दिवा दि.२२ फेब्रु | काल बुधवारी दिवा स्थानकावर झालेल्या एका अपघातात कणकवली तालुक्यातील भिरवंडे येथील सचिन बाळकृष्ण सावंत ( वय ४५ रा. भिरवंडे मुरडयेवाडी ) यांचे मुंबईकडे जाताना रेल्वे प्रवासादरम्यान अपघाती निधन झाले.
या अपघाताची सविस्तर माहिती अशी की कणकवली येथे स्थायिक असलेले सचिन हे काही कामानिमित्त मुंबई येथे मंगळवारी कोकण कन्या एक्सप्रेसने जाण्यास निघाले. दिवा स्टेशन येथे पोहोचल्यावर कोकण कन्या एक्सप्रेसचा वेग कमी झाला.याचा अंदाज घेऊन सचिन यांनी दिवा स्टेशन येथे उतरण्याचा प्रयत्न केला. मात्र हा प्रयत्न त्यांच्या जीवावर बेतला. रेल्वेतून उतरताना सचिन हे बाहेर फेकले गेले. त्यांना गंभीर स्वरूपाची इजा झाली. रेल्वे पोलिसांनी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्याची माहिती देखील मिळाली. मात्र अतिरक्तस्त्राव झाल्याने सचिन यांची उपचारांना साथ मिळत नव्हती. अशातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
घडलेली घटना हा निव्वळ अपघात असला तरी घटनेमुळे कोकणच्या प्रवाशांची एक जुनी मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे. ती मागणी म्हणजे कोकणात जाणाऱ्या गाड्यांना दिवा स्थानकावर थांबा मिळावा ही होय.
दिवा स्थानकांत सध्या आठ प्लॅटफॉर्म असून, या स्थानकात दिवा-सावंतवाडी, दादर-रत्नागिरी या पॅसेंजर गाड्या, दिवा-रोहा मेमू, दिवा-वसई अशा गाड्या चालविण्यात येतात. दिवा स्थानकात जर कोकण रेल्वेच्या सर्वच गाड्यांना थांबा दिला तर दिवा, डोंबिवली व कल्याण, अंबरनाथ, बदलापूर, टीटवाळा तसेच आजूबाजूच्या परिसरातील चाकरमान्यांचा ठाणे, कुर्ला, दादर, सीएसएमटी टर्मिनसवर जाण्यासाठी लागणारा वेळ वाचला जाईल. परतीच्या प्रवासातही ठाण्याला उतरल्यानंतर पुन्हा सामानासह लोकल पकडणे अडचणीचे ठरत असल्याचे प्रवाशांचे म्हणने आहे.
तर हे अपघात टाळता येणे शक्य
वा येथे गाडी आल्यावर ठाण्याच्या दिशेने जाताना रूळ बदलताना गाडीचा वेग कमी होतो. त्याचा फायदा घेऊन अनेक प्रवासी चालत्या गाडीतून उतरण्याचा प्रयत्न करताना दिसतात. त्यामुळे कित्येकदा अपघातही होतात. येथे थांबे दिल्याने असे अपघात टाळता येतील.
पहाटे सुटणार्या आणि उशिरा परतणाऱ्या गाड्यांना थांबा मिळावा
जनशताब्दी एक्सप्रेस सारख्या गाड्या मुंबईहुन पहाटे सुटतात आणि परतीच्या प्रवासात उशिराने ठाण्या- मुंबईत येतात. या गाडीला दिवा येथे थांबा दिल्यास या परिसरातील कोकणातील प्रवाशांची खूप मोठी सोय होईल. त्याचप्रमाणे कोकण-कन्या, तुतारी एक्सप्रेस, मांडवी एक्सप्रेस या नियमित आणि ईतर काही गाड्यांना येथे थांबा देण्यात यावा अशी मागणी होत आहे.