
सिंधुदुर्ग : सध्या महाराष्ट्र कर्नाटक हा सीमावाद पुन्हा एकदा पेटला आहे. भाषावार प्रांतरचनेच्या काही चुकांमुळे आज ह्या सीमा भागातील आपल्या मराठी बांधवाना खूप मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ह्या वादाला खूप वर्षाचा इतिहास आहे. एकीकडे हा वाद चालू असताना तळकोकणातील एका तालुक्यातील युवा वर्गाने चक्क दुसऱ्या राज्यात जाण्यासाठी २०१९ पासून आंदोलन सुरु केले आहे. जरी हे आंदोलन सध्या लहान प्रमाणात असले तरी ते ह्यावर उपाय न शोधल्यास ते पुढे वाढून त्याचे परिणाम दिसतील हे नक्की.
गोव्याच्या सीमेवर असणारा तळकोकणातील दोडामार्ग तालुका. याच दोडामार्ग तालुक्यातील तरुणवर्ग येथील सातत्याच्या मूलभूत सुविधांच्या उपेक्षा आणि वंचिततेला कंटाळून ‘आम्हाला गोव्यात सामावून घ्या!’ असे म्हणत उभा राहिला आहे. सुरवातीला व्हॅट्सअँप ग्रुपच्या माध्यमातून सुरू झालेली ही चळवळ हळू हळू व्यापक होत असून दोडामार्गच्या रोजच्या जगण्यातील मूलभूत प्रश्न घेऊन उभी राहिली आहे. ह्यासंबंधी एक दोन बैठका पण घेण्यात आल्याचे समजते.
अशी मागणी का होत आहे ?
दोडामार्ग तालुका अजूनही रोजगार आणि आरोग्य इत्यादी मूलभूत गोष्टीसाठी गोवा ह्या राज्यावर अवलंबून आहे. कारण ह्या सुविधा देण्यास स्थानिक आणि राज्य सरकार अपयशी ठरत आहे. सारा रोजगार, उद्योग जर गोव्यात आहे, येथील लोकप्रतिनिधी वर्षानुवर्षं आमच्या आरोग्याच्या प्रश्नाकडे सुद्धा लक्ष देत नसतील, तर आपला तालुकाच गोव्यात समाविष्ट करावा अशी मागणी येथील तरुणांकडून होऊ लागली आहे.
मागे गोवा सरकारने आपल्या राज्यातील आरोग्य सेवेसाठी परराज्यातील नागरिकांवर बंधने आणली होती. त्यावेळी त्यावेळचे विद्यमान आमदार दीपक केसरकर यांनी गोवा राज्यसरकारला विनंती करून हि सेवा पुन्हा चालू करून घेतली होती. सीमेच्या बंधनामुळे ह्या तालुक्यातील नागरिकांना गोव्यातील काही सेवेचा लाभ घेताना अडथळा होतो. ह्या सर्व कारणामुळे आपल्याला मूलभूत सुविधा तरी द्या नाहीतर गोवा राज्यात समाविष्ट होऊ द्या अशी मागणी होत आहे.
गोवा राज्य अगदी शांत राज्य म्हणून ओळखले जाते. इथे मराठी टक्का पण जास्त आहे. गोवामुक्तीसाठी मराठी जनता पुढे सरली होती त्यामुळे अजूनही गोवा आणि मराठी माणूस यांचे नाते जवळचे आहे. ह्या राज्यात विलीन झाल्यास काही तोटा न होता उलट फायदाच होईल अशी येथील काही तरुणांची भावना आहे.
ह्या प्रश्नात आता अजून एक ट्विस्ट आले आहे. महाराष्ट्र आणि गोवा सीमेलगत गोवा राज्यात मोपा गावात आंतराष्ट्रीय स्तराचे विमानतळ बनत आहे. दोडामार्ग तालुक्यापासून ते फक्त १९ किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे. साहजिकच त्यामुळे दोडामार्ग तालुक्याचा विकास होईल. इथल्या जमीनीचे भाव वाढले आहेत. गोव्यात जागेची मर्यादा आहे त्यामुळे गुंतवणूकदारांनी आपला मोर्चा इथे वळवला आहे. काही गुंतवणूदार इथे जमिनी खरेदी करून त्यावर रेसिडेन्टशल प्रोजेक्ट उभे करत आहेत. पुढच्या काही वर्षात येथील चित्र वेगळे असेल. विकासात सीमेचा अडथळा येत असल्याचे कारण दाखवून हि चळवळ अधिक तीव्र होईल आणि ह्या चळवळीस आर्थिक आणि राजकीय पाठबळ मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
महाराष्ट्र शासनाने ह्या गोष्टीची दखल घेणे अत्यंत गरजेचे आहे. सिंधुदुर्गातील लोकप्रतिनिधींनी हा प्रश्न गंभीर होण्याअगोदर त्याची दखल घेतली पाहिजे तरच हा तालुक्याचे गोवा राज्यात विलीनीकरण होण्यापासून रोखू शकतो.
Facebook Comments Box