सिंधुदुर्ग | शाम जोशी :कोकण रेल्वेमार्गावरील शेवटचे स्थानक सावंतवाडी हा राज्यातील शेवटचा थांबा आहे. या स्थानकास टर्मिनस चा दर्जा देण्यात आला आहे. मात्र हा दर्जा फक्त नावापुरताच दिला की काय असा प्रश्न वारंवार पडत आहे.
कोकणातील ईतर स्थानकांशी तुलना करता या स्थानकावर खूप कमी गाड्यांना थांबे देण्यात आले आहेत. लांब पल्ल्याच्या गाडय़ा, सुपरफास्ट एक्स्प्रेस गाड्यांना येथे क्वचितच थांबा आहे. खूप प्रयत्न करून कसाबसा जनशताब्दी या गाडीला येथे थांबा मिळविण्यात यश आले आहे. एक दोन लांब पल्ल्याच्या गाड्यांना येथे थांबे देण्यात आले होते. मात्र त्या गाड्यांची या स्थानकावर येण्याची वेळ खूपच गैरसोयीची होती. कमी प्रतिसाद म्हणुन त्या गाड्यांचे येथील थांबे काढून टाकले, मात्र त्याबदल्यात अजून दुसऱ्या कोणत्या गाडीला येथे थांबे दिले गेले नाही आहेत.
अलीकडेच वंदे भारत या गाडीची चाचणी घेतली असता टर्मिनस असूनही तिला या स्थानकावर थांबविण्यात आले नाही. यावरून या गाडीला सावंतवाडी स्थानकात थांबा मिळण्याची आशा कमी झाल्याचे बोलले जात आहे.
सावंतवाडी रेल्वे स्थानक तळकोकणातील महत्त्वाचे स्थानक आहे. सावंतवाडी, वेंगुर्ले आणि दोडामार्ग या तालुक्यातील प्रवासी या स्थानकावरून प्रवास करतो. त्याचबरोबर आंबोली, रेडी, सावंतवाडी शहर आणि ईतर पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी सावंतवाडी रेल्वे स्थानक हे सोयीचे आहे. या स्थानकावर वंदे भारत आणि तेजस या सारख्या गाड्यांना थांबा दिल्यास येथील पर्यटनाचा विकास होईल. मुंबई गोवा महामार्ग येथून फक्त २ ते ३ किलोमीटर अंतरावर आहे,त्यामुळे काही सुविधा उपलब्ध करून देवून रस्ते वाहतुकीची समस्या सुटल्यास त्याचा फायदा येतील नागरिकांना तसेच येथे भेट देणार्या पर्यटकांना होणार आहे.