Category Archives: महाराष्ट्र

दादर रत्नागिरी पॅसेंजर गाडी पूर्ववत होण्याची आशा पल्लवित

   Follow us on        

मुंबई: कोकणवासीयांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असलेल्या दादर-रत्नागिरी रेल्वे गाडीबाबत सकारात्मक हालचाली सुरू झाल्या आहेत. कोव्हिड काळात बंद झालेली आणि सध्या दिवा स्थानकावरून सुटणारी ही गाडी पुन्हा एकदा दादरहून चालवण्यात यावी, या मागणीसाठी खासदार रवींद्र वायकर यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान रेल्वेमंत्र्यांनी या मागणीवर सकारात्मकता दर्शवली असून, यासंदर्भात तांत्रिक बाबींची (Operational Feasibility) तपासणी करून योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे.

​गेल्या अनेक दिवसांपासून मध्य आणि पश्चिम उपनगरातील चाकरमानी या गाडीसाठी पाठपुरावा करत आहेत. सध्या ही गाडी दिवा टर्मिनल येथून सुटत असल्याने मुंबईतील प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. प्रवाशांच्या या भावना लक्षात घेऊन खासदार रवींद्र वायकर यांनी रेल्वेमंत्र्यांना सविस्तर पत्र दिले होते. तसेच प्रत्यक्ष भेटीत त्यांनी ही गाडी केवळ दादरहूनच नाही, तर दादर, अंधेरी, बोरिवली आणि वसई मार्गे कोकणात नेण्याबाबतही सविस्तर चर्चा केली. पश्चिम उपनगरातील प्रवाशांना थेट कोकणात जाण्यासाठी हा मार्ग अत्यंत सोयीचा ठरणार असल्याचे त्यांनी यावेळी अधोरेखित केले.

​या संदर्भात रेल्वेमंत्र्यांनी वायकर यांना पत्राद्वारे कळवले आहे की, रेल्वे प्रशासन या प्रस्तावाची गांभीर्याने दखल घेत आहे. गाड्यांचे वेळापत्रक आणि रेल्वे मार्गावरील उपलब्ध जागा यांची तांत्रिक तपासणी केल्यानंतर ही मागणी पूर्ण करण्याच्या दृष्टीने पावले उचलली जातील. “कोकणवासीयांची ही मागणी रास्त असून, केंद्रीय रेल्वे मंत्री आणि रेल्वे प्रशासनाकडे आम्ही याचा सातत्याने पाठपुरावा करू आणि ही गाडी लवकरात लवकर पूर्ववत सुरू करण्यासाठी प्रयत्नशील राहू,” असा विश्वास खासदार रवींद्र वायकर यांनी व्यक्त केला आहे. या सकारात्मक प्रतिसादामुळे आता पुन्हा एकदा दादरहून रत्नागिरीसाठी गाडी धावण्याची आशा पल्लवित झाली आहे.

Shaktipeeth Expressway: सुधारित आराखडा तयार; पण भूसंपादन मोबदल्याचे गणित काय?

   Follow us on        

छत्रपती संभाजीनगर: राज्यातील प्रमुख धार्मिक स्थळांना जोडणाऱ्या बहुचर्चित शक्तिपीठ द्रुतगती महामार्गाच्या आखणीत महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले असून, आता हा मार्ग ८५५ किलोमीटर लांबीचा होणार आहे. पूर्वी हा प्रकल्प १२ जिल्ह्यांसाठी प्रस्तावित होता, मात्र सुधारित आराखड्यानुसार आता हा महामार्ग राज्यातील १३ जिल्ह्यांतील ४० तालुके आणि सुमारे ४०० गावांमधून जाणार आहे. या महामार्गामुळे नागपूर ते गोवा हे १८ तासांचे अंतर केवळ ८ तासांवर येणे अपेक्षित आहे.

​या प्रकल्पामध्ये वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सातारा, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश आहे. विशेषतः मराठवाड्यातील सहा जिल्ह्यांतून हा मार्ग सुमारे २७० कि.मी. धावणार आहे. यवतमाळ, कोल्हापूर आणि सोलापूर या तीन जिल्ह्यांमध्ये या महामार्गाची लांबी प्रत्येकी १०० किलोमीटरपेक्षा जास्त असेल.

