मुंबई, दि. १७ जुलै: मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण मुंबईतील पहिली भूमिगत मेट्रो आता लवकरच मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहे. २४ जुलै रोजी या मेट्रोचं लोकार्पण होणार आहे. भाजप नेते विनोद तावडे यांनी याबाबत ट्विट करुन माहिती दिली आहे.
Block "ganesh-makar-1" not found
मुंबईची पहिली भूमिगत मेट्रो लाईन अर्थात अक्वा लाईन जी कुलाबा-वांद्रे-सीप्झ अशी धावणार आहे. येत्या २४ जुलैपासून या मेट्रोला सुरुवात होत आहे. आरे कॉलनी ते कफ परेड या ३३.५ किमी अंतरावर ही मेट्रो धावणार आहे. यामध्ये एकूण २७ थांबे असणार आहेत. या मेट्रोमुळं उपनगरीय प्रवास तसंच प्रत्यक्ष रस्त्यावरुन धावण्याऐवजी भूमिगत धावणार असल्यानं रस्त्यावरील वाहतूक कोंडीपासून मुंबईकरांची सुटका होणार आहे.
दरम्यान, विनोद तावडे यांनी ट्विट करुन याची माहिती दिली. त्यांनी म्हटलं की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईकरांचं जीवन सुकर बनवण्याची गॅरंटी दिली होती. ही गॅरंटी आता पूर्ण होत आहे. मुंबईची पहिली भूमिगत मेट्रो (अॅक्वा लाईन) २४ जुलैपासून सुरु होत आहे. ही मेट्रो मुंबई शहराच्या वेगाला नवा वेग देईल.
मुंबई, दि. १४ जुलै:पश्चिम रेल्वेवरील प्रभादेवी आणि दादर रेल्वे स्थानकादरम्यान झाड पडल्याने पश्चिम रेल्वेची सेवा विस्कळीत झाली आहे. रविवारी सकाळच्या सुमारास झाड पडल्याने धिम्या मार्गावरील लोकल जवळपास तासभर खोळंबली होती. रविवारी सकाळी ७.२५ वाजण्याच्या सुमारास प्रभादेवी-दादर दरम्यान डाऊन दिशेकडील धीम्या मार्गावर झाड पडले.
रेल्वे रुळांवर झाड पडल्याने, बोरिवलीकडे जाणाऱ्या लोकल ठप्प झाल्या. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास रखडला. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पश्चिम रेल्वेचे अधिकारी, कर्मचारी दाखल होऊन झाड बाजूला करण्याचे काम हाती घेतले. जवळपास तासाभराच्या रखडपट्टी सकाळी ८.२० वाजता झाड बाजूला काढण्यात यश आले. त्यानंतर बोरिवलीच्या दिशेने धीम्या मार्गावरील लोकल सुरू झाल्या.
तर, सकाळच्या सुमारास बोरिवली रेल्वे स्थानकात तांत्रिक बिघाड झाल्याने लोकल सेवा ठप्प झाली होती. त्यानंतर दुरुस्तीची कामे करून सकाळी ९.०५ वाजता बिघाड दूर करून बोरिवली येथील ठप्प झालेल्या तीन मार्गिका सुरू केल्या. तसेच डाऊन धीम्या मार्गावरील लोकल सेवा लवकरच सुरू केली जाईल, असे पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
मुंबई : ब्रिटीश अधिकाऱ्यांच्या नावे मुंबई उपनगरातील अनेक स्थानकांना मिळाली होती. इतकी वर्षे ही नावे या रेल्वे स्थानकांची ओळख बनली होती. आता या स्थानकांच्या नावांना स्थानिक परिसरातील ओळखीनूसार नावे देण्याचा प्रस्ताव होता. या प्रस्तावा राज्य विधान सभेच्या पावसाळी अधिवेशनात अखेर मंजूरी देण्यात आली आहे. त्यामुळे या स्थानकांची जुनी ओळख पुसली जाणार आहे. आता यापुढे इंग्रजी नावे जाऊन नवीन मराठी नावे स्थानकांना मिळणार आहेत. त्यामुळे आता मरीन लाईन्स मुंबादेवी असे त्या परिसराला साजेसे असे नाव मिळणार आहे. तर करीरोडला काय नाव मिळणार आहे. ? ते पाहूयात….
