Category Archives: कोकण रेल्वे

Konkan Railway: प्रवाशांसाठी खुशखबर! कोकणकन्या आणि मांडवी एक्सप्रेसच्या डब्यांत कायमस्वरूपी वाढ

   Follow us on        

मुंबई: कोकण रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या हजारो चाकरमान्यांसाठी रेल्वे प्रशासनाने एक अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. या मार्गावरील प्रवाशांची वाढती गर्दी आणि मागणी लक्षात घेता, अत्यंत लोकप्रिय असलेल्या कोकणकन्या एक्सप्रेस आणि मांडवी एक्सप्रेसच्या डब्यांच्या संख्येत कायमस्वरूपी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता या दोन्ही गाड्यांमध्ये ३-टायर इकॉनॉमी श्रेणीचा एक जादा डबा जोडला जाणार असून, त्यामुळे या गाड्यांची एकूण क्षमता आता २२ ऐवजी २३ एलएचबी (LHB) डब्यांची होणार आहे.

​या बदलाची अंमलबजावणी मडगाव-मुंबई ‘कोकणकन्या एक्सप्रेस’ (२२११२) साठी २४ फेब्रुवारी २०२६ पासून, तर मुंबई-मडगाव ‘कोकणकन्या’ (२२१११) आणि ‘मांडवी एक्सप्रेस’ (१०१०४/१०१०३) च्या दोन्ही फेऱ्यांसाठी २५ फेब्रुवारी २०२६ पासून केली जाणार आहे. या निर्णयामुळे ३-टायर इकॉनॉमी श्रेणीतील डब्यांची संख्या आता २ वरून ३ झाली आहे. सुधारित रचनेनुसार या गाड्यांमध्ये १ कंपोझिट डबा (प्रथम श्रेणी + २-टायर वातानुकूलित), १ स्वतंत्र २-टायर वातानुकूलित डबा, ४ डबे ३-टायर वातानुकूलित, ३ डबे ३-टायर इकॉनॉमी, ७ शयनयान श्रेणीचे डबे आणि ४ सामान्य डबे असतील. याव्यतिरिक्त १ पँट्री कार, १ जनरेटर कार आणि १ एसएलआर डबा जोडलेला असेल.

​कोकणकन्या आणि मांडवीच्या क्षमतेत झालेली ही वाढ पाहता, आता दादर-सावंतवाडी ‘तुतारी एक्सप्रेस’चेही डबे २२ पर्यंत वाढवण्यात यावेत, अशी मागणी प्रवाशांकडून जोर धरत आहे. रेल्वेच्या या निर्णयामुळे प्रवाशांना अधिक जागा उपलब्ध होणार असून, आरक्षणासाठी होणारी ओढाताण कमी होण्यास मदत होईल.

Konkan Railway: प्रीमियम सेवेचा बोजवारा! मडगाव–मुंबई तेजस एक्सप्रेस तब्बल ११ तास उशिरा

   Follow us on        

Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांच्या अडचणी काही केल्या संपण्याचे नाव घेत नाहीत. रेल्वे प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाचा फटका आता कोकणातील प्रीमियम समजल्या जाणाऱ्या २२१२० मडगाव–CSMT तेजस एक्सप्रेसला बसला आहे. २१ फेब्रुवारी रोजी सुटलेली ही गाडी तब्बल १० तास ५७ मिनिटे (सुमारे ११ तास) उशिराने मुंबईत पोहोचली. विशेष म्हणजे, ही गाडी नियोजित CSMT टर्मिनसऐवजी दादर येथेच थांबवण्यात आल्याने प्रवाशांचे मोठे हाल झाले.

