रायगड : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम काही पूर्ण होण्याची चिन्हे दिसेनात. या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सध्या ठप्प आहे. जागोजागी खासकरून महामार्गाची वडखळ ते इंदापूर या पट्टय़ात दुरवस्था झाली आहे.
दुसरीकडे महामार्गावरील अपघातांचे दृष्टचक्र थांबताना दिसत नाही. रायगड जिल्ह्यात गेल्या ९ महिन्यांत या मार्गावर ४९ जणांचा अपघातात मृत्यू झाला आहे.
मुंबई-गोवा महामार्गाच्या पळस्पे ते इंदापूर या पहिल्या टप्प्यातील चौपदरीकरणाचे काम २०११ साली सुरू झाले होते. २०२२ हे वर्ष सरायला आले तरी ८४ किलोमीटरच्या चौपदरीकरणाचे काम पूर्ण होऊ शकलेले नाही. मूळ ठेकेदाराची हकालपट्टी करूनही कामाला गती मिळू शकलेली नाही. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे सांगत काम बंद ठेवण्यात आलेले आहे. त्यामुळे रस्त्याची मोठय़ा प्रमाणात दुरवस्था झाली आहे. वाहनचालकांना खडतर परिस्थितीला सामोरे जात प्रवास करावा लागत आहे.
महामार्गाची दुरवस्था झालेली असतानाच महामार्गावरील अपघातांचे प्रमाणही वाढले असल्याची गंभीर बाब आता समोर आली आहे. जानेवारी ते सप्टेंबर २०२२ या दहा महिन्यांत रायगड जिल्हा पोलीस दूरक्षेत्राच्या हद्दीत येणाऱ्या महामार्गावरील भागात १४५ अपघात झाले असून, त्यामध्ये ४९ जणांचा मृत्यू तर १६० जण जखमी झाले आहेत, त्यामुळे दुहेरी संकटाला कोकणवासीयांना सामोरे जावे लागत आहे.
कोकणातील जनतेच्या सहनशक्तीचा अंत पाहिला जात आहे. कोकणच्या विकासाला उपयुक्त असा एक चौपदरी रस्ता मिळविण्यासाठी आजून किती वर्षे वाट पाहावी लागेल ह्याच उत्तर कोणाकडे नाही. कोकणातील नेते फक्त राजकारणात व्यस्त असल्याचे दिसत आहेत. ह्या प्रश्नासाठी तरी सर्व नेत्यांनी एकजुट दाखवावी अशी अपेक्षा कोकणवासीयां कडून केली जात आहे.
Vision Abroad