मुंबईतील रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याचा ठराव आज विधानसभेत अखेर मंजूर करण्यात आला आहे. आता हा ठराव केंद्र सरकारला पाठवला जाणार आहे. त्यानंतर रितसर नावं बदलण्यात येणार आहेत. आता करी रोड – लालबाग रेल्वे स्थानक म्हटले जाणार आहे. तर पुढील बदल अनुक्रमे सँडहर्स्ट रोड – डोंगरी रेल्वे स्थानक, मरीन लाईन्स – मुंबादेवी, चर्नी रोड – गिरगाव, कॉटन ग्रीन – काळाचौकी, डॉकयार्ड रोड – माझगाव रेल्वे स्थानक, किंग सर्कल – तीर्थकर पार्श्वनाथ रेल्वे स्थानक अशी नावे देण्यात आली आहेत.
मुंबई सेंट्रस स्थानकाला मुंबईचे शिल्पकार समाजसेवक नाना शंकर शेठ असे नाव देण्यात यावे अशी मागणी नामदार जगन्नाथ ( शंकर ) शेठ प्रतिष्ठान गेली कित्येक वर्षे करीत आहे. परंतू या स्थानकाचे नाव बदलण्यात आले नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. नाना शंकर शेठ यांना आशियातील पहिली रेल्वे 16 एप्रिल 1853 साली मुंबईच्या बोरीबंदर ते ठाणे या मार्गावर धावली होती. या जीआपीआर रेल्वे कंपनीचे कार्यालयच नाना शंकर शेठ यांच्या घरात उघडण्यात आले होते. व्हीक्टोरीया टर्मिनस या स्थानकाला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असे नाव देण्याची मागणी 90 च्या दशकात कॉंग्रेसने केली होती.
मुंबई: मुंबईत पडणाऱ्या मुसळधार पावसाचा परिणाम उपनगरीय लोकल आणि एक्सप्रेस गाड्यांवर झाला आहे. रुळांवर पाणी साचल्याने मुंबई पुणे दरम्यान धावणाऱ्या ४ एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या आहे. आज सकाळी सीएसएमटी वरून कोकणात जाणाऱ्या मांडवी एक्सप्रेस, जनशताब्दी एक्सप्रेस तसेच वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकांवर झाला आहे.
सीएसएमटी वरून सुटणारी मांडवी एक्सप्रेस सुमारे ४ तास उशिराने सकाळी सोडण्यात आली आहे. तर जनशताब्दी एक्सप्रेस तसेच वंदे भारत एक्सप्रेस या गाड्या वेळेवर सुटल्या असल्या तरी सुमारे २ ते अडीच तास उशिराने धावत आहे.
मुंबई :मुंबई गोवा महामार्ग पूर्ण होण्याच्या न पाळलेल्या तारखा, लोकप्रतिनिधींकडून मिळणारी पोकळ आश्वासने आणि नेहमीप्रमाणे पाहिल्याच पावसात महामार्गाची होणारी दयनीय अवस्था यामुळे वैतागलेला कोकणकर जनआक्रोश समितीच्या माध्यमातून पुन्हा एकदा आंदोलनाच्या पावित्र्यात आहे.
रखडलेला महामार्ग पूर्ण होण्याचे नाव घेत नाही. कोकणातील बहुतेक लोकप्रतिनिधी सत्ताधारी पक्षात असूनही ही अवस्था आहे. केंद्रीय रस्ते वाहतुक आणि महामार्ग मंत्री महाराष्ट्रातील असूनही ही परिस्थिती आहे. राज्य सरकारने जनतेला नको असलेले महामार्ग बनवण्याच्या अट्टहास धरला आहे. त्यांना मुंबई गोवा महामार्गाच्या परिस्थितीबद्दल देणे घेणे नाही. या सर्वांना वैतागून पुन्हा एकदा जनआक्रोश समिती आक्रमक झाली आहे. शनिवार दिनांक २९ जून रोजी समितीची निर्धार सभा मुंबई येथे पार पडली. या सभेत मुंबई गोवा महामार्गाच्या कामाच्या पूर्ततेसाठी आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी काही निर्णय घेण्यात आले.
प्रशासनाला जागे करण्यासाठी मुंबई गोवा महामार्गावर माणगाव येथे २८ जुलै २०२४ रोजी जनआक्रोश समितीतर्फे होमहवन घालण्यात येणार आहे. तसेच दिनांक १५ ऑगस्ट २०२४ रोजी पासून बेमुदत आमरण उपोषण करण्याचा निर्णय या सभेत घेण्यात आला. कोकणातील लोकप्रतिनिधी महामार्ग संदर्भात आवाज उठवीत नसल्याने त्यांच्या घरासमोर निदर्शन करून त्यांना जागे करण्याचा निर्णय घेतला गेला आहे.
निवडणुकीवर बहिष्कार टाकणे
लोकसभेला ३७००० कोकणकरांनी नोटाला मतदान केले. विधानसभेला देखील कोकणातील उमेदवार यांच्या विरोधात NOTA मतदान करण्यात येईल असा सज्जड इशारा देण्यात आला.
मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ज्या अटल सेतुचे उद्घाटन करण्यात आले त्या रस्त्याला अवघ्या तीन महिन्यातच भेगा पडल्या आहेत. नवी मुंबईकडील एका भागात अर्धा किलोमीटरपर्यंत रस्ता एक फुट खाली खचला आहे. महायुती सरकारने भ्रष्टाचाराच्या सर्व सीमा ओलांडल्या आहेत, असा गंभीर आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींबरोबर अटल सेतुची पाहणी करून रस्त्याला भेगा पडल्याचे निदर्शनास आणून दिले. शिवडी न्हावा शेवा प्रकल्पावर राज्य सरकारने १८ हजार कोटी रुपये खर्च केला असून यासाठी बँकेकडून कर्ज काढले आहे. हा काही विकास नाही तर भ्रष्टाचार असून सरकार स्वतःची घरे भरत आहे आणि जनतेच्या जीवाशी खेळत आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव या प्रकल्पाला दिले आहे, त्यांच्या नावाने भ्रष्टाचार करणे हे दुर्भाग्यपूर्ण आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले, उद्घाटनाआधी त्यांनी या प्रकल्पाची व्यवस्थित पाहणी तरी करायला हवी होती. पण नरेंद्र मोदी हेच देशातील भ्रष्टाचाराचे सरदार आहे. सर्व भ्रष्टाचाऱ्यांना ईडी, सीबीआयचा धाक दाखवून भाजपात घेऊन मंत्री बनवतात, असा आरोप पटोले यांनी केला आहे.
भाजपाचे म्हणणे काय?
नाना पटोले यांच्या आरोपांना भाजपच्या वतीने देखील प्रत्युत्तर देण्यात आले असून हा रस्ता अटल सेतू नसून त्याला जोडणारा मार्ग असल्याचे भाजपने म्हटले आहे. तसेच पडलेल्या भेगा या तांत्रिक त्रूटीमुळे पडलेल्या नसल्याचेही भाजपने म्हटले आहे.
मुंबई :काल रविवार दिनांक १६ जून रोजी अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती कार्यकारिणीची बैठक श्री. शांताराम नाईक यांच्या अध्यक्षतेखाली दादर येथे सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत पार पडली. या बैठकीत समितीच्या कार्यकारिणीच्या पदांसाठी नेमणुका/फेरनेमणुका करण्यात आल्या. त्याचप्रमाणे समितीच्या पुढील कार्यक्रमाचा आराखडा ठरविण्यात आला. येत्या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेच्या विलीनीकरणाबाबत प्रयत्न करण्याबाबत चर्चाही यावेळी करण्यात आली. याव्यतिरिक्त पुढील ठराव एकमताने मंजूर करण्यात आले.
१. श्री. यशवंत जड्यार यांच्याऐवजी श्री. अक्षय महापदी यांची सचिव पदावर निवड करण्यात आली.
२. ॲड. योगिता सावंत यांची उपाध्यक्ष पदी सर्वसंमतीने निवड करण्यात आली.
३. श्री. अभिजित धुरत यांची विशेष मार्गदर्शक म्हणून निवड करण्यात आली.
४. नवनियुक्त सचिव अक्षय महापदी यांना संघटनेचा पत्रव्यवहार व कार्यालयीन कामकाज करण्यास अधिकार देण्यात आले.
५. तसेच या सभेस उपस्थित नवीन संघटनांना या समितीमध्ये प्रवेश देण्याबाबत संमती देण्यात आली.
६. श्री. प्रमोद वासुदेव सावंत यांची सल्लागार पदी सर्वसंमतीने निवड करण्यात आली.
७. तसेच खजिनदार कु. मिहीर मठकर यांचा राजीनामा नामंजूर करण्यात आला व त्याच पदावर त्यांना कामकाज करण्यास अधिकार देण्यात आले.
८. १४ जानेवारी, २०२४ जन्मशताब्दी कार्यक्रमाचा जमाखर्च ताळेबंद मंजूर करण्यात आले व उर्वरित रक्कम श्री. राजाराम कुंडेकर यांच्याकडे ठेवण्याबाबत निर्णय घेण्यात आला.
९. तसेच येत्या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेच्या विलीनीकरणाबाबत त्वरित पत्रव्यवहार करण्यात यावा.
१०. तसेच परब मराठा समाज यांनी आपले कार्यालय उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार मानत ही सभा संपन्न झाली.
