Category Archives: क्राईम

सावंतवाडी: सोनू उर्फ अमित निवजेकर तीन जिल्ह्यांतून दोन वर्षांसाठी हद्दपार

   Follow us on        

सावंतवाडी | प्रतिनिधी: सावंतवाडी उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी परिसरातील गुन्हेगारी कारवायांना लगाम घालण्यासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. आरोंदा येथील रहिवासी सोनू उर्फ अमित दिवाकर निवजेकर (वय ३१) याला कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या तीन जिल्ह्यांतून दोन वर्षांसाठी हद्दपार (तडीपार) करण्याचे आदेश मंजूर करण्यात आले आहेत. निवजेकर याच्यावर मारामारीचे एकूण सहा गंभीर गुन्हे दाखल असून, त्याच्याविरुद्ध अनेक नॉन-कॉग्निजेबल (NC) तक्रारींचीही नोंद आहे. त्याच्या वाढत्या गुन्हेगारी हालचालींमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने ही कडक कारवाई केली आहे.

​या आदेशाची तत्काळ अंमलबजावणी करत पोलिसांनी संबंधित इसमाला नोटीस बजावली. त्यानंतर, दोन पोलीस अंमलदारांच्या कडक देखरेखीखाली त्याला गोवा राज्यातील त्याच्या नियोजित वास्तव्याच्या ठिकाणी सुरक्षितरित्या सोडण्यात आले. गोव्यातील स्थानिक पोलीस ठाण्यात त्याला हजर करून तडीपार आदेशाची औपचारिक बजावणी पूर्ण करण्यात आली आहे. पुढील दोन वर्षे त्याला या तीन जिल्ह्यांत प्रवेश करण्यास बंदी असेल, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

वेंगुर्ले तालुक्यात वनविभागाची मोठी कारवाई; ७ कोटींचे अंबरग्रीस जप्त, चौघांना अटक


   Follow us on        

वेंगुर्ले: वेंगुर्ले तालुक्यातील शिरोडा परिसरात वनविभागाने गुरुवारी एक मोठी कारवाई करत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कोट्यवधी रुपये किंमत असलेल्या ‘अंबरग्रीस’ची (ब्लू व्हेल माशाची उलटी) तस्करी उघडकीस आणली आहे. या धाडसी कारवाईत सुमारे ९.१२० किलो वजनाचे अंबरग्रीस जप्त करण्यात आले असून, याची बाजारपेठेत किंमत अंदाजे ७ कोटी रुपये इतकी मोठी आहे. याप्रकरणी वनविभागाने चार संशयित आरोपींना मुद्देमालासह ताब्यात घेतले असून परिसरात एकच खळबळ माजली आहे.

​बनावट ग्राहक बनून रचला सापळा

शिरोडा परिसरात काही व्यक्ती अंबरग्रीसची विक्री करण्यासाठी येणार असल्याची गोपनीय माहिती वनविभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे श्री. सचिन शिदतूरे (वनक्षेत्रपाल फिरते पथक, सावंतवाडी) यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पथके तयार केली. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी स्वतः ‘बनावट ग्राहक’ बनून तस्करी करणाऱ्यांशी संपर्क साधला आणि सापळा रचला. गुरुवारी, १६ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ७ च्या सुमारास व्यवहार निश्चित झाल्यावर वनविभागाने या आरोपींना रंगेहात पकडले.

​आरोपींची नावे आणि कारवाईत सहभागी पथक

या प्रकरणात रणजित रामचंद्र नायर (वय ४०, रा. परबगाव शिरोडा), गुरुनाथ नाईक (वय ७०, रा. परबगाव शिरोडा), विभव आडारकर (वय ३५, रा. शिरोडा) आणि निलेश मनोहर पांडजी (वय ३३, रा. रेडी) या चौघांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई उपवनसंरक्षक श्री. मिलीश शर्मा, विभागीय वनअधिकारी श्री. संजय वाघमोडे आणि साहाय्यक वनसंरक्षक डॉ. सुनील लाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये वनक्षेत्रपाल सचिन शिदतूरे, अमित कटके, वनपाल सावळा कांबळे, महेश पाटील आणि अन्य वनरक्षकांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