मिळालेल्या माहितीनुसार,दिनांक २१ फेब्रुवारी रोजी मडगाववरून सुटणारी ही हायस्पीड गाडी मूळ वेळेपेक्षा ६ तास ५५ मिनिटे उशिराने रवाना झाली होती. प्रवासादरम्यान हा उशीर वाढतच गेला आणि दादरला पोहोचेपर्यंत तो जवळपास ११ तासांवर गेला. प्रीमियम तिकीट दर मोजूनही प्रवाशांना रात्रभर स्थानकांवर आणि ट्रेनमध्ये ताटकळत राहावे लागल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

ठराविक गाड्यांवर अन्यायाचा संशय

प्रवाशांनी आरोप केला आहे की, कोकण रेल्वे मार्गावरील काही ठराविक गाड्या वारंवार उशिराने धावत आहेत.

११०९९ कुर्ला–मडगाव एक्सप्रेस ही गाडी नियमितपणे रात्री १२.४५ वाजण्याऐवजी पहाटे ५ ते ६ वाजता सुटत असल्याची तक्रार प्रवाशांनी केली आहे. दोन महिने आधी आरक्षण करूनही वेळेवर पोहोचण्याची खात्री उरलेली नसल्याने तळकोकणातील चाकरमान्यांचे मोठे नुकसान होत असल्याची भावना व्यक्त होत आहे.

लोकप्रतिनिधींच्या भूमिकेवर प्रश्न

कोकणातील प्रवाशांचे हाल होत असताना स्थानिक खासदार आणि आमदार गप्प का, असा सवाल संतप्त नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. “असा प्रकार इतर राज्यांत घडला असता, तर तेथील लोकप्रतिनिधींनी रेल्वे प्रशासनाला जाब विचारला असता,” असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.

रेल्वे प्रशासनावर टीका

वारंवार तक्रारी करूनही परिस्थितीत सुधारणा होत नसल्याने रेल्वे प्रशासनावर तीव्र टीका होत आहे. ‘प्रीमियम सेवा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तेजस एक्सप्रेसचीच अशी अवस्था असेल, तर इतर गाड्यांचे काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सोशल मीडियावरही रेल्वेचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडल्याची आणि प्रवाशांचा मानसिक छळ सुरू असल्याची टीका होत आहे.

काही प्रवाशांनी तर वंदे भारत एक्सप्रेसला प्राधान्य देण्यासाठी तेजस वारंवार उशिराने चालवली जाते का? असा संशयही व्यक्त केला आहे. मात्र, याबाबत रेल्वे प्रशासनाकडून अधिकृत भूमिका अद्याप स्पष्ट करण्यात आलेली नाही.

तुतारी एक्सप्रेसमध्ये चोरीचा प्रयत्न फसला; सतर्क टीसीमुळे दोन चोरटे जेरबंद

   Follow us on        

पनवेल: कोकण रेल्वेच्या सतर्क कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे ११०१४ तुतारी एक्सप्रेसमधील चोरीचा मोठा प्रयत्न हाणून पाडण्यात यश आले आहे. १६ फेब्रुवारी २०२६ रोजी पहाटे ४:३० च्या सुमारास, तुतारी एक्सप्रेस रोहा स्थानक ओलांडल्यानंतर ही घटना घडली. रत्नागिरीचे तिकीट परीक्षक (TTE) श्री. सचिन सावेकर हे डबा क्रमांक S2, S3 आणि S4 मध्ये तिकीट तपासणी करत असताना त्यांना दोन व्यक्तींच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. सावेकर यांनी प्रसंगावधान राखून आणि इतर प्रवाशांच्या मदतीने या संशयितांना तात्काळ ताब्यात घेतले.

तपासणी दरम्यान असे निष्पन्न झाले की, या आरोपींनी एका महिला प्रवाशाची हॅन्डबॅग चोरली होती. त्यांच्याकडून चोरीला गेलेले साहित्य हस्तगत करण्यात आले असून, यामध्ये एक मंगलसूत्र, दोन जोड कानातले, ४,७५० रुपये रोख आणि एक मोबाईल फोन यांचा समावेश आहे. दरम्यान, प्रवाशाने तक्रार केलेली एक अंगठी मात्र सापडू शकली नाही. यानंतर आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी पनवेल येथील रेल्वे सुरक्षा दलाच्या (RPF) स्वाधीन करण्यात आले आहे.

