सिंधुदुर्ग :केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी आमदार भास्कर जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भास्कर जाधवांवर गुन्हा दाखल व्हावा, अशी तक्रार भाजप कार्यकर्त्यांनी केली होती. कुडाळमधील सभेत राणेंवर अत्यंत खालच्या दर्जाची शिवराळ भाषा वापरल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे.
गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांच्या विरोधात भाजप कार्यकर्त्यांनी कुडाळ पोलीस स्थानकात तक्रार दाखल केल्यानंतर रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. 153, 505 (1) (क), 500, 504 कलमांतर्गत अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भास्कर जाधव यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे होमग्राउंड समजल्या जाणाऱ्या सिंधुदूर्ग जिल्ह्यात राणेंवर घणाघाती टीका केली.
काय म्हणाले होते भास्कर जाधव?
नारायण राणे हे देशाचे नेते असल्याचं सांगतात पण गल्लीत त्यांना कुत्रंदेखील विचारत नाही. भास्कर जाधव यांनी मध्यम, लघु, सुक्ष्म खातं म्हणत नारायण राणे, नितेश राणे, निलेश राणे या तिघांवर टीका केली. शिवसेनेने काही केले नाही, असं नारायण राणे म्हणतात. मग तू काय म्हशी भदरात होता? अशा शब्दात जाधव यांनी टीकास्त्र सोडलं. नारायण राणे केंद्रात मंत्री आहेत. मात्र, त्यांच्यामुळे देशात कोकणाची लाज जात असल्याचं सांगितलं. राणेंना तामिळनाडूचा प्रश्न विचारला की, केरळचे उत्तर देतात. कोकणातून देशाला विद्वान, विचारवंत नेते मिळाले. मात्र, राणेंनी देशात कोकणाची लाज काढली असल्याची घणाघाती टीका केली. यावेळी भास्कर जाधव यांनी राणेंची मिमिक्री करत टीकास्त्र सोडलं होते.
Vision Abroad
Vision Abroad