सावंतवाडी: कोकण रेल्वे संदर्भात प्रलंबित प्रश्नांची नेहमी वाचा फोडणारी संघटना म्हणजेच कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडी. या संघटनेने गेल्या वर्ष भरात अनेक प्रलंबित प्रश्नांना वाचा फोडली त्यात सावंतवाडी रेल्वे टर्मिनस हे मुख्य..!
सावंतवाडी टर्मिनसचे भूमिपूजन होऊन ९ वर्षा पेक्षा अधिक काळ लोटला येथे प्रस्तावित रेलो-टेल देखील रखडले, त्यातच सावंतवाडी स्थानकातून कोरोना काळात तब्बल तीन रेल्वे गाड्यांचे थांबे हे रद्द करण्यात आले. या मुळे प्रवाशांची परवड होऊ लागली. या प्रवाशांचा आवाज प्रशासन आणि शासन या दोघांकडे पोहोचवण्यासाठी माजी आमदार कै. जयानंद मठकर यांचा नातू मिहिर मठकर आणि त्याचे साथीदार व असंख्य टर्मिनस प्रेमी पुढे आले. सुरुवात झाली ती निवेदनाद्वारे, त्यानंतर माहितीचे अधिकार, त्यानंतर रेल्वे अधिकारी भेट, मंत्र्यांचा भेटी आदी घेण्यात आल्या. तरी यश मिळत नव्हतं.
२६ जानेवारी २०२४ रोजी संघटनेने सलग्न संघटनांचा सोबत मिळून हजारो लोकांचा उपस्थितीत लाक्षणिक उपोषण देखील केले होते. तरी देखील प्रशासनाला जाग आली नाही.म्हणून प्रशासनाला जागे करण्यासाठी येत्या स्वातंत्र्य दिनी मोठ्ठा घंटानाद करण्यात येणार आहे. उद्या दिनांक १५ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता सावंतवाडी रेल्वे स्थानकावर होणाऱ्या घंटानाद आंदोलनाला सर्व रेल्वे प्रवासी,टर्मिनस प्रेमी आणि कोकणवासियांनी उपस्थितीत राहण्याचे आवाहन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
Ganesh Chaturthi 2024: गणेशभक्तांसाठी ‘अटलसेतू’ टोलमुक्त करावा अशी मागणी होत आहे.
मुंबई – गोवा महामार्गचे काम चालू असल्यामुळे गोरी – गणपती सणास आपल्या गावी जाणाऱ्या गणेशभक्त प्रवाशांचा प्रवास त्रासदायक होऊ नये म्हणून गेली काही वर्षे मुंबई – (पूणा ) बेंगलोर महामार्ग गौरी – गणपती सणात टोल मुक्त केला जातो. तसाच “अटल सेतू” टोल मुक्त करण्यासाठी प्रयत्न करावा अशी मागणी गणेशभक्त कोकवासीय प्रवासी संघाने रायगड रत्नागिरी पालकमंत्री मान. उदय सामंत यांचकडे करण्यात आली.