​अंबरग्रीस हे अत्यंत दुर्मिळ आणि मौल्यवान मानले जाते, त्यामुळे केवळ पैशांच्या हव्यासापोटी अशा प्रकारचे गुन्हे घडत आहेत. नागरिकांनी अशा कोणत्याही तस्करीबद्दल माहिती मिळाल्यास त्वरित वनविभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

जमिनीच्या वादात कोयत्याने हल्ला! ओवळीयेतील महिलेचा मृत्यू

   Follow us on        

सावंतवाडी : तालुक्यातील ओवळीये गावातील मधलीवाडी येथे रविवारी सायंकाळी घडलेल्या धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या जमिनीच्या वादातून कोयत्याने करण्यात आलेल्या हल्ल्यात ६५ वर्षीय सरस्वती सावंत यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

या प्रकरणी पोलिसांनी संशयित विजय कृष्णा सावंत (वय ६१) आणि त्यांचा मुलगा रघुनाथ विजय सावंत (वय ३७) या पिता–पुत्रांना तात्काळ ताब्यात घेतले आहे. ही घटना सायंकाळी सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, सरस्वती सावंत या आपल्या मुलगा एकनाथ सावंत याच्यासोबत शेतात कामासाठी गेल्या असताना संशयितांनी तेथे येत जमिनीच्या वादातून वाद घातला. सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची झाली; मात्र काही क्षणांतच हा वाद हिंसक वळणावर गेला. संतापाच्या भरात आरोपींनी कोयत्याने सरस्वती सावंत यांच्या डोक्यावर वार केले. यात त्या गंभीर जखमी होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला.

घटनेनंतर तातडीने त्यांना सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह 

या प्रकरणातील धक्कादायक बाब म्हणजे, मृत महिलेने दोन दिवसांपूर्वीच आपल्या जीवाला धोका असल्याची तक्रार पोलिसांकडे दिली होती. तरीही ही घटना घडल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

त्यांच्या अनपेक्षित जाण्याने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. ही घटना डोळ्यासमोर घडल्याने त्यांचा मुलगा अजूनही या धक्क्यातून सावरला नाही आहे. अंत्यसंस्कारावेळी कुटुंबीयांचा आक्रोश मन हेलावून टाकणारा होता. त्यांच्या पश्चात पती, दोन मुलगे, एक मुलगी, सुना, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे.

दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून हल्ल्यात वापरण्यात आलेला कोयता जप्त केला असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेविरोधात नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्याची जोरदार मागणी केली जात आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाने बनावट रेशन कार्ड; अज्ञातावर गुन्हा दाखल

   Follow us on        

छत्रपती संभाजीनगर: राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कुटुंबाच्या नावाने बनावट पिवळे रेशन कार्ड तयार करण्यात आल्याचा एक खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. या बनावट रेशन कार्डवर चक्क उपमुख्यमंत्र्यांचा फोटो, बनावट स्वाक्षऱ्या आणि शिक्क्यांचा वापर करण्यात आला असून, कार्डचा क्रमांक YP 348261 असा आहे. विशेष म्हणजे, हे कार्ड रमाई आवास योजना आणि इतर शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठी वापरण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकारामुळे राज्याच्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील त्रुटी आणि सुरक्षा व्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

​या गंभीर प्रकरणाची माहिती माजी खासदार इम्तियाज जलील यांनी एका पत्रकार परिषदेत दिली. त्यांनी पुराव्यादाखल हे बनावट रेशन कार्ड आणि त्यासोबत जोडलेली इतर कागदपत्रे प्रसारमाध्यमांना दाखवली. १२ मार्च रोजी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. इतक्या उच्चपदस्थ व्यक्तीच्या नावाने बनावट कागदपत्रे तयार करण्याचे धाडस कोणी केले, याबाबत आता चर्चा रंगू लागली आहे.

​या प्रकरणी तक्रार प्राप्त होताच सिटी चौक पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. सरकारी कागदपत्रांचा गैरवापर आणि फसवणूक केल्याप्रकरणी पोलीस आता अधिक तपास करत आहेत. हे बनावट कार्ड नेमके कोणी आणि कुठे तयार केले, तसेच यामागे कोणते मोठे रॅकेट सक्रिय आहे का, याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.

