अस्सल माशेखांव

या लेखाचे शीर्षक वाचून घोगळ्यांनी वेंगुर्ला विषयक लेख लिह‍िण्यापासून फारकत घेतली की काय असे तुम्हाला वाटू शकते; पण थोडसं नीट विचार केला तर तुमच्या लक्षात येईल अस्सल माशेखांव ही वेंगुर्लेकरांची प्रमुख ओळख आहे. वेंगुर्ल्यात मच्छी न खाणारे सुध्दा आहेत. त्यातील बरेचजण धार्मिक परंपरेमुळे मच्छी खात नाहीत, मात्र मासळी आणि भात हे वेंगुर्लेकरांचे प्रमुख अन्न आहे. आता महागाईमुळे सुध्दा या ओळखीत काडीमात्र बदल झालेला नाही. त्यामुळे आजचा हा लेख सुध्दा माझ्या वेंगुर्ल्यावरच आहे.
 
हा लेख लिहायला घेण्यामागचं कारण पण तसच आहे, माझे बहुतांशी लेख हे एखाद्या घटनेमुळे मला सुचतात, मग ती घटना कितीही छोटी असू दे. असो, तर त्याचं काय झालं अलिकडेच वेंगुर्ल्यात म्हणजेच 6 मे पासून जनता कर्फ्यू लागू करण्याची घोषणा झाली आणि 5 मे रोजी आमच्या बंधूराजांचा मला फोन आला. “बाजारात मरणाची गर्दी झाली हां रे, लोक अक्षरश: तुटान पडलेत”. मागचा लॉकडाऊनचा अनुभव पाठिशी असल्याने वेंगुर्ल्यातील नागर‍िकांनी जनता कर्फ्युच्या काळात कमतरता भासू नये म्हणून भाजीपाला, धान्य, कडधान्य भरुन ठेवण्यासाठी वेंगुर्ल्याच्या मंडईत तुफान गर्दी केली होती. “अरे मग तू भरुन ठेयलय की नाय सामान”. अस्मादिकांच्या या प्रश्नावर बंधूराज उत्तरले, “नाय.. आसा आधीचाच थोडाफार धान्य, पुरात आठदहा दिवस, त्या गर्दीत शिरात कोण?” “अरे मग तू बाजारात काय गर्दी बघूक गेललस काय?” “नाय रे वायच जरा गोलमो हाडलय, आता दहा पंधरा दिवस माशे खांवक गावाचे नाय, म्हणान सोय करुन ठेवलंय”. मला अपेक्षित होते ते उत्तर मिळालेच.
 
वेंगुर्ल्यात असताना आमच्या लहाणपणी माशे हे अमुचे प्रमुख खाद्य होते, आता पन्नाशीकडे आलोय, नवी मुंबईत स्थाय‍िक झालोय तरी प्रमुख खाद्यात काहीच बदल झालेला नाही, ही बात अलहिदा. आता मिळते तशी तेव्हा वेंगुर्ल्यात मच्छी काही महाग नसायची आणि दोंपारच्या जेवणात भाताबरोबर कढीसाठी अगदी सुरमई, पापलेट हवे असं काही नव्हते; किंबहुना सुरमई-पापलेट हे माशे लहाणपणी हाताच्या बोटावर मोजण्याइतपत वेळा मी खाल्लेत. चार-आठाण्याचे खापी, पेडवे नाहीतर इंगा पाच्छाळी आणली की बस झाले. त्याकाळी ओल्या नाराळाची कापं (खोबऱ्याचे तुकडे) बाजारात पाच दहा पैशाला मिळायचीत, म्हणजे नारळ घ्यायला पैसे नसतील तर ती काप आणायची, लाल मिरशांगो, वायच धणे, हळद टाकून फातरीवर (पाटा वरवंटा) वाटण वाटलं की मस्तपैकी माश्याची कढी तयार. म्हणजे तात्पर्य काय तर माशे खाणं ही त्याकाळी आम्हा वेंगुर्लेवासीयांची चैन नव्हती तर स्वस्तात उदरभरणाची सोय होती. आजच्या सारखा त्यावेळी काही मच्छीचा तयार मसाला हा प्रकार नव्हता. मिक्सरवर वाटण वाटायचा प्रकारही नव्हता, फातरीवर वाटण वाटल्यामुळे माश्याची कढी चवदार व्हायची. सहसा कढी पुरतेच माशे आणले जायचे, खाणारी तोंडही जास्तच असायची. त्यामुळे माशे तव्यावरुन ताटात येणं हा प्रकार (तुमचं काय शेलो फ्राय की काय ते) कमीच असायचा, जास्तीत जास्त महिन्यातून एक-दोनदा.
 