​दरम्यान, प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या भूसंपादनाच्या मोबदल्याचा निर्णय अद्याप गुलदस्त्यातच आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ‘समृद्धी महामार्गा’च्या धर्तीवरच जमीन मालकांना मोबदला देण्याचा विचार शासन स्तरावर सुरू आहे. मात्र, अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी या महामार्गासाठी जमीन देण्यास विरोध दर्शविला आहे. जुन्या आखणीनुसार काही गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण झाली असली, तरी नव्या बदलांमुळे आणि मोबदल्याच्या अनिश्चिततेमुळे पेच कायम आहे.

कोकणसाठी सुरू झालेल्या दोन्ही रो-रो सेवा बंद; नियोजनातील त्रुटींमुळे अपयश

   Follow us on        

कोकणासाठी मोठ्या अपेक्षांनी सुरू करण्यात आलेल्या दोन महत्त्वाच्या Ro-Ro (Roll-on/Roll-off) सेवांना अल्पावधीतच ब्रेक लागला आहे. मुंबई–विजयदुर्ग फेरी बोट सेवा तसेच कोकण रेल्वे मार्गावरील कार Ro-Ro सेवा या दोन्ही प्रकल्पांना अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने त्या बंद करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, या सेवा सुरू होऊन एक महिनाही पूर्ण झाला नव्हता.

या सेवांमागचा उद्देश प्रवास सुलभ करणे, वेळ आणि इंधनाची बचत करणे असा होता. मात्र प्रत्यक्षात प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. सर्वात मोठी अडचण म्हणजे भाडे जास्त असणे. मध्यमवर्गीय प्रवाशांसाठी हे दर परवडणारे नसल्याची तक्रार सातत्याने करण्यात आली. याशिवाय प्रतीक्षा कालावधी (लोडिंग टाइम) मोठा असल्याने वेळ वाचवण्याऐवजी उलट वेळ वाया जात असल्याची भावना प्रवाशांमध्ये निर्माण झाली.

तसेच निवडलेली बंदरे आणि स्थानके गैरसोयीची असल्याचा मुद्दाही पुढे आला. शहराच्या मुख्य भागांपासून दूर असलेल्या ठिकाणी सेवा सुरू केल्याने प्रवाशांना अतिरिक्त प्रवास करावा लागत होता. परिणामी, या सेवांचा वापर करण्याऐवजी पारंपरिक रेल्वे किंवा रस्ते मार्ग अधिक सोयीस्कर वाटू लागले.

तज्ज्ञांच्या मते, या प्रकल्पांचे नियोजन करताना मुख्यतः उच्चभ्रू किंवा आर्थिकदृष्ट्या सक्षम प्रवाशांचा विचार करण्यात आला. मात्र मुंबईसारख्या शहरातील मोठा मध्यमवर्गीय वर्ग हा या सेवांचा प्रमुख वापरकर्ता असू शकतो, याकडे दुर्लक्ष झाले. सेवा किचकट आणि महाग असल्याने सर्वसामान्य प्रवासी दूर राहिले.

या पार्श्वभूमीवर, भविष्यात अशा प्रकल्पांचे नियोजन करताना मध्यमवर्गीयांच्या गरजा, परवडणारे दर, सोयीची स्थानके आणि कमी प्रतीक्षा वेळ यांचा विचार करणे अत्यावश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे. अन्यथा, चांगल्या उद्देशाने सुरू केलेले प्रकल्पही अशाच प्रकारे अल्पावधीत बंद पडण्याचा धोका कायम राहणार आहे.

धक्कादायक! सिग्नल यंत्रणेत बिघाड करून सह्याद्री एक्सप्रेसवर दरोडा

   Follow us on        

कराड: कराड तालुक्यातील शेणोली स्टेशनजवळ शनिवारी सकाळी सह्याद्री एक्सप्रेस (कोल्हापूर-पुणे) गाडीवर चोरट्यांनी मोठा दरोडा टाकला. चोरट्यांनी रेल्वेच्या सिग्नल यंत्रणेशी छेडछाड करून गाडी अचानक थांबवली आणि प्रवाशांवर धाड घातली. त्यांनी प्रवाशांच्या मोबाइल फोन, सोन्याचे दागिने आणि इतर मौल्यवान वस्तू लुटल्या.

