मुंबई : गणेशोत्सवासाठी गावी जाणार्या भक्तांना राज्यसरकारने एक खुशखबर दिली आहे. गणेशोत्सव दरम्यान कोकणात जाणाऱ्या भक्तांना सरकारद्वारे टोल माफी देण्यात आली आहे. दिनांक २७ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर या कालावधीत मुंबई बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग, मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग यावरील व इतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यांवरील टोल नाक्यावर कोकणात जाणाऱ्या गणेशोत्सव भाविकांच्या वाहनांना टोलमाफीत सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे.
ह्या सुविधेचा लाभ घेण्यासाठी गणेशोत्सव २०२२, कोकण दर्शन अशा आशयाचे स्टीकर्स स्वरुपाचे पथकर माफी पास, त्यावर वाहन क्रमांक, चालकाचे नाव असा मजकूर लिहून ते स्टीकर्स आवश्यक त्या संख्येनुसार परिवहन विभाग, वाहतूक पोलीस, पोलीस, संबंधीत प्रादेशिक परिवहन विभाग यांनी समन्वय साधून पोलीस ठाणे, वाहतूक पोलीस चौक्या व आर.टी.ओ. कार्यालयांमध्ये उपलब्ध करुन घ्यावे लागतील. हाच पास परतीच्या प्रवासाकरीता देखील ग्राह्य धरण्यात येईल. .
पोलीस व परिवहन विभागाने गणेशोत्सवाच्या काळात पास सुविधा आणि त्यांच्या उपलब्धतेबाबतची माहिती नागरिकांना देण्याच्या देखील सूचना आहेत.