सिंधुदुर्ग: वेंगुर्ले नगरपरिषदेला स्वच्छ सर्वेक्षण २०२३ मध्ये १५ हजार पेक्षा कमी लोकसंख्या गटातील कामगिरी नुसार कोकण विभागात प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे. देशामध्ये १ लाख लोकसंख्येपेक्षा कमी लोकसंख्या असणाऱ्या शहरातून पश्चिम विभाग ३७ वा, महाराष्ट्रामध्ये ३९ वा क्रमांक प्राप्त झाला आहे. तसेच वेंगुर्ले शहरास जीएफसी १ स्टार व ODF ++ मानांकन प्राप्त झाले आहे. त्यामुळे वेंगुर्ले नगरपरिषदेचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
नगरपरिषद मार्फत वर्षभरात विविध ठिकाणी आयोजित करण्यात येणाऱ्या स्वच्छता मोहीम, स्वच्छता जनजागृतीपर विविध कार्यक्रम व यामध्ये स्वच्छताप्रेमी वेंगुर्लेवासियांचा मिळणारा उत्स्फूर्त सहभाग या सर्वामुळे वेंगुर्ले नगर परिषदेला स्वच्छ सर्वेक्षण अभियानामध्ये घवघवीत यश प्राप्त झाले आहे. आतापर्यंत वेंगुर्ले नगरपरिषदेने स्वच्छ सर्वेक्षण मध्ये विविध पुरस्कार प्राप्त झाले असून मुख्याधिकारी, माजी लोकप्रतिनिधी, नगरपरिषद अधिकारी, कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी, स्वच्छता दूत, सामाजिक संस्था व नागरिक यांच्या सहकार्यातून हे यश प्राप्त झाले आहे, असे मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी सांगितले.
Sindhudurg :सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळचे सुपुत्र चंद्रकांत काजरेकर गिनीज बुक रेकॉर्ड होल्ड ठरले आहेत.शेती आणि बागायतदार चंद्रकांत काजरेकर कुडाळ यांच्या हापूस आंब्याच्या झाडावर आलेले पान जगातील सर्वात मोठे हापूस आंब्याच्या झाडाचे पान म्हणून रेकॉर्ड झाले आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रधान कार्यालयात प्रथम प्रशासन अधिकारी आणि नंतर अकाउंटंट व्यवस्थापक म्हणून सुमारे ३२ वर्षे सेवा करून निवृत्त झालेले चंद्रकांत काजरेकर आंबा आणि काजू बागायतीची आवड जोपासत असताना त्यांना आपल्या हापूस आंब्याच्या झाडावर आलेले पान खूपच लांब व रुंद असल्याचे आढळले. त्या पानाची लांबी व रुंदी त्यांनी मोजली. गुगलच्या सहाय्याने जगातील रेकॉर्ड पडताळून पाहिले. निरीक्षणानंतर त्यांना आढळले की हे जगातील रेकॉर्ड होऊ शकते. या वैशिष्ट्यपूर्ण पानाला जागतिक रेकॉर्डच्या प्लॅटफॉर्मपर्यंत नेण्यासाठी त्यांनी आपली मुली डॉ. नालंदा आणि डॉ. नुपूर आणि जावई धीरज व डॉ. देवेन यांच्या मदतीने व चिकाटीने गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड, वर्ल्ड वाईड बुक ऑफ रेकॉर्ड या दोन ठिकाणी रिपोर्ट पाठविला.
त्यानंतर पूर्णतपासनीचे रेकॉर्ड तयार करताना संत राहुल महाराज महाविद्यालयाचे तत्कालीन प्राचार्य डॉ. विलास झोडगे यांच्या सहकार्यामुळे महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागाच्या टीमची मदत मिळाली. महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रमुख प्राध्यापक डॉ. रवींद्र यशवंत ठाकुर, प्राध्यापक उमेश मिलिंद कामत आणि प्राध्यापक दयानंद विश्वनाथ ठाकूर यांनी अत्यंत परिश्रमपूर्वक व चिकाटीने काम केले. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आणि वल्डे वाईड बुक ऑफ रेकॉर्डच्या नियमानुसार वैशिष्ट्यपूर्ण पानाची मोजणी करणे, फोटोग्राफी, व्हिडिओ शूटिंग वर रेकॉर्डिंग तसेच रिपोर्टिंग या सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सहकार्य केले. त्या कामात डॉ. दिपाली काजरेकर, डॉ. नालंदा, डॉ. नुपुर, जावई धीरज, डॉ. देवेंद्र तसेच आशीर्वाद फोटो स्टुडिओचे टीम यांचे सहकार्य लाभले.
