शिवसेना गटनेता पदी अजय चौधरी यांची नियुक्ती अवैध असून एकनाथ शिंदे हेच शिवसेना विधिमंडळ गटनेते पदी कायम राहतील अशा निर्णयाचे पत्र काल रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्र विधान मंडळाने पाठवला आहे. त्याच प्रमाणे शिवसेनेचे मुख्य प्रतोद म्हणुन नियुक्ती करण्यात आलेले सुनील प्रभूंची नियुक्ती पण रद्द करून भरत गोगावले यांना त्याजागी कायम करण्यात आले आहे. आमदारांच्या संख्याबळाच्या आधाराने हा निर्णय घेण्यात आला आहे.
शिंदे गटातील आमदारांनी बंड केल्यानंतर शिवसेनेने एकनाथ शिंदे यांची गटनेते पदावरून हकालपट्टी केली होती. ह्या निर्णयाविरुद्ध एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातील आमदारांनी आक्षेप घेतला होता आणि तसे पत्र विधिमंडळाला २२ जून रोजी पाठवले होते.
एकीकडे नेमकी खरी शिवसेना कोणती हा वाद चालू असताना हा एक शिवसेनेसाठी मोठा धक्का आहे. आता एकनाथ शिंदे गटाचे व्हीप आदित्य ठाकरेसह शिवसेनेच्या १६ आमदारांना मानावे लागेल. तसे न केल्यास त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याचा अधिकार एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाला असेल.
या निर्णयाबद्दल बोलताना शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ह्या निर्णयाविरुद्ध आपण न्यायालयात आव्हान देणार आहोत असे ते म्हणाले.