या सभेला ॲड. योगिता सावंत, श्री. श्रीकांत विठ्ठल सावंत, श्री. शांताराम शंकर नाईक, श्री.सुनिल सीताराम उतेकर, श्री. दीपक चव्हाण,श्री. विशाल तळावडेकर, श्री. अक्षय मधुकर महापदी, श्री. राजू सुदाम कांबळे, श्री. तानाजी बा. परब, श्री. रमेश सावंत, श्री. राजाराम बा. कुंडेकर, श्री. सुरेंद्र हरिश्चंद्र नेमळेकर, श्री. अभिषेक अनंत शिंदे, श्री. प्रमोद वासुदेव सावंत, श्री. आशिष अशोक सावंत, श्री. मनोज परशुराम सावंत, श्री. सुधीर लवू वेंगुर्लेकर, श्री. सागर कृष्णा तळवडेकर, श्री. संजय धर्माजी सावंत, श्री. अभिजित धुरत हे प्रतिनिधी उपस्थित होते.
Konkan Railway News: मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथील १०-११ फलाटांच्या विस्तारीकरणाच्या पायाभूत कामासाठी तर ठाणे येथील फलाटांचे रुंदीकरण करण्यासाठी मध्यरेल्वेने तीन दिवसांचा जम्बोब्लॉक घेतला आहे. या ब्लॉक दरम्यान उपनगरीय लोकल आणि एक्सप्रेस गाड्यांच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहे.
या ब्लॉक चा परिणाम कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या गाड्यांवर झाला आहे.
रद्द करण्यात आलेल्या गाड्या
मध्य रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार उद्या शनिवार दिनांक ०१ जून रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक २२११९ तेजस एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे.
आरंभ स्थानकात बदल करण्यात आलेल्या गाड्या (Short Origination)
पनवेल येथून सोडण्यात येणाऱ्या गाड्या
उद्या दिनांक ०१ जून रोजी प्रवास सुरु करणाऱ्या १०१०३ सीएसएमटी – मडगाव मांडवी एक्सप्रेस, १२१३३ सीएसएमट-मंगलोर एक्सप्रेस, २०१११ सीएसएमटी- मडगाव कोकणकन्या एक्सप्रेस या गाड्यांचा प्रवास पनवेल स्थानकावरून सुरु होणार आहे.
दादर येथून सोडण्यात येणाऱ्या गाड्या
उद्या दिनांक ०१ जून रोजी प्रवास सुरु करणाऱ्या १२०५१ सीएसएमटी – मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस आणि २२२२० सीएसएमटी – मडगाव वंदेभारत एक्सप्रेस या दोन्ही गाड्यांचा प्रवास दादर स्थानकावरून सुरु होणार आहे.
Block on Western Railway: मुंबई उपनगरीय रेल्वे प्रशासनाने एका पाठोपाठ एक मोठे ब्लॉक घेण्याचा सपाट लावला आहे. मध्य रेल्वे मार्गावरील ३ दिवसांचा ब्लॉक संपण्याच्या आधीच आता पश्चिम रेल्वेने रविवार दिनांक 2 जून 2024 रोजी नियोजित देखभालीसाठी ब्लॉक घेण्यात असल्याचे जाहीर केले आहे.
रविवार, 2 जून, 2024 रोजी ट्रॅक, सिग्नल आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीसाठी पश्चिम उपनगरीय रेल्वे मार्गावर 5 तासांचा मोठा ब्लॉक असेल. याचा परिणाम चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यानच्या अप आणि डाउन जलद Fast मार्गांवर होईल. जलद मार्गावरील सर्व जलद गाड्या ब्लॉक दरम्यान स्लो मार्गांवर वळवण्यात येणार आहेत. तसेच काही उपनगरीय गाड्या रद्द केल्या जातील. रद्द केलेल्या गाड्यांची यादी सर्व स्टेशन मास्टर ऑफिसमध्ये उपलब्ध करण्यात आली आहे. प्रवाशांनी त्या प्रमाणे नियोजन करावे असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
मुंबई : मुंबई उपनगरीय रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. आज रात्री पासून ठाणे येथील फलाटांचे रुंदीकरण करण्यासाठी ६३ तासांचा ब्लॉक घेण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. गुरुवारी रात्रीपासून ते रविवारी दुपारपर्यंत हा ब्लाॅक असेल. तर मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथील १०-११ फलाटांच्या विस्तारीकरणाच्या पायाभूत कामासाठी ब्लाॅकची मालिका सुरू आहे. त्याचाच भाग म्हणुन आता अंतिम कामे करण्यासाठी सीएसएमटीकडे ३६ तासांचा ब्लाॅक घेण्यात येईल. या कालावधीत मध्य रेल्वेवरील ९३० लोकल फेऱ्या रद्द होणार आहेत तर, ८९० लोकल फेऱ्या अंशत: रद्द होतील. तसेच ७४ रेल्वेगाड्या रद्द होणार असून १२२ रेल्वेगाड्या अंशत:रद्द होणार आहेत. परिणामी, मध्य रेल्वेवरील प्रवाशांचे हाल होणार आहे.