दहावीचा गणिताचा पेपर टेलिग्रामवर लीक; ग्रुप ऍडमिनविरुद्ध गुन्हा दाखल

   Follow us on        

पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेत एक खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. गणित भाग-१ आणि भाग-२ या दोन्ही विषयांच्या प्रश्नपत्रिका परीक्षेपूर्वीच ‘महाराष्ट्रलीकर्स’ (Maharashtra Leakers) नावाच्या टेलिग्राम चॅनेलवर लीक झाल्याचे समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, ५ मार्च रोजी होणारा गणित भाग-२ चा पेपर तब्बल तीन दिवस आधीच या ग्रुपवर उपलब्ध करून देण्यात आला होता.

​या प्रकरणाची माहिती मिळताच बोर्डाच्या अधिकार्यांनी सोशल मीडियावर फिरणाऱ्या या प्रश्नपत्रिकांची अधिकृत प्रश्नपत्रिकांशी पडताळणी केली. तपासाअंती या दोन्ही प्रश्नपत्रिका तंतोतंत जुळत असल्याचे निष्पन्न झाले आहे. परीक्षेच्या गोपनीयतेचा भंग झाल्याने पुणे विभागीय मंडळाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल केली आहे.

​या तक्रारीनुसार, संबंधित टेलिग्राम ग्रुपचे ॲडमिन आणि सदस्यांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सायबर तज्ज्ञांच्या मदतीने पोलीस आता या रॅकेटचा मूळ स्रोत शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान, या पेपर लीकच्या प्रकारामुळे प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी आणि पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले असून, संबंधित विषयांची परीक्षा पुन्हा घेतली जाणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

कोकण रेल्वे प्रवासात साडेचार तोळ्यांचे दागिने चोरीला

   Follow us on        

कणकवली : मुंबईहून कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाचे  साडेचार तोळ्यांचे दागिने चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी राकेश सदानंद मिठबावकर (वय ३५, रा. कुर्ला-मुंबई, मूळ रा. पडेल-देवगड) यांनी कणकवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

मिठबावकर हे पत्नी आणि मेहुण्यासोबत ८ मार्च रोजी पहाटे सुमारे २.३० वाजता एलटीटी–मडगाव एक्सप्रेसने मुंबईहून देवगडकडे निघाले होते. दुपारी सुमारे १.३० वाजता गाडी कणकवली रेल्वे स्थानकावर पोहोचली. गाडीतून उतरण्यासाठी सामान आवरत असताना दागिन्यांची बॅग गायब झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी संपूर्ण डब्यात बॅगचा शोध घेतला; मात्र ती मिळून आली नाही.

दरम्यान गाडी सावंतवाडी स्थानकावर पोहोचल्यावर त्यांनी तात्काळ तेथील रेल्वे पोलिसांशी संपर्क साधला. मात्र ही घटना कणकवली स्थानकाच्या दरम्यान उघडकीस आल्याने त्यांना कणकवली येथे तक्रार नोंदवण्यास सांगण्यात आले. त्यानुसार मिठबावकर यांनी कणकवली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

चोरीस गेलेल्या मुद्देमालामध्ये ३२ ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र, १० ग्रॅम वजनाची सोन्याची चैन, ३ ग्रॅम वजनाचे छोटे मंगळसूत्र असा ऐवज आहे. या घटनेमुळे रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून या प्रकरणाचा पुढील तपास कणकवली पोलीस करत आहेत.

तुतारी एक्सप्रेसमध्ये चोरीचा प्रयत्न फसला; सतर्क टीसीमुळे दोन चोरटे जेरबंद

   Follow us on        

पनवेल: कोकण रेल्वेच्या सतर्क कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे ११०१४ तुतारी एक्सप्रेसमधील चोरीचा मोठा प्रयत्न हाणून पाडण्यात यश आले आहे. १६ फेब्रुवारी २०२६ रोजी पहाटे ४:३० च्या सुमारास, तुतारी एक्सप्रेस रोहा स्थानक ओलांडल्यानंतर ही घटना घडली. रत्नागिरीचे तिकीट परीक्षक (TTE) श्री. सचिन सावेकर हे डबा क्रमांक S2, S3 आणि S4 मध्ये तिकीट तपासणी करत असताना त्यांना दोन व्यक्तींच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. सावेकर यांनी प्रसंगावधान राखून आणि इतर प्रवाशांच्या मदतीने या संशयितांना तात्काळ ताब्यात घेतले.

