अलिबाग: अलिबाग तालुक्यात एक सामुदायिक फसवणुकीचा प्रकार घडला आहे. अलिबागमधील चार हजारांहून अधिक नागरिकांना २५ कोटींचा गंडा घालण्यात आला आहे. नॅसडॅक या अमेरिकन शेअर मार्केटमधील नावाजलेल्या कंपनीचा वापर करून हा हायटेक गंडा घालण्यात आला. सुरुवातीला ५०० रुपयांच्या बदल्यात १,२०० रुपये घेतल्यानंतर लोकांचा विश्वास बसला आणि त्यांनी जास्त गुंतवणूक केली. चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे पाहून या कंपनीने १४ दिवसांत १ लाखांवर २ लाख ४० हजार परतीची योजना काढली. अनेकांनी दागिणे गहाण ठेवून पैसे गुंतवले आणि काही दिवसातच कंपनीने वेब पोर्टल बंद झाले.
फसवणूक झालेल्या गुंतवणुकदारांनी अलिबाग पोलिस ठाण्यात येत सामुहीक तक्रार दाखल केली; मात्र, पोलिसांसमोर या हायटेक फसवणुकीचा गुंता सोडविण्याचे मोठे आव्हान आहे. फसवणूक करण्यासाठी वापरण्यात आलेल्या वेब पोर्टलचा आय पी ऍड्रेसहा कॅलिफोर्नियामधील आहे, तर गुंतवणुकीसाठी जे संपर्क क्रमांक वापरले होते, ते बंद आहे. बहुतांश वेळा व्हॉट्सॲप आणि चॅटिंगद्वारे गुंतवणूकदारांशी संपर्क साधण्यात आला होता. आता कोणीही त्यास प्रतिसाद देत नसल्याने गुंतवणुकदारांना हवालदिल झाले आहेत.
अशाच प्रकारे नॅशडॅक कंपनीच्या नावाचा वापर करून नाशिक, शिक्रापूर, पुणे, डोंबिवली आणि आता अलिबागमध्ये फसवणुकीचे प्रकार घडले आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे फसवणूक झालेल्यांपैकी अनेकांना ही बोगस कंपनी आहे, हे माहिती होते. मात्र हमखास मोबदल्याच्या मोहाने त्यांचा घात केला. अनेकांनी दागिने, उसनवारी आणि इतर ठिकाणी केलेली गुंतवणूक काढून या कंपनीत पैसे टाकले. शिवाय मित्र, नातेवाइकांनाही पैसे गुंतवण्यास सांगितले. केवळ तीन महिन्यात २५ कोटी रुपयांचा गंडा या बोगस कंपनीने घातला.
गुंतवणुकदारांशी संपर्क साधण्यासाठी ५०० जणांचा एक व्हॉट्सॲप ग्रुप तयार केला होता. अलिबाग तालुक्यातील एकट्या कुरूळ गावामध्ये असे चार ग्रुप कार्यरत होते. या गावातील लोकांनी लगतच्या गावातील आपले नातेवाईक, मित्रमंडळींनाही गुंतवणूक करण्यास सांगितले. आपल्यासह तिघांना सहभागी केल्यावर पहिल्या लेवलसाठी १ हजार रुपये, सहा जणांना सहभागी करून घेतल्यानंतर दोन हजार रुपये, मासिक पगार सुरू केल्यानंतर जास्तीत जास्त गुंतवणुकदारांना सहभागी करून घेण्याची चढाओढ पंचक्रोशीत सुरू होती. तीन महिन्यात या स्कीममध्ये अलिबाग तालुक्यात ५ हजारांहून अधिक लोकांनी पैसे गुंतवल्याचे उघड होत आहे.
दोनच दिवसात दुसरा वेब पोर्टल कार्यान्वित
फसवणूक झालेल्या गुंतवणुकदारांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला गुगल पे वरून थेट पैसे ट्रान्स्फर करता यायचे. परंतु त्यानंतर युटीआर पासवर्ड वापरावा लागत असे. यासाठी दररोज संध्याकाळी बोनस जाहीर केला जायचा, व्हॉट्सॲपवरून मॅसेज करून कंपनीच्या भविष्यातील योजनांची माहिती दिली जायची. नॅशडॅक कंपनीच्या नावाने सुरू केलेला वेबपोर्टल बंद केल्यानंतर हीच पद्धत वापरून फसवणूक करण्यासाठी एनवायएससी नावाचा नवा वेबपोर्टल सुरू करण्यात आला आहे. त्याच्या वेबलिंक येथील नागरिकांच्या मोबाईलवर येऊ लागल्या आहेत.
Vision Abroad
Vision Abroad