Category Archives: रायगड

रायगड: सावित्री आणि अंबा नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली

उल्हास, कुंडलिका आणि पाताळगंगा नद्यांनी इशारा पातळी ओलांडली

   Follow us on        

रायगड: जिल्ह्यात सतत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. जिल्हा माहिती कार्यालय, रायगड यांनी आज सायंकाळी ७ वाजता प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, जिल्ह्यातील प्रमुख नद्यांपैकी सावित्री आणि अंबा नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. तर उल्हास, कुंडलिका आणि पाताळगंगा नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. या स्थितीमुळे जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता वाढली असून, प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

अहवालानुसार, महाड तालुक्यातील सावित्री नदी (भोईरवाडी महिकावती मंदिराजवळ) ची सध्याची पाणी पातळी ६.४२ मीटर इतकी आहे, जी धोक्याची पातळी ६.४० मीटरपेक्षा जास्त आहे. त्याचप्रमाणे रोहा तालुक्यातील अंबा नदी (नागोठणे बंधारा) ची पातळी ९.२८४ मीटरवर पोहोचली आहे, जी धोक्याची ९.०० मीटरपेक्षा अधिक आहे. या दोन्ही नद्यांमुळे आसपासच्या खालच्या भागात पूर येण्याची मोठी शक्यता आहे. कुंडलिका नदी (झोलवखाली बंधारा) २३.९० मीटर, पाताळगंगा नदी (मौजे लोहोप) २१.१० मीटर आणि उल्हास नदी (दहीवली बंधारा) २८.८० मीटर पातळीवर असून, या सर्व नद्यांनी आपापल्या इशारा पातळ्या ओलांडल्या आहेत. गाडी नदीची पातळी मात्र इशारा पातळीपेक्षा कमी आहे.

जिल्हा प्रशासनाने या परिस्थितीचा गांभीर्याने विचार करत, प्रभावित तालुक्यांतील रहिवाशांना नद्यांच्या काठावरील भाग सोडून सुरक्षित ठिकाणी जाण्याची सूचना दिली आहे. पूर नियंत्रण कक्ष सक्रिय करण्यात आला असून, आपत्ती व्यवस्थापन पथके सज्ज आहेत. मुसळधार पावसाचा अंदाज लक्षात घेता, पुढील काही दिवस अतिशय महत्त्वाचे आहेत. शेतकरी, पर्यटक आणि नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा प्रशासनाच्या अधिकृत वेबसाइट किंवा हेल्पलाइनचा संपर्क साधावा, असे सांगण्यात आले आहे.

 

 

आंबेनळी घाट वाहतुकीसाठी चार दिवस पूर्णपणे बंद

   Follow us on        

रायगड: अतिवृष्टीचा इशारा आणि सातत्याने दरडी कोसळण्याच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हा प्रशासनाने पोलादपूर-महाबळेश्वर राज्य मार्गावरील आंबेनळी घाट शुक्रवार (३ जुलै) ते मंगळवार (७ जुलै) या कालावधीत सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकारी किसन जावळे यांनी या संदर्भातील अधिकृत आदेश जारी केले आहेत.

सह्याद्री पर्वतरांगेतील हा घाटमार्ग तीव्र उतार, खोल दऱ्या आणि अस्थिर बेसॉल्ट खडकांमुळे पावसाळ्यात अत्यंत धोकादायक ठरतो. पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा अंदाज असल्याने आणि गेल्या आठवड्यात दोनदा दरडी कोसळल्यामुळे, संभाव्य जीवितहानी टाळण्यासाठी हा प्रतिबंधात्मक निर्णय घेण्यात आला आहे. घाट बंद असताना नागरिकांनी पुणे किंवा सातारा बाजूकडे जाण्यासाठी महाड-माणगाव-ताम्हिणी घाट किंवा पोलादपूर-चिपळूण-कराड या पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

दुर्दैवी घटना! आईनेच पाजले पोटच्या मुलांना विष; तिघा चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत!