ही घटना पहाटेच्या सुमारास घडल्याने प्रवासी घाबरले होते.रेल्वे प्रशासन आणि स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी सिग्नल बिघडवून गाडी थांबवल्याची ही पहिलीच घटना नाही, मात्र एक्सप्रेस गाडीवर अशा पद्धतीने दरोडा टाकणे ही दुर्मीळ आणि अतिशय धोकादायक घटना आहे. चोरांनी गाडी थांबताच काही मिनिटांतच लूट केली आणि अंधाराचा फायदा घेत पळ काढला.

प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरांची संख्या चार ते पाच होती.मिरज रेल्वे पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, प्रवाशांच्या जबानी आणि अन्य पुराव्यांच्या आधारे आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. रेल्वे सुरक्षा यंत्रणेच्या कमकुवतपणामुळे ही घटना घडल्याची चर्चा रेल्वे वर्तुळात सुरू झाली आहे.

प्रवाशांनी अशा घटनांपासून सावध राहावे, मौल्यवान वस्तू जवळ ठेवू नयेत आणि संशयास्पद व्यक्ती दिसल्यास तत्काळ रेल्वे कर्मचाऱ्यांना किंवा पोलिसांना कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या घटनेमुळे कोल्हापूर-पुणे मार्गावरील रेल्वे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

“सह्याद्री एक्सप्रेस पुन्हा सुरू करा, अन्यथा….” प्रवासी संघाचा रेल्वेला इशारा

   Follow us on        

कोल्हापूर: कोल्हापूर आणि मुंबईला जोडणारी अत्यंत महत्त्वाची आणि जुनी रेल्वे सेवा ‘सह्याद्री एक्सप्रेस’ तातडीने पूर्ववत करावी, या मागणीसाठी कोल्हापूर जिल्हा रहिवासी सामाजिक प्रवासी संघाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. यासंदर्भात संघातर्फे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना निवेदन पाठवण्यात आले असून, मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन, रेल्वे रोको किंवा आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे. १९९० पासून सुरू असलेली ही रेल्वे सेवा कोविड-१९ महामारीच्या काळात बंद करण्यात आली होती. सध्या ही रेल्वे केवळ कोल्हापूर ते पुणे या मर्यादित स्वरूपात धावत असल्याने मुंबईला जाणाऱ्या हजारो प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.

​प्रवासी संघाने निवेदनात म्हटले आहे की, कोल्हापूर जिल्ह्यातून दररोज सुमारे २० ते २५ हजार प्रवासी खासगी बस किंवा कारने मुंबईकडे प्रवास करतात. रेल्वे सेवा उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांना महागड्या खासगी वाहतुकीचा आधार घ्यावा लागत असून, यामुळे त्यांच्यावर आर्थिक भार पडत आहे. तसेच इंधनाचा वापर वाढल्याने पर्यावरणावरही विपरीत परिणाम होत आहेत. रेल्वे प्रशासनाकडून ‘छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस’ (CSMT) येथे प्लॅटफॉर्म उपलब्ध नसल्याचे कारण दिले जात असले, तरी प्रत्यक्षात तिथे नवीन प्लॅटफॉर्मची सुविधा निर्माण झाली आहे. एकीकडे कोल्हापूर ते पनवेल विमान सेवा सुरू करण्यात आली असताना, सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी रेल्वे सेवा मात्र अद्याप बंदच ठेवण्यात आली आहे, याबद्दल प्रवाशांमध्ये मोठी नाराजी आहे.

