Category Archives: कोकण

मोठी बातमी:१० एक्सप्रेस गाड्यांची सेवा आता पनवेल, एलटीटी पर्यंतच; कोकणसह दक्षिणेकडील प्रवाशांचा त्रास वाढणार

   Follow us on        

मुंबई: मध्य रेल्वे (CR) ने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) आणि दादर येथून धावणाऱ्या 10 लांब पल्ल्याच्या गाड्या लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) आणि पनवेल येथे स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवला आहे. या निर्णयामुळे पीक अवर्समध्ये स्थानिक गाड्यांसाठी अधिक मार्गिका उपलब्ध होतील आणि विलंबात घट होईल, असा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे.

यातील ज्या गाड्या एलटीटी टर्मिनस येथे स्थलांतरित करण्यात येणार्‍या चार गाड्यांची नावे हाती आली असून ती खालील प्रमाणे आहेत.

एलटीटी टर्मिनस येथे स्थलांतरित करण्यात गाड्यांची नावे खालीलप्रमाणे 

  • 22629 दादर – तिरुनेलवेली एक्सप्रेस (कोकण रेल्वे मार्गे)
  • 16331 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस –तिरुवनंतपुरम (टीव्हीसी) एक्सप्रेस
  • 16351 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – नागरकोईल एक्सप्रेस
  • 16339 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – नागरकोईल एक्सप्रेस

या बदलामुळे सकाळी व संध्याकाळी होणाऱ्या गर्दीच्या वेळेत सुमारे 40 ते 50 हजार अतिरिक्त प्रवाशांना स्थानिक सेवांचा लाभ मिळू शकतो. सध्या CSMT आणि दादर येथे उशिरा येणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांमुळे स्थानिक गाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत होते, त्यामुळे दररोज अनेक लोकल गाड्या विलंबाने धावतात.

CR च्या योजनेनुसार काही लांब पल्ल्याच्या गाड्या CSMT आणि दादरऐवजी LTT किंवा पनवेल येथे सुरू–समाप्त केल्या जातील. यामुळे CSMT–कसारा/कर्जत मार्गावर सुमारे 15 अतिरिक्त उपनगरीय लोकल सेवा चालवणे शक्य होईल. तसेच काही गाड्यांचे वेळापत्रक 10 मिनिटांपर्यंत बदलण्याचाही विचार आहे.

रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, हा बदल केवळ टर्मिनस बदलण्यापुरता मर्यादित नसून, काही गाड्यांचे डबे वाढवून प्रवासी क्षमता वाढवण्याचाही प्रस्ताव आहे.

मात्र, प्रवासी संघटनांनी या निर्णयाबाबत चिंता व्यक्त केली आहे. LTT किंवा पनवेल येथे टर्मिनस बदलल्यास लांब पल्ल्याच्या प्रवाशांना अतिरिक्त अंतर व वाहतुकीचा त्रास सहन करावा लागू शकतो, असे त्यांचे म्हणणे आहे.

लॉंग वीकेंडलाच मध्य रेल्वेचा ब्लॉक; कोकणकन्या, तुतारी एक्सप्रेससह अन्य गाड्या रखडणार

   Follow us on        

मुंबई: डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन (DFCC) प्रकल्पाच्या पायाभूत कामासाठी मध्य रेल्वेने पनवेल आणि कळंबोली स्थानकांदरम्यान विशेष ट्रॅफिक ब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला आहे. हा ब्लॉक रविवार, २५ जानेवारी रोजी रात्री घेण्यात येणार असून, यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता आहे. या ब्लॉक मुळे शनिवार – रविवार आणि लागून आलेल्या प्रजासत्ताक दिनाच्या सुट्टीत गावी जाणार्‍या प्रवाशांची गैरसोय होणार आहे.

​ब्लॉकचे मुख्य कारण

​कळंबोली येथे ११० मीटर लांबीच्या (१५०० मेट्रिक टन वजन) ‘ओपन वेब गर्डर’ उभारणीचे काम केले जाणार आहे. यासाठी पनवेल-कळंबोली दरम्यान अप आणि डाऊन अशा दोन्ही मार्गांवर मध्यरात्री १:२० ते पहाटे ५:२० वाजेपर्यंत असा एकूण चार तासांचा ब्लॉक असेल.