श्री. सचिन सावेकर यांनी दाखवलेली सतर्कता आणि कर्तव्यतत्परतेची दखल घेत कोकण रेल्वेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. संतोष कुमार झा यांनी त्यांचे कौतुक केले आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी दाखवलेल्या या विशेष कार्याबद्दल सावेकर यांना १०,००० रुपयांचे रोख बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. कोकण रेल्वेने यानिमित्ताने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध असल्याचे पुनरुच्चारले असून, प्रवाशांनी कोणत्याही संशयास्पद हालचालींची माहिती रेल्वे कर्मचारी किंवा आरपीएफला देण्याचे आवाहन केले आहे.

कोकण रेल्वेच्या विलंबाचा प्रवाशांना फटका; माजी खासदारांनी घेतली अधिकाऱ्यांची भेट

   Follow us on        

मुंबई:गेल्या पाच महिन्यांपासून ‘मत्स्यगंधा एक्सप्रेस’ आणि ‘मुंबई-मंगळुरू सुपरफास्ट एक्सप्रेस’ या गाड्यांच्या सातत्यपूर्ण विलंबामुळे लाखो प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. या पार्श्वभूमीवर, माजी खासदार गोपाळ शेट्टी आणि मीरा-भाईंदरचे भाजप नेते सच्चिदानंद शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने कोकण रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन प्रवाशांच्या समस्यां तातडीने सोडवण्याची मागणी केली.

​प्रवाशांच्या समस्या आणि मागण्या:

​मुंबई आणि किनारपट्टी कर्नाटकला जोडणाऱ्या या गाड्या प्रवाशांसाठी जीवनवाहिनी आहेत. मात्र, रेल्वेच्या अनियमित वेळामुळे ज्येष्ठ नागरिक, रुग्ण, विद्यार्थी आणि दैनंदिन प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी शिष्टमंडळाने कोकण रेल्वेचे संचालक (वाणिज्य आणि परिचालन) सुनील गुप्ता यांची भेट घेतली.

​रेल्वे प्रशासनाचे आश्वासन:

​बैठकीत सुनील गुप्ता यांनी स्पष्ट केले की, रत्नागिरी आणि मडगाव विभागात प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रात्रीच्या वेळी रुळांच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. मात्र, शिष्टमंडळाच्या विनंतीची दखल घेत त्यांनी पुढील एका आठवड्यात मत्स्यगंधा एक्सप्रेसची वेळ नियमित करण्याचा प्रयत्न केला जाईल आणि इतर गाड्यांच्या वक्तशीरपणात सुधारणा करण्यासाठी आवश्यक पावले उचलली जातील, असे आश्वासन दिले.

​सुरक्षेचा मुद्दा आणि चोरीच्या घटना:

​गाड्यांमधील वाढत्या चोऱ्या आणि प्रवाशांच्या सुरक्षेचा गंभीर विषयही यावेळी मांडण्यात आला. यावर रेल्वे सुरक्षा दलाच्या (RPF) वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून गुन्हेगारी रोखण्यासाठी कडक उपाययोजना केल्या जातील, असे आश्वासन रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आले.

​इतर महत्त्वाचे विषय:

​वांद्रे-वसई-मंगळुरू रेल्वे सेवा: बंद असलेली ही रेल्वे सेवा पुन्हा सुरू करण्याबाबतही चर्चा झाली. कोकण रेल्वेने यासाठी पूर्ण सहकार्य करण्याचे मान्य केले असून, पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी या संदर्भात पाठपुरावा करण्याची सूचना शिष्टमंडळाला दिली.