जगातील सर्वात मोठे हापूस आंब्याच्या झाडाच्या पानाचे जागतिक वर्ल्ड रेकॉर्ड आणि वर्ल्ड वाईड बुक ऑफ रेकॉर्ड अशा दोन जागतिक रेकॉर्डची नोंद चंद्रकांत काजरेकर यांच्या नावे झाली. कुडाळ तालुका सिंधुदुर्ग जिल्हा महाराष्ट्र राज्य आणि इंडिया या सर्वांचे नाव जगाच्या नकाशावर नोंदवले गेले आहे. या पानाची लांबी ५५.६ सेमी रुंदी १५.६ से.मी. आहे त्यापूर्वी त्यांनी प्रयोगशील शेतकरी म्हणून आपल्या शेती बागायतीत प्रयोग केले आहेत. कुडाळ येथील आपल्या राहत्या घराच्या टेरेसवर सुपारी व काजूची रोपे तयार करून नर्सरीचा यशस्वी प्रयोग केला आहे. तसेच तळवडे, सावंतवाडी येथील शेतात आपले बंधू विनोद काजरेकर यांच्या मदतीने भाताची एक काडी लागवड, लावणी, कापणी, मळणी इत्यादी यंत्राच्या साह्याने शेती करणे. दुर्मिळ वनौषधी लागवडी व संवर्धन यांचे यशस्वी प्रयोग केले आहेत.
सावंतवाडी: व्हरेनिअम क्लाऊड लिमिटेड या जागतिक दर्जाच्या कंपनीच्या प्रधान कार्यालयाचे उद्घाटन आज सोमवारी मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर सावंतवाडी येथे मान्यवरांच्या उपस्थीतीत झाले. तळकोकणातील हे पहिले पहिल्या बी पी ओ सेंटर ठरले आहे.
सावंतवाडी मध्ये स्थापन झालेल्या व्हरेनिअम क्लाऊड लिमिटेडच्या माध्यमातून अनेक तरुणांना रोजगार उपलब्ध झाला आहे. या कंपनीच्या माध्यमातून दोनशे जणांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिली गेली असून अजून तरुण तरुणींना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
कोकणवासियांसाठी काहीतरी करावं ही व्हरेनिअम क्लाऊड लिमिटेडचे संचालक हर्षवर्धन साबळे साबळे यांची इच्छा होती. या उद्देशानेच त्यांनी मुंबईसारख्या मायानगरीतून सिंधुदुर्ग सारख्या ग्रामीण भागात नेटवर्क उभा करण्याचा मानस तयार केला होता. या त्यांच्या प्रयत्नांना आज खऱ्या अर्थानं यश मिळालं आहे. कोकणात अनेक तरुणांना यापुढ रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. सध्या बेरोजगार तरुणांना नोकरीसाठी मुंबई किंवा पुणे गाठावं लागतंय.
व्हरेनियम क्लाऊड लिमिटेड ही भारतीय डिजिटल तंत्रज्ञानातील एक नावाजलेली कंपनी आहे. सावंतवाडी मधील जिमखाना मैदाना शेजारील भव्य इमारतीमध्ये व्हरेनियम क्लाऊड लिमिटेड या कंपनीचे ऑफिस आहे. सिंधुदुर्गसारख्या ग्रामीण भागात स्थापन झालेले बीपीओ सेंटर हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्थापन झालेले पहिल बिपिओ सेंटर ठरलं आहे. सिक्युअर क्रेडेनशियल ,स्ट्रायकर, एफ एस आणि arrise च्या वाढत्या क्लाइंटबेससह डेटा एन्ट्री अकाउंटिं,बॅकग्राऊंड वेरिफिकेशन, डेट रिकवरी यासारख्या सेवांचा समावेश सावंतवाडीतल्या बीपीओ सेंटर मध्ये करण्यात आला आहे. या माध्यमातून बहुउपयोगी फिजिटल पायाभूत सुविधांचा आणि त्याच्या कौशल्य विकासाच्या माध्यमातून व्हरेनियम क्लाऊड लिमिटेड या कंपनी ने सिंधुदुर्ग मध्ये कॉर्पोरेट क्षेत्रात एक उत्तुंग असं पाऊल टाकलं आहे. ग्राहकांसाठी व्हरेनियम क्लाऊड लिमिटेडने विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
सिंधुदुर्ग : पर्यटन मंत्रालयाच्या स्वदेश दर्शन २.० योजनेमध्ये ४८ अधिसूचित पर्यटनस्थळी राज्यातील सिंधुदुर्ग या एकमेव पर्यटनस्थळाचा समावेश झाला आहे. ही कोकणकरांसाठी एक गौरवाची गोष्ट आहे. केंद्राच्या या योजनेमुळे पर्यटनात वाढ होणार असून पायभुत सुविधांचा देखील विकास होणार आहे. जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी ही माहिती दिली.