​गाड्यांच्या मार्गात आणि वेळेत झालेले बदल:

​या कामामुळे अनेक महत्त्वाच्या गाड्यांवर परिणाम होणार आहे. त्याचे तपशील खालीलप्रमाणे आहेत:

​१. मार्गात बदल (Diverted Train):

​गाडी क्र. २२१९३ (दौंड – ग्वाल्हेर एक्सप्रेस): ही गाडी कर्जत – कल्याण – वसई रोड या पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे.

२. स्थानकांवर थांबवून ठेवण्यात येणाऱ्या गाड्या (Regulated Trains):

​गाडी क्र. १२१३४ (मंगळुरू – सीएसएमटी एक्सप्रेस): ही गाडी सोमाटणे स्थानकादरम्यान रात्री २:५८ ते पहाटे ५:२० पर्यंत थांबवून ठेवली जाईल.

​गाडी क्र. २०११२ (मडगाव – सीएसएमटी कोकण कन्या एक्सप्रेस): ही गाडी पनवेल येथे पहाटे ४:०२ ते ५:२० पर्यंत थांबवली जाईल.

​गाडी क्र. ११००४ (सावंतवाडी रोड – दादर तुतारी एक्सप्रेस): ही गाडी आपटा स्थानकात पहाटे ४:२५ ते ५:१५ पर्यंत थांबवण्यात येईल.

​गाडी क्र. १२६२० (मंगळुरू – एलटीटी मत्स्यगंधा एक्सप्रेस): ही गाडी जिते स्थानकात पहाटे ४:४१ ते ५:१० पर्यंत थांबवली जाईल.

३. वेळेत बदल आणि उशीर:

​गाडी क्र. १०१०३ (सीएसएमटी – मडगाव मांडवी एक्सप्रेस): या गाडीच्या सुटण्याच्या वेळेत बदल करण्यात आला असून, ही गाडी सीएसएमटी येथून सकाळी ८:२० वाजता सुटेल.

​गाडी क्र. १७३१७ (हुबळी – दादर एक्सप्रेस): ही गाडी १५ ते २० मिनिटे उशिराने धावेल.

​प्रवाशांना आवाहन

​या मेगाब्लॉकमुळे कोकण रेल्वेच्या वेळापत्रकावर मोठा परिणाम होणार असून, तुतारी, मांडवी आणि कोकण कन्या यांसारख्या महत्त्वाच्या गाड्या विलंबाने धावतील. प्रवाशांनी प्रवासाला निघण्यापूर्वी रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा चौकशी खिडकीवर गाड्यांची सद्यस्थिती तपासून घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

​’दिल्ली लॉबी’ ही कोकणातील समृद्ध गावांना लागलेली कीड

   Follow us on        

दोडामार्ग: सह्याद्रीच्या रांगांमधील समृद्ध निसर्ग आणि गावे वाचवण्यासाठी स्थानिकांनी एकत्र येणे ही काळाची गरज असून, दिल्ली लॉबीच्या रूपाने जमिनी खरेदी करण्यासाठी येणारे गुंतवणूकदार म्हणजे या भागाला लागलेली ‘कीड’ आहे, असे परखड मत वनशक्ती संस्थेचे प्रमुख स्टॅलीन दयानंद यांनी कोलझर येथे व्यक्त केले. “रक्ताच्या नात्याबाहेर कोणालाही जमीन विकणार नाही” अशी शपथ घेत कोलझरवासियांनी पुकारलेल्या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी स्पष्ट केले की, हा परिसर व्याघ्र कॉरिडॉर आणि इको-सेन्सिटिव्ह झोनमध्ये येत असल्याने त्याचे रक्षण करण्याची मुख्य जबाबदारी स्थानिकांचीच आहे. ही मोठी आर्थिक लॉबी येथील गावपण आणि पर्यावरण नष्ट करण्यास टपली आहे, त्यामुळे स्थानिकांनी वेळीच सावध होऊन ही कीड उपटून फेकली पाहिजे.