​या मागणीचे गांभीर्य लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने सह्याद्री एक्सप्रेस कोल्हापूर ते मुंबई (किंवा पर्यायी स्वरूपात पनवेलपर्यंत) तात्काळ सुरू करावी, अशी विनंती अध्यक्ष ॲड. चंद्रकांत निकम यांनी केली आहे. या पत्राच्या प्रती मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष, कोल्हापूरचे खासदार आणि मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांनाही पाठवण्यात आल्या आहेत. हजारो कामगार, विद्यार्थी आणि व्यापाऱ्यांच्या हितासाठी ही रेल्वे सेवा पुन्हा सुरू होणे अत्यंत गरजेचे असल्याचे प्रवासी संघाने स्पष्ट केले आहे.

राज्यातील रेल्वे प्रश्नांसाठी मुंबईत रंगणार ‘महाराष्ट्र रेल्वे परिषद’

   Follow us on        

मुंबई:कोकणातील रेल्वेचे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्न मार्गी लावण्यासाठी आणि रेल्वे प्रशासनाच्या आडमुठ्या धोरणांविरुद्ध आवाज उठवण्यासाठी आगामी रविवार, २६ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता मुंबईत भव्य ‘महाराष्ट्र रेल्वे परिषद’ आयोजित करण्यात येणार आहे. ‘अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती, महाराष्ट्र’ यांच्या कार्यकारिणी सभेत या परिषदेची संकल्पना मांडण्यात आली असून, आता प्रत्यक्ष कार्यवाहीला सुरुवात झाली आहे.

​२८ ते ३० गाड्यांचा प्रश्न ऐरणीवर

​या परिषदेचा मुख्य हेतू दादर-रत्नागिरी पॅसेंजर आणि सह्याद्री एक्सप्रेस यांसारख्या महाराष्ट्रातील बंद केलेल्या किंवा शहरांतील मुख्य स्थानकाबाहेर (उदा. पनवेल, पुणे किंवा दिवा) फेकलेल्या २८ ते ३० महत्त्वाच्या गाड्यांबाबत जनजागृती करणे हा आहे. रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे चाकरमान्यांचे प्रचंड हाल होत असून, या अन्यायाविरुद्ध प्रशासनाला इशारा देण्यासाठी राज्यातील सर्व प्रवासी संघटनांना एका छत्रछायेखाली आणून पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे.

​दीर्घकाळ रखडलेले प्रकल्प आणि सुविधा

​केवळ गाड्याच नव्हे, तर कोकण रेल्वे मार्गावरील दीर्घकाळ रखडलेले प्रकल्प, सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचे अपूर्ण काम आणि स्थानकांवरील पायाभूत सुविधांचा अभाव यावरही या परिषदेत सविस्तर चर्चा होणार आहे. कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडीचे उपाध्यक्ष सागर तळवडेकर यांनी या परिषदेचे नियोजन केले असून, कोकणवासीयांनी या लढ्यात आता एकजुटीने सहभागी होणे काळाची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

​सामान्यांचा लढा, सामान्यांसाठी!

​या उपक्रमाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे हे कोणतेही राजकीय आंदोलन नसून, तुमच्या-आमच्यासारख्या सामान्य कष्टकरी आणि कोकणी चाकरमान्यांनी पुकारलेला हा हक्काचा लढा आहे. या परिषदेला कोणतेही मोठे राजकीय किंवा आर्थिक पाठबळ नाही. त्यामुळे ही परिषद यशस्वी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ आणि आर्थिक नियोजनाची गरज आहे.

​”ही परिषद यशस्वी करण्यासाठी स्वतः आयोजक म्हणून पुढे यावे. तसेच ज्यांना या सामाजिक कार्यात प्रत्यक्ष सहभाग घ्यायचा आहे किंवा आर्थिक मदत करायची आहे, त्यांनी त्वरित संपर्क साधावा,” असे आवाहन समितीचे सचिव अक्षय महापदी यांनी आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

​कोकणच्या रेल्वे विकासासाठी आणि हक्काच्या प्रवासासाठी होणारी ही परिषद कोकण रेल्वेच्या इतिहासातील एक निर्णायक वळण ठरण्याची शक्यता आहे.

