सावंतवाडी – प्रस्तावित संकेश्वर-बांदा राष्ट्रीय महामार्ग सावंतवाडी शहरातून जाणार कि नाही याबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे झाले आहे. माजी आमदार शिवराम दळवी यांनी लिहिलेल्या एका पत्राला सावंतवाडी नगरपरिषदेने दिलेल्या उत्तरामुळे याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
दोन वर्षांपूर्वी सावंतवाडी मतदार संघाचे माजी आमदार शिवराम दळवी यांनी सावंतवाडी नगरपरिषदेला एक पत्र लिहिले होते. या पत्रात संकेश्वर बांदा राष्ट्रीय महामार्ग सावंतवाडी शहरातील ज्या रिंग रोड मधून जाणार होता त्या रिंग रोड बाबत काय ठराव झाला याबाबत प्रश्न विचारला होता. मात्र नगरपरिषद मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांनी याबाबत कोणताही ठराव झाला नाही असे उत्तर दिले आहे. त्यामुळे हा महामार्ग सावंतवाडी शहरातून जाणार की नाही याबाबत प्रश्नचिन्ह उभे झाले आहे.
संकेश्वर ते बांदा हा नवा महामार्ग होऊ घातला आहे. हा महामार्ग चौपदरी असुन जवळपास दोन हजार कोटी रुपये यावर खर्च करण्यात येणार आहे. या महामार्गाचा सर्व्हे पूर्ण झाला असून जवळ जवळ 45 ते 60 मिटर रुंदीचा व 108 मीटर लांबीचा हा मार्ग असणार आहे. केंद्र शासनाच्या भारतमाला आणि सागरामाला या दोन्ही योजनेमध्ये या महामार्गाला स्थान मिळाल्याने याचे काम तातडीने सुरू होणार आहे. मात्र हा मार्ग सावंतवाडी शहरातून जाणार, की बावळाटमार्गे बांद्याला जोडणार? हा नवा पेच निर्माण झाला होता . बावळाटमार्गे बांदा, असा मार्ग झाल्यास 10 किलोमीटरचे अंतर वाचणार आहे. शिवाय तांत्रिक अडचणीही कमी होतील. त्यामुळे बावळाटमार्गेच हा मार्ग नेण्याच्या हालचाली चालू होत्या. मात्र विरोध झाल्याने केंद्राने हा मार्ग आंबोली – माडखोल – सावंतवाडी – इन्सुलि मार्गे जाणार असल्याचे स्पष्ट केले होते. हा मार्ग सावंतवाडी शहरात रिंग रोड मार्गे जाणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र दोन ते तीन वर्षे उलटली तरी सावंतवाडी नगरपरिषदेत याबाबत साधा ठराव पास झाला नसल्याने पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग या शहराच्या बाहेरून जातो. रेल्वेमार्ग सुमारे आठ किलोमीटर दूर अंतरावरून नेण्यात आला आहे. येथे विकासासाठी पूर्ण वाव असुनही सावंतवाडी शहर विकासाच्या दृष्टीने मागे पडत आहे. त्यामुळे निदान प्रस्तावित संकेश्वर-बांदा मार्ग सावंतवाडी शहरातूनच जावा अशी मोठ्या प्रमाणावर मागणी करण्यात आली आहे.
Facebook Comments Box