 
 
मी वेंगुर्ला, सिंधुदुर्गच्या हद्दीबाहेर जेव्हा प्रथम बाहेर पडलो तेव्हा माझ्या एक गोष्ट लक्षात आली की, आपल्याकडे खाणावळीत/हॉटेलात केवळ तीन प्रकारची जेवणाची ताटं मिळायचीत. शाकाहारी आणि मांसाहारीमध्ये मच्छी व चिकनचे ताट. हॉटेलात जेवायला जायचे म्हणजे वेगवेगळ्या पदार्थांच्या डिश मागवायचा हा प्रकार काही आपल्याकडे तेव्हा नव्हता. आता तेही खुळ आपल्या मातीत रुजलंय. नाष्टा करायचा म्हणजे सुध्दा काही व्हरायटी नव्हती, ऊसळ पाव, वडे, कांदा भजी, बटाटा भजी, पुरीभाजी, चहा हे मोजकेच पदार्थ. तेसुध्दा त्यांच्या वेळा ठरलेल्या. सकाळी ऊसळ, कांदा भजी तर संध्याकाळी बटाटा भजी त्यामुळे हॉटेलात गेल्यावर तुम्ही ज्या वेळात गेलात त्यावेळी जे काही दोन-तीन पदार्थाचे प्रकार असतील तेच तुमच्या पुढ्यात येतील. बरं, थोडसं विषयांतर होत आहे, तर आपला विषय काय होता मच्छी. हां तर आपल्याकडे खाणावळीत जी तीन ताटं जेवणासाठी उपलब्ध असायचीत त्याचा दर चढत्या क्रमाने असा – सर्वात स्वस्त शाकाहारी, नंतर मच्छीचे जेवण आणि सगळ्यात महाग चिकन ताट. मी वेंगुर्ला, सिंधुदुर्ग हद्दीच्या बाहेर गेल्यावर माझ्या असे लक्षात आले की, इतर ठिकाणी आपल्यासाखेच शाकाहारी ताट स्वस्त होते, मात्र मच्छीचे ताट चिकन थाळीपेक्षा महाग होते. अर्थात आता काळ बदललाय, आता कोकणात सुध्दा मच्छीचे ताट चिकन ताटापेक्षा महाग मिळू लागलेय; अर्थात हे दर मच्छीच्या प्रकारावर अवलंबून आहेत.
 