शक्तीपीठ महामार्गाच्या फेररेखांकनामुळे कोकणची जैवविविधता धोक्यात

   Follow us on        

सिंधुदुर्ग: शक्तीपीठ महामार्गाचे नवीन फेररेखांकन आता केगड-कुंभवडेतून तळकट, झोळंबेमार्गे डेगवे-बांदा अशा अतिसंवेदनशील आणि जैवविविधतेने नटलेल्या भागातून करण्याचे निश्चित झाले आहे. या प्रस्तावित मार्गामुळे कोकणातील अमूल्य वनसंपदा आणि दुर्मिळ वन्यजीवांचे अस्तित्व धोक्यात आल्याचे मत सामाजिक कार्यकर्ते डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी व्यक्त केले आहे. महामार्गाच्या या नवीन आराखड्यामुळे निसर्गाचे कधीही भरून न येणारे नुकसान होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली असून प्रशासनाच्या या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

​डॉ. परुळेकर यांनी माहिती दिली की, ज्या भागातून हा महामार्ग जाणार आहे, तिथे असंख्य मोठ्या वृक्षांची बेसुमार तोड केली जाण्याची चिन्हे दिसत आहेत. हा भाग नैसर्गिकदृष्ट्या अत्यंत समृद्ध असून महामार्गाच्या कामामुळे इथल्या पर्यावरणाचा समतोल ढासळणार आहे. विकासाच्या नावाखाली निसर्गाचा हा ऱ्हास स्थानिक पर्यावरण आणि जनजीवनासाठी घातक ठरू शकतो, असा इशारा त्यांनी दिला असून या वृक्षतोडीमुळे निर्माण होणाऱ्या परिणामांकडे लक्ष वेधले आहे.

​या परिसरातील वन्यजीवांच्या अस्तित्वाचा दाखला देताना त्यांनी सांगितले की, नुकतेच सरमळे आणि तळकट यांसारख्या गावांमध्ये अत्यंत दुर्मिळ अशा ‘किंग कोब्रा’ (नागराज) या सापाचे दर्शन घडले आहे. ज्या भागात नागराज, पट्टेरी वाघ, बिबट्या, हत्ती आणि गवे यांसारख्या वन्यजीवांचा मुक्त वावर आहे, तिथे महामार्ग बांधणे पर्यावरणासाठी विनाशकारी ठरेल. वन्यजीवांचे अधिवास नष्ट झाल्यामुळे भविष्यात मानव-प्राणी संघर्षाच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली आहे.

​सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडताना डॉ. परुळेकर म्हणाले की, किंग कोब्राचे वारंवार दर्शन घडणे हा निसर्गाचा एक मोठा संकेत आहे. मात्र, अघोरी विद्या आणि भोंदू बाबांच्या नादी लागणाऱ्या सत्ताधाऱ्यांना निसर्गाचे आणि ईश्वराचे हे संकेत कळणार आहेत का, असा बोचरा सवाल त्यांनी केला आहे. महामार्गाच्या निमित्ताने होणारी वृक्षतोड आणि वन्यजीवांच्या अधिवासावर होणारे हे आक्रमण स्थानिक जनतेच्या संतापाचे कारण ठरत असून, निसर्गप्रेमींकडून या मार्गाला विरोध दर्शवला जात आहे.

 

Photo Credit – AI

सर्व आशा मावळल्यात! दादर रत्नागिरी पाठोपाठ अजून एक राज्यांतर्गत गाडी मुंबईकरांनी कायमची गमावली

   Follow us on        

मुंबई: पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांची आणि मुंबईकर चाकरमान्यांची हक्काची असलेली ‘सह्याद्री एक्सप्रेस’ पुन्हा तिच्या मूळ स्वरूपात (कोल्हापूर ते मुंबई) धावेल, ही आशा आता पूर्णपणे मावळली आहे. रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या नव्या निर्णयानुसार, ही गाडी आता कायमस्वरूपी ‘कोल्हापूर-खडकी एक्सप्रेस’ (गाडी क्र. ११४१९/२०) म्हणून चालवली जाणार आहे. कोरोना महामारीच्या काळात खबरदारीचा उपाय म्हणून बंद करण्यात आलेली ही सेवा, त्यानंतर ‘स्पेशल’ म्हणून काही काळ सुरू राहिली. मात्र, आता ती नियमित करताना तिचा मार्ग खडकीपर्यंतच मर्यादित करण्यात आला आहे. यामुळे दादर-रत्नागिरी पॅसेंजरपाठोपाठ मुंबईला जोडणारी अजून एक महत्त्वाची गाडी मुंबईकरांनी कायमची गमावली असल्याची भावना प्रवाशांमध्ये निर्माण झाली आहे.

