संपादकीय : एकीकडे फुल्ल झालेले रेल्वे आरक्षण तर दुसरीकडे मुंबई गोवा महामार्गाची झालेली दयनीय स्थिती यामुळे यंदा गणेशचतुर्थी सणाला गावी जाणाऱ्या चाकरमान्यांची चिंता वाढली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही त्याला मोठी कसरत करून गाव गाठावे लागणार हे उघड झाले आहे. हंगामात कोकणात गावी जाणे हे एक त्याच्यासाठी प्रकारचे दिव्यच झाले आहे.
कोकणात जाण्यासाठी दोन महत्त्वाचे पर्याय उपलब्ध आहेत. एक म्हणजे रेल्वे आणि दुसरा म्हणजे मुंबई गोवा महामार्ग. रेल्वेच्या बाबतीत बोलायचे झाले तर मध्य आणि पश्चिम रेल्वे मिळून कोकण रेल्वे मार्गावर सुमारे 300 विशेष फेर्या चालविणार आहे. अगदी शेवटी घोषित झालेल्या गाड्यांचे आरक्षण पाहिल्या 1/2 मिनिटांत फुल्ल झाले असल्याने आजून किती प्रवाशांना तिकीटे भेटली नसतील याचा अंदाज येतो. रेल्वे या मार्गावर अजून अतिरिक्त गाड्या चालवू शकणार नाही. कारण कोकण रेल्वे अजून ‘डबल ट्रॅक’ वर आणली गेली नाही आहे. दुसरी गोष्ट म्हणजे या मार्गावर सोडण्यात आलेल्या 300 गाड्यांमुळे येथील यंत्रणेवर मोठा ताण येणार आहे. सर्व गाड्यांचे वेळापत्रक बिघडून उशिरा धावणार आहेत. याचा मोठा त्रास प्रवाशांना होणार आहे.
कोकणात जाण्याचा दुसरा पर्याय आहे मुंबई गोवा महामार्ग. गेली 14 वर्षे रखडलेला मुंबई गोवा महामार्गा अजूनही पूर्णत्वाच्या प्रतिक्षेत आहे. अनेक ठिकाणी जीवघेणे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे वाहतुकीचा खोळंबा Traffic तर होणारच पण अपघात होण्याच्या शक्यता आहेत. अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याचा धोका आहे. सर्व परिस्थिती वरून यंदाही चाकरमान्यांना गणेशोत्सवासाठी गावी जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार यात काही शंका नाही.
कोकण रेल्वे मार्ग फक्त कोकणासाठी मर्यादीत नाही आहे तर दक्षिणेकडील राज्यांतील गाड्या पण याच मार्गावरून जातात. पावसाळ्यातील एक दोन महिने सोडले तर या मार्गावरील गाड्यांचे आरक्षण मिळवणे तर एक प्रकारचे दिव्यच झाले आहे. जनरल आणि स्लीपर डब्यांची स्थिती मुंबईच्या लोकल डब्यांच्या गर्दी सारखी होत आहे.एवढी बिकट परिस्थिती असताना येथे गेली कोकण रेल्वे चालू झाल्यानंतर गेली 25 वर्षे डबल ट्रॅक साठी का प्रयत्न केले जात नाही आहेत हा एक मोठा प्रश्न आहे.
राजकिय इच्छाशक्तीचा अभाव
कोकणरेल्वेचे शिल्पकार मा. मधु दंडवते आणि मा. जॉर्ज फर्नाडिस यांनी कोकण रेल्वे साकारताना दाखवलेल्या इच्छाशक्तिचा अभाव आज प्रकर्षाने जाणवत असल्याचे दिसत आहे. मुंबई गोवा महामार्ग चौदा वर्षातही पूर्ण होत नाही, कोकण रेल्वे २५ वर्षानंतरही सिंगल ट्रॅक वर आहे हे कोकणातील नेत्यांचे खूप मोठे अपयश आहे. मोठे प्रकल्प नको तर आधी आम्हाला या मूलभूत सुविधा उपलब्ध तरी करून द्या असे आकांताने कोकणवासी सांगत आहे. पण त्याची हाक ऐकणारा कोणी दिसत नाही आहे.
Vision Abroad