रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर वैभववाडी ते रत्नागिरी सेक्शन दरम्यान मार्गाच्या देखभाल दुरुस्तीसाठी बुधवार दि. २३ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी ७.३० ते १०.३० असा तीन तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ‘मेगा ब्लॉकच्या कालावधीत या मार्गावरुन धावणाऱ्या तीन गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.
1) दिनांक २३ ऑगस्ट रोजी सुटणार्या गाडी क्र. 11003 दादर – सावंतवाडी रोड तुतारी एक्स्प्रेसला रोहा ते रत्नागिरी दरम्यान सुमारे अडीच तास रोखून ठेवले जाणार आहे.
2) दिनांक २२ ऑगस्ट रोजी सुटणार्या गाडी क्र. 16346 तिरुवनंतपुरम सेंट्रल – लोकमान्य टिळक (टी) एक्स्प्रेसला उडुपी – कणकवली दरम्यान सुमारे तीन तास रोखून ठेवले जाणार आहे.
3) दिनांक २३ ऑगस्ट रोजी सुटणार्या गाडी क्र. 10106 सावंतवाडी रोड – दिवा जं. एक्स्प्रेसला सावंतवाडी रोड – कणकवली दरम्यान सुमारे तीस मिनिटे रोखून ठेवले जाणार आहे.
सावंतवाडी |सागर तळवडेकर : गेली अनेक वर्षे रेंगाळलेले सावंतवाडी टर्मिनस चे काम पूर्ण करून तेथे वंदे भारत, मत्स्यगंधा, मंगलोर एक्सप्रेस सारख्या रेल्वे गाड्यांना येथे थांबा द्यावा असे निवेदन प्रेरणा फाउंडेशन च्या संस्थापिका दीप्ती दत्ताराम गावकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग चे पालक मंत्री रविन्द्र चव्हाण यांना पाठवले आहे.
कोकण रेल्वे मार्गावरील महत्वाचे स्थानक असणारे सावंतवाडी स्थानकात विविध समस्या अनेक दिवसांपासून आहेत, या समस्या लवकरात लवकर मार्गी लागाव्या तसेच टर्मिनस चे टप्पा २ चे काम पूर्ण व्हावे आणि येथे मंगलोर,वंदेभारत,नेत्रावती,मत्स्यगंधा,मंगला या दैनिक गाड्यांना व नागपूर मडगाव ह्या विदर्भ कोकण जोडणाऱ्या रेल्वेगाडीला या स्थानकात थांबा मिळावा म्हणून प्रवाशांनी तसेच विविध संघटनांनी रेल्वे प्रशासनाला वेळोवेळी विनंती केली आहे परंतु या समस्या अजूनही जैसे थे आहेत
कोकणातील गणेशोत्सव हा एका महिन्यावर आलाय, हा उत्सव राज्यात नाही तर संपूर्ण देशातील पारंपरिक पद्धतीने साजरा केला जाणारा मोठा उत्सव आहे, लाखो चाकरमानी या उत्सवासाठी लवकरच कोकणाकडे रवाना होणार आहेत ही बाब लक्षात घेऊन सावंतवाडी स्थानकातील वरील समस्या लवकरात लवकर सोडवून कोकणातील प्रवाशांना दिलासा द्यावा अशी मागणी केली आहे.
[pdf-embedder url=”https://kokanai.in/wp-content/uploads/2023/08/letter-for-chief-minister.pdf” title=”letter for chief minister”]
👆झूम करण्यासाठी / पान परतण्यासाठी कृपया फोटो वर क्लिक करावे
Konkan Railway News :कोकणात गणेश चतुर्थी हा सण साजरा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात चाकरमानी कोकणात आपल्या गावी जातात. या दरम्यान या मार्गावरील वाहतुकीवर मोठ्या प्रमाणात ताण सहन करावा लागतो. चाकरमान्यांची पहिली पसंती असलेल्या कोकण रेल्वेवर क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी गाड्या चालविल्या जातात त्यामुळे रेल्वेचे वेळापत्रक बिघडून प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतो. हा त्रास पूर्णपणे नाहीसा करणे शक्य नसले तरी रेल्वे प्रशासनाने योग्य नियोजन केल्यास तो थोडा कमी करता येणे शक्य आहे.