लहाणपणी हातावर चार-आठाणे टेकवून मला दुपारच्या वेळात मच्छी आणायला काहीवेळा पाठवायचेत. त्यामुळे लहाणपणी थोडाफार माशे खरेदी करण्याचा अनुभव माझ्याकडे होता. चार-आठाण्याचा दर एक-दोन रुपयापर्यंत जाईपर्यंत मला वेंगुर्ल्यात मच्छी खरेदी केल्याचे आठवते. घरापासून काही लांब नव्हते मच्छी मार्केट. चालत पाच मिनिटे लागायचीत. वेंगुर्ले नगरपर‍िषद कार्यालयाच्या बाजूला भाजी मार्केट ओलांडल्यावर तृप्ती हॉटेलच्या बाजून एक चिंचोळी गल्ली होती. कधी-कधी या गल्लीच्या तोंडापासून मच्छी विक्रेत्या बसलेल्या असायच्या. या गल्लीतच एक प्लॅस्टिक वा तत्सम पिशव्या विकायला विक्रेता बसलेला (बसलेला कुठे.. बसायला जागाच नव्हती, उभाच असायचा बिचारा) असायचा. त्यामुळे तुम्ही बाजारात येताना पिशवी आणायला विसरला असाल तर आत शिरतानाच पिशवीची सोय करुन जायचं. तेथील मासेविक्रेती तुम्हाला पैशाच्या मोबदल्यात फक्त माशे देणार. ते सुटी करुन देणे, पिशवी देणे असले लाड नाही चालायचेत. माशे ‘सुटी’ करणे म्हणजे काय हे तुम्ही कोकणातले असल्याने तुम्हाला लगेच कळले असेलच. जे कोकणातले नाहीत त्यांच्यासाठी सांगतो, मासे ‘सुटी’ करणे म्हणजे मासे साफ करणे, त्याचे डोके, शेपटी, पंख, खवले वेगळी करणे, मासे सुटी करणे ही सुध्दा एक मोठी कला आहे.
 
आत मासळी बाजारात ग्राहकांची व विक्रेत्यांची तुंबळ गर्दी असायची. या गर्दीतही आपल्याला हवे आहेत तसे मासे खरेदी करण्याच्या तपश्चर्येत अस्सल माशेखांव वेंगुर्लेवास‍िय भंग होऊ द्यायचा नाही. सर्वात स्वस्त मच्छीचे अनेक प्रकार होते. खापी हा त्यातला एक प्रकार. खापी जरा मोठ्या असतील तर ठीक, पण छोट्या असतील तर खाताना त्याचा काटा बऱ्याचदा गळ्यात अडकायचा. मग सुक्या भाताची मूद खाल्ल्यावर त्या घासाबरोबर तो काटा गिळला जायचा आणि पुन्हा माशे खाण्यावर आपले लक्ष केंद्रित व्हायचे.
 
पेडवे, तारले, राणे, धोडकारे, इंगा-पाच्छाळी हे अजून काही स्वस्त आणि मस्त मिळणाऱ्या माश्यांचे प्रकार. त्यातील तारले आणि त्याचाच छोटा प्रकार! पण चवीत वैविध्य आणणारे ईरडा हा माश्याचा प्रकार माझ्या अत्यंत आवडीचा. अलिकडे कित्येक वर्षे हा मासा खाता नाही आला. इथे मुंबईत आमच्या मासेवाल्यांकडे अलिकडे विक्रीसाठी नसतो आणि मी जेंव्हा वेंगुर्ल्याला जातो तेंव्हा या माश्याचा सिझन नसतो. तिरफळा टाकून इरडाची चटणी करायची, चटणी म्हणजे तुमच्या नेहमीच्या चटण्या नव्हेत बरं का, कमी वाटण टाकून अगदी भाजी सारखी घट्ट ईरडाची चटणी करायची. चपाती बरोबर काट्यासकट एका घासात दहाबारा ईरडा खायच्या. काय अप्रतिम लागते म्हणून सांगू. तसेच तारले हा प्रकार, तारल्याची चटणी, आमटी दोन्हीही अप्रतिम. तारले असले की त्यातील काही तारले तव्यावर जायचे. खूप कमी तेल लागते, किंबहुना तव्यावर भाजताना हा मासा तेल सोडतो. शिवाय घरात मस्त वास दरवळत असल्याने माश्याला तेल आणि आमच्या तोंडाला पाणी सुटायचे.
 