   Follow us on        

रायगड : रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात एक अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना घडली आहे. येथील खरवली आदिवासी वाडी येथे एका आईने आपल्या चार लहान मुलांना विषारी थंडपेय पाजल्यानंतर स्वतःही विषप्राशन केले. या दुर्दैवी आणि विदारक घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. या घटनेत विषबाधेमुळे आईसह तिच्या दोन चिमुकल्या मुलींचा मृत्यू झाला असून, इतर दोन मुलांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, आशा जाधव (वय २९) यांनी बाजारातून आणलेल्या थंडपेयामध्ये विषारी औषध मिसळले. त्यानंतर त्यांनी हे विषयुक्त थंडपेय आपल्या चार मुलांना पाजले आणि स्वतःही त्याचे प्राशन केले. काही वेळातच सर्वांची प्रकृती वेगाने बिघडू लागली. मुलांना व आईला उलट्या आणि अस्वस्थता जाणवू लागल्यानंतर शेजाऱ्यांनी आणि स्थानिक नागरिकांनी तातडीने धाव घेत सर्वांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान आशा जाधव यांच्यासह त्यांच्या दोन मुलींचा मृत्यू झाला. मृतांमध्ये आशा जाधव (वय २९), नंदिनी जाधव (वय ७) आणि दुर्वा जाधव (वय ६) यांचा समावेश आहे.

​या घटनेत इतर दोन मुलांचे प्राण वाचले असले तरी त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. सध्या त्यांच्यावर माणगाव उपजिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात (ICU) उपचार सुरू आहेत. डॉक्टर या दोन्ही मुलांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. दरम्यान, या आईने एवढे टोकाचे पाऊल का उचलले आणि या कौटुंबिक दुर्घटनेमागचे नेमके कारण काय होते, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

‘तिसर्‍या मुंबई’चा विस्तार: नेरळ, कर्जत आणि अलिबाग परिसरातील ७४ नवीन गावांचा प्रकल्पात समावेश

   Follow us on        

रायगड: मुंबई आणि नवी मुंबईनंतर नियोजित असलेल्या ‘तिसऱ्या मुंबई’च्या कक्षा आता आणखी रुंदावल्या आहेत. या महत्त्वाकांक्षी विकास प्रकल्पात नेरळ, कर्जत आणि अलिबाग परिसरातील नवीन ७४ गावांचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. या संपूर्ण क्षेत्राचा विकास करण्यासाठी या प्रकल्पाचे नामकरण ‘केएससी न्यू टाऊन’ (KASC New Town) असे करण्यात आले असून, या क्षेत्राचा विकास आता विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून एमएमआरडीए (MMRDA) मार्फत केला जाणार आहे. या विस्तारामुळे तिसरी मुंबई आता तब्बल ३२४ ते ३७१ चौरस किलोमीटर क्षेत्रात विस्तारणार असून, हे शहर मूळ मुंबईच्या आकारापेक्षा तिप्पट मोठे असणार आहे. या संपूर्ण क्षेत्राचा अंतिम मास्टर प्लॅन (डेव्हलपमेंट प्लॅन) ऑगस्ट २०२६ पर्यंत तयार होणार असून, यासाठी आवश्यक असणाऱ्या ड्रोन आणि ‘लिडार’ (LiDAR) सर्वेक्षणाचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे.

​या आराखड्यानुसार, कर्जत-नेरळमधील ५२ गावे आणि अलिबाग-पोयनाडमधील २२ गावांचा यामध्ये नव्याने समावेश केला आहे. कर्जत-नेरळ क्षेत्रामध्ये नेरळ (मुख्य भाग), ममदापूर, मोहपाडा, बेकरे, बीड, कडाव, डिकसळ, वेणगाव, उमरोली, हुमगाव, तसेच माथेरानच्या पायथ्याशी असलेले देवपाडा, वंजारपाडा आणि भूतीवली धरणाजवळील महसुली गावांचा समावेश आहे. यासोबतच कर्जत शहराच्या परिघातील मुळगाव, ढाक, वारे, पाथरज, साळोख, पाली (तर्फे वाशवली), वाशवली, पोशीर, गौरकामत, दहिवली, कोल्हारे आणि कोंढाणे या गावांचाही यात समावेश करण्यात आला आहे.