​या लढ्यात तरुणांच्या असलेल्या मोठ्या सहभागाचे कौतुक करताना स्टॅलीन म्हणाले की, नव्या पिढीने घेतलेला हा निर्णय आदर्शवत आहे. जमिनी विकून मिळणारा पैसा फार काळ टिकणार नाही, मात्र येथील निर्मळ जल आणि समृद्ध निसर्ग भविष्यात पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिकांना अधिक श्रीमंत करू शकतो. रेडी येथील उत्खननामुळे झालेल्या दुरवस्थेचा दाखला देत त्यांनी पर्यावरणाचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच, इको-सेन्सिटिव्ह क्षेत्राबाबत लोकांमध्ये पसरवले जाणारे गैरसमज चुकीचे असून स्थानिकांच्या निसर्गपूरक जीवनशैलीला त्यापासून कोणताही धोका नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, परिसरातील बेकायदेशीर वृक्षतोड आणि खनिजयुक्त मातीच्या उत्खननाची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली असून, ही गंभीर परिस्थिती न्यायालयाच्या निदर्शनास आणून देणार असल्याची ग्वाही त्यांनी ग्रामस्थांना दिली.

​यावेळी पर्यावरणवादी कार्यकर्ते संदीप सावंत यांनी व्याघ्र कॉरिडॉरमधील गावांची समन्वय समिती स्थापन करण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाला देवस्थान कमिटीचे अध्यक्ष शामराव देसाई, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते पी. पी. देसाई, कुंब्रलचे माजी सरपंच प्रवीण देसाई, सुदेश देसाई, सिद्धेश देसाई यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर धावणार्‍या विशेष गाडीला तब्बल पाच वर्षे मुदतवाढ

   Follow us on        

Konkan Railway: प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता आणि प्रवासाची सोय अधिक सुलभ करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने पश्चिम मध्य रेल्वेच्या समन्वयाने गाडी संख्या ०२१९८ / ०२१९७ जबलपूर – कोइम्बतूर – जबलपूर साप्ताहिक स्पेशल ट्रेनच्या सेवा विस्तारित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. एक दोन नाही तर तब्बल पाच वर्षासाठी या गाडीला मुदतवाढ देण्यात आली आहे.

नवीन वेळापत्रकानुसार, गाडी संख्या ०२१९८ जबलपूर – कोइम्बतूर साप्ताहिक स्पेशलच्या फेऱ्या ६ मार्च २०२६ पासून २७ डिसेंबर २०३० पर्यंत वाढवण्यात आल्या आहेत. तसेच, परतीच्या प्रवासात गाडी संख्या ०२१९७ कोइम्बतूर – जबलपूर साप्ताहिक सुपरफास्ट फेस्टिव्हल स्पेशल ९ मार्च २०२६ पासून ३० डिसेंबर २०३० पर्यंत धावणार आहे. म्हणजे पुढील पाच वर्षे ही गाडी कोकण रेल्वे मार्गावर धावणार आहे.

या गाडीचे प्रमुख थांबे:

ही गाडी आपल्या प्रवासात नरसिंगपूर, गाडरवारा, पिपरिया, इटारसी जंक्शन, हरदा, खंडवा, भुसावळ जंक्शन, नाशिक रोड, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, थिवीम, मडगाव जंक्शन, कारवार, कुमटा, मूकंबिका रोड बिंदूर, कुंदापुरा, उडुपी, मुल्की, मंगळुरू जंक्शन, कासारगोड, कन्नूर, वडाकरा, कोझिकोड, तिरूर, शोरनूर जंक्शन आणि पालघाट या स्थानकांवर थांबेल.

​डब्यांची रचना (Coach Composition):

या विशेष गाडीला एकूण २४ डबे जोडण्यात आले आहेत. यामध्ये प्रथम श्रेणी ए.सी. (First AC) चा १ डबा, द्वितीय श्रेणी ए.सी. (Two Tier AC) चे २ डबे, तृतीय श्रेणी ए.सी. (3 Tier AC) चे ६ डबे, स्लीपर क्लासचे ११ डबे, जनरलचे २ डबे आणि २ एस.एल.आर. (SLR) डब्यांचा समावेश आहे.

