‘मुडी’ : कोकणातील पारंपरिक धान्य साठवणुकीची नष्ट होत चाललेली पद्धत

लेख |सई परब: काल सहजच सोशल मीडियावर वेळ घालवत असताना एक विडिओ नजरेस पडला. धान्याची साठवणूक करण्याची एक पारंपरिक पद्धत म्हणजे ‘मुडी’ किंवा ‘बिवळा’ बांधण्याचा तो विडिओ होता. हा विडिओ पाहताना काही जुन्या आठवणी जाग्या झाल्यात.
पूर्वी कोकणात भातशेती मोठ्या प्रमाणात केली जात असे. पिक हातात आल्यानंतर त्याची साठवणूक करणे हे सुद्धा शेती करून धान्य मिळवण्याइतकेच महत्वाचे काम असे. धान्याच्या साठवणुकीसाठी गवताची ‘मुडी’ बांधून धान्याची साठवणूक केली असे.  
मुडी म्हणजे गवत आणि दोरी वापरून धान्याची नैसर्गिकरीत्या साठवण करून ठेवण्याचं एक साधन. मुडी ही भाताची मळणी केल्यावर मिळणाऱ्या गवताची बांधली जायची. हे मोठं कौशल्याचं आणि  ताकदीचंही काम असायचं. मोठय़ात मोठी मुडी ही दहा कुढवांची बांधली जायची. अगदी लहान म्हणजे दोन-तीन कुडू धान्याच्या मुडीला ‘बिवळा’ म्हणायचे. आमच्या बालपणीच्या काळात कोकणातल्या प्रत्येक घरात धान्याच्या अशा मुड्या एकावर एक रचून ठेवलेल्या दिसत. 
बालपणीची काही वर्षं आम्ही अशा मुड्या पाहिल्या. एकाही वर्षी अशा मुडीतलं बियाण्यासाठीचं धान्य खराब झालेलं कधी पाहिलं नाही. त्या काळात खरिपाच्या सुरुवातीला बाजारातली आताच्या सारखी पिशवीबंद बियाणी विकत आणण्याची प्रथा नव्हतीच. शेतकरी वर्षभरासाठी लागणारं धान्य आणि मिरगात पेरायचं बियाचं धान्य अशा मुड्यांमध्ये ठेवत असत. 
मुड्या या भाताच्या, भुईमुगाच्या व नाचणीच्या बांधल्या जात असत. धान्य टिकण्यासाठी  त्यात त्रिफळ आणि लिंबाची पानेही टाकली  जात असत.  त्या काळात आजच्या सारखी बियाणी बाजारातही नव्हती. ‘वालय’ आणि ‘बेळणा’ ह्या भाताच्या पारंपरिक जाती खूप लोकप्रिय होत्या. ह्या दोन्ही जाती ‘महान’ प्रकारातल्या होत्या आणि जास्त उत्पादन देणाऱ्या होत्या. या जातीच्या भाताच्या पाच पायली, दहा पायली, एक मण, दीड मण अशा प्रमाणात मुड्या बांधत असत. साधारणपणे एक मणापासून पुढची मुडी बांधण्यासाठी खूप ताकद लागत असे. एखाद्या मुडीतलं भात दोन-अडीच वर्षांपर्यंतही उत्तम स्थितीत राहत असे.  
पूर्वी कोणत्याही घराच्या श्रीमंतीचा अंदाज  हा त्या घरात किती ‘मुड्या’ आहेत यावरून लावला जात असे. जेवढ्या जास्त ‘मुड्या’ तेव्हडा तो शेतकरी सधन असे मानले जायचे. एवढेच नव्हे तर जेव्हा लग्न ठरव्यासाठी मुलीकडील लोक मुलाकडे जायचे तेव्हा त्या घरातील ‘मुड्या’ मोजून लग्नाला होकार द्यायचा कि नाही ते ठरवायचे. काहीशी अतिशोयक्ती वाटल्यास तुम्ही वाडीतील जुन्या शेतकऱ्यांना अजूनही या गोष्टी विचारून या गोष्टीतील सत्यता जाणून घेऊ शकता. 
आता अशा घरगुती मुड्या कुठे औषधालाही दिसत नाहीत. आता धान्य साठवण करून ठेवण्याइतपत शेतीही कुणी करत नाही. दीड-दोन खंडी भात पिकवणारा शेतकरी आज ‘मोठा’ शेतकरी समजला जातो. याशिवाय गावोगावी भात भरडण्याच्या मोठमोठ्या गिरण्या उपलब्ध असल्याने धान्याची साठवणही कुणी करत नाही.

Loading

Facebook Comments Box






मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search