खेड: मुंबई-गोवा जुन्या महामार्गावरील कशेडी घाटात गुरुवारी उशिरा रात्री एक भीषण अपघात घडला. खेड डेपोची खेड-बोरीवली एसटी बस रात्री १० वाजता मार्गस्थ झाली होती. रात्री ११:३० ते १२ च्या सुमारास रायगड जिल्ह्यातील भोगाव परिसरात पोहोचली असता, बसचे ब्रेक निकामी झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटले. परिणामी, या बसने समोर असलेल्या एका बल्कर ट्रकला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात ट्रक चालकासह बसमधील सुमारे १२ ते १३ प्रवासी जखमी झाले असून, त्यातील काहींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.
अपघाताचे ठिकाण हे अत्यंत धोकादायक असून एका बाजूला खोल दरी आहे. सुदैवाने, धडक बसल्यानंतर बस दरीच्या टोकावर थांबली, ज्यामुळे मोठा अनर्थ टळला आणि अनेक प्रवाशांचे प्राण वाचले. घटनेची माहिती मिळताच शिवसेना खेड तालुकाप्रमुख सचिन धाडवे, तसेच मदत ग्रुपचे प्रसाद गांधी, अक्षय भोसले, निखिल चौधरी, समीर मोरे आणि दर्पण दरेकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली. पोलादपूर पोलिसांनीही तातडीने धाव घेत बचावकार्य सुरू केले. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.
कशेडी घाटात सध्या बोगद्याचे काम पूर्ण झाले असले, तरी स्थानिक गावांसाठी काही एसटी बसेस अजूनही जुन्या घाटातूनच धावतात. भोगाव परिसरात सध्या रस्त्याचे काम सुरू असून, त्या ठिकाणी आवश्यक सुरक्षा उपाययोजना केल्या जात नसल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे. वारंवार होणाऱ्या अशा घटनांमुळे घाटातील रस्ते सुरक्षा आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.