​विशेष म्हणजे, या ट्रेनच्या धावण्याचे दिवस, वेळ, थांबे आणि डब्यांच्या रचनेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही; ती पूर्वीप्रमाणेच नियमितपणे धावत राहील. या विस्तारामुळे कोकणात आणि दक्षिण भारतात जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला असून, आगामी पाच वर्षांसाठी प्रवासाचे नियोजन करणे सोपे होणार आहे. या गाड्यांच्या थांब्यांच्या आणि वेळेच्या सविस्तर माहितीसाठी प्रवाशांनी रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

कोकण रेल्वे स्थानकांच्या विकासासाठी १०५ कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित – खासदार कोटा श्रीनिवास पुजारी

   Follow us on        

उडुपी | प्रतिनिधी

उडुपी रेल्वे स्थानकावरील प्रवाशांची अनेक वर्षांपासूनची मागणी अखेर पूर्ण झाली आहे. ‘अमृत भारत रेल्वे स्थानक योजने’अंतर्गत सुमारे २ कोटी ४० लाख रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या विविध प्रवासी सुविधांचे लोकार्पण १४ जानेवारी रोजी उत्साहात पार पडले. या नूतनीकरणामुळे उडुपी रेल्वे स्थानकाला आता आधुनिक आणि देखणे स्वरूप प्राप्त झाले असून, किनारपट्टी भागातील प्रवाशांना याचा मोठा लाभ होणार आहे.

​उडुपी-चिक्कमगळुरूचे खासदार कोटा श्रीनिवास पुजारी यांच्या हस्ते कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने विकसित केलेल्या या सुविधांचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना खासदार पुजारी म्हणाले की, “केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी किनारपट्टी भागातील रेल्वे स्थानकांच्या विकासासाठी १०० कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी दिली आहे. पहिल्या टप्प्यात २.६ कोटी रुपये खर्चून प्लॅटफॉर्म क्रमांक २ चा विकास केला जाईल, तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या सोयीसाठी तीन नवीन लिफ्ट बसवण्यात येतील.”

​रेल्वे विकासाचा धडाका:

खासदारांनी माहिती दिली की, बारकूर ते मुल्की दरम्यानच्या रेल्वे प्लॅटफॉर्मच्या सुधारणेसाठी ४.२८ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. चालू आर्थिक वर्षात केंद्र सरकारकडून एकूण १० रेल्वे स्थानकांच्या विकासासाठी सुमारे १०५ कोटी रुपयांचा निधी मिळण्याची शक्यता आहे.

​महत्त्वाच्या मागण्या आणि प्रस्ताव:

यावेळी खासदारांनी किनारपट्टी भागातील रेल्वे कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी काही महत्त्वाचे मुद्दे मांडले:

​दुहेरीकरण: मंगळुरू ते कारवार या रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण ही काळाची गरज असून, याचा सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) केंद्र सरकारला सादर केला जाईल.

​गाड्यांचा विस्तार: मडगाव-मंगळुरू ‘वंदे भारत’ ट्रेन मुंबईपर्यंत आणि बेंगळुरू-मंगळुरू ट्रेन कारवारपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे.

​नामकरण: उडुपी रेल्वे स्थानकाचे नाव बदलून ‘श्री कृष्ण रेल्वे स्थानक’ करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी जाहीर केले.

​या उद्घाटन समारंभाला आमदार यशपाल ए. सुवर्णा, आमदार गुरमे सुरेश शेट्टी, कोकण रेल्वेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा, कारवार विभागीय रेल्वे व्यवस्थापक आशा शेट्टी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

वेंगुर्ला हादरले! पोटच्या मुलानेच झाडली जन्मदात्या आईवर गोळी; आईचा जागीच मृत्यू…

   Follow us on        

वेंगुर्ला | प्रतिनिधी: तालुक्यातील अणसुर पाल मडकीलवाडी येथे माणुसकीला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शुल्लक घरगुती भांडणाचे रूपांतर टोकाच्या वादात होऊन एका मुलाने आपल्या जन्मदात्या आईवर बंदुकीतून गोळी झाडून तिची निर्घृण हत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

​नेमकी घटना काय?

​अणसुर पाल मडकीलवाडी येथील रहिवासी वासंती वासुदेव सरमळकर (वय ६५) आणि त्यांचा मुलगा उमेश वासुदेव सरमळकर यांच्यात गेल्या काही काळापासून सतत घरगुती कारणावरून वाद होत होते. मंगळवारी, १४ जानेवारी २०२६ रोजी रात्री ८.३० च्या सुमारास वासंती सरमळकर या आपल्या घराच्या अंगणात नेहमीप्रमाणे खुर्चीवर बसल्या होत्या.

