मालवणात पर्यटनाचा ‘हा’ नवा ट्रेन्ड ठरत आहे पर्यटन व्यवसायिकांची डोकेदुखी

मालवण – उन्हाळी सुट्यांमुळे मालवणचे पर्यटन बहरलेले दिसून येत आहे; मात्र यात निवासव्यवस्थेचे दर आकारण्यात पर्यटन व्यावसायिकांमध्ये सुरू झालेली जीवघेणी स्पर्धा, येथील व्यावसायिकांसाठी डोकेदुखी ठरली आहे. यातच पर्यटकांनी मासळी आणून दिल्यास ती बनवून देण्याचा नवा ट्रेंड सुरु झाल्याने हॉटेल व्यवसायालाही मोठा फटका बसत आहे. एकूणच येथे काही काळापूर्वी वाढत असलेला पर्यटन व्यवसाय आता नव्या वळणावर पोहचला आहे. यातच अंमली पदार्थांसह व्यसनाधिनतेचे काही प्रकारही धोक्याची घंटा वाजवणारे ठरत आहेत.

पर्यटनाची राजधानी म्हणून मालवणकडे बघितले जाते. गेल्या काही वर्षात समुद्राखालील अनोखे विश्‍व पाहण्याची संधी स्कूबा, स्नॉर्कलिंगमुळे उपलब्ध झाली आहे. याबरोबरच साहसी जलक्रीडा प्रकार यामुळे येथील पर्यटन हंगाम हा गेल्या काही वर्षात बहरत असल्याचे दिसून येत आहे. पर्यटकांना अत्यावश्यक सोईसुविधा पर्यटन व्यावसायिकांनी उपलब्ध करून दिल्याने दरवर्षी लाखोंच्या संख्येने येथे दाखल होत असून त्यांच्याकडून सागरी पर्यटनाचा आनंद लुटला जात आहे. पर्यटनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होत असल्याने नोकरीच्या मागे न लागता अनेक तरूण बेरोजगारांनी पर्यटन व्यवसायात उतरण्याचे धाडस दाखवित त्यातून गेल्या काही वर्षात चांगले अर्थांजन मिळविण्यास सुरवात केल्याचे किनारपट्टी भागात पहावयास मिळत आहे.सागरी पर्यटनासाठी सिंधुदुर्गात पर्यटक जास्ती पसंती देतात. वर्षातील साधारणतः ८० ते १०० दिवसांचा हा पर्यटन उद्योग सुरू असतो. गेल्या दोन वर्षाच्या कोरोना महामारीच्या काळानंतर पर्यटन व्यवसाय आता खर्‍या अर्थांने उभारी घेत असल्याचे दिसून येत आहे; परंतु सर्वात मोठी समस्या निर्माण झाली असल्याचे दिसून येत आहे. यात हॉटेल्स, होम-स्टे, रिसॉर्टची जी वर्गवारी आहे. त्यात जी निवासव्यवस्थेची दर आकारणी केली जाते. यात ज्यांच्याकडे चांगल्या सोईसुविधा उपलब्ध आहेत. त्यांच्या निवासव्यवस्थेचे दर १५०० ते २५०० रुपये प्रतिदिवस असे आहेत. असे पर्यटन व्यावसायिक विनाकारण स्पर्धा करताना दिसून येत आहे. संबंधितांकडून ३० ते ४० टक्के दर कमी करून पर्यटकांना निवासाची व्यवस्था करून दिली जात आहे. परिणामी याचा फटका ज्यांच्याकडे चांगल्या सुविधा आहेत मात्र ते दर स्थिर ठेवून व्यवसाय करू पाहतात अशा पर्यटन व्यावसायिकांना बसत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या किनारपट्टी भागात नवा ट्रेंड निर्माण झाला आहे. पर्यटक बुकींग करून येण्यापेक्षा थेट रिसॉर्ट, निवास न्याहरी, हॉटेल्सच्या ठिकाणी येऊन दरांमध्ये आपल्याला हवी तशी तडजोड करून घेत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे भविष्यात जर अशीच परिस्थिती राहिल्यास निवास व्यवस्थेचा जो व्यवसाय आहे तो कोलमडण्याची भीती निर्माण झाली आहे.किनारपट्टी भागास पर्यटकांची जास्त पसंती असल्याचे दिसून येत आहे. मात्र गेल्या काही वर्षात पर्यटकांनाच तुम्ही मासे आणून द्या ते बनवून देतो असे पर्यटन व्यावसायिकांकडून सांगितले जात असल्याने हा नवा ट्रेंड या क्षेत्रात निर्माण झाला असल्याचे दिसून येत आहे. यामुळे येथे येणारा पर्यटक हा थेट मासळी लिलावाच्या ठिकाणी जावून मासळी खरेदी करतात. मग ती वास्तव्यास असलेल्या हॉटेलच्या ठिकाणी येऊन त्या व्यावसायिकाला ती बनविण्याचे सांगून किलोप्रमाणे दर निश्‍चित करून घेतात. ही प्रथा म्हणजे वेगळ्या प्रकारची कीड या व्यवसायास लागली आहे. जेमतेम १०० दिवसांच्या या पर्यटन व्यवसायाच्या काळात किलोवर असे मासे बनवून दिल्यास तर व्यावसायिक पैसे कमावणार केव्हा? बँकांचे हफ्ते, विविध शासनाचे कर कोठून भरणार? जेव्हा एखादा पर्यटक हॉटेलला वास्तव्यास असतो त्यावेळी त्याचे जेवण, वास्तव्य याचा विचार केला तर त्यातून सरासरी वार्षिक खर्च निघत असतो; परंतु असे जे प्रकार किनारपट्टी भागात सध्या सुरू आहेत हे चुकीचे असून येणाऱ्या काळात पर्यटन व्यावसायिकांनी यातून स्वतःला सावरण्याची गरज आहे. आपण जो व्यवसाय करत आहोत. तो कमर्शिअल पद्धतीने करायला हवा. या गंभीर बाबींकडे लक्ष न दिल्यास हा व्यवसाय कमर्शिअल पद्धतीने व्यवसाय करणाऱ्यांच्या हाती जाण्याची शक्यता असून याचा फटका स्थानिक पर्यटन व्यावसायिकांना बसण्याची भीती आहे. त्यामुळे पर्यटन व्यावसायिकांनी आताच सावध होण्याची गरज निर्माण झाली आहे.

विष्णू ऊर्फ बाबा मोंडकर,

जिल्हाध्यक्ष, सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघ

 

   






मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Loading

Facebook Comments Box






मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search