जिल्ह्यातील सर्व निवास युनिट्स हॉटेल, ब्रेड आणि ब्रेकफास्ट रिसॉर्ट्, फार्मस्टे, होमस्टे, टूर ऑपरेटर, पर्यटक गाईड्स, ट्रॅव्हल एजंट आणि पर्यटन उद्योगातील इतर भागधारकांनी https://nidhi.tourism.gov.in या पोर्टलवर नोंदणी करून ‘ट्रॅव्हल फॉर लाइफ’ प्रमाणपत्र मिळवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तावडे यांनी केले आहे. नोंदणी केल्यावर युनिक NIDHI ID (NID) द्वारे विविध सेवा आणि फायदे यांच्या इलेक्ट्रॉनिक वितरणाचा लाभ या व्यावसायिकांना मिळणार आहेत.
‘स्वदेश दर्शन २.०’ उपक्रमाअंतर्गत संबंधित जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली पर्यटनस्थळ व्यवस्थापन समिती देखील स्थापन केली आहे. विविध पर्यटनस्थळांच्या व्यवस्थापन उपक्रमांमध्ये समन्वय साधण्यासाठी ही समिती जबाबदार आहे. पहिली डेस्टिनेशन मॅनेजमेंट समितीची बैठक जिल्हाधिकारी तावडे यांच्या अध्यक्षतेखाली डेस्टिनेशन प्लॅनिंग, डेव्हलपमेंट आणि मॅनेजमेंट ऍक्टिव्हिटीज या विषयांवर चर्चा करण्यासाठी आयोजित केली होती. यावेळी त्यांनी हे आवाहन केले आहे.
स्वदेश दर्शन २.० योजनेमधील अधिसूचित पर्यटनस्थळांची यादी
कोल्हापूर :कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या कोल्हापूर – वैभववाडी रेल्वे मार्गाची प्रकिया सुरू असल्याचे मध्य रेल्वेचे सरव्यवस्थापक राम करण यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. कोल्हापूर रेल्वे स्थानकाची पाहणी करण्यासाठी ते सोमवारी कोल्हापूर स्थानकावर आले होते.
कोल्हापूर वैभववाडी रेल्वे मार्गाचे काम गती शक्ति योजनेतून केले जाणार आहे. त्याकरिता डीपीआर काढण्याचे काम चालू आहे. डीपीआर मंजूर झाल्यावर निधी उपलब्ध होईल आणि ताबडतोब भूसंपादन प्रक्रियेस सुरवात होईल असे ते यावेळी म्हणालेत.
वैभववाडी-कोल्हापूर मार्गाची पीएम गतीशक्ती अंतर्गत शिफारस करण्यात आली आहे. या मार्गासाठी 3411.17 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. सन 2015 मध्ये वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण झाल्यानंतर 2016 मध्ये तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी या मार्गाची घोषणा केली. त्यानंतर आठ वर्षांपासून कोणत्याही हालचाली झाल्या नाहीत. त्यामुळे हा रेल्वेमार्गाबाबत साशंकता व्यक्त केली जात होती. पश्चिम महाराष्ट्रातील शेती उत्पादित मालाची रस्ते मार्गाने कोकणात वाहतूक केली जाते. कोकणातील खनिजांची वाहतूकही रस्ते मार्गानेच होते. कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्ग पूर्ण झाल्यास पश्चिम महाराष्ट्रातील शेतीमालाची बंदरापर्यंत वाहतूक कमी खर्चिक आणि सुलभ होणार आहे. कोकणातील मालही मालवाहतूक करणे सोयीस्कर ठरणार आहे.
सिंधुदुर्ग-मालवण: दक्षिण कोकणची काशी अशी ओळख असलेल्या आंगणेवाडीची जत्रा यंदा शनिवारी दिनांक ०२ मार्च २०२४ या दिवशी संपन्न होणार आहे. नुकतीच या यात्रेच्या तारखेची घोषणा करण्यात आली आहे.
आंगणेवाडीच्या यात्रेसाठी देवीला कौल लावून तारीख निश्चित करण्याची पद्धत आहे. आजही लावलेल्या कौलानुसार शनिवार ०२ मार्च २०२४ हा दिवस यात्रेसाठी ठरवण्यात आला आहे.