​शिष्टमंडळातील उपस्थित मान्यवर:

​या शिष्टमंडळात रेल्वे यात्री संघाचे (बोरीवली) अध्यक्ष वीरार शंकर शेट्टी, टीम युवा ब्रिगेडचे अध्यक्ष अरुण शेट्टी पणियूर, वाशी येथील उद्योजक संजीव शेट्टी अश्विथ, भास्कर शेट्टी ताळीपाडीगुत्तू, कांदेश भास्कर शेट्टी, प्रेमनाथ कोट्यान, जगदीश शेट्टी नंदीकूर, राजेश शेट्टी पूवणी गुत्तू, रजित सुवर्ण आणि इतर अनेक सामाजिक प्रतिनिधी उपस्थित होते.

​”रेल्वे प्रशासनाने दिलेली आश्वासने लवकरच प्रत्यक्षात येतील आणि प्रवाशांचा प्रवास पुन्हा सुरक्षित आणि वेळेवर होईल, अशी आम्हाला आशा आहे.”

— सच्चिदानंद शेट्टी (टीम युवा ब्रिगेड)

Konkan Railway: प्रवाशांसाठी खुशखबर! होळीसाठी विशेष गाडीला मुदतवाढ; वेळापत्रकातही बदल

   Follow us on        

Konkan Railway: होळी आणि शिमगोत्सवासाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांची गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने गाडी क्रमांक ०९०५७ / ०९०५८ सुरत – मंगळुरू जंक्शन – सुरत द्विसाप्ताहिक एक्सप्रेस स्पेशल गाडीच्या फेऱ्या मार्चअखेरपर्यंत वाढवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

कोकण रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मार्गावर धावणारी गाडी क्रमांक ०९०५७ / ०९०५८ सुरत – मंगळुरू जंक्शन – सुरत द्विसाप्ताहिक एक्सप्रेस स्पेशल गाडीच्या फेऱ्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, १ मार्च २०२६ पासून या गाडीच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे.

​गाडी क्र. ०९०५७ दिनांक २५/०२/२०२६ ते २९/०३/२०२६ पर्यंत आणि  ​गाडी क्र. ०९०५८ दिनांक २६/०२/२०२६ ते ३०/०३/२०२६ पर्यंत या गाडीचा विस्तार करण्यात येणार आहे. विस्तारित कालावधीत दोन्ही दिशांनी मिळून एकूण १८ फेऱ्या (९ येण्याच्या आणि ९ जाण्याच्या) चालवल्या जाणार आहेत.

गाडीची नवीन वेळ (१ मार्च २०२६ पासून प्रभावी)

​ही गाडी दिनांक १ मार्च २०२६ पासून सुधारित वेळापत्रकावर चालविण्यात येणार आहे.

गाडी क्र. ०९०५७ (सुरत – मंगळुरू जंक्शन): ही गाडी सुरत येथून दर बुधवारी आणि रविवारी रात्री १९:३५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी १९:४५ वाजता मंगळुरू जंक्शनला पोहोचेल.

​गाडी क्र. ०९०५८ (मंगळुरू जंक्शन – सुरत): ही गाडी मंगळुरू जंक्शन येथून दर गुरुवारी आणि सोमवारी रात्री २२:३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री २३:४५ वाजता सुरतला पोहोचेल.

​या प्रवासात गाडी खालील स्थानकांवर थांबेल:

​१. उधना जंक्शन | २. वलसाड | ३. वापी | ४. पालघर | ५. वसई रोड | ६. भिवंडी रोड | ७. पनवेल | ८. पेण | ९. रोहा | १०. माणगाव | ११. खेड | १२. चिपळूण | १३. सावर्डे | १४. संगमेश्वर रोड | १५. रत्नागिरी | १६. राजापूर रोड | १७. वैभववाडी रोड | १८. कणकवली | १९. सिंधुदुर्ग | २०. कुडाळ | २१. सावंतवाडी  | २२. थिवि | २३. करमळी | २४. मडगाव जंक्शन | २५. काणकोण | २६. कारवार | २७. अंकोला | २८. गोकर्ण रोड | २९. कुमटा | ३०. मुरुडेश्वर | ३१. भटकळ | ३२. मुकांबिका रोड बिंदूर | ३३. कुंदापुरा | ३४. उडुपी | ३५. मुल्की | ३६. सुरथकल.