कोकण रेल्वे संस्थापक सदस्य आणि अभ्यासक श्री. सुरेंद्र हरिश्चंद्र नेमळेकर कोकण रेल्वेला या नियोजनाबाबत पत्र लिहून यावर एक उपाय पण सुचविला आहे. त्यांनी लिहिलेले पत्र खालीलप्रमाणे
कोकण रेल्वे महाव्यवस्थापक १८/८/२०२३
सन्माननीय महोदय
कोकण रेल्वेला गणेशोत्सवात अडीचशे च्या वरती अतिरिक्त जागा गाड्या मार्गावर प्रवास करणार आहेत. यापूर्वीच मी पत्र दिले होते किमान गणपतीचे पहिले पाच दिवस येतानाच्या गाड्या लोढा मिरज मार्गे वळवाव्यात परंतु त्याची आपण दखल घेतली नाही पर्यायाने या वेळेला गणेशोत्सवात रहदारी वाढल्यामुळे गाड्यांना विलंब होणे हे नित्याचे होणार आहे .
तरी यावर आणखीन एक तोडगा म्हणून गणपतीच्या दिवसांमध्ये गणेशोत्सवाच्या अगोदर पाच दिवस व चतुर्थी नंतर पाच दिवस ज्या गाड्या पनवेल पासून पुढे रोहा मार्गे मेंगलोर पर्यंत धावतील त्या गाड्यांना पहिले प्राधान्य देऊन पुढे काढल्या जाव्यात व येणाऱ्या गाड्या सिग्नलला अथवा स्टेशनला उभ्या करून यांना जाण्याचा मार्ग मोकळा करून द्यावा व पाच दिवसानंतर जाणाऱ्या गाड्या स्टेशनला साईडला घेऊन येणाऱ्या गाड्यांना प्राधान्य देण्यात यावे जेणेकरून गणेशोत्सवात जाणाऱ्या लोकांना प्राधान्याने पुढे जाता येईल व येणाऱ्या गाड्यांना पाच दिवसानंतर येताना प्राधान्य मिळेल. नियमित गाड्यांच्या बाबतीत हे असे नियोजन करणे शक्य नसले तरी अतिरिक्त गाड्यांच्या बाबतीत असे करणे शक्य होईल. रेल्वे प्रशासनाने याची आपण नोंद घ्यावी ही नम्र विनंती
सुरेंद्र हरिश्चंद्र नेमळेकर संस्थापक सदस्य कोकण रेल्वे 9404135619
Konkan Railway News :कोकण रेल्वेच्या दक्षिणेकडील राज्यांच्या स्थानकांवर काही गाड्यांना प्रायोगिक तत्त्वावर काही कालावधीसाठी थांबे देण्यात आले होते. त्या थांब्यांना कायम करण्यात आले आहे. रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार हे थांबे पुढील सूचना मिळेपर्यंत Till Further Advice कायम राहणार आहेत. रेल्वेच्या या प्रसिद्धी पत्रकानुसार एकूण 6 स्थानकावरील 16 गाड्यांचे थांबे कायम करण्यात येणार आहेत.
महाराष्ट्रातील स्थानके अजूनही प्रतिक्षेत
लांब पल्ल्यांच्या गाड्यांना कोकण रेल्वेच्या महाराष्ट्रातील स्थानकांवर थांबे मिळावेत यासाठी विविध प्रवासी संघटनेंकडून अनेक वर्ष मागण्या होत आहेत. या स्थानकां कडून मिळणारे उत्पन्न आणि महत्त्व पाहता अधिक थांब्यासाठी होणारी मागणी रास्त आहे. मात्र या मागण्यांना रेल्वे प्रशासनाने नेहमी केराची टोपली दाखवली आहे. लांब पल्ल्याच्या नेहमीच्या गाड्यांना सावंतवाडी, खेड, संगमेश्वर तसेच ईतर महत्त्वाच्या स्थानकावर थांबे मिळावेत यासाठी अनेक वर्ष मागणी करूनही रेल्वे प्रशासन या मागण्या गांभीर्याने घेत नसल्याचे दिसत आहे. दुसरीकडे दक्षिणेतील राज्यातील स्थानकांवर या गाड्यांना सहजासहजी थांबे मिळत आहेत. या सर्व प्रकारावरून कोकण रेल्वे नेमकी कोणासाठी हा प्रश्न पुन्हा पुन्हा उभा रहात आहे.