तपासणी दरम्यान असे निष्पन्न झाले की, या आरोपींनी एका महिला प्रवाशाची हॅन्डबॅग चोरली होती. त्यांच्याकडून चोरीला गेलेले साहित्य हस्तगत करण्यात आले असून, यामध्ये एक मंगलसूत्र, दोन जोड कानातले, ४,७५० रुपये रोख आणि एक मोबाईल फोन यांचा समावेश आहे. दरम्यान, प्रवाशाने तक्रार केलेली एक अंगठी मात्र सापडू शकली नाही. यानंतर आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी पनवेल येथील रेल्वे सुरक्षा दलाच्या (RPF) स्वाधीन करण्यात आले आहे.

श्री. सचिन सावेकर यांनी दाखवलेली सतर्कता आणि कर्तव्यतत्परतेची दखल घेत कोकण रेल्वेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. संतोष कुमार झा यांनी त्यांचे कौतुक केले आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी दाखवलेल्या या विशेष कार्याबद्दल सावेकर यांना १०,००० रुपयांचे रोख बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. कोकण रेल्वेने यानिमित्ताने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध असल्याचे पुनरुच्चारले असून, प्रवाशांनी कोणत्याही संशयास्पद हालचालींची माहिती रेल्वे कर्मचारी किंवा आरपीएफला देण्याचे आवाहन केले आहे.

सावंतवाडी: अजब लाच, गजब अधिकारी! गरिबाकडून रेशनकार्डसाठी मागितले ‘चुलीवर भाजलेले काजू’ आणि ‘बकरीचे दुध’


   Follow us on        

सिंधुदुर्ग: प्रशासकीय कामात पारदर्शकता आणण्याचे दावे केले जात असतानाच, सावंतवाडी तहसील कार्यालयातील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नवीन रेशनकार्ड बनवून देण्यासाठी एका महिला पुरवठा निरीक्षकाने चक्क चुलीवर भाजलेले काजू, साजूक तूप, गोड पपई आणि बकरीच्या दुधाची मागणी केल्याची तक्रार एका गरीब महिलेने केली आहे. या विचित्र मागणीमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

​नेमकी घटना काय?

​सावंतवाडी तालुक्यातील आंबोली येथील रहिवासी असलेल्या शालू जानू कोकरे या महिलेने ही तक्रार केली आहे. शालू कोकरे या धनगर समाजातील असून बकरी पालन आणि मजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात. काही दिवसांपूर्वी त्या नवीन रेशनकार्ड काढण्यासाठी सावंतवाडी तहसील कार्यालयात गेल्या होत्या.

​तक्रारदार महिलेच्या म्हणण्यानुसार, तेथील पुरवठा निरीक्षण अधिकारी श्रीमती दिपाली सचितानंद गोटे/वाघमारे यांनी रेशनकार्डसाठी त्यांच्याकडे १०,००० रुपयांची मागणी केली.

​लाचेत मागितले ‘खाद्यपदार्थ’

​जेव्हा शालू कोकरे यांनी आपली आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याचे सांगितले आणि आपण पैसे देऊ शकत नाही असे स्पष्ट केले, तेव्हा संबंधित महिला अधिकाऱ्याने पैशांऐवजी पदार्थांची यादीच समोर ठेवली. तक्रार अर्जात नमूद केल्यानुसार, अधिकाऱ्याने खालील वस्तूंची मागणी केली:

​पेजेचे तांदूळ, चुलीवर भाजलेले काजूगर, साजूक तूप​, मोठ्या आकाराची गोड पपई​, बकरीचे दूध

​इतकेच नाही तर, हे सामान कार्यालयात न आणता बाजूच्या कॅन्टीनमध्ये ठेवण्यास आणि दूध फ्रिजमध्ये ठेवण्यास बजावले. ‘हे सामान दिले तर कागदपत्रे नसली तरी एका तासात रेशनकार्ड बनवून देईन’ असे आश्वासनही संबंधित अधिकाऱ्याने दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

