कुडाळ:साळगाव- वरची धुरीवाडी येथील अभिषेक सत्यवान धुरी यांच्या मालकीच्या गोपाळ गंगा दूध डेअरीला आग लागल्याची घटना मंगळवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली. या आगीत आतील मशिनरी व दुग्धजन्य पदार्थ तसेच अन्य साहित्य . मिळून सुमारे ३५ लाख रु. चे नुकसान झाले. चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. या घटनेची नोंद कुडाळ पोलीस ठाण्यात गुरुवारी करण्यात आली. अभिषेक धुरी यांनी तीन वर्षांपूर्वी साळगाव- वरची धुरीवाडी येथे ‘गोपाळ गंगा’ नावाने दूध डेअरी सुरू केली. २४ ऑक्टोबर रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास यातील मशिनरीच्या भागातून धूर येऊन आग लागली असल्याचे तेथीलच संजय धुरी यांनी पाहिले. त्यांनी लागलीच अभिषेक धुरी यांना त्याबाबत कल्पना दिली. त्यानंतर मालक धुरी यांच्यासह संजय धुरी, शशी धुरी, प्रसाद परुळेकर, जेरॉन फर्नांडिस व अन्य ग्रामस्थांनी धाव घेत डेअरीमध्ये असलेल्या पाण्याचा वापर करून ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. सतत पाण्याचा मारा करून ही आग मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास आटोक्यात आणण्यात यश आले. तोपर्यंत आतील किमती मशिनरी व साठवून ठेपलेले दुग्धजन्य पदार्थ जळून खाक झाले. यामध्ये सुमारे ३५ लाख रु. चे नुकसान झाल्याचे कुडाळ पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत धुरी यांनी म्हटले आहे.
घटनेच्या दिवशी दसरा सण असल्याने डेअरी बंद होती. रात्रीच्या वेळी घटना घडली. शेजारच्या व्यक्तींनी डेअरीला आग लागली असल्याचे सांगितले. या घटनेत २ हजार ७०० किलोचा तुपाचा साठा, मिल्क टेस्टिंग मशीन, मिल्क पॅकिंग मशीन, पॅकेजिंग मटेरिअल, होमोनायझर, मिल्क पाऊच पॅकिंग मशीन, मशीनच्या मोटर्स आदी सुमारे ३५ लाखांचे साहित्य आगीत जळून खाक झाले. ही आग नेमकी कशामुळे लागली हे समजू शकले नाही. शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी, अशी शक्यता धुरी यांनी व्यक्त केली. कुडाळचे पोलीस हवालदार सचिन गवस व अमोल महाडिक यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. याबाबतचा अधिक तपास हवालदार ममता जाधव करीत आहेत.
Facebook Comments Box
Vision Abroad