KonkanRailway News: गणेशोत्सवासाठी चालविण्यात येणार्या दिवा चिपळूण मेमू विशेष गाडी संदर्भात एक महत्त्वाची बातमी आहे. रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार गाडी क्रमांक 01155 दिवा चिपळूण मेमू विशेष गाडीला दिवा या सुरवातीच्या स्थानकावरून याआधी नियोजित केलेल्या वेळेच्या 10 मिनिटे अगोदर सोडण्यात येणार आहे.
नियोजित वेळेनुसार ही गाडी संध्याकाळी 19:45 या वेळी सुटणार होती. मात्र रेल्वे प्रशासनाने त्यामधे बदल करून ही गाडी सुधारित वेळेनुसार ही गाडी 10 मिनिटे अगोदर म्हणजे संध्याकाळी 19:35 वाजता सुटणार आहे. हा बदल दिनांक 13 सप्टेंबर पासून असणार आहे.
प्रवाशांनी या बदलाची नोंद घ्यावी आणि आपल्या प्रवासाचे नियोजन करावे असे आवाहन रेल्वे प्रशासनाने तर्फे करण्यात आले आहे.
सावंतवाडी: सावंतवाडी येथील रेल्वे स्थानकावर सोमवारी रात्री गाडी पकडत असताना एका प्रवाशाचा अपघात झाला. संदीप रामचंद्र वरक असे त्या प्रवाशाचे नाव असून तो ओवाळिये या गावाचा आहे. या अपघातात त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून उपचारासाठी त्याला बांबुळी येथे दाखल करण्यात आले आहे.
स्थानकावरच्या प्रवाशांच्या सुविधे आणि सुरक्षिततेबद्दल प्रश्न उपस्थित
अपघात नक्की कसा झाला त्याची पूर्ण माहिती आजून आली नाही. मात्र एक गंभीर बाब सावंतवाडी स्थानकावरच्या प्रवाशांच्या सुविधे आणि सुरक्षिततेबद्दल पुढे आली आहे. हा अपघात झाल्यानंतर जखमी प्रवासी प्लॅटफॉर्म वर अर्धातास तसाच मदतीशिवाय पडून होता. गाडी पास झाल्यावर प्लॅटफॉर्म वरच्या लाईट्स बंद झाल्या होत्या. त्यामुळे हा अपघात झाला हे तेथील रेल्वे कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले नाही. जखमी प्रवाशाने आपल्या मोबाईल फोन वरून स्थानका जवळच्या नातेवाईकांना संपर्क साधून मदत मिळवली.
त्यांनी जखमी युवकाला ताबडतोब उपजिल्हा रुग्णायालयात दाखल केले.
याप्रकरणी नातेवाईकांनी स्टेशन मास्तरांना जाब विचारला असता स्थानकावर फक्त स्टेशन मास्टर आणि गार्ड असे दोनच कर्मचारी रात्रीच्या वेळी होते, वरिष्ठांच्या आदेशामुळेच सर्व लाईट्स गाडी गेल्यावर बंद केल्या होत्या त्यामुळे या अपघाताची कोणतीही कल्पना नसल्याचे त्यांनी सांगितले.
सावंतवाडी एक महत्वाचे स्थानक असून त्याला टर्मिनसचा दर्जा देण्यात आला आहे. मात्र या स्थानकावर त्या दर्जाच्या सुविधा का नाही देण्यात येत आहे असा प्रश्न प्रवाशांकडून विचारण्यात येत आहे.
ठाणे :गुलामी छळाच्या जाचेतून, येणाऱ्या लोकशाही माणुसकीत ताठ मानेने जगण्यासाठी ज्या थोर वीरांनी आपल्या प्राणाची अहूती देत १५ ऑगस्ट १९४७* रोजी म्हणजेच आजच्या सुमारे ७६ वर्षापूर्वी माणसातल्या माणुसकीला स्वतंत्र्य मिळून दिले. या ७६ वर्षात लोकशाही कृषिप्रधान भारत देशाने प्रचंड प्रमाणात प्रगती केली. त्या वेळच्या घडामोडीच्या परंपरा काही अंशी भारत देशाने साथ करीत अधिकाधिक यशाची शिखरे गाठलीत.