​या निर्णयामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा आणि कराड या भागातून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांना मोठा फटका बसला आहे. सध्या महालक्ष्मी एक्सप्रेसवर प्रवाशांचा प्रचंड ताण असून, एलएचबी (LHB) कोचमुळे डब्यांची संख्या कमी झाल्याने तिथे कायम वेटिंग लिस्ट असते. अशा परिस्थितीत सह्याद्री एक्सप्रेस मुंबईपर्यंत सुरू होणे गरजेचे होते. मात्र, रेल्वेने ‘झिरो टाइम टेबल’च्या नावाखाली या गाडीचा मुंबईपर्यंतचा प्रवास कापून तो खडकीपर्यंतच ठेवला आहे. जरी ही गाडी आता नियमित झाल्याने प्रवाशांना वाढीव तिकीट दरातून दिलासा मिळाला असला, तरी प्रवासाचे मुख्य उद्दिष्ट असलेल्या मुंबईपर्यंत पोहोचण्यासाठी आता प्रवाशांना पुण्यातून इतर पर्यायांचा शोध घ्यावा लागणार आहे.

​या अन्यायाविरुद्ध रेल्वे प्रवासी संघटना आणि सल्लागार समितीचे सदस्य आक्रमक झाले आहेत. मध्य रेल्वे विभागीय सल्लागार समितीचे सदस्य किशोर भोरवत यांनी ही गाडी किमान पनवेल, दादर किंवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत विस्तारित करण्याची मागणी लावून धरली आहे. विशेषतः नवी मुंबईचा विस्तार आणि तिथे वाढलेली रोजगाराची संधी पाहता, ही गाडी पनवेलमार्गे सोडल्यास हजारो प्रवाशांना त्याचा लाभ होऊ शकतो. मात्र, प्रवाशांच्या या रास्त मागणीकडे रेल्वे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत असून, मुंबईची कनेक्टिव्हिटी कमी होत असल्याने प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

राज्यांतर्गत वर्षभरात फक्त एकच नवी गाडी; राज्याबाहेर जाणाऱ्या गाड्यांची खैरात

   Follow us on        

मुंबई: गेल्या वर्षभरात भारतीय रेल्वेने महाराष्ट्रातील प्रवाशांच्या पदरात निराशाच टाकली आहे. राज्यातील अंतर्गत प्रवासासाठी वर्षभरात केवळ एकच नवीन रेल्वे सुरू करण्यात आली असून, याउलट राज्याबाहेर जाणाऱ्या सहा गाड्यांना प्राधान्य देण्यात आले आहे. रेल्वे प्रशासनाच्या या भूमिकेमुळे स्थानिक प्रवाशांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजीचा सूर उमटत आहे.

​राज्यांतर्गत केवळ एकच गाडी

​मागील आर्थिक वर्षात महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरांना जोडणारी फक्त एकच नवीन गाडी धावली:

  • ​पुणे – अजनी वंदे भारत एक्सप्रेस

​राज्याबाहेर जाणाऱ्या सहा नवीन गाड्या

​रेल्वेने राज्याबाहेर जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांना हिरवा कंदील दाखवला आहे. यात खालील गाड्यांचा समावेश आहे:

​एलटीटी – सहरसा: अमृत भारत एक्सप्रेस

  • ​पनवेल – अलीपूरद्वार: अमृत भारत एक्सप्रेस
  • ​हडपसर – जोधपूर: एक्सप्रेस
  • ​हडपसर – रेवा: एक्सप्रेस
  • ​हडपसर – मुझफ्फरपूर: एक्सप्रेस
  • ​साईनगर शिर्डी – तिरुपती: एक्सप्रेस

​मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर यांसारख्या प्रमुख शहरांमधील प्रवाशांची संख्या सातत्याने वाढत आहे. असे असतानाही नवीन गाड्या सुरू करण्याऐवजी, पूर्वी सुरू असलेल्या काही गाड्या बंद केल्या गेल्याचा आरोप प्रवाशांकडून होत आहे.