Konkan Railway: मध्यरेल्वेकडून कोकणात जाण्यासाठी होळी विशेष गाड्यांची घोषणा

   Follow us on        

मुंबई: होळी आणि शिमगोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेता, मध्य रेल्वेने मुंबई आणि सावंतवाडी दरम्यान विशेष साप्ताहिक गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे सणासुदीला गावी जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

​रेल्वे प्रशासनाने जाहीर केलेल्या दोन विशेष गाड्यांचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे:

१. लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) – सावंतवाडी रोड साप्ताहिक स्पेशल

​गाडी क्र. ०१११९: ही गाडी २६ फेब्रुवारी आणि ५ मार्च २०२६ रोजी LTT वरून रात्री २२:१५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ०९:३० वाजता सावंतवाडीला पोहोचेल.

​गाडी क्र. ०११२०: ही गाडी २७ फेब्रुवारी आणि ६ मार्च २०२६ रोजीसावंतवाडीवरून सायंकाळी १७:२० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ०४:०५ वाजता LTT ला पोहोचेल.

​थांबे: ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ.

​डब्यांची रचना (Coach Composition):१ एसी फर्स्ट क्लास + ३ एसी २-टायर + ७ एसी ३-टायर + ८ स्लीपर क्लास. (एकूण १९ डबे)

​२. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) – सावंतवाडी रोड साप्ताहिक स्पेशल

​गाडी क्र. ०११७१: ही गाडी २६ फेब्रुवारी आणि ५ मार्च २०२६ रोजी CSMT वरून मध्यरात्री ००:२० वाजता सुटेल आणि दुपारी १२:३० वाजता सावंतवाडीला पोहोचेल.

​गाडी क्र. ०११७२: ही गाडी दिनांक २६ फेब्रुवारी आणि ५ मार्च २०२६ रोजी सावंतवाडीवरून सायंकाळी १७:२० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ०३:४५ वाजता CSMT ला पोहोचेल.

​थांबे: दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ.

​डब्यांची रचना (Coach Composition):१ एसी २-टायर + ६ एसी ३-टायर + ९ स्लीपर क्लास + ४ जनरल डबे + २ एसएलआरडी. (एकूण २२ डबे)

​प्रवाशांनी या विशेष गाड्यांचा लाभ घेण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. आरक्षणासंदर्भातील अधिक माहितीसाठी प्रवासी रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकतात.

कोकण मार्गावर धावणाऱ्या एक्सप्रेसच्या क्षमतेत वाढ; तब्बल ६ कोच वाढवले!

   Follow us on        

मुंबई: कोकण रेल्वे मार्गावर प्रवाशांचा ओघ प्रचंड असतो, मात्र अनेक गाड्या कमी डब्यांच्या (उदा. १६ किंवा १८ डबे) चालवल्या जात होत्या. यामुळे ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांना आरक्षण मिळणे अशक्य व्हायचे. मात्र कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या तिरुनेलवेली – लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT)  (२२६३० / २२६२९) एक्सप्रेसच्या प्रवाशांना कोकण रेल्वेने एक आनंदाची बातमी दिली आहे. या गाडीची क्षमता आता १६ डब्यांवरून २२ डब्यांपर्यंत वाढवण्यात आली असून, दक्षिण रेल्वेने यासंदर्भातील अधिकृत घोषणा केली आहे.

नवीन डब्यांची रचना (Coach Composition):

डब्याचा प्रकार पूर्वीची स्थिती (Existing)
आताची सुधारित स्थिती (Revised)
एसी २ टायर (2 Tier AC) ०१ डबा ०२ डबे
एसी ३ टायर (3 Tier AC) ०२ डबे ०६ डबे
एसी ३ टायर इकॉनॉमी (3E) ०१ डबा
०१ डबा (बदल नाही)
स्लीपर क्लास (Sleeper) ०६ डबे ०७ डबे
जनरल क्लास (General) ०४ डबे
०४ डबे (बदल नाही)
जनरेटर कार / एसएलआर ०२ डबे
०२ डबे (बदल नाही)
एकूण डबे (Total Coaches) १६ एलएचबी (LHB)
२२ एलएचबी (LHB)

 

बदल कधीपासून लागू होणार?