गौरी – गणपती सणास कोकणात आपल्या गावी जाणाऱ्या गणेशभक्त प्रवाशांच्या सोयीसाठी एस. टी. महामंडळाच्या सहकार्याने गणेशभक्त कोकणवासीय प्रवासी संघाने १२०० पेक्षा जास्त एस. टी. गाड्यांचे नियोजन केले आहे. इतर काही संस्था, राजकीय कार्यकर्ते, आणि एस. टी. महामंडळही जादा गाड्यांचे नियोजन करतात. एस. टी. महामंडळाने ३००० पेक्षा जास्त गाड्यांचे नियोजन केल्याचे समजते. तसेच छोटया गाड्यांचेही प्रमाण जास्त असते, मुंबईत अनेक ठिकाणी रस्ता, पूल, मेट्रो अशी कामे सुरु आहेत.त्याच कालावधीत श्री गणेश आगमनाच्या मिरवणूकाही निघतात. वाहतूकीची कोंडी होते, जर अटल सेतू मार्ग टोल मुक्त केल्यास मुंबईतून निघणाऱ्या एस. टी. गाड्या, व इतरही गाड्या अटलसेतू मार्गे जातील. त्यामुळे वाहतूकीची कोंडी होणार नाही, प्रवाश्यांचा वेळही वाचेल, हे मान. मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून दिले. माजी आमदार मान. तुकाराम काते यांनी मंत्री महोदयांची भेट घडवून आणली. गणेशभक्त कोकवासीय प्रवासी संघांचे अध्यक्ष रविंद्र मुकनाक, कार्याध्यक्ष -दीपक मा. चव्हाण, कोषाध्यक्ष- विश्वनाथ मांजरेकर, प्रमुख संघटक- अनिल काडगे, अशोक नाचरे, अजित दौडे, संतोष कासार, शंकर नाचरे आदी उपस्थित होते. प्रवासी संघाच्या वतीने कार्याध्यक्ष- दीपक चव्हाण यांनी आपल्या मागणीचे सविस्तर विश्लेषण केले. सकारात्मक चर्चा झाली. दिनांक १८/०८/२०२४ रोजी होणाऱ्या स्नेह संमेलास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याचे निमंत्रणही प्रवासीसंघाच्या वतीने देण्यात आले.
सावंतवाडी: सावंतवाडी स्थानकावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक खुशखबर आहे. सावंतवाडी रेल्वे स्थानकावर प्रवासी तिकीट आरक्षण खिडकी आता सकाळी ८ ते संध्याकाळी ८ अशी १२ तास खुली राहणार आहे. या आधी ती सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत खुली असायची. आता ती १२ तास खुली राहणार असल्याने प्रवाशांची मोठी सोय होणार आहे.
प्रवासी संघटनेच्या प्रयत्नांना यश
खरेतर सावंतवाडी रेल्वे स्थानकावरून आंबोली-चौकुळ, कलंबिस्त-शिरशिंगे, शिरोडा, रेडी , दोडामार्ग आणि वेंगुर्ल्यातील गावे अशा मोठ्या पट्ट्यातील प्रवासी प्रवास करतात. अर्धवेळ तिकीट आरक्षण खिडकीमुळे दुरून येणाऱ्या प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत असे. त्यामुळे या स्थानकावरील आरक्षण खिडकी पूर्णवेळ चालू करावी अशी मागणी येथील कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडी तर्फे करण्यात येत होती. दिनांक ९ ऑगस्ट रोजी सुशोभीकरणाच्या कार्यक्रमात खासदार नारायण राणे आणि जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी हजेरी लावली होती. यावेळी संघटनेच्या विविध मागण्याचे निवेदन सादर करून त्या लवकरात लवकर पूर्ण कराव्या अशी विनंती केली गेली होती. या निवेदनात स्थानकावरील आरक्षण खिडकी पूर्णवेळ सुरु करावी या मागणीचा समावेश होता. त्यांच्या विनंतीला मान देऊन खासदार नारायण राणे यांनी रेल्वे प्रशासनाला तशा सूचना दिल्या होत्या. त्यामुळे प्रवासी संघटनेने त्यांचे आभार मानले आहेत.
मुंबई :रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हा सर्वांगीण विकास परिषदेची सभा काल दिनांक ११ ऑगस्ट रोजी मुंबईत पार पाडली.
या सभेला कार्यसम्राट आमदार माननीय श्री कालिदास कोळंबकर यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले व सर्वतोपरी मदत करण्याचे त्यांनी वचनच दिले. भाषणात त्यांनी कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत त्वरित विलीनीकरण होणे आवश्यक आहे, गोवा महामार्ग त्वरित पूर्ण झालाच पाहिजे, कोकणच्या पर्यटनाच्या विकासाच्या दृष्टीने बोट वाहतूक पुन्हा सुरू होणे आवश्यक आहे तसेच कोकणातील सर्वच बंदरांचा मांडवा बंदरा प्रमाणे विकास होणे आवश्यक आहे व तेथे सर्वसोई सुविधा उपलब्ध होणे आवश्यक आहे त्यामुळे भारतातील व परदेशीय पर्यटक मोठ्या प्रमाणात पर्यटनासाठी कोकणात येतील, त्यामुळे अनेक प्रकारचे रोजगार निर्माण होतील.पंतप्रधान नरेंद्र मोदीजी म्हणाल्या प्रमाणे भारतातील प्रत्येक जिल्हा रुग्णालयात मेडिकल कॉलेज निर्माण करून त्यामध्ये मातृभाषेतून शिक्षण दिलेगेले पाहिजे त्यामुळे ग्रामीण भागातील आरोग्यसेवा सुधारणा होतील तळागाळातील समाजातील हुशार मुले डॉक्टर होतील त्याची सुरुवात सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातून या वर्षापासुन सुरू होईल असे ते यावेळी म्हणाले.
संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष माननीय श्री श्रीकांत सावंत यांनी कोकण रेल्वेचे विलीनीकरण व सावंतवाडी टर्मिनस होणे का जरूरी आहे याचा आपल्या भाषणात प्राधान्याने तसेच प्रभावीपणे उल्लेख केला तसेच यासाठी सर्व कोकणवासियांना एकत्र येण्याचे आवाहन केले. यासोबत इतर मान्यवरांनी तसेच उपस्थित असलेल्या सदस्यांनी आपले विषय तसेच मते मांडली.
सभेला विलास राणे वडाळा विधानसभा क्षेत्र प्रमुख,माजी नगरसेवक सुनील मोरे,मुकुंद पडियाल,नामदेव मठकर निवृत्त सुप्रिटेंड जिल्हा व सत्र न्यायालय सिंधुदुर्ग जिल्हा,ऍड योगिता सावंत,पर्यावरण प्रेमी कार्यकर्ते प्रकाश कदम,कोकणातील अनेक संस्थांचे कार्यकर्ते उपस्थित होते,सभेचा समारोप करताना संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत सावंत यांनी सर्वांचे उपस्थित राहिल्या बद्दल धन्यवाद दिले व आभार मानले व पुढील काळात सर्वच कोकनवासीयांनी आपले राजकीय मतभेद विसरून एकत्रित येऊन कोकणच्या सर्वांगिण विकासासाठी कार्य करूया असे आवाहन केले
Special train for Independence day: येत्या स्वातंत्र्यदिनी कोकणात जाणाऱ्या सर्व गाड्यांचे आरक्षण फुल झाल्याने मध्य रेल्वेने या मार्गावर एक विशेष गाडी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. एलटीटी ते मडगाव दरम्यान ही गाडी चालविण्यात येणार असून या गाडीच्या दोन्ही बाजूने एकूण चार फेऱ्या चालविण्यात येणार आहेत.
०११४९/०११५० एलटीटी – मडगाव – एलटीटी विशेष (एकूण ४ फेर्या)
गाडी क्रमांक ०११४९ विशेष ही गाडी एलटीटी येथून गुरुवार दिनांक १५ ऑगस्ट रोजी आणि शनिवार दिनांक १७ ऑगस्ट रोजी रात्री २१.०० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी १०.०० वाजता मडगाव येथे पोहोचेल.
गाडी क्रमांक ०११५० विशेष मडगाव येथून शुक्रवार दिनांक १६ ऑगस्ट रोजी आणि रविवार दिनांक १८ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता सुटेल ती रात्री ००.४० वाजता एलटीटी येथे पोहोचेल.
Follow us on Mumbai Goa Highway:कोकणातील सर्वात मोठा सण म्हणून ओळखला जाणारा गणेशोत्सव आता काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. रेल्वेचे आरक्षण आधीच फुल झाल्याने मोठ्या उत्साहाने कोकणात गावी जाणाऱ्या कित्येक गणेश भाविकांकडे रस्ते वाहतुकीचा पर्याय राहिला आहे. साहजिक दरवर्षीप्रमाणे मुंबई गोवा महामार्गावर मोठ्याप्रमाणात गणेश चतुर्थी दरम्यान वाहतूक होणार आहे. मात्र सध्याची महामार्गाची परिस्थिती पाहता गणेशोत्सवात प्रवास करताना मोठा मनस्ताप सहन करावा लागणार आहे. महामार्गाच्या या परिस्थितीकडे कोंकण विकास समिती व मुंबई गोवा महामार्ग जनआक्रोश समितीने राज्याच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, संबंधित लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधण्यासाठी महामार्गाच्या दुर्दशेच्या फोटो पुराव्यासहित पत्रव्यवहार केला आहे.
