंगालमधील आहेत. सध्या पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. तेथील २९४ जागांसाठी दोन टप्प्यात मतदान होत असून, २३ एप्रिल आणि २९ एप्रिल रोजी ही प्रक्रिया पार पडणार आहे. जर मतदान केले नाही, तर मतदार यादीतून नाव वगळले जाईल किंवा ओळखपत्र रद्द होईल, अशी भीती या कामगारांमध्ये आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने कामगार गावी गेल्याने महामार्गासह जिल्ह्यातील इतर खासगी बांधकामांची गतीही मंदावली आहे.

​केवळ महामार्गच नव्हे, तर जिल्ह्यातील शहरांमधील आणि ग्रामीण भागातील इमारतींच्या कामांवरही याचा परिणाम झाला आहे. सेंटिंग, गवंडी काम आणि प्लास्टरच्या कामासाठी बिल्डर आणि ठेकेदार प्रामुख्याने बंगालमधील कामगारांना पसंती देतात, कारण ते कमी पगारात आणि चांगल्या दर्जाचे काम करतात. आता हे कामगार नसल्याने अनेक प्रकल्प ठप्प झाले आहेत. निवडणूक निकालानंतरच हे कामगार पुन्हा परतण्याची शक्यता असून, तोपर्यंत मुंबई-गोवा महामार्गाचे काम वेळेत पूर्ण होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Konkan Railway: प्रवाशांसाठी खुशखबर! नागपूर-मडगाव साप्ताहिक एक्सप्रेस आता कायमस्वरूपी धावणार

   Follow us on        

नागपूर:विदर्भ आणि कोकणला जोडणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. नागपूर-मडगाव-नागपूर या मार्गावर धावणारी विशेष रेल्वे (०११३९/०११४०) आता रेल्वे बोर्डाने नियमित करण्याचा निर्णय घेतला आहे. ही रेल्वे आता ११२०३/११२०४ नागपूर-मडगाव एक्स्प्रेस या नवीन क्रमांकाने धावणार आहे.

​गाडीचे वेळापत्रक आणि दिवस:

ही रेल्वे गाडी आठवड्यातून दोन दिवस धावणार आहे:

​१. गाडी क्र. ११२०३ (नागपूर ते मडगाव): ही गाडी दर बुधवारी आणि शनिवारी दुपारी १५:०५ वाजता नागपूरहून सुटेल. दुसऱ्या दिवशी सकाळी ६:४५ वाजता रोहा येथे पोहोचेल आणि सायंकाळी १७:४५ वाजता मडगावला पोहोचेल.

​२. गाडी क्र. ११२०४ (मडगाव ते नागपूर): ही गाडी मडगावहून दर गुरुवारी आणि रविवारी रात्री २०:०० वाजता सुटेल. दुसऱ्या दिवशी पहाटे ५:१५ वाजता रोहा येथे येईल आणि रात्री २१:३० वाजता नागपूरला पोहोचेल.

प्रवाशांच्या सुविधेसाठी या गाडीला महत्त्वाच्या स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत:

​वर्धा, पुलगाव, धामणगाव, बडनेरा, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम आणि करमळी.

​गाडीची संरचना:

ही गाडी एकूण २४ डब्यांची (ICF कोच) असेल. यामध्ये जनरल ५ डबे, स्लीपर ११ डबे, ३-टियर एसी ५ डबे, २-टियर एसी १ डबा आणि २ गार्ड/लगेज डबे असतील.

या गाडीची प्राथमिक देखभाल नागपूर येथे केली जाईल. प्रवाशांच्या सोयीसाठी भुसावळ आणि पनवेल येथे गाडीत पाणी भरण्याची सोय केली जाईल. रेल्वे बोर्डाचे संचालक (कोचिंग) संजय आर. नीलम यांनी या संदर्भात आदेश जारी केले असून, ही सेवा लवकरच अधिकृत तारखेसह नियमितपणे सुरू केली जाणार आहे.

ही गाडी नियमित झाल्यामुळे प्रवाशांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. विशेष रेल्वे म्हणून धावताना या गाडीचे तिकीट दर जास्त होते, मात्र आता नियमित एक्स्प्रेस झाल्यामुळे तिकीट दरात कपात होणार आहे. तसेच, या गाडीला आता कायमस्वरूपी वेळापत्रक मिळाल्याने ही गाडी अधिक वेळेवर धावण्यास मदत होईल, ज्यामुळे प्रवाशांचा प्रवास सुखकर आणि निश्चित वेळेत पूर्ण होईल.

 

कोकण रेल्वे मार्गावर गुरुवारी आणि शुक्रवारी ट्रॅफिक ब्लॉक

   Follow us on        

बेलापूर:कोकण रेल्वे मार्गावरील नांदगाव रोड आणि कणकवली स्थानकांदरम्यान अंडरपासच्या (भुयारी मार्ग) बांधकामासाठी रेल्वे प्रशासनाने ‘ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक’ घेण्याचा निर्णय घेतला आहे. हा ब्लॉक ३० एप्रिल २०२६ आणि १ मे २०२६ (गुरुवार आणि शुक्रवार) रोजी घेण्यात येणार आहे. या कामामुळे काही गाड्यांच्या धावण्याच्या वेळेवर परिणाम होणार असून, प्रवाशांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

गाड्यांच्या वेळापत्रकातील बदल खालीलप्रमाणे:

​गाडी क्र. २२६२९ दादर – तिरुनेलवेली एक्सप्रेस: ही साप्ताहिक गाडी ३० एप्रिल रोजी नांदगाव रोड स्थानकावर १० मिनिटे थांबवून (Regulated) पुढे सोडली जाईल.

​गाडी क्र. १२२०२ तिरुवनंतपुरम नॉर्थ – लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) एक्सप्रेस: ही गाडी ३० एप्रिल ते १ मे दरम्यान मडगाव जंक्शन ते नांदगाव रोड या पट्ट्यात ६० मिनिटे (१ तास) थांबवून चालवण्यात येईल.

​या कामामुळे प्रवाशांना होणाऱ्या विलंबाबद्दल रेल्वे प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे. कोकण रेल्वेच्या ताज्या अपडेट्ससाठी प्रवाशांनी ‘KR Mirror’ हे अधिकृत ॲप डाऊनलोड करावे किंवा अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील बी. नारकर यांनी केले आहे.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search