नागपूर:सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळाला ‘बॅ. नाथ पै विमानतळ, सिंधुदुर्ग’ असे नाव देण्याच्या ठरावास आज विधानपरिषदेत मंजुरी मिळाली आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी याबाबत शासकीय ठराव मांडला. दोन्ही सभागृहांच्या मंजुरीमुळे आता हा ठराव केंद्र सरकारकडे पाठवण्यात येणार आहे.
बॅरिस्टर नाथ पै यांचे नाव योग्य
बॅरिस्टर नाथ पै हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ल्याचे सुपुत्र होते. नाथ पै यांनी स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतला होता. त्यांना यासाठी अनेकवेळा कारावास भोगावा लागला होता. गोवा मुक्ती संग्रामातही ते अग्रभागी होते. स्वातंत्र्यानंतर त्यांनी राजापूर लोकसभा मतदारसंघातून प्रतिनिधीत्व केले होते. त्यांनी लोकसभेच्या राजापूर मतदारसंघातून १९५७, १९६२ आणि १९६७ या तीन निवडणुकीत विजय मिळवत १९५७ ते १९७१ अशी पंधरा वर्षे मतदारसंघाचे नेतृत्व केले. कोकण रेल्वेच्या संकल्पनेमध्ये त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात सरकारने त्यांचा सन्मान केला आहे. तसेच नाथ पै यांचे विमानतळाला नाव देण्याची सर्व पक्षांनी मागणी केली होती.
या विमानतळ परिसरात बॅ. नाथ पै यांचे जीवन चरित्र पुढील पिढीला कळावे यासाठी विस्तृत माहितीचे शिलालेख तसेच त्यांच्या व्यक्तिमत्वाला साजेसे स्मारक बांधून त्यांना गौरविण्यात येईल, असे मंत्री सामंत यांनी यावेळी सांगितले.
(Also Read>कचरा गोळा करण्यासाठी सावंतवाडी नगरपालिकेचे ‘ई’ पाउल.)
Vision Abroad