जसे शरीरातील रक्तवाहिन्या डोक्यापासून पायापर्यंत जात शरीराला जगण्यासाठी चालना देतात; त्याचप्रमाणे भारतातील रेल्वे हा दळणवळणाचा अत्यंत महत्त्वाचा दुवा मानला जाणारा भारतीय रेल्वे मार्ग कन्याकुमारी ते जम्मू-काश्मीर पर्यंत पसरलेला आहे. तोच महाराष्ट्रातील २६ जानेवारी १९९८ रोजी मराठी कोकणवासीय खेडेगावतल्या जनतेची शहराशी नाळ जोडावी यासाठी प्राध्यापक मधू दंडवते साहेबांनी महाराष्ट्र राज्यातील राजधानी मुंबई ते सावंतवाडी रोड यादरम्यान वा पार कर्नाटक पर्यंत सुखकर आणि सुरक्षित कमी खर्चिक वेळ असा कोकण रेल्वे मार्ग* प्रवास सुरू केला.
त्याच कोकणातल्या मातीतल्या कोकण वासियांनी आपला खेडेगाव जपत; कोकणाई जगत, आपल्या सहबंधूंना एकत्र करीत कोकणवासी यांच्या समस्या आणि अडीअडचणी, सूचना यावर कार्य करण्यासाठी कोकणवासी यांचा आवाज शहरी करणापर्यंत पोहोचेल याकरीता प्रवासी बंधूंची सन २००९ साली कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघ (रजि.) ठाणे संघटना अस्तित्वात नव्हे प्रत्यक्षात आणून मोठ्या प्रमाणात कार्यशील राहात आहे. या संघटनेने भारतीय स्वातंत्र्य दिनाचे ७६ वे अमृत महोत्सव साजरा करीत सालाबाद प्रमाणे १५ ऑगस्ट २०२३ चा स्वातंत्र्य दिन सोहळा रांगोळी प्रदर्शित करीत ठाणे स्थानकात मधल्या महत्त्वाच्या प्रवासी पुलावर भव्यदिव्य सुटसुटीत रांगोळी काढीत भारतीय स्वतंत्र दिनाचा ७६ वा अमृत महोत्सवाचा प्रदर्शनीय सोहळा छोटे खानी साजरा केला. या संघटनेस ठाणे स्थानकातील स्थानक निर्देशक श्री अरुण प्रताप सिंह, स्थानक मुख्यप्रबंधक श्री तावडे साहेब, स्थानक उपप्रबंधक, रेल्वे सुरक्षा बल आणि लोहमार्ग पोलीस ठाणे येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि सर्व कर्मचारी वर्ग, मुख्य तिकीट तपासनीस आणि सर्व कर्मचारी वर्ग यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले. त्यावेळी तसेच खालील आवर्जून उपस्थिती असलेले संघटनेचे सभासद आणि कार्यकारी पदाधिकारी यांचे मोलाचे योगदान लाभले.
संघटनेचे सदस्य श्री राजू कांबळे (प्रमुख सल्लागार) यांच्या अधिपत्याखाली श्री . दर्शन कासले (सचिव), श्री. सुजित लोंढे (अध्यक्ष) श्री. संभाजी ताम्हणकर (खजिनदार), श्री. संतोष पवार,/श्री संतोष निकम (मा. अध्यक्ष/मा. उपाध्यक्ष) श्री. यशवंत बावदाणे (सल्लागार), श्री. तुषार साळवी (सल्लागार), श्री. महेश धाडवे (सल्लागार), श्री. विजय जगताप (सल्लागार), श्री. सुहास तोडणकर (संपर्क प्रमुख), श्री. विकास कांबळे, श्री.राजू कदम, श्री. प्रमोद घाग, श्री. नामदेव चव्हाण, श्री. गोविंद आमडोसकर, श्री. अमित चव्हाण, श्री. अनंत लोके, श्री. नागेश गुरव, श्री.गोपीचंद गुरव, श्री. विजय चव्हाण, श्री. सुजित नार्वेकर, श्री. रूपेश शिंदे, श्री. शरद धाडवे, श्री. साहील सकपाळ, श्री. वेदांत सावंत, श्री परेश गुरव, श्री. जितेंद्र बाईत (सर्व सभासद) आदि, त्याचबरोबर रांगोळी कला रेखाटक श्री. विलास सावंत आणि दिलीप सावंत यांचे अनमोल सहकार्य मिळाले.