​राज्यांतर्गत रेल्वे गाड्यांची संख्या वाढल्यास रस्त्यावरील वाहनांचा ताण कमी होऊ शकतो. यामुळे वाहतूक कोंडी सुटेल आणि अपघातांचे प्रमाणही घटण्यास मदत होईल. त्यामुळे अंतर्गत रेल्वे सेवा वाढवणे ही काळाची गरज आहे.

— अक्षय महापदी, रेल्वे अभ्यासक

​रेल्वे प्रशासनाचे स्पष्टीकरण

​मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्निल नीला यांनी सांगितले की, “गेल्या आर्थिक वर्षात सुरू करण्यात आलेल्या अनेक रेल्वे गाड्यांना महाराष्ट्रातील महत्त्वाच्या स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत, ज्याचा फायदा स्थानिक प्रवाशांना होत आहे. तसेच भाविकांच्या सुविधेसाठी देवदर्शनाच्या ठिकाणांना जोडणाऱ्या गाड्यांवरही भर दिला जात आहे.”

​थोडक्यात राज्याबाहेरील प्रवाशांना दिलासा मिळाला असला तरी, महाराष्ट्रातील अंतर्गत रेल्वे प्रवाशांच्या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष होत असल्याची टीका रेल्वे प्रवासी संघटनांकडून केली जात आहे.

ठाण्यातील पाहिल्या ‘प्लॅनेटेरियम’चे ५ एप्रिलला उद्घाटन

   Follow us on        

ठाणे: ठाणे जिल्ह्यातील पहिले प्लॅनेटेरियम ५ एप्रिल रोजी सुरू होणार आहे. शाहापूर येथील साकदभाव परिसरात उभारण्यात आलेले हे ‘स्पेस अ‍ॅस्ट्रोटेनमेंट अँड प्लॅनेटेरियम ऑब्झर्व्हेटरी (SAPO)’ नावाचे प्रकल्प खाजगी स्वरूपात उभारण्यात आले आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन खगोलशास्त्रज्ञ डॉ. के. सोमन आणि आमदार दौलत दरोडा यांच्या हस्ते सायंकाळी ५ वाजता होणार आहे.

निलेश ठाकूर आणि त्यांचे बंधू गिरीश ठाकूर यांनी हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकारला असून, लोकांमध्ये खगोलशास्त्राविषयी आवड निर्माण करणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. सुमारे ३.५ एकर उंच ठिकाणी उभारण्यात आलेल्या या केंद्रामध्ये आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

या प्रकल्पात अत्याधुनिक प्लॅनेटेरियमसह चार मोठ्या दुर्बिणी असलेले वेधशाळा केंद्र उभारण्यात आले आहे. येथे ५६ आसनांची व्यवस्था असून मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये अर्धा ते एक तासांचे खगोलशास्त्रीय शो दाखवले जाणार आहेत.

या केंद्रामध्ये पर्यटकांना शनीचे वलय, गुरू ग्रहाचे पट्टे व त्याचे उपग्रह, तसेच आकाशगंगेचे सुंदर दृश्य स्पष्टपणे पाहण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे मुंबई महानगर प्रदेशातील (MMR) सर्वोत्तम स्टारगेझिंग अनुभव देणारे हे ठिकाण ठरणार आहे.

याशिवाय येथे प्रदर्शन हॉल, सेल्फी पॉइंट्स, मार्गदर्शनासाठी स्वयंसेवक आणि खाद्यपदार्थांसाठी कॅन्टीनचीही सुविधा उपलब्ध आहे. खगोलशास्त्रप्रेमींसाठी हे ठिकाण मोठे आकर्षण ठरणार असून, भेट देण्यापूर्वी पूर्वनोंदणी करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search