वरीलप्रकारचे माशे हे गर‍िबांच्या घरी असायचेत. अर्थात आपल्याकडे पैशाने गरीब असलेल्यांची संख्या तशी जास्तच होती म्हणा; त्यामुळे यांची विक्री जास्त व्हायची. त्यांनतर बांगडा हा मासा मध्यमवर्गीयांसाठी, थोडासा महाग. कधी-कधी जाळ्यात जास्त बांगडे मिळाले की तो गर‍िबांच्या घरीही जायचा. मी एकदा एक रुपयाला चौदा बांगडे आणलेले आठवतेय, अर्थात माझ्या लहाणपणी हां. नायतर म्हणशात घोगळ्यांनू काय फेकताय. हळदीचे पान, तिरफळे टाकून बांगड्या तिखला, कढी केली की त्या दिवशी भाताचे चार घास जास्तच जायचेत. बाजारात स्वस्त बांगडे मिळाले की आमच्या घरी भरलेले बांगडे व्हायचेत. भरलेले बांगडे करायला गृह‍िणींना आपले सगळे कौशल्य लावायला लागायचे. विशेषत: बांगडा सुटी करतानाच त्यातील संपूर्ण काटा काढून टाकणे हे काय सर्वांनाच जमायचे असे नाही. माझी आई अगदी सहज बांगड्यातून काटा वेगळा करायची. बळे, टोळ हेही काही अजून माशेखांव लोकांचे आवडीचे प्रकार. बुगडी हा मासा मात्र विकत घेणे कमीपणाचे मानले जायचे. वेंगुर्ल्यात खूप कमी किंमतीत हा मासा मिळायचा. फारच चव‍िष्ट आणि आठाण्या-बाराण्यात भला मोठा मासा विकत मिळायचा. मुंबईत याला फुफा मासा असे नाव आहे, इथे तो जरा चढ्या दरातच विकला जातो. मी बरेच वेळा मुंबईत मासेविक्रेत्यांना सुरमई म्हणून ग्राहकांना विकताना पाहिले आहे.
 
कधी चार पैसे जास्त कनवटीला असले तर सुंगटाचा वाटाही पिशवीत यायचा. सुंगटाला कोळंबी असेही म्हणतात, हे मुंबईत आल्यावर मला कळले. सुंगटा हा प्रकार नेहमीच्या मच्छीच्या वाटणात तसेच भाजलेल्या वाटपात असे दोन्ही प्रकारे बनविले तरी तेवढेच चव‍िष्ट लागतो. यात काटा हा प्रकार नसल्याने लहान मुलांमध्ये लोकप्रिय. सुंगटा फ्राय करायला घेतल्यावर संपूर्ण घरात असा वास पसरतो, की पोटातले कावळे अध‍िक जोरात ओरडायला लागतात. तिसऱ्या, खुबे, म्हाकला, लेपे, कुर्ले, मोरी हे अजून काही माश्याचे प्रकार आहेत जे भाजलेल्या वाटपात केले जातात. कुर्ल्या खाताना त्याच्या तंगड्या तोडताना जरा मेहनत घ्यावी लागते; पण आमचे दातांना कुर्ल्यांच्या डेंग्याची सवय झालेली असल्याने आम्ही लिलया फस्त करायचो. मोरी मासा हा मटणाचाच प्रकार, मोरीची आमटी, कढी न म्हणता मोरीचे मटण असेच म्हटले जाते. वेंगुर्ल्यात हा मासा खूप महाग मिळतो, मुंबईला मात्र त्यामानाने स्वस्त आहे मोरी मासा.
 
ईस्वन, सरंगो, पापलेट हे मासे श्रीमंतासाठी असाच माझा समज होता. खूप कमी वेळा जाळ्यात जास्त मिळाल्याने वेंगुर्ले मासळी मार्केटमध्ये स्वस्त मिळाले असतील. नाहीतर त्याचा दर आम्हाला न परवडणाराच असायचा. ईस्वनाला सुरमई तर सरंग्याला हलवा म्हणतात, असे मला मुंबईत आल्यावर कळाले. हे मासे खायला चविष्ट तसेच सोपे त्यामुळे खूपच लोकप्रिय आहेत; पण न परवडणारे. आता लोकांची कमाईच एवढी झाली आहे की परवडत नाही असा काही प्रकारच नाही राह‍िलाय. या माश्यांमुळे मुंबईत स्थायिक असलेले; परंतु मुळेचे ज्या भागातून आलेत ज्या भागात समुद्रातील मच्छी मिळत नाही, त्यांना माश्याची गोडी लागली आणि मासे हा प्रकार अजूनच महाग होत चाललाय. आम्हाला मच्छीखांव म्हणून हसणारे हॉटेलात गेल्यावर सुरमई थाळी, बांगडा थाळीची ऑर्डर देताना आढळतात.
 