  • गाडी क्र. २२६३० (तिरुनेलवेली येथून): १५ एप्रिल २०२६ पासून.

  • गाडी क्र. २२६२९ (लोकमान्य टिळक टर्मिनस येथून): १६ एप्रिल २०२६ पासून.

या निर्णयामुळे तिरुनेलवेली – एलटीटी एक्सप्रेसच्या प्रवासी क्षमतेत मोठी वाढ होणार आहे. रेल्वेने केलेल्या बदलांनुसार, एसी ३ टायरच्या डब्यांमध्ये सर्वाधिक वाढ करण्यात आली असून, त्यांची संख्या आता २ वरून थेट ६ करण्यात आली आहे. तसेच, एसी २ टायरची संख्या १ वरून २ करण्यात आली असून, स्लीपर क्लासचा १ डबा वाढवून आता एकूण ७ स्लीपर डबे या गाडीला जोडले जातील. अशा प्रकारे या ट्रेनमध्ये एकूण ६ नवीन डबे कायमस्वरूपी वाढवण्यात आले आहेत. डब्यांच्या या लक्षणीय वाढीमुळे विशेषतः उन्हाळी सुट्ट्या आणि सणासुदीच्या काळात प्रवाशांची वेटिंग लिस्ट कमी होण्यास आणि प्रवासाचा अनुभव अधिक सुखकर होण्यास मोठी मदत होणार आहे.

कोकण विकास समितीचा पाठपुरावा:

कोकण विकास समितीचा पाठपुरावा: काही काळापूर्वी या गाडीचे टर्मिनल दादरवरून लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) येथे हलवण्यात आले होते. दादर स्थानकावरील प्लॅटफॉर्मच्या मर्यादेमुळे या गाडीला जास्त डबे जोडण्यात अडचणी येत होत्या. टर्मिनल बदलल्यामुळे हा तांत्रिक अडथळा दूर झाला होता. याच संधीचा फायदा घेत कोकण विकास समितीने ही गाडी २२ डब्यांची करावी, अशी आग्रही मागणी रेल्वे प्रशासनाकडे केली होती. समितीच्या या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे.

सावधान! ईथे फसवणूक होण्याची शक्यता; कोकण रेल्वे प्रशासनाचे दक्षतेचे आवाहन

   Follow us on        

नवी मुंबई: कोकण रेल्वेमध्ये नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून तरुणांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या टोळ्यांपासून सावध राहण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. काही अनधिकृत व्यक्ती आणि एजंट रेल्वेमध्ये नोकरी लावतो असे खोटे आश्वासन देऊन नोकरी इच्छुकांकडून पैसे उकळत असल्याचे समोर आले आहे.

 

या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेने स्पष्ट केले आहे की, त्यांनी कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेला नोकरी देण्यासाठी किंवा त्याबदल्यात पैसे गोळा करण्याचे अधिकार दिलेले नाहीत. रेल्वेतील सर्व भरती प्रक्रिया ही केवळ अधिकृत नियमांनुसार आणि पारदर्शक पद्धतीनेच राबवली जाते. कोणत्याही मध्यस्थाचा या प्रक्रियेशी संबंध नसून अशा दाव्यांना बळी पडू नये, असे प्रशासनाने आवाहन केले आहे.

 

नोकरी संदर्भातील सर्व अधिकृत माहिती आणि अपडेट्ससाठी केवळ konkanrailway.com या अधिकृत संकेतस्थळाचाच वापर करावा. अशा प्रकारच्या संशयास्पद हालचाली आढळल्यास त्याची तातडीने तक्रार करावी, असे आवाहन मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील बी. नारकर यांनी केले आहे.