​त्यावेळी रागाच्या भरात असलेल्या उमेशने क्रूरतेची सीमा ओलांडली. तो घराच्या छपरावर चढला आणि तिथून त्याने आपल्या हातातील बंदुकीने आईच्या दिशेने थेट गोळी झाडली. ही गोळी वासंती यांच्या डाव्या बाजूच्या छातीत घुसल्याने त्या रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.

​पोलीस कारवाई आणि गुन्हा दाखल

​या घटनेची माहिती मिळताच वेंगुर्ला पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी सौ. जागृती जयेश सरमळकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी उमेश वासुदेव सरमळकर याच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत:

​भारतीय न्याय संहिता (BNS): कलम १०३ (३) (हत्या)

​शस्त्र अधिनियम १९५९: कलम ३, २५, २७, २९

​महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१: कलम ३७ (१), १३५

Sindhudurg: मोठी बातमी:प्रशासकीय राजवट संपणार! जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका अखेर जाहीर

   Follow us on        

सावंतवाडी:सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका अखेर जाहीर झाल्या आहेत. गेल्या नऊ वर्षांपासून रखडलेली ही निवडणूक येत्या ५ फेब्रुवारी २०२६ रोजी पार पडणार आहे. २०१७ नंतर पहिल्यांदाच या निवडणुका होत असल्याने जिल्ह्याचे राजकीय वातावरण कमालीचे तापले असून इच्छुकांची मोठी मांदियाळी पाहायला मिळत आहे.

​प्रशासकीय राजवट संपणार; ५.९९ लाख मतदार बजावणार हक्क

​मार्च २०२२ मध्ये जिल्हा परिषदेची मुदत संपल्यानंतर ओबीसी आरक्षणाच्या न्यायालयीन पेचामुळे या निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. गेल्या चार वर्षांपासून जिल्हा परिषदेवर प्रशासकाची नियुक्ती होती. आता या निवडणुकांमुळे जिल्ह्याला पुन्हा एकदा लोकनियुक्त प्रतिनिधी मिळणार आहेत.

​एकूण मतदार: ५,९९,५६७

​मतदान केंद्रे: ८७०

​जिल्हा परिषद जागा: ५०

​पंचायत समिती जागा: १००

​अध्यक्षपद ‘खुले’; दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

​पुढील अडीच वर्षांच्या कालावधीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद ‘खुले’ (General) प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. हे पद सर्वांसाठी खुले झाल्याने जिल्ह्यातील मातब्बर नेत्यांमध्ये चुरस निर्माण झाली आहे. आपल्या समर्थकांना उमेदवारी मिळवण्यासाठी आणि जिल्ह्यावर आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

​पंचायत समित्यांचे आरक्षण: ४ तालुक्यांत ‘महिला राज’

​जिल्ह्यातील आठ पंचायत समित्यांच्या सभापतीपदांचे आरक्षणही प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये आठपैकी चार तालुक्यांचे नेतृत्व महिलांकडे जाणार असून, महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

​तालुकानिहाय आरक्षण खालीलप्रमाणे:

सावंतवाडी – अनुसूचित जाती (महिला)

कणकवली – ओबीसी (महिला)

दोडामार्ग – सर्वसाधारण (महिला)

मालवण – सर्वसाधारण (महिला)

वेंगुर्ला – ओबीसी (सर्वसाधारण)

कुडाळ – सर्वसाधारण (खुले)

वैभववाडी – सर्वसाधारण (खुले)

देवगड – सर्वसाधारण (खुले)

निवडणुकीचे महत्त्व

​सिंधुदुर्ग जिल्हा परिषद हे जिल्ह्याचे ‘मिनी मंत्रालय’ मानले जाते. ९ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर निवडणूक होत असल्याने मतदारांमध्येही मोठा उत्साह आहे. प्रलंबित विकासकामे आणि स्थानिक प्रश्नांवरून या निवडणुकीत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार संघर्ष होण्याची चिन्हे आहेत. ५ फेब्रुवारीला होणाऱ्या या मतदानानंतर जिल्ह्याची सत्ता कोणाच्या हाती जाणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Konkan Railway: लागून आलेल्या सुट्ट्यांसाठी मुंबई पुण्याहून विशेष गाड्या सोडाव्यात – कोकण विकास समिती