Konkan Railway News: दक्षिणेकडील राज्यात साजरा होणारा ओणम सण, वार्षिक वेलांकनी महोत्सव आणि या महिन्यात महाराष्ट्र राज्यात साजरे होणार्या सणांच्या निमित्ताने कोकण रेल्वे मार्गावर नागरकोईल ते पनवेल अशी विशेष गाडी सोडण्यात येणार आहे. दि. 22 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर 2023 या कालावधीत या विशेष गाडीच्या दोन्ही बाजूने एकूण ६ फेऱ्या होणार आहेत. या गाड्यांचे आरक्षण 18 ऑगस्ट रोजी रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर आणि आरक्षण तिकीट खिडक्यांवर चालू होणार आहे.
Train No. 06071 Nagercoil – Panvel Special (Weekly):
ही गाडी मंगळवार दिनांक 22/08/2023, 29/08/2023 आणि 06/09/2023 या दिवशी नागरकोइल येथून सकाळी 11 वाजून 35 मिनिटांनी सुटेल आणि दुसऱ्या वेळेला दिवशी 10 वाजून 45 मिनिटांनी ती पनवेलला पोहोचेल.
Train No. 06072 Panvel – Nagercoil Special (Weekly):
ही गाडी गुरुवार दिनांक 24/08/2023, 31/08/2023 आणि 07/09/2023 या दिवशी पनवेल येथून ही गाडी रात्री 12 वाजून 10 मिनिटांनी सुटेल आणि नागरकोईल ला ती दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सकाळी 10 वाजता पोहचेल.
पनवेल मडगाव दरम्यान ही विशेष गाडी रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सावंतवाडी तसेच थिवीला थांबणार आहे.
डब्यांची स्थिती
2 Tier AC – 01 Coaches, 3 Tier AC – 05 Coaches, Sleeper – 11 Coaches, General – 02 Coaches, SLR – 02, असे मिळून एकूण 21 डबे
Konkan Railway News: कोकणरेल्वे मार्गावर गणेशोत्सवासाठी चालविण्यात येणाऱ्या मेमू गाड्यांच्या वेळापत्रकांत आणि थांब्यामध्ये काहीसा बदल करण्यात आला आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी हा बदल केला गेला असून प्रवाशांनी या बदलांची नोंद घेऊन आपल्या प्रवासाची योजना आखावी असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे काण्यात आले आहे.
अतिरिक्त थांबे
०११५३/०११५४ दिवा रत्नागिरी दिवा संपूर्ण अनारक्षित गणपती विशेष मेमू वीर ते खेड ह्या ५१ किलोमीटर अंतरात कुठेही थांबत नसल्याने या गाडीला किमान दोन वाढीव थांबे देण्याची मागणी कोकण विकास समितीने तसेच इतर संघटनांनी मागणी केली होती. त्यानुसार या गाडीला करंजाडी आणि अंजनी या दोन स्थानकांवर प्रत्येकी २ मिनिटांचे थांबे देण्यात आले आहेत.
०११५३ दिवा रत्नागिरी मेमू या गाडीची करंजाडी या स्थानकावर येणायची वेळ सकाळी १०:४० असून अंजनी स्थानकावरची वेळ ११:४५ आहे.
०११५४ रत्नागिरी दिवा मेमू या गाडीची करंजाडी या स्थानकावर येणायची वेळ सायंकाळी १८:३० असून अंजनी स्थानकावरची वेळ १७:३२ आहे.
हा बदल या गाडीच्या सुरवातीपासून म्हणजे १३/०९/२०२३ पासून अमलात आणला जाणार आहे.
वेळापत्रकात बदल
०११५६ चिपळूण दिवा मेमू या गाडीच्या चार स्थानकांच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आला आहे.