दरवर्षी कोकणवासियांना या यात्रेच्या तारखेबद्दल उत्सुकता असते. आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या दर्शनाला या जत्रेत दर्शनाला भाविक देशा-परदेशातून येतात.आंगणेवाडीच्या देवीच्या दर्शनाला या जत्रोत्सवामध्ये अनेक सेलिब्रिटी, राजकीय मंडळी आवर्जुन हजेरी लावतात. लाखो भक्त दिवसभरात देवीचं दर्शन घेतात. यासाठी विशेष सोय केली जाते. रेल्वे प्रशासनाकडूनही विशेष रेल्वे फेर्या चालवल्या जातात. एसटी कडूनही भाविकांना खास बससेवा असते.
गोवा वार्ता : गोवा-बांबुळीच्या धर्तीवर पेडणे-तूये येथे उभारण्यात आलेल्या शंभर बेडच्या हॉस्पिटलचे काम पूर्ण झाले आहे. हे हॉस्पिटल जानेवारीपासून रुग्णांच्या सेवेसाठी सुरू होणार आहे. याचा विशेष करून फायदा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकांना होणार आहे, असे मत पेडणे मतदारसंघाचे आमदार जीत आरोलकर यांनी केला. या हॉस्पिटलमध्ये गोवा मेडिकल कॉलेजच्या धर्तीवर उपचार होणार आहेत. त्यामुळे गोवा-बांबुळी “सेकंड पार्ट” असा दर्जा त्या हाॅस्पिटलला देण्यात आला आहे. त्यामुळे बांबुळीला होणारे सर्व उपचार या ठिकाणी होणार आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. पणजी-गोवा येथे आयोजित एका कार्यक्रमात ते आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलत होते.
यावेळी भाजपा युवा मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष भाई सावंत उपस्थित होते. सावंतवाडी पत्रकार संघाच्या कार्यक्रमा दरम्यान आरोलकर दीड वर्षांपूर्वी सावंतवाडीत आले होते. यावेळी त्यांनी याबाबतची माहिती दिली होती. याबाबत श्री. आरोलकर यांना विचारले असता ते म्हणाले पेडणे तुये येथे हे हॉस्पिटल उभारण्यात आले आहे. गोवा-बांबुळीच्या धर्तीवर त्या ठिकाणी सर्व सोयी सुविधा उपलब्ध होणार आहे. विशेष करून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णांना हे अत्यंत जवळचे हॉस्पिटल ठरणार आहे. त्यामुळे आता उपचारासाठी त्यांना गोवा-बांबुळीत जावे लागणार नाही. या हॉस्पिटलचा शुभारंभ जानेवारी अखेरपर्यंत होणार आहे.
देवगड:काल दिनांक ०९ डिसेंबर रोजी देवगड पर्यटनासाठी पुणे येथील संकल्प सैनिक अकॅडमीची सहल आली असताना या समुद्रात गेलेल्या चार विद्यार्थिनींचा पाण्यात बुडून मृत्यु झाल्याची आणि एकजण बेपत्ता झाल्याची दुर्घटना घडली.
अशा घटना घडल्या कि पहिला प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे त्या जागेवरील सुरक्षाव्यवस्था. साहजिकच सर्व स्तरावरून अशा येथील प्रशासनास जबाबदार धरले जाते आणि येथून प्रशासन सुरक्षा देण्यास कुठे कुठे कमी पडले त्यावर सर्वच माध्यमावर चर्चा सुरु होते. येथेही काही त्रुटी आढळून आल्यात.