   Follow us on        

मुंबई/रत्नागिरी:

येणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या (२६ जानेवारी) जोडून आलेल्या दीर्घ सुट्ट्यांमुळे कोकण मार्गावर प्रवाशांची होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेता, कोकण विकास समितीने रेल्वे प्रशासनाकडे विशेष गाड्या सोडण्याची आग्रही मागणी केली आहे. २३ जानेवारी ते २६ जानेवारी २०२६ या काळात मुंबई आणि पुण्याहून कोकणात जाणाऱ्या नियमित गाड्यांचे आरक्षण महिनाभर आधीच फुल्ल झाल्याने चाकरमानी आणि पर्यटकांचे हाल होत आहेत.

​या पार्श्वभूमीवर, ‘कोकण विकास समिती’चे जयवंत शंकर दरेकर आणि अक्षय मधुकर महापदी यांनी मध्य रेल्वे आणि कोकण रेल्वे प्रशासनाला सविस्तर पत्र लिहून विशेष गाड्यांचे नियोजन करण्याची विनंती केली आहे.

​प्रवाशांच्या सोयीसाठी या तीन मार्गांवर विशेष ट्रेनची मागणी:

​समितीने प्रवाशांच्या मागणीनुसार खालील तीन मार्गांवर विशेष फेऱ्यांचे प्रस्ताव मांडले आहेत:

​१. मुंबई CSMT – सावंतवाडी रोड – मुंबई CSMT:

ही गाडी दादर, ठाणे, पनवेल, रोहा, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली आणि कुडाळ यांसारख्या महत्त्वाच्या स्थानकांवर थांबून सिंधुदुर्गपर्यंत धावण्यासाठी अपेक्षित आहे. यात स्लीपर आणि एसी कोचची सोय असावी.

​२. पुणे – सावंतवाडी रोड – पुणे:

पुण्याहून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. लोणावळा, कल्याण, पनवेलमार्गे ही गाडी सोडल्यास पुणेकर चाकरमान्यांचा प्रवास सुखकर होईल.

​३. मुंबई CSMT – चिपळूण – मुंबई CSMT (दिवसा धावणारी स्पेशल):

कमी अंतराच्या प्रवाशांसाठी ही गाडी फायदेशीर ठरेल. पेण, माणगाव, वीर, खेड यांसारख्या स्थानकांवर थांबा देऊन सेकंड सीटिंग आणि एसी चेअर कारची सुविधा देण्याची मागणी करण्यात आली आहे.

​दरवर्षी जानेवारीच्या अखेरीस येणाऱ्या लाँग वीकेंडमुळे कोकणात कौटुंबिक भेटी आणि पर्यटनासाठी मोठी गर्दी होते. नियमित गाड्यांमध्ये जागा नसल्याने प्रवाशांना खासगी ट्रॅव्हल्सच्या अव्वाच्या सव्वा भाड्याचा सामना करावा लागतो किंवा असुरक्षित रस्ते प्रवासाचा धोका पत्करावा लागतो.

​”जर रेल्वेने वेळेत विशेष गाड्यांचे नियोजन केले आणि बुकिंग सुरू केले, तर प्रवाशांना शेवटच्या क्षणी होणारा मनस्ताप वाचेल. तसेच, यामुळे भारतीय रेल्वेच्या महसुलातही मोठी भर पडेल,” असे कोकण विकास समितीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

विधवा प्रथा बंद करण्यासाठी कोकणातील ग्रामपंचायतीचा अनोखा उपक्रम; राज्य महिला आयोगाकडून दखल

   Follow us on        

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कलमठ ग्रामपंचायतीने आपल्या कार्यक्षेत्रात विधवा प्रथा पूर्णपणे बंद करण्याचा आणि विधवा महिलांना घरपट्टी व पाणीपट्टी करामध्ये सवलत देण्याचा अत्यंत पुरोगामी आणि धाडसी निर्णय घेतला आहे. याची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून दखल घेण्यात आली असून अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी ग्रा. पं.च्या अभिनंदनाचे पत्र सरपंच संदीप मेस्त्री व ग्रामपंचायत अधिकारी प्रवीण कुडतरकर यांना पाठविले आहे.