​अलिबाग आणि पोयनाड परिसरातील एकूण २२ गावांचा विकास पर्यटन, कोस्टल कनेक्टिव्हिटी आणि व्यावसायिक केंद्र म्हणून केला जाणार आहे. पोयनाड परिसरातील पोयनाड (मुख्य बाजारपेठ), पेझारी, शहाबाज (काही भाग), बावे, आंबेपूर, नवखार, वावे, मळघर आणि केळवणे या गावांचा यात समावेश आहे. तसेच अलिबाग शहरालगतच्या ११ गावांचा समावेश असून, कुरुळ, वरसोली (शहराच्या वेशीवरील भाग), खंडाळा, बामणोली, मापगाव, कार्ले, आगरसुरे, चौल (महसुली भाग), थेरोंडा, आक्षी आणि नागाव या गावांच्या जमिनींचा या नव्या विशेष क्षेत्रात समावेश करण्यात आला आहे.

​नियोजित ‘तिसरी मुंबई’ केवळ निवासी नसून भारताचे नवे आर्थिक आणि लॉजिस्टिक हब असेल. येथे दळणवळणाचे मोठे महाजाळे तयार होत असून, अटल सेतूमुळे मुंबई ते चिरनेर प्रवास अवघ्या २० मिनिटांत शक्य झाला आहे. हाच मार्ग पुढे अलिबाग-विरार मल्टिमोडल कॉरिडोअर आणि मुंबई-पुणे एक्सप्रेसवेला जोडला जात आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि जेएनपीए बंदर या शहराच्या अगदी वेशीवर असल्याने, येथे आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्रे आणि भव्य डेटा सेंटर्स उभारली जाणार आहेत. एमएमआरडीएने यासाठी ४८,०७२.५७ कोटींचा अर्थसंकल्प मंजूर केला असून, त्यापैकी ४,००0 कोटी रुपयांचा निधी थेट प्राथमिक पायाभूत सुविधांसाठी राखीव ठेवला आहे. आता या ७४ गावांमधील कोणत्याही नवीन बांधकामाची, ले-आउटची किंवा व्यावसायिक प्रकल्पाची मंजुरी स्थानिक ग्रामपंचायत किंवा जिल्हाधिकाऱ्यांऐवजी थेट एमएमआरडीएकडून घ्यावी लागणार आहे.

पनवेल-कर्जत नवीन रेल्वे मार्गाचे काम अंतिम टप्प्यात; खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडून आज प्रत्यक्ष पाहणी

   Follow us on        

मावळ लोकसभा मतदारसंघातील अत्यंत महत्त्वाकांक्षी पनवेल ते कर्जत नवीन रेल्वे मार्गिकेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या प्रकल्पाचे सुमारे ९५ टक्के काम पूर्ण झाल्याने खासदार श्रीरंग अप्पा बारणे यांनी आज मंगळवार, २६ मे २०२६ रोजी सकाळी ११ वाजता रेल्वे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत संपूर्ण मार्गाची प्रत्यक्ष पाहणी करण्याचा कार्यक्रम आखला आहे.

