कोकणवासियांनो सावधान; गोव्यात जमिनींचा अपहार करणाऱ्या ‘दिल्ली लॉबी’ चा कोकणात शिरकाव

सिंधुदुर्ग-कोकणात पर्यटन वृद्धीस मोठा वाव आहे; त्याचबरोबर काही मोठ्या प्रकल्पाच्या घोषणा केल्या गेल्या आहेत. त्यामुळे येत्या काळात येथील गुंतवणूक कित्येक पटीने परतावा देणारी असल्याचे लक्षात आल्याने अनेक परप्रांतीय येथे मोठ्या प्रमाणात जमिनी खरेदी करताना दिसत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे अनेकदा बळजबरीने, गैरमार्गाने जमिनी बळकावण्याचे प्रकारसुद्धा घडताना दिसत आहेत.
गोव्यात हल्लीच उघडकीस आलेल्या जमीन घोटाळ्याच्या भूमाफियांनी सिंधदुर्ग जिल्ह्यात सुद्धा आपले पाय पसरवण्यास सुरवात आहे.  त्यांनी या जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यात शिरकाव केला असून कायद्यातील पळवाटा, आर्थिक ताकद याचा वापर करत यंत्रणेला हाताशी धरून सोन्याच्या किमतीच्या जमिनी कवडीमोल दाम देवून आपल्या विळख्यात आणायला सुरूवात केली आहे. गोव्यात या भूमाफियांना ‘दिल्ली लॉबी’ असे बोलले जात आहे. मुळात दिल्ली लॉबी म्हणजे दिल्ली प्रांतातून येणारे गुंतवणूकदार आहेत.
या दिल्ली लॉबीने गोव्यात नक्की काय केले ? 
ही लॉबी अवैध मार्गांचा वापर करून पैशाच्या जोरावर मालमत्ता मिळवते. स्थानिकांना सुरूवातीला आमिषे आणि नंतर बळाचा वापर करून बेदखल करतात; मात्र ते कधीच प्रत्यक्ष पडद्यावर येत नाहीत. गोव्यात आयएएस, आयपीएस, आयएफएस हे वरिष्ठ अधिकारी प्रामुख्याने दिल्लीतील असतात. त्यांच्याशी ओळख काढून त्यांचा वापर करत या मालमत्ता मिळवल्या जातात. हे दिल्लीकर मोठमोठ्या हस्तींकडून गुंतवणुकीसाठी पैसे मिळवतात. स्थानिकांना आमिष दाखवून त्यांनाच पुढे करून अवैध मार्गाद्वारे मालमत्ता बळकावल्या जातात. मग त्याची दामदुप्पट व्यावसायिक किमतीत विक्री होते. यात करोडो रूपयांचा घोटाळा केला जातो.जमिनी मिळवण्यासाठी खोटे कागदपत्र, मृत व्यक्तींच्या बोगस स्वाक्षरी, बोगस वारस आदी सगळे मार्ग अवलंबले जातात. गोव्यात गेल्या काही वर्षांत या लॉबीने आर्थिक दहशत निर्माण केली आहे.
गोव्यात असलेली पोर्तुगीजकालीन बंद घरे या लोकांच्या दृष्टीस पडली. ही घरे प्रामुख्याने वर्षानुवर्षे बंद असल्याने पडझड झालेल्या स्थितीत असायची. त्याचे वारसदार परदेशात स्थायिक असायचे. या लोकांनी सरकारी यंत्रणेला हाताशी धरून त्याचे वारसदार शोधले. मुळ दिल्लीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या ओळखीमुळे त्यांना हे सहज शक्य झाले. या वारसदारांकडून कवडीमोल किंमतीने मालमत्ता घेतल्या.त्या घरांची दुरूस्ती करून तीन चार पट दराने याची विक्री केली गेली.