आजही समाजातील विधवा महिलांना सन्मानाने जगण्यासाठी संघर्ष करावा लागतो. अशा परिस्थितीत, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील कलमठ ग्रामपंचायतीने केवळ सामाजिक अनिष्ट प्रथांवर घाला घातला नाही, तर त्या भगिनींना आर्थिक स्थैर्य देण्यासाठी घरपट्टी व पाणीपट्टीमध्ये सवलत देऊन एक नवा आदर्श महाराष्ट्रासमोर ठेवला आहे. आपल्या निर्णयामुळे विधवा महिला स्वतःवर लादलेली बंधने झुगारून सन्मानाने मुख्य प्रवाहात येतील तसेच कर सवलतीमुळे एकल महिलांना कुटुंबाचा गाडा चालवण्यासाठी मोठी मदत लाभणार आहे. हा निर्णय संपूर्ण राज्यातील इतर हजारो ग्रामपंचायतींसाठी दीपस्तंभाचे कार्य करेल व आपल्याप्रमाणेच महाराष्ट्रातील इतर ग्रामपंचायतींनी अनुकरण करण्यासाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोग प्रयत्न करेल.

आपण अशा संवेदनशील निर्णयाला दिलेले प्रोत्साहन आणि पाठबळ कौतुकास्पद आहे. महिलांच्या हक्कासाठी आणि सन्मानासाठी काम करणारी सर्वोच्च संस्था म्हणून महाराष्ट्र राज्य महिला आयोग आपल्या या निर्णयाचे स्वागत करतो. याबद्दल महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या वतीने आपले मनःपूर्वक अभिनंदन! भविष्यातही सिंधुदुर्ग जिल्ह्यात महिला सबलीकरणाचे असेच नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जातील, अशी आम्हाला खात्री असल्याचे पत्रात नमुद केले आहे.

 

परप्रांतियांना जमीनी विकणार नाही; ग्राम देवतेसमोर नारळ ठेवत गावकऱ्यांनी घेतली शपथ

   Follow us on        

दोडामार्ग | १२ जानेवारी (प्रतिनिधी):

पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील (इकोसेन्सिटिव्ह झोन) असलेल्या कोलझर गावामध्ये सध्या परप्रांतीय लोकांचा वावर वाढल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. याच पार्श्वभूमीवर, आपल्या जमिनी आणि निसर्गाचे रक्षण करण्यासाठी कोलझरमधील ग्रामस्थ एकवटले असून, त्यांनी ग्रामदेवतेसमोर नारळ ठेवून सामूहिक शपथ घेतली आहे.

नेमके प्रकरण काय?

​गेल्या काही दिवसांपासून या भागात अनधिकृत उत्खनन झाल्याचे स्पष्ट झाले आहे. जमिनींच्या विक्रीचे व्यवहार अद्याप अधिकृतरीत्या समोर आले नसले तरी, भविष्यात गावातील जमिनी परप्रांतीयांच्या हाती जाऊ नयेत यासाठी ग्रामस्थ सावध झाले आहेत.

ग्रामसभेत महत्त्वाचे निर्णय:

  • जमीन विक्रीवर बंदी: गावातील कोणत्याही नागरिकाने आपल्या रक्ताच्या नात्याबाहेरील व्यक्तीला जमीन विकू नये, याबाबत ग्रामस्थांचे एकमत झाले आहे.
  • व्यावसायिकांना विनंती: ज्यांनी जमिनी विकण्याचे ठरवले आहे किंवा ज्यांच्या चर्चा सुरू आहेत, त्यांना विनंती करून हे व्यवहार थांबवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
  • आंदोलनाचा इशारा: इथून पुढे कुणालाही न विचारता अनधिकृत उत्खनन किंवा जमिनींचे व्यवहार झाल्यास कायदेशीर मार्गाने तीव्र आंदोलनात्मक लढा उभारला जाईल, असा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.

​निसर्गसंपन्न असलेल्या कोलझर गावाचे अस्तित्व टिकवण्यासाठी आणि बाहेरच्या लोकांचा हस्तक्षेप रोखण्यासाठी ग्रामस्थांनी हा निर्णय घेऊन नवीन आदर्श घालून दिला आहे.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search