“आपण मुंबई गोवा हायवे दुर्दशेबाबत स्वतःहून लक्ष घालून सहयाद्री अतिथी गृह येथे बैठक घेऊन नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया तसेच राष्ट्रीय महामार्ग (सा.बा.) चे अधिकारी यांना खड्डे बुजविने तसेच खड्डे बुजविणेसाठी कोणत्या प्रतीचे मटेरियल वापरावे याबाबत स्पष्ट आदेश देवूनही पूर्तता होत नसलेने एकंदरीत मुंबई गोवा हायवे संबंधात आपणाकडून स्पष्ट आदेश होऊनही पूर्तता होत नसलेने कोंकणात लवकरच साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सव उत्सवाचे महत्त्व लक्षात घेऊन आपण मुंबई गोवा हायवे पाहणी दौरा करावा अशी नम्र विनंती आहे. कोंकण विकास समितीचे सदस्य व मुंबई गोवा महामार्ग जनआक्रोश समितीचे सह सचिव श्री चैतन्य उषा लक्ष्मण पाटील यांनी स्वखर्चाने तसेच कोंकण विकास समितीचे सदस्य श्री अक्षय मधुकर महापदी तसेच श्री सुधीर सापळे यांनी दिनांक २८.०७.२०२४ ते ०७.०८.२०२४ रोजी केलेले पाहणीत तसेच सोबत जोडलेले पीडीएफ मधील फोटो वरून दिसत आहे. या पाहणीत कासू ते माणगाव मार्गावर ४७ तर कासू ते पळस्पे मार्गावर ६९ ठिकाणी गंभीर स्वरूपाचे खड्डे आढळले” अशा आशयाचे पत्र ई-मेल द्वारे संबधीत लोकप्रतिनिधींना पाठविण्यात आले आहे.
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर वाढते गुन्हेगारीचे प्रमाण लक्षात घेता कोकण रेल्वे प्रवाशांची सुरक्षा आणि गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी रत्नागिरी येथे लोहमार्ग पोलीस ठाण्याला शासनाने मंजुरी दिली आहे. शासनाने यासाठी ९१ लाख ७० हजारांचा निधी मंजूर केला असून १५२ अधिकारी, कर्मचाऱ्यांची पदनिर्मिती करण्यात येणार आहे. शासनाच्या गृह विभागाने याबाबतचा अद्यादेश शुक्रवारी जारी केला आहे. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील गुन्हेगारीच्या प्रमाणाला आळा बसणार आहे.
कोकणातील रोहा, कणकवली आणि रत्नागिरी या तीन ठिकाणी लोहमार्ग पोलीस ठाणी प्रस्तावित होती त्यापैकी रत्नागिरी येथे लोहमार्ग पोलीस ठाण्याला शासनाने मंजुरी दिली आहे. त्यापैकी रेल्वे सुरक्षा अधिक मजबूत होणार आहे. मुंबई उपनगरीय रेल्वेच्या हद्दीतील स्थानके, प्रवाशांची सुरक्षा आणि गुन्ह्यांचा तपास करण्याची जबाबदारी लोहमार्ग पोलिसांवर आहे. रेल्वेच्या मालमत्तेची सुरक्षा रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) अखत्यारित आहे. सध्या लोहमार्ग पोलिसांची हद्द सीएसएमटी ते पनवेल आणि कर्जत, खोपोली, मंकीहिलपर्यंत आहे. रोह्यापासून पुढे कोकण रेल्वेची हद्द सुरू होते. याहद्दीतील सुरक्षेची जबाबदारी रेल्वे सुरक्षा दलावर आहे. मुंबईच्या दिशेने येणाऱ्या गाडीत कोकण रेल्वे स्थानकांदरम्यान एखादा गुन्हा घडल्यानंतरही त्याबाबतची तक्रार प्रवासी मुंबईत आल्यानंतर करतात. त्यामुळे रेल्वे सुरक्षा दल, स्थानिक पोलिसांशी संपर्क साधून गुन्हा संबंधित यंत्रणेकडे वर्ग करण्याचे काम लोहमार्ग पोलिसांना करावे लागते. रेल्वे सुरक्षा दलाशी संपर्क साधून कारवाई करावी लागते. आपल्या हद्दीतील स्थानके, तसेच प्रवाशांची सुरक्षा व घडणाऱ्या गुन्ह्यांचा तपास करता यावा यासाठी कोकण रेल्वेवरील तीन स्थानकांमध्ये पोलीस ठाणे स्थापन करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात आल्याची माहिती लोहमार्ग पोलीस आयुक्त कैसर खालिद यांनी दिली आहे.