देवगड नगरपंचायतीतर्फे जीव रक्षकांना पगार दिला जातो एवढा खर्च करू नाही आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सक्षम नाही आहे. देवगड किनारपट्टीवर एक जीव रक्षक यापूर्वीच नोकरी सोडून गेला त्या ठिकाणी दुसऱ्याची नेमणूक अद्यापही करण्यात आलेली नाही. या ठिकाणी नगरपंचायतीचा एक सफाई कर्मचारीही उपस्थित असतो मात्र तोही या दुर्घटनेच्या वेळी नव्हता तो कोठे होता? असे प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. हजारो लाखो रुपये खर्च करून आपत्ती व्यवस्थापनाच्या रंगीत तालीम करण्यात येतात मात्र आपत्ती आल्यावर ही रंगीत तालीम काहीच उपयोगाची नसते याचा प्रत्यय आजच्या घटनेवरून आला व्यक्ती बुडाल्यावर पोलीस हजर झाले व देवगड ग्रामीण रुग्णालयाच्या अपुऱ्या कर्मचारी वर्गाने बुडालेल्या व्यक्तींना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले सागरी पोलिसांची एकच नौका देवगड समुद्रात बेपत्ता व्यक्तींचा शोध घेत होती देवगड मधील मच्छिमार, ग्रामस्थ यांनीच आपत्ती व्यवस्थापन राबवले. पोलीस व देवगड ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी वगळून कुठल्याही खात्याचे लोक आपत्ती व्यवस्थापनासाठी फिरकले नाहीत
सुरक्षा व्यवस्थेत त्रुटी आहेत, त्यात सुधारणा करणे आवश्यक आहे. जेणेकरून अशा घटना घडल्यास हानी होता नये. पण पूर्णपणे अशा घटनेस प्रशासनास जबाबदार धरणे योग्य ठरेल का? मुले जवळपास असली कि पालकवर्ग मुलांकडे लक्ष ठेवून असतो. तेच पालक मुलांना सहलीसाठी किंवा एका अभ्यास दौऱ्यासाठी शाळेतर्फे किंवा एखाद्या अकॅडेमी तर्फे पाठवत असतात आणि तीच जबाबदारी त्या संस्थेला वर्ग pass करतो. त्यांच्यावर विश्वास ठेवतो.
मात्र कालच्या घटनेत संस्थेतर्फे निष्काळजीपणाचे दर्शन झाल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे ही सैनिक अकॅडमी आहे, जेथे शिस्तीला मोठे स्थान आहे. संस्थेच्या शिक्षकांनी सहलीसाठी मार्गदर्शक सूचना दिल्या नाही होत्या का? विध्यार्थ्यांच्या संख्येप्रमाणे शिक्षकांची संख्या कमी होती का? त्यांचा विद्यार्थ्यांवर आणि त्यांच्या कृतींवर पुरेसा लक्ष नाही होता का? या घटनेवरून विद्यार्थी बेलगाम असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे या अकॅडमीच्या प्रशासनावर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
मालवण : तालुक्यातील कुंभारमाठ-वेंगुर्ले सागरी महामार्गावरकाल सायंकाळी चारच्या सुमारास दोन मोटारींची समोरासमोर धडक बसून झालेल्या अपघातात पाचजण जखमी झाले.या अपघातात दोन्ही गाड्यांचेही मोठे नुकसान झाले असून या अपघाताची नोंद येथील पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. त्या सर्व जखमींना अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.
याबाबत अधिक माहिती अशी की, कुडाळ-माड्याचीवाडी येथील काहीजण मोटारीने (एम. एच- ४३ एन- ७०५०) मालवणात लग्न समारंभासाठी आले होते. समारंभ आटोपून सायंकाळी ते पुन्हा कुडाळच्या दिशेने निघाल्यावर कुंभारमाठ-वेंगुर्ले सागरी महामार्गावर मोटार आली असता समोरून वेंगुर्लेहून श्रावणच्या दिशेन येत असलेली मोटार (एम. एच. ०२ डीएस ११०६) यांच्यात समोरासमोर धडक बसून अपघात घडला. या अपघातात दशरथ धोंडू तेली (वय ५५) व चंद्रशेखर मधुसूदन परब (५८ दोघे रा. माड्याचीवाडी, कुडाळ) हे तर दुसऱ्या गाडीतील सुनीता महेश पवार (५८), सिद्धेश महेश पवार (३३), सचिन गणपत पवार (३६, सर्व रा. श्रावण) हे तिघे असे एकूण पाचजण जखमी झाले आहेत,
देवगड : सिंधुदुर्गातील देवगड येथे सहलीला आलेल्या पुण्यातील सहा पर्यटक बुडाल्याची घटना घडलीय. यात ४ जणांचा मृत्यू झाला असून एकजण असून बेपत्ता असल्याचं सांगितलं जात आहे. पुणे येथील संकल्प सैनिक अॅकॅडमीची सहल देवगड येथे आली होती. यातील काहीजण समुद्रात आनंद लुटण्यासाठी उतरले होते. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने सहा जण बुडाले.
बुडालेल्यांपैकी चार जणांचे मृत सापडले आहेत. प्रेरणा डोंगरे,अंकिता गालटे,अनिषा पडवळ,पायल बनसोडे अशी मृतांची नावे आहेत. याच्याबरोबर अजून दोनजण बुडाले आहेत, त्यातील आकाश तुपे नावाच्या पर्यटकाला वाचवण्यात आलंय. तर राम डिचवलकर हे अद्यापही बेपत्ता असून त्याचा शोध सुरू आहे.