रत्नागिरी : खेडशी नाका येथे खवले मांजर आल्याची माहिती वन विभागाला मिळाली होती. त्यानंतर एक पथक त्या ठिकाणी दाखल होऊन त्या खवले मांजराला जीवनदान देण्यात आले आहे. पथकाने खवले मांजर ताब्यात घेतले. त्यानंतर त्याची पशू वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून वैद्यकीय तपासणी करून ते सुरक्षित असल्याची खात्री करून घेण्यात आली त्यानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
खेडशी नाका येथे खवले मांजर आल्याची माहिती केतन साळवी यांनी दूरध्वनीद्वारे दिली होती. या बचाव कार्यात पालीचे वनपाल एन.एस.गावडे, रत्नागिरीचे वनरक्षक प्रभू, साबणे, जाकादेवी वान रक्षक शर्वरी कदम यांनी सहभाग घेऊन खवले मांजर ताब्यात घेतले आणि नंतर सुरक्षित नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. हे बचाव कार्य विभागीय वन अधिकारी रत्नागिरी (चिपळूण) दीपक खाडे, सहायक वन रक्षक रत्नागिरी आणि चिपळूण सचिन नीलख यांच्या मार्गदर्शनाखाली परिक्षेत्र वन अधिकारी रत्नागिरी श्री प्रकाश सुतार आणि त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांनी पूर्ण केले.
खवले मांजरा विषयी या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?
खवले मांजर भारतात हिमालय आणि ईशान्येकडील भाग वगळता सगळीकडे आढळतं. पण शिकारीमुळे बहुतेक भागात ही प्रजाती नष्ट झाली आहे. भारतात भारतीय खवले मांजर आणि चिनी खवले मांजर या दोन प्रजाती आढळतात. या प्राण्याच्या संपूर्ण शरीरावर खवले असतात त्यामुळे धोक्याची सूचना मिळाली की ते आपल्या शरिराचे वेटोळे करून घेते. हल्ला न करता स्वतःचं संरक्षण करण्याची वृत्ती निसर्गाने त्याला बहाल केलीये. साधारण पाच फूट लांब आणि मोठी शेपटी असलेल्या या प्राण्याला दात नसतात पण शिकार करण्यासाठी एक फुट लांब जीभ असते. खवले मांजर आपल्या या एक फूट लांबीच्या चिकट जीभेने मुंग्या, वाळवी आणि डोंगळे खावून जगते.
तस्करीसाठी वापर
खूप पूर्वी स्थानिक लोक आणि आदिवासी जंगली प्राण्यांची शिकार करून खायचे. पण पुढे त्यांना इतर पर्याय उपलब्ध झाल्याने आणि वन्यजीव संरक्षणाचा कायदा आल्याने यावर निर्बंध आले. पण गेल्या काही वर्षांमध्ये तस्करीच्या उद्देशाने भारतात खवल्या मांजराची शिकार वाढल्याचं दिसतं. खवले मांजरांची बिळं शोधून त्यांना बाहेर काढलं जातं आणि त्याची खवलं काढण्यासाठी उकळत्या पाण्यात टाकलं जातं. या खवल्यांची किंमत आंतरराष्ट्रीय तस्करीत लाखोंमध्ये असते.
या खवल्यांचा उपयोग
ही खवलं पारंपरिक चीनी औषध आणि जडीबुटीमध्ये वापरली जातात. त्यात दमा आणि संधीवातावर उपचार करण्याचे गुणधर्म असल्याचा दावा केला जातो.
हेही वाचा – देवगड येथे सापडले आगळे वेगळे आणि विलक्षण मानवाकृती कातळशिल्प
तस्करी रोखण्यासाठी उपाय.
आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघाने International Union for Conservation of Nature (IUCN) जाहीर केलेल्या रेड डेटा लिस्ट म्हणजेच धोक्यात आलेल्या प्राण्यांच्या यादीत खवले मांजराचा समावेश करण्यात आलाय. भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा, 1972 अंतर्गत या खवले मांजराचा पहिल्या श्रेणीत समावेश करण्यात आलाय. स्थानिक पातळीवर सुद्धा काही प्राणीमित्र संस्था या प्रजातीला वाचविण्यासाठी पुढे सरल्या आहेत.
Vision Abroad