पनवेल रेल्वे स्थानकापासून सुरू होणारा हा पाहणी दौरा चिखले, पोयंजे, चौक आणि कर्जत रेल्वे स्थानकांवर थांबून पूर्ण होणार आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळ (MRVC) मार्फत मुंबई नागरी परिवहन प्रकल्प-३ (MUTP-3) अंतर्गत २,७८२ कोटी रुपयांच्या खर्चाने उभारण्यात येत असलेल्या या २९.६ किलोमीटर लांबीच्या दुहेरी रेल्वे मार्गामुळे पनवेल आणि कर्जत या दोन महत्त्वाच्या शहरांना थेट जोड मिळणार आहे. या नवीन मार्गामुळे मुंबई आणि आसपासच्या भागातील रेल्वे वाहतुकीला मोठा दिलासा मिळेल, पर्यायी लोकल सेवा सुरू होईल आणि कल्याणमार्गे धावणाऱ्या गाड्यांवरील गर्दीचा ताण लक्षणीयरीत्या कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

सध्या पूल, उड्डाणपूल, भुयारी मार्ग, बोगदे यांसारखी बहुतांश कामे पूर्ण झाली असून, कर्जत येथे रुळ जोडणी आणि पनवेल रेल्वे उड्डाणपुलाचे कामही शेवटच्या टप्प्यात आहे. लवकरात लवकर हा मार्ग प्रवाशांच्या सेवेत दाखल करण्यासाठी प्रशासन पूर्ण प्रयत्न करत आहे.

 

 

 

आंबेनळी दाभिळटोंक – ‘मृत्यूचा घाट’

   Follow us on        

पोलादपूर: निसर्गरम्य पण तितकाच धोकादायक असलेल्या दाभिळटोक घाटात काल रात्रीच्या सुमारास एक अत्यंत भीषण अपघात घडला. या घाटातून प्रवास करणाऱ्या एका स्कॉर्पिओ कारवरील चालकाचे नियंत्रण अचानक सुटल्याने, कार थेट १२०० ते १९०० फूट खोल दरीत कोसळली. या दुर्दैवी आणि काळजाचा थरकाप उडवणाऱ्या घटनेत कारमधील सर्व ८ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. या ताज्या अपघातामुळे दाभिळटोक परिसराला स्थानिकांनी दिलेले “मृत्यूचा घाट” हे नाव पुन्हा एकदा दुर्दैवाने खरे ठरले आहे.

​या घाटाचा इतिहास पाहिला  येथे अपघातांची मालिकाच सुरू आहे. जुलै २०१८ मध्ये झालेल्या एका भीषण बस अपघातात ३३ जणांना आपला जीव गमवावा लागला होता, जो या घाटाच्या इतिहासातील सर्वात मोठा काळा डाग आहे. त्यानंतरही प्रशासनाला जाग आलेली नाही. अगदी अलीकडे, मार्च २०२६ मध्ये मारुती वॅगनआर कारचा अपघात होऊन ५ जण गंभीर जखमी झाले होते, तर एप्रिल २०२६ मध्ये एका दांपत्याच्या बाईकचा अपघात होऊन दोघांचा ७०० फूट खोल दरीत पडल्याने मृत्यू झाला होता. आणि आता मे २०२६ मधील या ताज्या दुर्घटनेने या घाटातील मृत्यूचे सत्र अजूनही थांबले नसल्याचे दाखवून दिले आहे.

​स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांच्या मते, या घाटातील अत्यंत तीव्र व धोकादायक वळणे, रस्त्याच्या कडेला असलेली हजारो फूट खोल दरी, दाट झाडी आणि धुके यामुळे समोरचे वाहन न दिसणे आणि रस्त्याची झालेली अत्यंत दुरवस्था ही या अपघातांची मुख्य कारणे आहेत. “प्रशासनाच्या दिरंगाईमुळे निष्पाप लोकांचे बळी जात आहेत. आम्ही वारंवार मागणी करूनही इथे साधे सुरक्षा रक्षक किंवा रेलिंग बसवले गेलेले नाही,” असा संतप्त आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

​या घाटातील रस्त्यांच्या सुधारणेसाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) आणि जिल्हा प्रशासनाकडे वारंवार मागण्या करण्यात आल्या आहेत. परंतु, प्रत्येक अपघातानंतर केवळ चौकशीचे आश्वासन देणाऱ्या प्रशासनाकडून अजूनही कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. प्रत्यक्षात परिस्थिती ‘जैसे थे’ असल्याने नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधात प्रचंड संताप व्यक्त होत आहे. आता तरी या भीषण दुर्घटनेनंतर प्रशासनाला जाग येईल का? आणि घाटात रस्त्याचे रुंदीकरण, मजबूत सुरक्षा रेलिंग (Safety Railings) व धुके संकेत यंत्रणा (Fog Indicators) बसवली जाईल का? असा संतप्त सवाल जनतेकडून विचारला जात आहे.

