मुंबई, दि.४ सप्टें राज्यातील गणेश भक्तांसाठी एक खुशखबर आहे. राज्य सरकारने यावर्षी गणेश भक्तांना टोल माफी देण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या 5 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर या कालावधीत राज्य सरकारच्या वतीने सर्व गणेश भक्तांना टोल माफ असणार आहे. मुंबई-गोवा महामार्ग, मुंबई-बँगलोर महामार्ग, इतर सर्व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तसेच महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीत असलेल्या टोल नाक्यावर गणेश भक्तांना टोल माफी दिली जाणार आहे.
आज राज्य सरकाराच्या वतीने यासंबधी अधिसूचना काढून टोल प्रशासनाला आदेश देण्यात आले आहेत. गणेश उत्सवासाठी गावी निघालेल्या गणेश भक्तांच्या सर्व गाड्या आणि राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांच्या बसेसना टोल नाक्यावर मोफत सोडले जाणार आहे. तसेच फ्री पाससाठी संबंधित वाहतूक विभागाकडे संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या टोलमाफी सवलतीसाठी ‘गणेशोत्सव २०२४, कोकण दर्शन’ अशा आशयाचे स्टीकर्स स्वरुपाचे पथकर माफी पास, त्यावर वाहन क्रमांक, चालकाचे नाव असा मजकूर लिहून ते स्टीकर्स आवश्यक त्या संख्येनुसार परिवहन विभाग, वाहतूक पोलीस/पोलीस, संबंधित प्रादेशिक परिवहन विभाग (आर.टी.ओ.) यांनी समन्वय साधून पोलीस ठाणे, वाहतूक पोलीस चौक्या व आर.टी.ओ. कार्यालयांमध्ये उपलब्ध करुन द्यावेत, असे आदेश देण्यात आले आहेत. हाच पास परतीच्या प्रवासाकरीता देखील ग्राह्य धरण्यात येईल.तसेच गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसना ही टोल माफी लागू असणार आहे. गणेशोत्सवासाठी ज्या जिल्ह्यातून बसेस येथील त्या ठिकाणच्या पोलीस किंवा आरटीओ यांच्याकडून हे पास एसटी महामंडळाला उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
पोलीस आणि परिवहन विभागाने गणेशोत्सवाच्या काळात पास सुविधा आणि त्यांच्या उपलब्धतेबाबतची माहिती नागरिकांना देण्याच्या देखील सूचना आहेत.