पुणे-एर्नाकुलम एक्सप्रेसमध्ये सापडली बेवारस बॅग! रेल्वे प्रशासनाचे प्रवाशांना सतर्कतेचे आवाहन

   Follow us on        

रत्नागिरी: कोकण रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षिततेला नेहमीच प्राधान्य दिले असून, रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे पुन्हा एकदा एका प्रवाशाचे मौल्यवान सामान सुरक्षितपणे ताब्यात घेण्यात आले आहे.

दिनांक ०९.०२.२०२६ रोजी, गाडी क्रमांक २२१५० पुणे – एर्नाकुलम सुपरफास्ट एक्सप्रेसमध्ये नियमित तिकीट तपासणी सुरू असताना, B1 कोचमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांना एक बेवारस बॅग आढळून आली. बराच वेळ या बॅगवर कोणीही दावा न केल्याने, सुरक्षा नियमांचे पालन करून ही बॅग तातडीने ताब्यात घेण्यात आली.

​बॅगमध्ये असलेले साहित्य:

ही बॅग पुढील कार्यवाहीसाठी रेल्वे सुरक्षा दलाकडे (RPF) सोपवण्यात आली आहे. तपासणी दरम्यान बॅगेमध्ये खालील वस्तू आढळून आल्या आहेत:

​रोख रक्कम: एकूण ४,९३३ रुपये.

​कागदपत्रे: आधार कार्ड, एटीएम कार्ड, क्रेडिट कार्ड आणि इतर काही महत्त्वाची कागदपत्रे.

​इतर वस्तू: पॉकेट (Wallet), चाव्या, चार्जर, डेटा केबल आणि इअरफोन्स.

​प्रवाशांना आवाहन:

कोकण रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील बी. नारकर यांनी प्रवाशांना आवाहन केले आहे की, प्रवास करताना आपल्या सामानाची काळजी घ्यावी. तसेच, गाडीत किंवा स्थानक परिसरात कोणतीही संशयास्पद किंवा बेवारस वस्तू आढळल्यास त्वरित रेल्वे कर्मचाऱ्यांना कळवावे, जेणेकरून रेल्वे प्रवास सुरक्षित ठेवण्यास मदत होईल.

Konkan Railway: भाविकांचा प्रवास सुखाचा होणार! आंगणेवाडी जत्रेसाठी कोकण रेल्वे कडून अजून एका गाडीची घोषणा

   Follow us on        

मडगाव: आंगणेवाडी यात्रा २०२६ दरम्यान प्रवाशांची वाढलेली गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने प्रवाशांसाठी दिलासादायक निर्णय घेतला आहे. यात्रेकरू व चाकरमान्यांची गैरसोय टाळण्यासाठी मडगाव–लोकमान्य टिळक टर्मिनस–मडगाव दरम्यान विशेष साप्ताहिक रेल्वेगाडी चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

गाडी क्रमांक ०१००४ मडगाव–लोकमान्य टिळक (टी) विशेष

ही गाडी बुधवार, ११ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ४.३० वाजता मडगाव जंक्शन येथून सुटेल व दुसऱ्या दिवशी सकाळी ५.५० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) येथे पोहोचेल.

गाडी क्रमांक ०१००३ लोकमान्य टिळक (टी)–मडगाव विशेष

ही गाडी गुरुवार, १२ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ७.५५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटेल व त्याच दिवशी रात्री १०.०० वाजता मडगाव जंक्शन येथे पोहोचेल.

या विशेष गाडीला करमळी, थिवीम, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, विलवडे, आदवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पेन, पनवेल आणि ठाणे या स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.

डब्यांची रचना:

एकूण २२ डबे

– स्लीपर: २०

– एसएलआर: ०२

या विशेष गाडीमुळे आंगणेवाडी यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांसह कोकण-मुंबई मार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search