Mumbai Goa Highway: महामार्गावरील प्रवास महागणार!

   Follow us on        

रायगड: गेल्या १५ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मुंबई-गोवा ४ पदरी राष्ट्रीय महामार्गाचे काम अद्यापही अपूर्णच आहे. असे असतानाच या महामार्गावर टोलवसुली सुरू करण्यात आल्यामुळे प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी येत्या जून महिन्यापर्यंत या महामार्गाचे काम पूर्ण होणार असल्याची माहिती दिली असली, तरी प्रत्यक्षात नागोठाणे आणि कोलाड येथील उड्डाणपूल, सुकेली घाट, माणगाव आणि इंदापूर जवळील रस्त्यांची कामे अद्यापही अपूर्ण आहेत. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना दररोज भीषण वाहतूक कोंडी आणि धुळीचा सामना करावा लागत आहे. या दुरवस्थेमुळे आणि रखडलेल्या कामांमुळे नागरिकांमध्ये आधीच तीव्र असंतोष आहे.

​तीन ठिकाणी टोलनाक्यांचे नियोजन आणि स्थानिक विरोध

​अपूर्ण कामांच्या पार्श्वभूमीवर, रायगड जिल्ह्यात खारपाडा, खांब आणि पोलादपूरजवळील लोहारे अशा तीन ठिकाणी टोलवसुली करण्याचे नियोजन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. यापैकी खारपाडा येथे प्रत्यक्ष टोलवसुली सुरू झाली असून, या टोलनाक्याचे कंत्राट तीन महिन्यांचे आहे. नागरिकांकडून याला मोठ्या प्रमाणावर विरोध होत असतानाच, खांब येथेही टोलनाका उभारण्यात आला आहे. खारपाडा येथील टोलनाक्यावरून मिळणाऱ्या प्रतिसादाचा अंदाज घेऊन खांब येथे टोलवसुली सुरू करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे आणि त्यानंतर लोहारे येथेही टोलनाका सुरू केला जाईल. या लागोपाठच्या टोलनाक्यांमुळे मुंबई-गोवा प्रवास अधिक खर्चिक होणार असून, याचा थेट परिणाम सर्वसामान्य कोकणवासीयांसह वाहतूक क्षेत्रावर होणार आहे. वाहतूक खर्च वाढल्यामुळे जीवनावश्यक वस्तूंबरोबरच बाजारपेठेतील इतर वस्तूही महागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

​लोकप्रतिनिधींचे मौन ​आंदोलनाचा इशारा

​खारपाडा टोल सुरू झाल्यावर स्थानिक नागरिकांना यातून वगळण्यात येईल, असे तोंडी सांगण्यात आले असले तरी सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे, सत्ताधारी घटक पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी या संवेदनशील विषयावर पूर्णपणे मौन बाळगल्याने त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. पूर्वी खारघर टोलनाक्याविरुद्ध जशी ठोस आणि आक्रमक भूमिका घेण्यात आली होती, तशी भूमिका या टोलबाबत घेतली जात नसल्याचा आरोप नागरिक करत आहेत. दरम्यान, जोपर्यंत मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण होऊन त्याचे अधिकृत उद्घाटन होत नाही, तोपर्यंत खारपाडा येथील टोलवसुली तात्काळ थांबवावी, अशी मागणी रायगड प्रेस क्लबने केली आहे. तसेच, या अन्यायाविरोधात २१ मे रोजी खारपाडा टोलनाक्यावर ‘ठिय्या आंदोलन’ करण्याचा इशाराही रायगड प्रेस क्लबने प्रशासनाला दिला आहे.