सीएसएमटी फलाट क्रमांक १०-११ वर सध्या १६ डब्यांच्या रेल्वेगाड्या थांबत असून या फलाटावर २४ डब्यांच्या रेल्वेगाड्या थांबविण्यासाठी फलाटाचा विस्तार केला जात आहे. मध्य रेल्वेकडून हे काम पूर्ण करण्यासाठी शुक्रवार, शनिवार आणि रविवारी मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून सीएसएमटी येथील फलाटाच्या विस्तारीकरणाच्या कामामुळे मुंबईबाहेर जाणाऱ्या आणि मुंबईत येणाऱ्या बहुतांशी मेल/एक्स्प्रेस रद्द, तर अंशत: रद्द करण्यात आल्या असून त्याचा फटका लोकल गाड्यांनाही बसणार आहे. ब्लाॅक काळात मध्य रेल्वेवरील एकूण ९३० लोकल फेऱ्या रद्द होतील. शनिवारच्या दिवशी सुट्टीकालीन वेळापत्रक चालविण्यात येईल. त्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल होणार आहेत. ठाणे येथील फलाटाच्या रुंदीकरणासाठी गुरुवारी रात्रीपासून ते रविवारी मध्य रेल्वेकडून मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे लोकल गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे. त्यामुळे लोकल प्रवाशांची तारांबळ उडणार आहे
ब्लॉक १ – ठाणे येथे ६३ तासांचा विशेष ब्लॉक
ब्लॉक कालावधी – गुरुवारी मध्यरात्रीच्या १२.३० ते रविवार दुपारपर्यंत
ब्लॉक २ – सीएसएमटी येथे ३६ तासांचा विशेष ब्लॉक
ब्लॉकची कालावधी – शुक्रवार मध्यरात्रीच्या १२.३० ते रविवार दुपारी १२.३० पर्यंत
ब्लाॅक कालावधीत सीएसएमटी ते वडाळा रोड दरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्ग, सीएसएमटी आणि भायखळा दरम्यान अप आणि डाऊन जलद, धीमा मार्गावर लोकल सेवा उपलब्ध नसेल.
शुक्रवारी मध्य रेल्वेवरील १६१ लोकल फेऱ्या रद्द, शनिवारी ५३४ लोकल फेऱ्या रद्द आणि ६१३ लोकल अंशत: रद्द, रविवारी २३५ लोकल फेऱ्या आणि २७० लोकल अंशत: रद्द असतील. त्याप्रमाणे शुक्रवारी ४ रेल्वेगाड्या रद्द आणि ११ रेल्वेगाड्या अंशत: रद्द असतील. शनिवारी ३७ रेल्वेगाड्या रद्द आणि ३१ रेल्वेगाड्या अंशत: रद्द, रविवारी ३१ रेल्वेगाड्या रद्द आणि ८० रेल्वेगाड्या अंशत: रद्द असतील.
पश्चिम रेल्वेवरील रविवारचा ब्लाॅक न घेण्याचे कळविले आहे. त्यानुसार ते त्यांचा निर्णय घेतील. राज्याचे प्रधान सचिव यांना देखील ब्लाॅक संदर्भात माहिती दिली असून त्यांच्याद्वारे योग्य पावले उचलली जाणार आहेत. तसेच पोलीस यंत्रणा, वाहतूक पोलीस विभागाला सीएसएमटी, भायखळा या परिसरात जादा पोलीस बंदोबस्त तैनात करण्याची विनंती केली आहे. बेस्ट उपक्रम, एसटी महामंडळ यांना देखील जादा बस सोडण्याबाबत कळवले आहे. बेस्ट उपक्रमाला सीएसएमटी, भायखळा, वडाळा भागात नियमित बस चालविण्यासह जादा २५ ते ३० बस चालवण्यात येण्याचे कळविले आहे. तसेच एसटी महामंडळाला पुणे, नाशिक, ठाणे, पनवेल येथे जादा बस सोडण्याचे कळविले आहे, असे मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक रजनीश कुमार गोयल यांनी सांगितले.
Ad -
मराठी मुलांमुलींना युरोप, पोर्तुगाल,माल्टा,इटली आणि पोलंडयेथे नोकरीच्या संधी....