सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेकडून भजन मंडळांना साहित्य वाटप; अर्ज करण्यासाठी उद्याचा अखेरचा दिवस

सिंधुदुर्ग :सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या भजन परंपरेला प्रोत्साहन देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने २०२३-२४ या आर्थिक वर्षाचे बजेट करताना भजनी मंडळांना साहित्य पुरविण्याकरिता २५ लाख रुपयांची आर्थिक तरतूद केली आहे. अशी तरतूद पहिल्यांदाच करण्यात आली आहे. एका भजन मंडळाला १० ते १२ हजार रुपयांचे साहित्य पुरविले जाणार आहे. या निर्णयाचे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील भजनप्रेमी मंडळींकडून जोरदार स्वागत होत आहे. 
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात घरोघरी साजरा केला जातो. त्याप्रमाणे वाडीवाडीत भजन मंडळे सक्रिय होऊन या कालावधीत घरोघरी जाऊन गणपती समोर आरती, भजने सादर करीत असतात. जिल्ह्यात प्रत्येक वाडीचे स्वतंत्र भजन मंडळ आहे. काही वाड्यांमध्ये तर एकापेक्षा अनेक भजन मंडळे कार्यरत आहेत. अलीकडे महिला भजन मंडळ, लहान मुलांचे भजन मंडळ हा सुद्धा ट्रेंड मोठ्या स्वरुपात सुरू झाला आहे. एवढी रसिकता व लोकप्रियता भजन या पारंपरिक कलेची जिल्ह्यात आढळून येत आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद या मूलभूत विषयाला प्राधान्य देताना अन्य नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यासाठी तजवीज करीत असते; मात्र यावर्षी यात वेगळीकता जिल्हा परिषदेने दाखविली आहे. जिल्हा परिषदेत प्रशासक असलेल्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी यावर्षी भजनी मंडळांना साहित्य पुरविण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा परिषदेचे विद्यमान ग्रामपंचायत उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे यांनी पुणे जिल्हा परिषदेच्या धर्तीवर ही संकल्पना मांडली आहे. पुणे जिल्ह्यातील वारकऱ्यांना जिल्हा परिषद वाद्य साहित्य पुरविते. त्याप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने भजनी मंडळांना साहित्य पुरविण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, प्रशासनाने यासाठी मंडळ रजिस्टर असण्याची अट ठेवलेली नाही. 
सध्या यासाठी प्रस्ताव घेण्याचे काम सुरू आहे. प्रस्ताव सादर करण्यासाठी ग्रामीण भागातील भजन मंडळांची झुंबड उडालेली दिसत आहे. जिल्ह्यात ४३१ ग्रामपंचायती असल्या, तरी भजन मंडळांची संख्या हजारोंच्या संख्येने आहे. त्यामुळे कोणाला प्राधान्य दिले जाईल, हे निश्चित समजलेले नाही; मात्र ”पहिला प्रस्ताव, पहिले प्राधान्य” असा निकष असण्याची शक्यता आहे. उपलब्ध प्रस्तावांतून लॉटरी काढून लाभ दिला जाण्याचीही शक्यता आहे.
जिल्हा परिषदेच्या स्वनिधीतून ही योजना राबविण्यात येत आहे. यासाठी २५ लाख रुपयांची आर्थिक तरतूद केली आहे. एका मंडळाला दहा ते बारा हजार रुपयांचे साहित्य पुरविले जाणार आहे. यामध्ये एक मृदंग, पाच ते सहा टाळ, एक झांज या साहित्य संचाचा समावेश आहे. 
प्रस्ताव सादर करताना ग्रामसभा, मासिक सभेचा ठराव आवश्यक आहे. मंडळाची कार्यकारिणी यादी जोडणे गरजेचे आहे. मंडळ गावात कार्यरत असल्याबाबत ग्रामपंचायतीचा दाखला आवश्यक असून, पुरविण्यात येणारे साहित्य ठेवण्यासाठी जागा उपलब्ध असल्याबाबत मंडळाचा दाखला जोडणे गरजेचे आहे. पुरविण्यात येणाऱ्या साहित्याची देखभाल दुरुस्ती करण्यास तयार असल्याचा भजन मंडळाने दाखला जोडायचा असून, यासाठी गटविकास अधिकाऱ्यांची शिफारस आवश्यक आहे. मंडळाचे किमान १० ते १५ सदस्य असल्याची कार्यकारिणी यादी जोडायची आहे. यासाठी ३० ऑगस्टपर्यंत प्रस्ताव सादर करण्याची मुदत आहे.

Loading

Facebook Comments Box

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search

Join Our Whatsapp Group.