सुधारित वेळापत्रकानुसार ही गाडी
चिपळूण या स्थानकावर १३:१० वाजता (पूर्वीची वेळ १३:००),
अंजनी स्थानकावर १३:२६ (पूर्वीची वेळ १३:१५),
खेड स्थानकावर १३:३९ (पूर्वीची वेळ १३:३१)
कळंबणी बुद्रुक १३:४७ (पूर्वीची वेळ १३:४३)
या वेळेस या स्थानकांवर येणार आहे. हा बदल दिनांक १४ सप्टेंबर २०२३ पासून अमलांत आणला जाणार आहे.
Railway News : मागच्या ७ वर्षांपासून रखडलेल्या वैभववाडी -कोल्हापूर रेल्वेमार्गासाठी पीएम गतीशक्ती अंतर्गत ५३ व्या राष्ट्रीय नियोजन गटाच्या बैठकीत तीन हजार ४११ कोटी १७ लाखांच्या खर्चास शिफारस देण्यात आली आहे. त्यामुळे वैभववाडी -कोल्हापूर या १०७ किलोमीटरचा रेल्वेमार्गाला ग्रीन सिग्नल मिळाला आहे.
पीएम गतीशक्ती अंतर्गत तीन रेल्वे प्रकल्प आणि तीन रस्ते प्रकल्पांचा समावेश आहे. याचा मुख्य उद्देश कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या वैभववाडी- कोल्हापूर रेल्वे मार्ग हा आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या शहरी आणि रेल्वे पायाभूत सुविधांवरील ताण कमी करण्यासाठी या प्रकल्पाचा उपयोग होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
वैभववाडी कोल्हापूर रेल्वे मार्गामुळे पश्चिम महाराष्ट्रातील कच्चा, पक्का अशा दोन्ही प्रकारचे शेतीमाल बंदरापर्यंत पोहचण्यास मदत होणार आहे. तर कोकणातील खनिजासह अन्य मालाची पश्चिम महाराष्ट्रात वाहतूकीसाठी मदत होणार असल्याने कोकण व पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाला गती मिळू शकते. सध्या पश्चिम महाराष्ट्रातील शेती उत्पादित मालाची रस्ते मार्गाने कोकणात वाहतूक होते.
कोकणातील खनिजांची वाहतूकही रस्ते मार्गानेच होते. कोल्हापूर- वैभववाडी रेल्वे मार्ग पूर्ण झाल्यास पश्चिम महाराष्ट्रातील शेतीमालाची बंदरापर्यंत वाहतूक कमी खर्चिक आणि सुलभ होणार आहे. शिवाय कोकणातील मालवाहतूक करणे सोयीस्कर ठरणार आहे.
काय आहे ‘पीएम गति शक्ती’ योजना ?
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi)यांनी ओक्टोम्बर २०२१ रोजी ‘पीएम गति शक्ती’ योजना सुरू केली. मल्टी मोडल कनेक्टिव्हिटीसाठी हा केंद्र सरकारचा राष्ट्रीय मास्टर प्लॅन आहे. सरकारच्या मते, ही योजना भारताच्या पायाभूत सुविधांसाठी गेम चेंजर ठरेल. सरकार या कार्यक्रमात 107 लाख कोटी रुपये खर्च करणार आहे. सरकारने म्हटले की, गती शक्ती योजना ही मंत्रालयाच्या सर्व विद्यमान आणि नियोजित उपक्रमांचा समावेश असलेला एक मास्टर प्लॅन आहे. यामध्ये आर्थिक क्षेत्र आणि कनेक्टिव्हिटी पायाभूत सुविधा विकसित केल्या जातील. सरकारच्या मते, यामुळे पायाभूत सुविधा आणि कनेक्टिव्हिटीमध्ये प्रादेशिक आणि क्षेत्रीय असंतुलन दूर करण्यास मदत होईल. यासह मुख्य क्षेत्रांच्या जलद वाढीसह रोजगार निर्माण होईल. सरकारचे सर्व पायाभूत प्रकल्प गती शक्ती योजनेत समाकलित केले जातील. सरकारच्या मते, या योजनेमुळे पायाभूत सुविधांच्या विकासातील सर्व अडथळे दूर होतील.