असो, माश्याची भरलेली पिशवी घेऊन घरी मार्गक्रमण करत असताना, रस्त्यात “काय ईला?” असा प्रश्न विचारणारे किमान तीन- चार तरी महाभाग भेटणारच. हातात माश्यांनी भरलेली पिशवी असताना सुध्दा “काय नाय” असं तोंड वाकडंतिकड करुन मिळणारे उत्तर हे ठरलेले; पण त्याचे उत्तर काही असले तरी विचारणारा, लगबगीने बाजारात धाव घेतो. माश्याची पिशवी हातात घेऊन घरी पोहचल्यावर प्रथम स्वागत करते ती मन‍िमाऊ आणि त‍िची पिल्ले. कुठून तरी तिचा नवरोबा बोकाही वास काढत घरात दाखल होतो; मग पायात घुटमळणाऱ्या मांजरांपासून पिशवी सांभाळत पार पाटल्यावाटेक (घराची मागची बाजू) जाऊन पिशवी आईच्या ताब्यात द्यायची.
 
मच्छी सुटी करण्यासाठी “आदाळो” बाहेरच्या पडवीत वेगळा ठेवलेला असायचा. त्या आदाळयावर बसून आई सटासटा माशे सुटी करायची. माश्याची खवले साफ करणे, त्याचे पंख, शेपटी वेगळे करणे, डोके वेगळे केल्यावर ते मांजरांपुढे टाकले जायचे. इथ आमचे लहान मुलांचे सैन्य हातात काठी उभी घेऊन आदाळ्यापासून मांजरांना लांब ठेवण्यासाठी उभे असायचे. आईने टाकलेले माश्याचे डोके जमिनीवर पडायच्या आत मांजरे डाईव्ह मारुन झेलायचीत. त्यांच्या या झेलापुढे जाँटी ऱ्होडस, रविंद्र जाडेचाचे झेल पाणी कमच. बरं आमचे एवढे सैन्य हातात काठी घेऊन तैनात असताना देखील एखादे मांजर एखादा मासा लंपास करायचेच. ओरडा मात्र त्या मांजराऐवजी आम्हालाच पडायचा. टॉमी मात्र या मेजवाणी पासून वंचित रहायचा. जेवताना सुध्दा माश्याचे काटे खायला मनी आणि त‍िची फॅमिलीच उपस्थित असायची. तरीही आई टॉमीसाठी वेगळा मासा काढून ठेवायची आणि त्या इमानदाराला बाहेर नेऊन वाढायची.
 
असे आम्ही माशेखांव, लिह‍िण्यासारखे अजून बरेच आहे, पण लिह‍ितांना पोटात भूक चाळवली. मन लावून वाचल्याबद्दल धन्यवाद! ओ भाऊ.. ओ ताई.. पिशवी घेऊन कुठे निघालात, लॉकडाऊन चालू आहे, मासळीबाजार बंद आहे. नाय ओशाळण्याची कायच गरज नाय, आपण आहोतच माशेखांव, तोपर्यंत डब्यात तो गोलमो भरुन ठेवलो हां, सुके बांगडे ठेयलेत ते काढा बाहेर.
 
 
– श्री. संजय गोविंद घोगळे (8655178247)

 

Photos credit :

http://www.geethasrasoi.com
https://www.whatshot.in
https://ratnagiritourism.in
http://www.malvancity.com
Facebook Comments Box






मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search