मी एक घर बोलतेय, तुम्ही चाकरमानी आलात की भरलेले आणि बाकी पूर्ण वर्षभर ओसाड असलेल्या घरापैकी वाडीतील एक घर… खूप आहे मनात बोलण्यासारखे पण कधी काही बोलले नाही.. यावर्षी अगदी राहावले नाही म्हणुन मी माझ्यात वर्षभर एकट्या राहणार्या एका आईची, एका आजीची आणि एका सासूची व्यथा ईथे मांडत आहे ….
मी एक घर बोलतेय… गणपती मुक्कामाला गेलेत तसा तू पण आल्या वाटेने पाहुण्यांसारखा आपल्या शहरातील ”घरी” परतलास. तुझ्या आईने जाताना तुला पाणावलेल्या डोळ्याने “बाबू सांभाळून जा, कामधंदो जीव सांभाळून कर, फोन करीत रव” अशा शब्दात निरोप दिला.
निरोप देवून मागे फिरली आणि माझ्याकडे पाहिले,ओट्यावर येवून खूप रडली रे ती. माझ्याकडे पाहून का रडली असेल? या प्रश्नाचे उत्तर तुलाही माहीत आहे. चतुर्थी सणात जे रूप मला आले होते ते पूर्ण बदलले, कदाचित भकास झालेले रूप पाहून ती रडली असेल.
आता माझ्यात (घरात) पुढील कित्येक दिवस नको नकोशी वाटणारी शांतता असेल. या घरात आता तिच्या नातवंडांची किलबिल नसेल. तिला साद घालणारे किंवा तिने कोणाला साद घालावी असे कोणीही नसेल. तोंड असून मुक्या सारखे तिला जगावे लागेल. कधी बाबू तुझा फोन आला तेव्हाच फक्त तिचा आवाज मला यापुढे ऐकू येईल. दिवस तर ठीक आहे मात्र रात्र खूपच भयानक आणि एकाकी असणार रे तिच्यासाठी. ८/१० खोल्या असल्या तरी फक्त एकाच खोलीत लाईट लागलेली असेल. ती पण जेमतेम संध्याकाळी ८ वाजेपर्यंत.
कोरी चाय (चहा) जरी दिवसातून चार वेळा असली तरी ”एकटी साठी कित्याक व्हया” असा विचार करून तिच्या जेवणात फक्त पेज, मसाला आणि भात आणि कधीतरी भाकरी हेच असेल. कधी सणावाराला ”वाडी” घालण्यासाठी एखादा गोडधोड पदार्थ असेल. कधी आजारी पडली तर काळजी घेणारे कोणीच नसणार. जेवण तर दूरची गोष्ट पाणी पण देणारे आता कोणी नसणार. कधी कधी तर भीती पण वाटायला लागणार की एखाद्या आजारपणात अगदी एकटेपणात जीवच जायचा.
बाबू तू तिची सर्व सोय केलीस, तिला जाताना पैसे दिलेस, वाडीतील लोकांना तिच्याकडे लक्ष द्यायला सांगितलास. दर दोन दिवसांनी फोन तर तू करणारच आहे. मात्र तीची सर्व सुख तुझ्यासोबत घेऊन गेलास रे. आता चतुर्थी सणाला ती खरे आयुष्य जगली. पुढे तू पुन्हा येईपर्यंत ती जे जगणार त्याला जगणे म्हणतात की नाही हा मला प्रश्न पडलाय. पोटापाण्यासाठी तुला जावे लागले हे मान्य, मात्र तू शक्य तितक्या दिवशी येथे येत जा रे. ” या वेळी सुट्टी नाय/मुलांची परीक्षा हा, यावेळी यायला जमणार नाही ” अशी कारणे देताना दहावेळा तिचा विचार कर. एवढीच विनंती आहे माझी तुला….
महेश धुरी, सावंतवाडी
Vision Abroad