पणजी : गोव्यातील दूधसागर ते सोनालीम सेक्शन दरम्यान आज सकाळी ९.३५ वाजता सतरा डब्यांची मालगाडी रुळावरून घसरल्याने दक्षिण पश्चिम रेल्वेवरील रेल्वे वाहतुक विस्कळीत झाली आहे.
दक्षिण पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी मंजुनाथ कनमडी यांनी येथे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, शुक्रवारी सकाळी 9.35 वाजता, गोव्यातील हुबली विभागातील घाट विभागात सोनालीम आणि दूधसागर सेक्शन दरम्यान सतरा (17) वॅगनसह मालगाडी रुळावरून घसरली असून खालील दोन गाड्या कोकण रेल्वे मार्गे वळवल्या असल्याची माहिती दिली आहे.
ट्रेन क्र. १२७७९ वास्को द गामा – हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेस मडगाव, रोहा, पनवेल, कल्याण आणि पुणे मार्गे वळवण्यात आली आहे, त्यापुढे ही गाडी आपल्या नियमित मार्गाने जाईल
दुसरी ट्रेन क्र. १२७८० हजरत निजामुद्दीन – वास्को दा गामा एक्स्प्रेस पुणे, कल्याण, पनवेल, रोहा आणि मडगाव मार्गे वळवण्यात आली आहे, त्यापुढे ही गाडी आपल्या नियमित मार्गाने जाईल
सावंतवाडी:सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविन्द्र चव्हाण यांच्या विशेष प्रयत्नातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली, सिंधुदुर्ग आणि सावंतवाडी या तीन स्थानकाच्या सुशोभीकरणाचे काम खूप कमी वेळात पूर्ण झाले असून आज या स्थानकांचे त्यांचाच हस्ते लोकार्पण होणार आहे.
कोकण पट्ट्यातील एकूण १२ स्थानकांचे सुशोभीकरण करण्यासाठी त्यांनी १०० कोटी मंजूर करून घेतले. सावंतवाडी स्थानकाचे सुशोभीकरण पूर्ण झाले असून या कामाला सुमारे ९ कोटी खर्च आला. या स्थानकाचे बाहेरचे रुपडे पालटून एखाद्या विमानतळाचे स्वरूप आले आहे. एखाद्या पर्यटन जिल्ह्याला साजेसे अशा स्वरूपाचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. प्रशासनाने केलेल्या या कामाबद्दल प्रवाशांकडून, प्रवासी संघटनेंकडून समाधान व्यक्त होत आहे. मात्र एक प्रश्न अजूनही अनुत्तरीत राहतो. “नवरी तर नटली पण सुपारी कधी फुटणार?”