त्यानंतर या लॉबीची नजर गोव्यातील हजारो एकर पडीक जमिनीवर पडली. येथे वारस परदेशात असलेल्या, वारसांना मालमत्तांबाबत माहिती नसलेल्या हजारो एकर जमिन होत्या. अधिकाऱ्यांशी साटेलोटे ठेवून असलेल्या या लॉबीने गोव्याच्या पुराभिलेख खात्यामधून अवैध मार्गाने कागदपत्र मिळवत अशा जमिनींचे वारस शोधले. काहीवेळा अशा वारसांना पैसे देवून कवडीमोल किंमतीने जमिनी खरेदी केल्या. या पुढचे पाऊल टाकत वारसांचा पत्ता नसलेल्या जमिनींचे बोगस वारस उभे केले. निधन झालेल्या किंवा ज्ञान नसलेल्या लोकांच्या नावेही बोगस मालक दाखवून खरेदी व्यवहार करण्यत आले. यासाठी पुराभिलेख, महसूल आणि उपनिबंधक कार्यालयाच्या लोकांना लाच देवून बनावट खरेदीखते करण्यात आली. ग्रामिण भागात हजारो एकर जमिनी यातून खरेदी करून त्याची विक्रीही केली. 
परदेशातून परत आलेल्या काही नागरिकांनी आपली जमिनीची परस्पर विक्री झाल्याबद्दल ची तक्रार दिल्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यात आली आणि हा मोठा घोटाळा बाहेर पडला.
सिंधुदुर्गात प्रवेश.
मोपा विमानतळामुळे दोडामार्गमध्ये मालमत्तांना दर येणार याची आधीच कुणकुण असलेल्या या लॉबीने तालुक्यात वैध अवैध मार्गांचा वापर करून मोठ्याप्रमाणात जमिनी घेतल्या आहेत. खरेदीदार कागदावर वेगळे असले तरी यामागे मुळ हीच लॉबी असून बळाचा वापर तेच करत असल्याचे चित्र आहे.
आताही हैदराबाद-पणजी असा मोठा महामार्ग भविष्यात होणार असल्याचे व तो दोडामार्ग तालुक्यातील वझरे गावातून जाणार असल्याची कुणकुण या लॉबीला आहे. याची राज्यस्तरावरच्या प्रशासनाला अधिकृतरित्या कोणतीच माहिती नाही; मात्र ही लॉबी त्या मार्गावरील जमिनी कवडीमोल किंमतीने खरेदी करत आहे. यासाठी यंत्रणेचा वापर आणि स्थानिकांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेतला जात आहे.
दोडामार्ग तालुक्यातील एका गावात या लॉबीची छुपी गुंतवणूक काही वर्षांपूर्वीपासून आहे. या ठिकाणी स्थानिकांना कवडीमोल किंमत देवून व इतर मार्गाने जमिनी घेण्यात आल्या. त्या ठिकाणी आलीशान घरे, सदनिका तयार करण्यात आल्या. त्या आता विक्रीसाठी सज्ज असून त्यासाठीचे ग्राहकही करोडो रूपये मोजणारे शोधले जात आहेत.
गोव्यात घोटाळा उघडकीस आला तरी या लॉबीचे व्यवहार सिंधुदुर्गात चालूच आहेत. कारण सध्या हा भाग अविकसित असला तरी येथे येणारे भविष्यातील प्रकल्पांमुळे येथे विकासाला मोठा वाव आहे. भविष्यात ही लॉबी राजापूर-रत्नागिरीसुद्धा शिरकाव करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कोणती खबरदारी घ्याल?
कोकणातील अनेक लोक नोकरीधंद्याच्या निमित्ताने शहरात वास्तव्यास असतात. त्यांच्या जमिनीवर या भूमाफियांचा डोळा असतो. अशा जमिनी सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी घेऊन परस्पर विकल्या जाऊ शकतात. आपल्या गावात-वाडीत जमिनी बद्दल जेवढे फेरफार होतात त्याबद्दल हरकती नोंदविण्यास https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/aaplichawdi या  शासकीय संकेतस्थळावर सूचना प्रसिद्ध केली जाते. या चावडी वर आपण नजर ठेवणे गरजेचे आहे. तसेच आपला सातबारा वारंवार तपासून त्यामध्ये काही फेरफार झाले आहेत का ते पाहणे महत्वाचे आहे.  

Loading

Facebook Comments Box






मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search