​अपमानास्पद वागणूक

​शालू कोकरे यांनी या वस्तू देण्यासही असमर्थता दर्शवली असता, संबंधित महिला अधिकाऱ्याने त्यांना “एकही वस्तू देता येत नसेल तर इथून चालती हो, माझा वेळ घालवू नको” अशा शब्दांत अपमानित करून कार्यालयातून हाकलून दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

​कठोर कारवाईची मागणी

​याप्रकरणी पीडित महिलेने सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री मा. नितेश राणे, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांकडे लेखी तक्रार केली आहे. एका गरीब आणि गरजू महिलेला अशा प्रकारे वेठीस धरणाऱ्या भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्याची चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.

वेंगुर्ला हादरले! पोटच्या मुलानेच झाडली जन्मदात्या आईवर गोळी; आईचा जागीच मृत्यू…

   Follow us on        

वेंगुर्ला | प्रतिनिधी: तालुक्यातील अणसुर पाल मडकीलवाडी येथे माणुसकीला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शुल्लक घरगुती भांडणाचे रूपांतर टोकाच्या वादात होऊन एका मुलाने आपल्या जन्मदात्या आईवर बंदुकीतून गोळी झाडून तिची निर्घृण हत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

​नेमकी घटना काय?

​अणसुर पाल मडकीलवाडी येथील रहिवासी वासंती वासुदेव सरमळकर (वय ६५) आणि त्यांचा मुलगा उमेश वासुदेव सरमळकर यांच्यात गेल्या काही काळापासून सतत घरगुती कारणावरून वाद होत होते. मंगळवारी, १४ जानेवारी २०२६ रोजी रात्री ८.३० च्या सुमारास वासंती सरमळकर या आपल्या घराच्या अंगणात नेहमीप्रमाणे खुर्चीवर बसल्या होत्या.

​त्यावेळी रागाच्या भरात असलेल्या उमेशने क्रूरतेची सीमा ओलांडली. तो घराच्या छपरावर चढला आणि तिथून त्याने आपल्या हातातील बंदुकीने आईच्या दिशेने थेट गोळी झाडली. ही गोळी वासंती यांच्या डाव्या बाजूच्या छातीत घुसल्याने त्या रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.

​पोलीस कारवाई आणि गुन्हा दाखल

​या घटनेची माहिती मिळताच वेंगुर्ला पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी सौ. जागृती जयेश सरमळकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी उमेश वासुदेव सरमळकर याच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत:

​भारतीय न्याय संहिता (BNS): कलम १०३ (३) (हत्या)

​शस्त्र अधिनियम १९५९: कलम ३, २५, २७, २९

​महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१: कलम ३७ (१), १३५

अरे बापरे! मुंबईतून हरवलेले तब्बल दोन कोटी रुपयांचे १६५० मोबाईल उत्तर प्रदेशात सापडले

   Follow us on        

मुंबई: मुंबई पोलिसांनी हरवलेल्या आणि चोरीला गेलेल्या मोबाईल फोनचा शोध घेण्यासाठी राबवलेल्या एका विशेष मोहिमेअंतर्गत मोठे यश संपादन केले आहे. मुंबईतून गायब झालेले तब्बल १,६५० मोबाईल फोन पोलिसांनी उत्तर प्रदेशातील विविध भागांतून शोधून काढले आहेत. या जप्त करण्यात आलेल्या फोनची बाजारपेठीय किंमत अंदाजे २ कोटी रुपये इतकी आहे. तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी या फोनचा माग काढला आणि विशेष पथकाद्वारे हे फोन पुन्हा मुंबईत आणले.

​या मोहिमेमुळे आपले महागडे फोन परत मिळतील ही आशा सोडून दिलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या विशेष मोहिमेअंतर्गत आतापर्यंत एकूण ३३,५१४ मोबाईल फोन त्यांच्या मूळ मालकांना सुरक्षितपणे परत करण्यात आले आहेत. चोरीच्या मोबाइल टोळ्यांवर वचक बसवण्यासाठी आणि नागरिकांचा कष्टाचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठी ही मोहीम यापुढेही सुरू राहणार असल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

 

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search