आंबोली, रेडी, सावंतवाडी शहर, तळकोकणातील समुद्र किनारे या पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी, दोडामार्ग तालुक्यातील काही भाग, सावंतवाडी पंचक्रोशी, बांदा, शिरोडा, वेंगुर्ला या मोठ्या पट्ट्यातील प्रवाशांसाठी सावंतवाडी स्थानकाचा विकास होणे खूप गरजेचे आहे. सध्याची परिस्थिती बघता या स्थानकावर खूप कमी गाड्यांना थांबे दिले आहेत. प्रवासी संख्या पाहता हे थांबे पुरेसे नाही आहेत. त्यामुळे वंदे भारत, मंगलोर एक्सप्रेस आणि ईतर प्रमुख गाड्यांना येथे थांबे मिळणे गरजेचे आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे येथे मंजूर झालेल्या टर्मिनसचे काम पूर्ण होणे. ९ वर्षापूर्वी सावंतवाडी स्थानकाचे ‘सावंतवाडी टर्मिनस’ या नावाने तत्कालीन केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते भूमिपूजन झाले होते. कोकण रेल्वेचा लाभ खऱ्या अर्थाने महाराष्ट्र राज्यातील कोकणातील जनतेला व्हावा यासाठी सावंतवाडी येथे टर्मिनस होणे खूप गरजचे आहे ही गोष्ट सुरेश प्रभू यांच्या तेव्हाच लक्षात आली होती. टर्मिनस झाल्यास मुंबई /कल्याण/पुणे ते सावंतवाडी दरम्यान गाड्या चालविण्यास शक्य झाले असते. मात्र सुरेश प्रभू यांचा मंत्रिपदावरुन पायउतार होताच टर्मिनसचे काम रखडले ते आजतागायत अपूर्णच आहे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे टर्मिनसच्या दुसर्या टप्प्यातील कामासाठी आलेला निधी परत गेला. ‘सावंतवाडी टर्मिनस’ अशा नावाने भूमिपूजन झाले असूनही अजूनही रेल्वे रेकॉर्ड मध्ये ‘सावंतवाडी रोड’ असा उल्लेख होत आहे.
सार्वजनिक बांधकाम मंत्री रविन्द्र चव्हाण यांच्या प्रयत्नांने सार्वजनिक बांधकाम विभाग PWD आणि कोकण रेल्वे KRCL यांच्यात एक सामंजस्य करार झाला. या करारानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने कोकण रेल्वे च्या १२ स्थानकाच्या बाहेरील सुशोभीकरणाची आणि रेल्वे स्थानकांना जोडणाऱ्या रस्त्यांच्या पुनर्बांधणी करण्याची जबाबदारी स्वीकारली आणि कमी वेळात ती पार पाडत आहे. मात्र आता कोकण रेल्वेने स्थानकाच्या आतील सुधारणांची जबाबदारी घेतली पाहिजे. सावंतवाडी स्थानकावर सध्या शेड नसल्याने प्रवाशांना ऊन आणि पावसाचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे सर्व प्लॅटफॉर्मवर शेड बांधणीचे काम प्राधान्याने घेण्याची गरज आहे. सध्या स्थानकावरील तिकीट आरक्षण खिडकीची वेळ दुपारी २ वाजेपर्यंत आहे ती पूर्णवेळ करण्याची गरज आहे.
सावंतवाडी शहर ते मळगाव रस्ता दुपदरीकरण होणे गरजेचे.
तालुक्याच्या विकासासाठी रेल्वे वाहतूक आणि रस्ते वाहतूक यांचा बरोबरीने विकास होणे गरजेचे आहे. संपूर्ण जिल्ह्यातील सावंतवाडी हे एकमेव स्थानक शहरापासून दूर आहे. हे अंतर ८ किलोमीटर एवढे आहे. तसेच मार्गावर घाटरस्ता लागतो. त्यामुळे सावंतवाडी शहर ते मळगाव ही वाहतूक जलद होण्यासाठी हा रस्ता दुपदरीकरण होण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.