Mumbai Goa Highway: “अपूर्ण रस्त्यावर पूर्ण टोल वसुली”

   Follow us on        

रायगड, २१ मे २०२६: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग (NH-66) चे काम १७-१८ वर्षांपासून रखडले असताना आणि अनेक भाग अजूनही अपूर्ण असताना खारपाडा टोल प्लाझावर टोल वसुली सुरू करण्यात आल्याने कोकणवासीयांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. अपूर्ण रस्ते, खड्डे आणि खराब गुणवत्तेमुळे होणारे अपघात या पार्श्वभूमीवर ही टोल वसुली अन्यायकारक असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.

रायगड जिल्ह्यातील खारपाडा टोल प्लाझावर १७ मे २०२६ पासून टोल वसुली सुरू झाली. फास्टॅगद्वारे वाहनांमधून पैसे कापले जाऊ लागले आहेत. मात्र, पेन ते माणगाव, इंदापूर बायपास, उड्डाणपुल, सर्व्हिस रोड्स आणि इतर अनेक महत्त्वाचे भाग अजूनही अपूर्ण आहेत. प्रवाशांना खड्ड्यांनी भरलेल्या रस्त्यांवरून, डाव्हर्सनमधून आणि अपूर्ण बायपासवरून प्रवास करावा लागत आहे.

अपघातांची मालिकारायगड विभागातील NH-66 वर २०२२ ते २०२४ दरम्यान झालेल्या अपघातांच्या आकडेवारीनुसार अनेक जीव गमावले गेले आहेत. अपूर्ण रस्ते, अचानक डाव्हर्सन, खराब पृष्ठभाग आणि रात्रीच्या वेळी अपुरी प्रकाश व्यवस्था यामुळे अपघात वाढले आहेत. कोकणातील अनेक कुटुंबे या महामार्गामुळे वेदनेत आहेत. गेल्या काही वर्षांत २४०० हून अधिक लोकांचा या महामार्गावर अपघातात मृत्यू झाल्याचे आकडे उपलब्ध आहेत.

रायगड प्रेस क्लबने या टोल वसुलीला “अन्यायकारक” ठरवत त्वरित स्थगित करण्याची मागणी केली आहे. उद्या आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे. स्थानिक कार्यकर्ते चैतन्य पाटील यांनी कवींना आवाहन करत कवितेद्वारे या मुद्द्यावर विरोध व्यक्त करण्याचे आवाहन केले आहे. “रस्ता अपूर्ण, तरी टोल पूर्ण?” असा प्रश्न उपस्थित करणाऱ्या कविता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

सरकारचे आश्वासन आणि वास्तवकेंद्र आणि राज्य सरकारने महामार्गाचे पूर्ण काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, प्रत्यक्षात काम ९३% पूर्ण झाले असल्याचे सांगितले जात असले तरी रायगड आणि रत्नागिरीतील अनेक गंभीर भाग अजूनही बाकी आहेत. आता पूर्णत्व २०२७ पर्यंत ढकलले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

प्रवासी आणि स्थानिक व्यापारी म्हणतात, “प्रथम पूर्ण रस्ता द्या, मग टोल घ्या.” अपूर्ण महामार्गावर पूर्ण टोल आकारणी ही प्रवाशांची लूट असल्याची भावना व्यक्त होत आहे. गणेशोत्सव काळात कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी ही परिस्थिती अधिकच कठीण ठरणार आहे.

कोकणवासीयांकडून आंदोलन, सोशल मीडियावर तीव्र विरोध आणि कविता-प्रतिबंध यांचा मेळ घालून हा मुद्दा अधिक तीव्र होत चालला आहे. NHAI आणि संबंधित विभागाकडून लवकरात लवकर स्पष्टीकरण आणि अपूर्ण काम पूर्ण करण्याची मागणी जोर धरत आहे.


