रत्नागिरी:मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम आता अंतिम टप्प्यात आले असून, उर्वरित काम मे महिन्याअखेर पूर्ण होईल, अशी ग्वाही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली होती. मात्र, प्रत्यक्षात या कामाची गती पाहता हे काम पावसाळा संपेपर्यंत सुरू राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या विलंबाचे मुख्य कारण म्हणजे महामार्गाच्या कामावर असलेले पश्चिम बंगालमधील कामगार मतदानासाठी आपल्या गावी परतले आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यात महामार्गावरील काही उड्डाणपूल आणि रस्त्याचे काम अद्याप शिल्लक आहे. या कामाचा ठेका घेतलेली एजन्सी आणि त्यावरील बहुतांशी कामगार हे परराज्यातील, विशेषतः पश्चिम बंगालमधील आहेत. सध्या पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. तेथील २९४ जागांसाठी दोन टप्प्यात मतदान होत असून, २३ एप्रिल आणि २९ एप्रिल रोजी ही प्रक्रिया पार पडणार आहे. जर मतदान केले नाही, तर मतदार यादीतून नाव वगळले जाईल किंवा ओळखपत्र रद्द होईल, अशी भीती या कामगारांमध्ये आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने कामगार गावी गेल्याने महामार्गासह जिल्ह्यातील इतर खासगी बांधकामांची गतीही मंदावली आहे.
केवळ महामार्गच नव्हे, तर जिल्ह्यातील शहरांमधील आणि ग्रामीण भागातील इमारतींच्या कामांवरही याचा परिणाम झाला आहे. सेंटिंग, गवंडी काम आणि प्लास्टरच्या कामासाठी बिल्डर आणि ठेकेदार प्रामुख्याने बंगालमधील कामगारांना पसंती देतात, कारण ते कमी पगारात आणि चांगल्या दर्जाचे काम करतात. आता हे कामगार नसल्याने अनेक प्रकल्प ठप्प झाले आहेत. निवडणूक निकालानंतरच हे कामगार पुन्हा परतण्याची शक्यता असून, तोपर्यंत मुंबई-गोवा महामार्गाचे काम वेळेत पूर्ण होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.