एसटी च्या वेळापत्रकात बदल आवश्यक
मळगाव ते वेंगुर्ला, शिरोडा, बांदा आणि सावंतवाडी जाण्यासाठी एसटी आणि रिक्षा हे दोन पर्याय प्रवाशांनकडे आहेत. अंतर जास्त असल्याने सर्वच प्रवाशाना रिक्षाने प्रवास करणे परवडत नाही. त्यामुळे सामान्य प्रवाशांसाठी एसटीने या मार्गावर लवचिक वेळापत्रक अंगीकारणे आवश्यक आहे. सध्या प्रवाशांना इतर गावांसाठी चालविण्यात येणाऱ्या बसवर अवलंबुन राहावे लागत आहे. सावंतवाडी आगाराची अजूनही फक्त रेल्वे स्थानकाला विशेष बस नाही आहे. रेल्वेच्या वेळापत्रकाप्रमाणे एसटीच्या या मार्गावरील बसच्या वेळापत्रकात बदल केल्यास त्याचा फायदा प्रवाशांना तर होईलच आगाराच्या उत्पन्नातही भर पडेल.
सिंधुदुर्ग:सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकाचे “सावंतवाडी रेल्वे टर्मिनस” भूमिपूजन होवूनही सार्वजनिक बांधकाम विभागाने बाह्य सुशोभीकरण केले त्याला” सावंतवाडी रोड ” असा फलक लावण्यात आला आहे त्याला सावंतवाडी रेल्वे प्रवासी संघटनेने आक्षेप घेत सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे लक्ष निवेदनाद्वारे वेधले आहे.
सावंतवाडी रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अँड संदीप निंबाळकर, सचिव मिहीर मठकर, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर,सागर तळवडेकर आदींनी सार्वजनिक बांधकाम मंत्री, कोकण रेल्वे व्यवस्थापकीय संचालक,सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हाधिकारी आदींचे लक्ष वेधले आहे.
या निवेदनात म्हटले आहे,सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचे भूमिपूजन दि.२७ जून २०१५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते तर पालकमंत्री दिपक केसरकर, खासदार विनायक राऊत आणि मान्यवरांच्या उपस्थितीत झाले आहे. त्यानंतर पहिल्या टप्प्यातील कामे पूर्ण झाली आहेत. त्यावेळी “सावंतवाडी रेल्वे टर्मिनस” नावाची भूमिपूजन कोनशिला आवारात बसविण्यात आली आहे. दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाने बाह्य सुशोभीकरण केले. तेथे “सावंतवाडी रोड” अशा स्वरूपाचा सुशोभीकरणानंतर फलक लावण्यात आलेला आहे.
सार्वजनिक बांधकाम विभाग तर्फे बाह्य सुशोभिकरणाचे काम पूर्ण झाले आहे. याचे उद्घाटन या आठवड्यात अपेक्षित आहे, त्या अनुषंगाने, सार्वजनिक बांधकाम विभागाने स्थानक परिसरात नाव फलक लावण्यात आला आहे त्यावर “सावंतवाडी रोड” असा उल्लेख करण्यात आला आहे, जो काही अंशी चुकीचा आहे, कारण त्या ठिकाणी टर्मिनस चे उद्घाटन झालेले आहे आणि कोकण रेल्वेच्या दफ्तरी देखील सावंतवाडी टर्मिनस असा उल्लेख कागदोपत्री करण्यात येत असल्याचे निर्दशनास आहे, असे या निवेदनात म्हटले आहे.
सावंतवाडी रेल्वे टर्मिनस चे नामकरण हे कोकण रेल्वेचे शिल्पकार कै. प्रा. मधु दंडवते यांचा नावे करावे, अशी मागणी सातत्याने जनतेतून होत आहे, त्यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे.सावंतवाडी रेल्वे टर्मिनस दर्जा ची कामे व्हावीत. तसेच अधिकच्या रेल्वे गाड्यांना थांबा,पाणी भरण्याची सुविधा आणि इतर प्रवासी सुविधांची निर्मिती झाली पाहिजे. त्यासाठी स्वतंत्र निवेदन दिली आहेत. तसेच आंदोलन छेडले, जनजागृती सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरू केली आहे. यासाठी यापुढेही आंदोलने छेडण्यात येणार आहेत, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच रेल्वे स्थानकाच्या प्रवेश द्वारावरील त्या फलकावरील नावाची दुरुस्ती करून ‘सावंतवाडी टर्मिनस’ असे न केल्यास ‘घंटानाद’ आंदोलन छेडण्याचा ईशारा सावंतवाडी रेल्वे प्रवासी संघटनेने दिला आहे.