 

 

 

 

 

 

मल्टीमोडल कॉरिडोर की ‘मल्टीमोडल’ लूट? विरार-अलिबागसाठी भारी टोल

   Follow us on        

मुंबई: महाराष्ट्रातील प्रस्तावित विरार-अलिबाग मल्टीमोडल कॉरिडोरसाठी पूर्ण १२६ किलोमीटर अंतरासाठी ₹७६५ इतका टोल आकारण्याच्या बातम्या माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्या आहेत. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र चर्चा सुरू झाली आहे. इन्फ्रा न्यूज इंडियाने यावर प्रश्न उपस्थित करताना म्हटले आहे की, प्रति किलोमीटर ₹६.०७ इतका टोल दर अत्यंत जास्त आहे. प्रकल्प अद्याप सुरूही झालेला नसताना इतका उच्च दर निश्चित करणे योग्य नाही, असे मत व्यक्त करत MSRDCकडून अधिकृत स्पष्टीकरणाची मागणी करण्यात आली आहे.

१२६ किलोमीटर लांबीचा मल्टीमोडल कॉरिडोर विरार ते अलिबाग दरम्यान थाणे आणि नवी मुंबई मार्गे जोडणारा असेल. यात रस्ता, रेल्वे आणि बससाठी वेगवेगळ्या समर्पित लेन असतील. भूमी संपादन प्रक्रिया सुरू असून, BOT मॉडेलवर टेंडर प्रक्रिया सुरू आहे. प्रकल्प २०३० पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. मात्र, अद्याप बांधकाम सुरू नसताना टोल दर ₹७६५ ते ₹१००० पर्यंत असल्याच्या बातम्यांमुळे लोक संतापले आहेत.

काहींनी दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेचा उल्लेख करत याची तुलना केली आहे.नागरिक आणि सोशल मीडियावर या उच्च टोल दरावर टीका होत आहे. MSRDCने याबाबत लवकरात लवकर अधिकृत माहिती जाहीर करावी, अशी मागणी जोर धरत आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे.

 

 

मुंबई आणि लगतच्या जिल्ह्यात आज पावसाचा इशारा

   Follow us on        

मुंबई: मंत्रालयाकडून प्राप्त झालेल्या ताज्या माहितीनुसार, मुंबईसह लगतच्या जिल्ह्यांमध्ये पुढील ३ तासांत हवामानात लक्षणीय बदल होण्याची शक्यता आहे. मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर आणि रायगड या पाच जिल्ह्यांमधील काही भागांत हलक्या पावसाच्या सरी कोसळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अचानक उद्भवलेल्या या बदलामुळे नागरिकांनी आपल्या प्रवासाचे आणि कामाचे नियोजन काळजीपूर्वक करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

​पावसाच्या सरींसोबतच या भागात सोसाट्याचा वारा वाहण्याची दाट शक्यता आहे. तसेच, काही ठिकाणी जोरदार मेघगर्जना आणि विजांचा कडकडाटही होईल, असे हवामान अंदाजात नमूद करण्यात आले आहे. विशेषतः किनारपट्टीलगतच्या आणि ग्रामीण भागांत वाऱ्याचा वेग अधिक राहण्याची शक्यता असल्याने घराबाहेर पडताना सतर्क राहणे आवश्यक आहे.

​प्रशासनाने नागरिकांना खबरदारीचा उपाय म्हणून विजा चमकत असताना झाडाखाली किंवा मोकळ्या मैदानात उभे न राहण्याचा सल्ला दिला आहे. पालघर आणि रायगड जिल्ह्यांतील दुर्गम भागांत पावसाचा आणि विजांचा जोर अधिक राहू शकतो. बदलत्या हवामानामुळे तापमानात थोडी घट होण्याची शक्यता असली, तरी नागरिकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व आवश्यक खबरदारी घ्यावी, असे मंत्रालयाद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search