Alphanso GI Tag | कोकणातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांसाठी २००८ मध्ये विविध पाच संस्थांनी ‘अलफॉन्सो’ (हापूस) या इंग्रजी नावाने भौगोलिक निर्देशांक Geographical Indication मिळविला आहे. त्यामुळे इतर भागातील आंबा हापूस किंवा अलफॉन्सो या नावाने विकण्याच्या प्रयत्न झाल्यास तो कायदेशीर गुन्हा ठरणार आहे. मात्र आपल्या भागात पिकणाऱ्या आंब्यांना पण हापूस म्हणुन ओळख मिळावी म्हणुन काही भागातील आंबा उत्पादक पुढे आले आहेत.
कोकणातील हापूस आंब्याची महाराष्ट्राच्या विविध प्रांताबरोबरच देशाच्या आणि परदेशात व्यावसायिक लागवड करण्यात आली होती. त्यामुळे या लागवडीतून उत्पादित होणारा आंबा हापूस आहे असा दावा आता त्या त्या भागातील आंबा उत्पादकांकडून होऊ लागला आहे. यामध्ये कर्नाटक हापूस, पुणे जिल्ह्यातील पश्चिम घाट परिसरातील गावरान हापूस आणि जुन्नर हापूस तर दक्षिण आफ्रिकेतील मालावी प्रांतात उत्पादित होणारा मालावी हापूस यांचा समावेश आहे. या भागातील उत्पादकांनी आपल्या भागातील आंबा हापूसच असल्याचा दावा केला आहे. तसेच ‘हापूस’ म्हणुन भौगोलिक निर्देशांक Geographical Indication मिळविण्यासाठी अर्ज पण केले गेले आहेत.
जीआय मानांकनासाठी होणार्या दाव्या बद्दल या क्षेत्रातील तज्ज्ञांनी आपली मते व्यक्त केलीत.
ॲड. गणेश हिंगमिरे, भौगोलिक निर्देशांक तज्ज्ञ म्हणतात की ज्या भागाच्या नावाने त्या भागातील पदार्थ, वस्तूची चव आणि वैशिष्ट्यपूर्ण रचना असते. जसे पुणेरी – पगडी, वाडा – कोलम, कोल्हापुरी – चप्पल आहे. प्रत्येक भागाच्या भौगोलिक आणि वातावरणानुसार त्या भागातील शेती उत्पादनांना चव, गंध, रंग आणि आकार असतो. त्यामुळे त्या त्या भागासाठी स्वतंत्र ‘जीआय’असू शकतो. त्यामुळे विविध भागात उत्पादित होणाऱ्या हापूस आंब्याला केवळ हापूस या नावाने जीआय मिळू शकतो. तसा प्रयत्न जुन्नरच्या शेतकऱ्यांनी सुरु केला आहे. या आंब्याचा इतिहास आणि वेगळेपण सिद्ध झाल्यास त्याची जीआय नोंद विचाराधीन होऊ शकते.
कोकण हापूस आंबा उत्पादक आणि उत्पादक विक्री सहकारी संस्था, रत्नागिरी या संस्थेचे विवेक भिडे यांच्या मते एकदा एका विशिष्ट भौगोलिक क्षेत्रातील उत्पादनासाठी जीआय घेतले तर ते दुसऱ्या भागासाठी घेता येत नाही. कारण त्या भूभागावरील शेतकऱ्यांची मालकी त्या नावाची झाली आहे. यानुसार हापूस नाव आता कोकण वगळता इतर भागातील हापूस उत्पादनांना घेता येणार नाही. बासमती तांदळाच्या बाबतीतही हा वाद सुरु आहे. टेक्सास येथील बासमतीला टेक्समती असा जीआय घ्यावा लागला आहे.
आता जीआय मानांकन नक्की कोणाकोणाला मिळणार की हापूस न्यायालयीन लढाईत अडकणार, याकडे आंबा उत्पादकांचे लक्ष आहे.